मधुरीमा पर्व २ (भाग ७)

कथा मधुराची, कथा रीमाची... कथा सच्च्या मैत्रीची

मधुरीमा पर्व २ (भाग ७)


मधुराने रीमाला फोन लावला होता पण रीमाने फोन उचलला नाही. मधुराने थोड्यावेळाने परत फोन लावला. रीमाने तेव्हाही फोन उचलला नाही. दुपारी थोडा निवांत वेळ मिळाल्यावर तिने नितीनला फोन लावला. नितीनसोबत बोलून मधुरा बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.

दुसऱ्या दिवशी रीमा सकाळी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या तिला रिसेप्शन काऊंटरवर दोन सिस्टर गप्पा मारताना दिसल्या.

"ही वेळ गप्पा मारायची आहे का? चला आपापली कामं करा." रीमा दोघींवर विनाकारण ओरडली. बोलता बोलता तिने हॉस्पिटलचा बदललेला चेहरामोहरा पहिला, तिला त्या गोष्टीची अजूनच चीड आली. तावातावाने ती तिच्या केबिनमध्ये गेली. मधुरा तिच्या केबिनमध्ये होती. दोघींच्या केबिनला जोडणारा कॉमन दरवाजा उघडाच होता. मधुराचं लक्ष रीमाकडे गेलं.


"रीमा, चल राऊंड घेऊयात." मधुरा रीमाच्या केबिनमध्ये जात बोलली.


"हो." रीमा नाराजीतच म्हणाली आणि मधुरासोबत राऊंड घ्यायला गेली. रीमा मधुरासोबत पेशंटच्या व्यतिरिक्त बाकी एक शब्दही बोलली नाही. राऊंड घेत घेत दोघी मधुराच्या त्या पेशंटजवळ आल्या. रीमा मात्र त्या पेशंटला न बघताच निघून गेली. मधुराने पेशंटला तपासलं आणि दोन दिवसाने सुट्टी करता येईल असं तिच्या नातेवाईकांना सांगितलं.


"रीमाला माझा एवढा राग आलाय? खरंच माझाच राग आहे की अजून दुसरी कोणती गोष्ट आहे. मला काहीही करून आजच रीमासोबत बोलावं लागेल." स्वतःच्याच विचारात मधुरा केबिनमध्ये आली. हॉस्पिटलमध्ये पेशंटची भरपूर गर्दी होती. संध्याकाळपर्यंत दोघींना जराही सवड मिळाली नाही. संध्याकाळी सर्व पेशंटची गर्दी ओसरल्यावर मधुरा रीमाच्या केबीनमध्ये आली त्यापूर्वी तिने स्ट्रॉंग कॉफीची ऑर्डर दिली.


"अजून राग आहेच का?" मधुराने कॉफीचा मग रीमाकडे सरकवला.


"राग? मला कशाला येईल?" रीमा


"मग नीट बोलत का नाहीयेस?" मधुरा


"मी बोलण्याने न बोलण्याने कोणाला काही फरक पडतो का? रादर, मी असले काय की नसले काय, कोणाला फरक पडणार आहे? जो तो आपला निर्णय घ्यायला मोकळा आहे." रीमा


"रीमा, स्पष्ट सांग काय झालंय नेमकं? परवाच्या मॅटरवर एवढी चिडणारी तू नाहीयेस… तुझं ना दुसऱ्याच गोष्टीवरून काहीतरी बिनसलंय, काय झालंय सांगशील का? तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे." मधुराने मैत्रीची शपथ घातल्यावर मात्र रीमाचा नाईलाज झाला.


"मधु, काय सांगू गं? तुला तर माहितीच आहे आई किती लग्नाच्या मागे लागलीये. पण अरविंदला म्हणावं तशी लग्नाबद्दल एक्साईटमेंट नाहीये… लग्नाचा विषय निघाला की तो ना नेहमीच टाळायचा बोलायला… खूप मागे लागल्यावर त्याने सांगितलं की त्याच्या आईला हे आंतरजातीय लग्न मान्य नाही म्हणून… मधु, तू सांग, आयुष्याच्या या वळणावर आलोत आपण, एवढं वय झालं आपलं तरी अजूनही आपण आपला निर्णय घेऊ शकत नाही तर काय उपयोग गं नुसतं वयाने मोठं होण्याचा… आता त्याची आई नाही म्हणत असेल लग्नाला आणि आईचं ऐकून तो लग्नाला तयार नसेल तर मग माझ्या आयुष्यात पुन्हा आलाच कशाला तो? माझं माझं खूप चांगलं आणि सुरळीत सुरू होतं ना सगळं… मी नव्हते गेले ना त्याच्याकडे, तोच आला होता, आपल्याच कार्यक्रमात येऊन त्यानेच लग्नाची मागणी घातली होती, आठवतंय ना तुला? मधु, तो आल्यापासून ना नुसती चिडचिड वाढलीये माझी. कधी कधी वाटतं आपण उगीच होकार दिला त्याला." रीमा उद्विग्नपणे बोलत होती.


मधुराने तिच्या खांद्यावर हात ठेवला.


"रीमा, तुम्ही ना एकदा भेटा. समोरासमोर बसून बोला. त्याच्या आईला इकडे या म्हणावं. आपलं हॉस्पिटल, तुझं घर दाखव… त्यांनाही कळू दे की त्यांची होणारी सून किती कर्तृत्ववान आहे. असं फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून जे काही गैरसमज असतील ते सहज दूर होतील. मोकळं बोला गं थोडं… आणि अजून एक, आता ह्या गोष्टींचा जास्त विचार करू नको. मी तुझ्यासोबत आहे. सगळं नीट होईल." मधुराच्या शब्दाने रीमाला थोडा धीर आला. रीमा पुन्हा मधुरासोबत पूर्वीसारखं बोलायला लागली होती. मैत्रीवर चढलेलं अबोल्याचं मळभ दूर झालं होतं.


दोन दिवस अगदी घाईतच गेले. मधुरा आणि रीमा सर्व कामं आटोपून मधुराच्या केबिनमध्ये बसून एका पेशंटच्या पुढच्या ट्रीटमेंटबद्दल चर्चा करत होत्या. तेवढ्यात सारिका तिथे आली.


"मॅडम, आत येऊ का?" केबिनचं दार थोडं किलकिलं करत सारिका म्हणाली. मधुराने तिला मान हलवून हो म्हटलं आणि सारिका आत आली.


"मॅडम, तो त्यादिवशीचा राडा घातलेल्या पेशंटचा नवरा तुम्हाला भेटायचं म्हणतोय. आज डिस्चार्ज आहे त्याच्या बायकोला." सारिका


"ठीक आहे, आत पाठव त्यांना." मधुरा


"आता हॉस्पिटलच्या बिलावरून काही गोंधळ घालू नये म्हणजे मिळालं." रीमा पुटपुटली. तितक्यात तो माणूस आत आला.


"माफ करा मॅडम. ते त्यादिवशी जरा… एका डॉक्टरने मरणाच्या दारात लोटलं म्हणून मग सगळेच डॉक्टर तसेच असतात असाच गैरसमज झाला. तुमच्यामुळं आज माझ्या मुलींना त्यांची आई जीवंत दिसतेय." तो माणूस हात जोडून म्हणाला.


"आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलं बाकी काही नाही." मधुरा


"ठीक आहे मॅडम, येतो आम्ही. कधीही, काहीही अगदी कोणतीही मदत लागली तर या सूरजभाईला सांगा, आपल्या मोठ्या बहिणीसारख्याच आहात तुम्ही, आपला शब्द म्हणजे शब्द... तसंही आपली लै दूरवर ओळख आहे. तो आपल्या शहरातला जुना पूल नाही का त्याच्या खाली लागूनच जी झोपडपट्टी आहे ना तिकडंच राहतो मी. सूरजभाई म्हटलं तर कोणीही सांगेल. ते काय आमच्या धंद्यामुळं सारखे फोन बदलत राहतो ना मी… म्हणून सरळ घराचा पत्ता सांगितला. येतो मी." तो माणूस एवढं बोलून निघून गेला.


"आता तुला या माणसाचं काम पडणार आहे का कधी? काहीही… काय तर म्हणे काही मदत लागली तर सांगा… माझी बहिण…" रीमा वाकडं तोंड करत बोलली.


"जाऊ दे ना. गेला तो. आणि अजून एक… आयुष्यात कधी कुणाची कुठे गरज पडेल हे काही सांगता येत नसतं बरं…." मधुरा डोळे मिचकावत बोलली.

"हो… आता काय बाई... भाऊ मिळाला ना तुला… काय तर नाव… सूरजभाई… बाकी बुद्धीच्या बाबतीत सगळाच अंधार..." रीमा तिची री ओढत होती. दोघीजणी कितीतरी दिवसांनी खळखळून हसल्या.


क्रमशः


(खरंच मधुराला सूरजभाई ची काही मदत लागेल का पुढे? की हा एक नुसता योगायोग असेल… त्यासाठी वाचत राहा मधुरीमा)

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all