Aug 16, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग १२)

Read Later
मधुरीमा (भाग १२)

 

 

मधुरीमा (भाग १२)

"बाबा, रविवारी तिकडे जाणार आहात, तर सोबत ड्रायव्हर न्या. एवढ्या दूर तुम्ही एकट्यानी ड्रायव्हिंग करायची नाही.  आणि जाताना तिकडे पोहोचायची घाई, येताना घरी यायची घाई म्हणून गाडी कुठेच रस्त्यात थांबवायची नाही असं करू नका. त्या ड्रायव्हरला चहा पाणी घ्यायला तरी गाडी थांबवा. त्याला घेऊ द्या चहा पाणी काय घ्यायचं ते, पण तुम्ही बाहेरचं काही खायचं-प्यायचं नाही. पाण्याची ती मोठी वॉटर बॅग घेऊन जा सोबत. आई, प्लिज स्वयंपाकवाल्या मावशींच्या मदतीने तुम्हाला रस्त्यात काही खायला बनवून घेशील. आणि हो, तिकडून शक्यतो लवकर निघा म्हणजे बराचसा प्रवास दिवसाच होईल. रात्री ड्रायव्हिंग कमी करावी लागेल." मधुरा आई बाबांना सूचना देत होती.
   "बरं माझी माय-माऊली. झालं तुझं सांगून की अजून काही बाकी आहे? " बाबा मधुरासमोर हात जोडून मुद्दामच तिची थट्टा करत बोलले.

"नाही अजून काही. सध्या तरी एवढंच आहे. पुन्हा काही आठवलं तर सांगेल अजून काही." मधुरा नाक फुगवत म्हणाली.

"तू अशी बोलायला लागली ना की माई ची खूप आठवण येते. ती पण अशीच बोलायची. काळजीनं... एखादं काम करताना हजार सूचना असायच्या तिच्या." बाबा.
 

" बाबा,  कशी होती हो आजी? बस फोटोतच पाहिलंय तिला."
"अगदी तुझ्यासारखीच". बाबा त्यांच्या आईच्या आठवणीत हरवत म्हणाले. तेव्हढ्यात मधुराचा फोन वाजला, हॉस्पिटलमधून फोन होता. मधुरा फोनवर बोलत तिच्या रूममध्ये गेली.

"आपली चिऊ किती लवकर मोठी झाली ना. आता उडून जाईल. स्वतःच घरटं बांधेल. तिच्या विश्वात रमून जाईल. आपल्या घरातला चिवचिवाट मात्र बंद होऊन जाईल." बोलता बोलता आईचा कंठ दाटून आला होता.

"कशाचा शांत होईल किलबिलाट मधुराच्या आई.. ती तिचे पिल्लं घेऊन येत जाईल. ती स्वतःच डॉन.. विचार करा तिचे पिल्लं कसे होतील." बाबा वातावरण हलकं करायसाठी बोलले. "पण खरं आहे, आपली मुलगी एवढी वर्षे बाहेर शिकायला होती, घरी येऊन जाऊन असायची पण तेव्हा काही नाही वाटायचं. आता मात्र ती लग्न करून
जाईल या कल्पनेने जीव सगळा कंठाशी येऊन बसतो." आई बाबा दोघेही आपापल्या डोळ्यातलं पाणी अडवायचा प्रयत्न करत होते. मधुरा दाराच्या मागून सगळं ऐकत होती. तिच्या अश्रूंचा बांध मात्र कधीचाच फुटला होता.

   ठरल्याप्रमाणे आई-बाबा रुद्रच्या गावी पोहोचले. एका मोठ्या वाड्यासमोर गाडी थांबली. जुनाच पण नवीन विचारसरणी ने सजलेला वाडा खरंच डोळ्यात भरण्यासारखाच होता. आष्टेकरांच्या आदरातिथ्याने मधुराचे आई बाबा भारावून गेले. धन, धान्य, समृद्धी, लक्ष्मी या सगळ्यांचा वास होता वाड्यात. सगळ्या कामांना नोकर-चाकर माणसं होती. जेवणात सुग्रास पदार्थांची रेलचेल होती. रुद्रच्या बाबांनी शेतीसुद्धा दाखवली मधुराच्या आई बाबांना. मधुराला चांगलं स्थळ मिळालं याचं समाधान झालं दोघांना. दोन्ही कुटुंबांनी मिळून एक महिन्यानंतरची साखरपुड्याची तारीख काढली होती आणि तीन महिन्यांनी लग्नाची.

"ते सगळं झालं हो, पण लग्नात मान-पान, देणं-घेणं याबद्दल बोलायचंच राहील की." रुद्रचे बाबा म्हणाले, तशा मधुराच्या आईच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या.
"तुम्ही सांगा, काय द्यायचं-घ्यायचं करायचं ते." मधुराचे बाबा.
"ते ...म्हणतात ना मुलगी आणि नारळ... पण आम्हला तुमची मुलगीच द्या. अगदी नारळ पण नको आम्हाला. आमच्याच शेतावर किती आहेत नारळ, तुम्हीच घेऊन जा हवे तितके. आता साखरपुडा, लग्न, पूजा वगैरेसाठी लागतीलच ना." रुद्रचे बाबा म्हणाले, अन धीरगंभीर झालेलं वातावरण क्षणात निवळलं. मधुराच्या आईचा जीव भांड्यात पडला. खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. मधुराचे आई बाबा परतीच्या प्रवासाठी निघाले. घरी आल्यानंतर आई मधुराला दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी सांगत होती. मधुराच्या डोळ्यासमोर चित्र उभ राहतं होत, मधुरा मनातल्या मनात नुसतं हसू येत होतं. पण मुद्दाम ती ते लपवत होती.

   दुसऱ्याच दिवशी मधुराने हॉस्पिटलमध्ये जाऊन राजीनामा दिला होता. हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे तिला आता एक महिना काम करायचे होते. डॉ. गिरीजा तिला म्हणाल्या सुध्दा, 'लग्नाला तर तीन महिने वेळ आहे, तू अजून काही दिवस जॉब करू शकतेस.' पण मधुराला आता पूर्ण वेळ आई बाबांसोबत घालवायचा होता. शिक्षणासाठी घराबाहेर पडताना एवढं जड नव्हतं गेलं. पण आता तिची आई बाबांना एकटं सोडायची इच्छा नव्हती. रुद्रचा विचार आला की नवीन संसाराची स्वप्न बघत होती, आई बाबांचा विचार आला की पुन्हा लग्न नको वाटत होतं, खूप द्विधा मनस्थिती होत होती मधुराची.

   मधुराच्या आई बाबांना रुद्रकडे भेटून येऊन आठ दिवस झाले होते. आई-बाबांची साखरपुड्याची तयारी सुरू झाली होती. कार्यक्रमासाठी हॉल, केटरिंग सगळं बुक झालं होतं. रात्रीची जेवणं आटोपून मधुरा आणि आई-बाबा बोलत होते. तेवढ्यात मधुराचा फोन वाजला, रीमाचा फोन होता.

"मधे, खडूस कुणिकडची... तुला काही वाटतं की नाही?... अशी कशी असशील गं तू..? एक साधा फोन नाही केलास मैत्रिणीला..." रीमा.

"तूच खडूस... डोळ्यांनी  दिसत असेल तर नीट बघ... तुझा मेल बॉक्स.. किती मेल्स केलेत मी... तुझा मॅसेज बॉक्स.. डझनभर माझेच मॅसेज असतील... अन् मोबाईलवर मिसकॉल पण बघ माझे किती आहेत ते... अन् मलाच खडूस म्हण...इंग्रजी, मराठी वाचता येतं ना..की विसरली तिकडं जाऊन..?"

"हो माझी माय... येतं सगळं... तेच पाहून फोन लावला ना... आणि सॉरी गं.. खरंच खूपच बिझी होता हा आठवडा.. अगं इथे आम्ही आमच्या डिपार्टमेंट तर्फे एक कॉन्फरन्स घेणार आहोत. बस, आमच्या सरांनी त्याचे काम वाटून दिले सगळ्यांना, तेच काम करणं सुरू होतं. रूमवर जेवण बनवायला वेळही नव्हता मिळत म्हणून मग बाहेरच खाल्लं..नाही गं सहन झालं, इकडे लोक सगळं वेगळंच खातात. दोन दिवस उलट्या होत्या नुसत्या म्हणून मग ऍडमिट होते, सलाईन लावलं होतं. तू बोल काय महत्वाचं बोलायचं होतं?"
 

"रीमा तुला तुझी काळजी नाही घाययची तर बोलूच नकोस..जाऊ दे ना... तसही तुला कुठे वेळ आहे... काही नाही... "

"मधे, उगीच भाव खाऊ नको हां... सॉरी म्हटलं ना मी... सांग ना..."

"काही नाही, माझं लग्न जमलंय एवढंच सांगायचं होतं."

"अच्छा एवढंच होय...... काय.....?  काय म्हणालीस....? कोणाशी जुळलं.....? म्हणजे कोणाचं नशीब फोडलंस तू.....? "

"म्हणजे तू मेल्स पण नाही ना पाहिले... मी तुला बायोडाटा मेल केला होता.. त्या अरविंदला तरी वेळ देतेस की नाही काय माहिती."

मधुरानी अरविंदच नाव घेतलं अन् रीमाच्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली. अरविंद नी तिच्यासोबत काय केलं हे मधुराला तिनी सांगितलंच नव्हतं. बोलताना अगदी तोंडापर्यंत आलं होतं, पण तिनी स्वतःला सावरलं, " जाऊ दे ना काय त्या अरविंदच्या मागे लागलीस... मग, काय म्हणतात दाजी?"

"कोण दाजी?" मधुराने आश्चर्याने विचारलं.

"कपाळ माझं ! अगं..  म्हणजे तुझा होणारा नवरा... माझा होणारा जीजू... दाजी."
 

"ए... दाजी-फिजी म्हणू नको आं... एक तर सरळ जीजू म्हण किंवा नावानी बोललीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही."

"बरं बाई... नाव तर सांग त्याचं."
 

"मी मेल केलाय तू वाचून घे काय नाव आहे ते."

"बरं मॅडम, त्याच्याशी पण असंच बोलतेस का?"
 

"बोलतच नाही. त्यानी अजून फोन केला नाही कधी, अन मी पण केला नाही."

"हो, अन् स्वतःहून फोन करणाऱ्यातली तू नाहीस."

"हो, मग, माझं काय एकटीचं लग्न ठरलंय का? त्याच पण ठरलंय ना? मग त्यानी करावा ना फोन."

"मधे, कधी सुधारशील?"

"कधीच नाही."

"नकोस सुधरु कधी.. अशीच राहा.."

"हं... अशीच आहे मी... बरं.. साखरपुड्याला नाही आलीस तरी मी काही म्हणणार नाही. पण लग्नाला मात्र तू आलीच पाहिजेस. आतापासून रिझर्वेशन, परमिशन वगैर सगळं करून ठेव. मी कोणतेच बहाणे ऐकणार नाही तुझे."
 

"तुझं लग्न आणि मी येणार नाही असं होईल का बरं? नक्की येईल मी लग्नाला. चल करते फोन नंतर.. मेल बघते तुझा.. काय नाव आहे त्या कमनशिबी माणसाचं ते.." रीमाने मधुराला चिडवतच फोन ठेवला.

   त्या दोघींचं शेवटी शेवटी जे बोलणं ते मधुराच्या आईच्या कानावर पडलं. "खरंच, मधुरा अन् रुद्रचं काहीच बोलणं नाही झालं आतापर्यंत. पाहायला आले होते ते लोक त्यादिवशी तर अगदी जुजबी बोलणं झालं होतं, अगदी नाहीच्या बरोबरचं. आपण रुद्रचा नंबर मागून घ्यायला हवा होता. पण त्यानीसुध्दा एक पण फोन करू नये. आमच्यावेळी तर किती बंधन होती, पण तेव्हा यांनी कस लपूनछपून पत्र पाठवलं होतं. आता तर तसं काही नाहीये. मग का बरं रुद्रनी कॉल नसेल केला? मला तर बाई वेगळीच शंका येतेय. मधुराच्या बाबांशी बोलतेच एकदा." आईच्या मनात विचार आला. आणि तिनी लगेच तो मधुराच्या बाबांना बोलून दाखवला. त्यांनासुद्धा काय करावे ते कळलं नाही. "उद्या एकदा दिनकरशी बोलून रुद्रचा नंबर घेतो."असं त्यांनी ठरवलं.
 

क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न