मधुरीमा पर्व २ (भाग १०)

कथा मधुराची, कथा रीमाची, कथा सच्च्या मैत्रीची




मधुरीमा पर्व २ (भाग १०)

मधुराने अरविंदला 'मधुरीमा' जॉईन करण्याचा सल्ला दिला. दुर्गाबाईंना बहुतेक तो पटला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी अगदी स्पष्ट दिसत होती.

"नितीन काय म्हणतोय? तोसुद्धा इकडेच येणार का?" अरविंदने मधुराला विचारलं.

"नाही रे. तो कशाला इकडे येतोय. मुंबईत चांगला जम बसलाय त्याचा. आणि तसंही त्याला इकडे परत सगळं सेटअप करावं लागेल. आपल्यासारखा त्याला 'मधुरीमा'चा काहीच फायदा होणार नाही." मधुरा

"अच्छा,मग तू तिकडे जाणार तर?" अरविंद

"सध्या तरी नाही. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ठेऊ आम्ही. नंतर पुढचं पुढे बघू. पण तू मात्र सिरीयसली विचार कर बरं माझ्या ऑफरचा. इथं सगळं सेटअप रेडीच आहे. तू फक्त कधी जॉईन होतोय ते सांग." मधुरा बोलली त्यावर अरविंदने विचार करायला वेळ मागितला. अजून थोडा वेळ गप्पा करून अरविंद आणि त्याच्या घरचे परत जायला निघाले. त्यांची संध्याकाळची ट्रेन होती. सुनीताताईंनी त्यांच्यासोबत रात्रीच्या जेवणाचा डब्बा दिला. निरोप घेऊन सर्व निघाले.


"आता किती वेळ लागेल पोहोचायला? दोन दिवस लागतील का?" मधुकरराव चौकशी करत होते.


"दोन दिवस कुठले? आता या ट्रेनने मुंबई आणि तिथून विमानाने कोलकाता." अरविंद

"हे बरं केलंत विमानाने जाताय तर वेळ वाचेल. ठीक आहे. येत जा हो रीमाला भेटायला. हॉस्पिटल जॉईन करण्याबाबत तुमचा निरोप लवकर कळवा मग. कसं आहे रीमाची मेहनत आम्हाला माहितीये… म्हणून मधुराने हा प्रस्ताव ठेवला… बघा पटतोय का? योग्य निर्णय घ्याल तुम्ही…आम्ही वाट बघतोय. " मधुकरराव म्हणाले. 

अरविंदला स्टेशनवर सोडायला रीमा आणि मधुरा दोघीही गेल्या होत्या. दुर्गाबाई आणि अर्णवला सीटवर बसवून अरविंद ट्रेनच्या बोगीच्या दारात उभा होता.

"रीमा, तू काळजी करू नको. मला मधुराचा विचार पटलाय. आईला मनवणं अवघड आहे. थोड्या जुन्या विचारांची आहे ना ती. पण मी तिला सर्व पटवून देईल. आणि आता सरळ वरात घेऊनच येईल आणि इकडचाच होऊन जाईल. झालं तर मग? तू मात्र आपल्यासाठी नवीन घर बघ. काळजी करू नको, त्या घराचे पैसे मीच देईल. तुला यासाठी सांगतोय की तू इथे राहतेस तर तुला जास्त माहीत असणार ना." अरविंद बोलत होता. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजली आणि ट्रेन निघाली. अरविंद हात हलवून निरोप घेत होता. मधुरा आणि रीमा दोघींनीही त्याला बाय म्हटलं. ट्रेनची स्पीड वाढली आणि अरविंदची बोगी झरझर पुढे जाऊ लागली. मधुरा आणि रीमा तिथेच थांबून होत्या. ट्रेन निघून गेली. 

"चला, जायचं का घरी?" मधुरा रीमाला म्हणाली. रीमाचे डोळे डबडबले होते.

"ये दुरीया… फना हो सभी दुरीया…" मधुरा तिला चिडवत होती. पण रीमा चिडलीही नाही आणि काहीच बोलली नाही.

"काय झालं रीमा?" मधुराने विचारलं. रीमाने नकारात्मक मान हलवली.


"अच्छा, चल मग… ते बघ... तो दूर एक बाकडा आहे ना त्यावर बसू." मधुरा प्लॅटफॉर्म संपत आल्यावर शेवटी असणाऱ्या बाकड्याकडे बोट दाखवून म्हणाली. दोघी तिथे जाऊन बसल्या. बराचवेळ शांततेत गेला. सूर्य अस्ताला जात होता. पिवळसर प्रकाश सगळीकडं पसरला होता.

"मधु." रीमा म्हणाली.

"बोल बोल. तुझ्यासाठीच इथं थांबलोय आपण." मधुरा

"किती सहज प्रश्न सोडवला गं तू…" रीमा

"त्यात काय प्रश्न सोडवला? कोणाला तरी एकाला ही गोष्ट करावीच लागणार होती. ती गोष्ट अरविंदही करूच शकतो ना? त्याच्यासाठी हे जास्त सोपं होतं. म्हणजे तू तिकडे जाऊनही जॉब वगैरे करू शकली असती किंवा स्वतःचं हॉस्पिटल सुरू करू शकली असती. पण तू मधुरीमा सोडू नये अशी माझी इच्छा होती. आणि त्यासाठी मी विचार मांडून पाहिला. तसंही 'मधुरीमा'साठी, माझ्यासाठी तू काय आहेस हे शब्दात सांगणं अवघड आहे." मधुरा उसासा टाकत बोलली.


"एवढी काही मी महान वगैरे नाहीये." रीमा


"मी कुठं म्हटलं तू महान आहेस? लोकं लगेचच हरभऱ्याच्या झाडावर चढतात." मधुरा तिला चिडवत होती.


"मधे, तू काही सुधारायची नाहीस." रीमा


"सुधरायचं वय गेलं गं आपलं. पण रीमा एक काळजी घेशील बरं." मधुरा थोडी सिरीयस झाली


"काय गं?" रीमा सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होती.


"हरभऱ्याच्या झाडावरून हळूच उतर हो… लागेल नाही तर…" मधुराने परत चिडवलं आणि रीमाने चिडून तिच्या हातावर झापड मारली.

"बरं वाटतंय का? झाला मूड चांगला? सकाळपासून तोंडावर बारा वाजलेले होते. जसं काही वाघासमोर बांधून ठेवलं होतं." मधुरा

"माहिती नाही गं मधु… एक कम्फर्ट झोन असतो ना… तोच सापडत नव्हता… त्यात अरविंदची आई सारखी वाघासारखी खाऊ का गिळू अशा नजरेने माझ्याकडं बघत होती." रीमा

"वाघासारखी नाही गं…." मधुरा

"मग?" रीमा

"मारक्या म्हशीसारखी…" मधुरा म्हणाली आणि दोघी अगदी खळखळून हसल्या.


"मधे, लोकं बघतील तर काय म्हणतील? काय त्या डॉक्टर… काय त्यांच्या गप्पा…! तेही असं प्लॅटफॉर्मवर बसून!" रीमा


"म्हणू दे गं… आपण काय माणूस नाही का… की आपल्याला मन नाही…? जाऊ दे… गयी दुनिया भाडमें…!" मधुरा

"पण एक मात्र बरं झालं… मला सासू मिळाली… आता आपण वेळ मिळाला की बाकीच्या बायकांसारख्या सासुवर गप्पा करत जाऊ…" रीमा

"गप्पा नाही गं… त्याला चुगल्या म्हणतात…" मधुरा म्हणाली आणि पुन्हा एक हास्याची कारंजी उडाली. दोघीजणी आज कितीतरी दिवसांनी अगदी मनसोक्त गप्पा करत बसल्या होत्या, मनमोकळ्या हसत होत्या. त्यांना बघून सूर्यही क्षितिजावर रेंगाळला होता.


क्रमशः
© डॉ.किमया मुळावकर

🎭 Series Post

View all