मधुरीमा पर्व २ (भाग २२)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग २२)

मधुराच्या मागावर असणाऱ्या इसमाविरुद्ध मधुरा आणि रीमा पोलीस कंपलेंट देऊन आल्या होत्या. दिवस झरझर पुढं सरकत होते. पोलीस कंपलेंट केल्यापासून मात्र मधुराच्या मागावर कुणी आढळून आलं नाही. त्यामुळं मधुरा आणि रीमा दोघी थोड्या रिलॅक्स झाल्या.

“मधु, येत्या रविवारी आम्ही लग्न करतोय.” एक दिवस ओ पी डी मध्ये आल्या आल्या रीमा मधुराला म्हणाली.


“आत्ता! ह्या रविवारी!” मधुराला आश्चर्य वाटलं.


“हो, त्यादिवशी अरविंद घरी आला होता. त्याने आईला स्पष्ट सांगितलं आणि आईसुद्धा म्हणत होती की उगीच लांबण लावण्यापेक्षा लवकर लग्न करून घेऊ आणि तसंही मंदिरातच लग्न करायचं आहे तर मग जास्त काही तयारी वगैरे लागणार नाही.” रीमा


“ठीक आहे ना. आज आपण संध्याकाळी शॉपिंगला जाऊ, मस्त साडी घेऊ तुझ्यासाठी… आणि अजून थोडे दागदागिने पण घेऊ.” मधुरा


“तसंही मंदिरातच लग्न करायचंय, कशाला उगीचच शॉपिंग वगैरे.” रीमा


“म्हणजे काय दाखवण्यासाठी शॉपिंग करायची असते का? कमॉन यार, लग्न आहे तुझं. तुझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा… आणि हजार पाचशे लोकं नसले म्हणून काय झालं? सगळं रीती रिवाजाप्रमाणे करणार आहोत ना, करूया आपण सगळं व्यवस्थित. तेवढंच दोघी हिंडू फिरू मस्त.” मधुरा म्हणाली. रीमाने तिला हसून होकार भरला. रीमाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती.


अरविंदने ठरवल्यानुसार रीमा आणि अरविंद ह्यांचा विधिपूर्वक लग्न सोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. लग्नानंतर दोघांनी हॉटेलमध्ये एक छोटीशी पार्टी ठेवली होती. पार्टीसाठी अगदी मोजकेच आणि जवळचे लोकं उपस्थित होते. मधुराला त्यादिवशी नेमका तिथं पोहोचायला उशीर झाला होता.


“सॉरी हां रीमा, पोहोचायला उशीर झाला. अगं वेळेवर एक पेशंट आली. सॉरी सॉरी… कॉंग्रेच्युलेशन्स मि. अँड मिसेस अरविंद.” मधुराने हातातला बुके रीमा आणि अरविंदला दिला.


“दी डॉक्टर मधुरा… खरं तर थँक्स… तुम्ही आमच्या ह्या छोट्याश्या पार्टीत आलात. तसंही इतकावेळ आम्ही तुमच्याच नावाचा जप करत होतो… मधु आली नाही… मधु आली नाही अजून” अरविंद थोडा खोचक बोलला तरी मधुरानं चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला.


“अरविंद काय हे?” रीमा


“अरे, तुम्ही लगेच जाम सिरीयस होता बुआ… थट्टा करू नाही का मी… शेवटी ती साली आहे माझी. काय मधुरा, तुला राग आला का?” अरविंद म्हणाला.


“अजिबात नाही. तुम्ही दोघे तुमचा वेळ एन्जॉय करा. आणि हो, रीमा नितीननी तुला सॉरी कळवलंय, त्याचं येणं जमलंच नाही… ट्राय केलं त्याने बरंच… ” मधुरा रीमाला म्हणाली आणि तिथून निघाली. अरविंदच्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं होतं. पण चेहऱ्यावरचे हावभाव लपवत ती तिथल्या एका चेअरवर बसली.


“मधुरा, जेवलीस की नाही गं?” सुनीताताई तिथं आल्या.


“काकू, जेवते मी थोड्यावेळात. बसा ना इथं.” मधुरा म्हणाली आणि सुनीताताई तिच्याजवळ बसल्या.


“काही म्हण मधुरा, देर आये पर दुरुस्त आये असं झालंय जावाईबापूचं… लग्नापासून आजच्या ह्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन त्यांनीच केलं. मला कुठं म्हणून डोकं लावायचं काम नाही पडलं की काही करायचं काम नाही पडलं. अगं रीमा इकडं नव्हती तेव्हा तर घराचं सगळं काम त्यांनी स्वतः करून घेतलं.” सुनीताताई जावयाचं कौतुक करत होत्या.

‘अरविंदचा स्वभाव काही कळत नाही. जेव्हाही बोलतो माझ्यासोबत, खोचकच बोलतो. काय माहिती, माझ्यासोबत असं का वागतो ते?’ मधुराच्या डोक्यात विचार सुरू होते.


“मधुरा, कुठं हरवली गं?” सुनीताताई


“काही नाही काकू, रोहित कुठं दिसत नाहीये?” मधुरा


“अगं तो काय, आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नात बघ कसं सगळं जबाबदारीनं करतोय. अगं हो, राधिकाताई आणि भावजी नाही आले?” सुनीताताई


“नीतीला बरं नाहीये, काल तिकडं मंदिरात खूप खेळली ना ती आणि थंडी हवा होती तिथं खूपच… ताप आलीये तिला.” मधुरा


“हो का? बरं, चल आपण तिकडे जाऊ, ते बघ दुर्गाबाई एकट्याच बसल्या आहेत.” सुनीताताई


“काकू, तुम्ही जा. मी इथंच बसते.” मधुरा म्हणाली आणि सुनीताताई तिथून निघाल्या. मधुरा रीमाकडं बघत होती. अरविंदसोबत बोलण्यात रीमा गुंग झाली होती.

क्रमशः

©® डॉ. किमया मुळावकर


🎭 Series Post

View all