मधुरीमा पर्व २ (भाग ६)

कथा मधुराची... कथा रीमाची... कथा सच्च्या मैत्रीची




मधुरीमा पर्व २ (भाग ६)


सकाळी घरी जाताना मधुरा सिग्नल लागला म्हणून चौकात थांबली होती. तेव्हा तिच्या बाजूला एक माणूस येऊन थांबला. मधुरा त्याला बघून चांगलीच घाबरली आणि त्या इसमाला घराचा पत्ता कळू नये म्हणून वाट दिसेल तिकडे गाडी नेऊ लागली. तो माणूस बऱ्याचवेळपर्यंत तिचा पाठलाग करत तिच्या मागेच येत होता. मधुरा अत्यंत वेगाने गाडी चालवत होती आणि अचानकच तो मनुष्य दिसेनासा झाला. तो मनुष्य आपल्या मागे येत नाहीये याची खातरजमा झाल्यावर मधुराने घराकडे गाडी वळवली. एरव्ही हॉस्पिटलमधून दहा-पंधरा मिनिटांत घरी पोहोचणारी मधुरा आज जवळपास तासाभराने घरी पोहोचली होती.


मधुरा घरी आली तेव्हा राधिकाताई अंगणात झाडांना पाणी घालत होत्या.


"आई, बाबा कुठे गेलेत? अजून झोपलेले आहेत का? बरं वाटतंय ना त्यांना?" मधुरा


"हो गं. सकाळी उठले आणि रोजच्यासारखे फिरायला गेलेत." राधिकाताई


"हे काय आई, मी म्हटलं होतं ना, काही फिरायला वगैरे जायची गरज नाहीये म्हणून." मधुरा चिडली होती.


"तूच सांग बाई तुझ्या बाबांना. आमचं काही ऐकतात का ते." राधिकाताई


"मी काही म्हणतेय तर त्या मागे काही कारण असेल ना? तुम्ही लोकं कधी समजूनच घेत नाही." मधुरा चांगलीच चिडून होती आणि बोलता बोलता तिला एकदम रडायला आलं. तेवढ्यात मधुकरराव घरी परतले. मधुराच्या एकंदरीत वागण्यावरून तिचं काहीतरी बिनसलंय हे त्यांना कळलं होतं. राधिकाताईंनी बनवलेल्या चहाचा कप घेऊन ते मधुराजवळ येऊन बसले. मधुरा मात्र त्यांच्यासोबत एकही शब्द बोलत नव्हती.


"बरं का मधुराच्या आई… नीतिच्या आईला राग आलाय बरं… अरे! नीतिची आई कुठे… ती तर नीतिची मम्मा आहे. मी तर विसरलोच होतो." मधुकरराव वातवरण हलकं करायचा प्रयत्न करत होते. मधुराने रागानेच त्यांच्याकडे पाहिलं.


"मधू, काय झालंय?" मधुकररावांनी डायरेक्ट विषयाला हात घातला.


मधुराला एकदम रडायलाच आलं. तिने कालपासून घडलेली सर्व हकीकत मधुकररावांना सांगितली.


"बाबा, मला ना खूप भीती वाटते आजकाल. तो माणूस बऱ्याचदा हॉस्पिटलच्या बाहेर उभा असतो. बरं तो माणूस मला एकटीलाच कसा काय दिसतो? रीमा सोबत असली की मी तिला त्याबद्दल बोलेपर्यंत तो माणूस गायब झालेला असतो… आणि आज… आज तर कहरच झाला… तो माणूस माझ्या मागेच आला… नेमकं माझ्यामागे कोण लागलंय काही कळायला मार्ग नाही. बाबा, काही समजत नाहीये… मी काय करू? मला ना तुमच्या सर्वांची खूप काळजी वाटतेय. तुम्ही प्लिज एकटे कुठेच जात जाऊ नका." मधुरा


"मधु, काळजी नको करू बेटा. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत? तू म्हणत असशील तर आपण पोलिसांत तक्रार नोंदवायची का?" मधुकरराव


"सध्या नको… ऍकच्युअली… मला माहिती नाही काय करायचं ते…" मधुरा


"ठीक आहे. तू म्हणशील तेव्हा आपण तक्रार नोंदवू. बरं एक सांग, नितीनला फोन केला होतास का?" मधुकरराव


"बाबा, ते…" मधुराने मान खाली घातली.


"असं नाही करायचं… एखादा फोन कर त्याला… त्यालाही जरा बरं वाटेल." मधुकरराव बोलले त्यावर मधुराने होकार भरला. तेवढ्यात नीति झोपेतून उठली. नीति दिसल्याबरोबर मधुराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि नीतिजवळ गेली. दोघी मायलेकींच्या गप्पा,धिंगाणा, मस्त्या सुरु झाल्या. नीतिच्या मागे मागे मधुरा धावत होती. मधुकरराव दोघींकडे कौतुकाने बघत होते. राधिकाताई मात्र कसल्याशा विचारात होत्या. तेवढ्यात मधुकररावांच लक्ष राधिकताईंकडे गेलं.


"मधुराच्या आई, कसला विचार करताय?" मधुकरराव


"अहो, मी काय म्हणते, तुम्हीच नितीनला फोन लावून बोला ना एकदा. आजकाल ना मला मधुरा फार डिस्टर्ब वाटते. त्या माणसाबद्दल बोलते, पण रीमा म्हणते तसं कोणीच तिला दिसत नाही. खरंच मधुराला भास होतात आहे की कोणी तिच्या मागावर आहे. आधी एवढी औषधी सुरु होती तिला, त्याचे तर दुष्परिणाम नसतील ना हे? आणि जर खरंच तिच्या मागावर कोणी असेल तर मग नेमकं कोण असेल? मला बाई खूप काळजी वाटतेय पोरीची." राधिकाताई


"मधुराच्या आई, काळजी करू नका. मी बोलतो नितीनसोबत. ठीक आहे?" मधुकरराव म्हणाले आणि राधिकाताई उठून आपल्या लेकीच्या मागे गेल्या.


नीतिसोबत थोडा वेळ घालवून, फ्रेश होऊन मधुरा परत हॉस्पिटलमध्ये आली. हॉस्पिटलमध्ये येतांना तिचं सगळं लक्ष मात्र रस्त्यावरच होतं. आपल्या मागे कोणी येत नाहीये ना याची तिला आता धास्ती वाटत होती. मधुरा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर काल जिथे सगळी तोडफोड झाली होती तिथे रिपेअरिंगच काम सुरू झालं होतं. मधुरा दिसली तशी रिसेप्शनिस्ट धावत तिच्याजवळ आली.


"हे काय? हे काम कोणी सुरू केलं?" मधुराने तिला विचारलं. तिने त्या गुंड माणसाकडे बोट दाखवलं. तेवढ्यात तो माणूसही मधुराजवळ आला.


"माफ करा मॅडम, काल आम्ही ही तोडफोड केली. आजच्या आज हे सगळं दुरुस्त करून घेतो की नाही ते बघा." तो माणूस बोलत होता. मधुरा मात्र त्याला काही उत्तर न देताच तिथून निघाली.


"कांचन, रीमा मॅडम येऊन गेल्या का राऊंडसाठी?" मधुरा कांचन सिस्टरसोबत बोलत केबिनकडे जात होती.


"नाही मॅडम, अजून आल्या नाहीत." कांचन


"बरं, काही फोन वगैरे आला का तिचा?" मधुरा


"नाही." कांचन म्हणाली. मधुराला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. रीमा सहसा कधी कोणती गोष्ट धरून ठेवत नव्हती आणि एखादी गोष्ट पटली नाही तरी त्या गोष्टींचे पडसाद  पेशंटवर कधीच येत नसत. आज पहिल्यांदा असं झालं होतं की रीमा एवढं अलिप्त वागली होती.


मधुराने कांचनसोबत राऊंड घेतला. सगळे पेशंट स्टेबल होते तरी मधुरा दिवसभर हॉस्पिटलमध्येच थांबली होती. संध्याकाळच्या वेळी कालच्या त्या पेशंटला शुद्ध आली. मधुराने तिला तपासलं. पेशंटचं नातेवाईकांसोबत बोलणं करून दिलं. चोवीस तासात डोक्यावरचं टेन्शन एकदम हलकं झालं होतं. दिवसभरात रीमाचा फोन वगैरे आला नव्हता. शेवटी न रहावून मधुराने रीमाला फोन लावला. 


क्रमशः
© डॉ किमया मुळावकर

🎭 Series Post

View all