Login

मधुरीमा (भाग ९)

Story of two friends


मधुरीमा (भाग ९)

   बाबांनी समजावून सांगितल्याचा चांगलाच परिणाम झाला होता मधुरावर. मधुरा  तयार झाली होती लग्न करायला. मधुराच्या आई बाबांनीसुद्धा वरसंशोधन करण्यास सुरुवात केली होती. तोपर्यंत मधुराने शहरातील नामांकित स्त्री रोग तज्ञ  डॉ. गिरीजा चौधरी यांचं हॉस्पिटल जॉईन केलं होतं. अधून मधून रीमा सोबत बोलणं होत होतं. रीमा तिकडे जर्मनीला पुष्कळ नवीन गोष्टी शिकत होती. फोनवर ती थोडंफार सांगत होती मधुराला, नवीन इन्स्ट्रुमेंट्स, ऑपरेशन करण्याच्या नवीन पद्धती, आपल्या इकडे वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धती पेक्षा कितीतरी नवीन, पेशंटला परवडणाऱ्या, कमी वेदना देण्याऱ्या उपचार पद्धतीचा तिकडे वापर होत होता. आपणही जर्मनीला जायला पाहिजे होतं असं राहून राहून वाटात होतं मधुराला.

   एक दिवस संध्याकाळी मधुरा हॉस्पिटलमधून घरी आली होती. हॉलमध्ये कोणीतरी तिच्या बाबांच्या वयाची व्यक्ती आणि तिचे बाबा बसलेले होते. एकंदरीत गप्पा रंगात आल्या होत्या त्या दोघांच्या. मधुरा घरात जात होती तेव्हा तिच्या बाबांनी तिला आवाज दिला

"मधुरा, बघ तर आपल्याकडे कोण आलंय? ओळखलं का तू?" बाबा.


मधुराने प्रश्नार्थक नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिलं.

"अगं, हा माझा मित्र दिनकर, माझ्याच बँकेत होता, मला मॅनेजरचं प्रमोशन मिळालं अन् हा पण सोलापूरला प्रमोशन वर गेला होता. बरं का दिनकर, ही आमची मधुरा. एम. बी. बी. एस., एम. डी. आहे, गोल्ड मेडलिस्ट." बाबा.

"अरे वा वा! छान छान! कशी ओळखेल रे ती मला. ती बारावीत असताना तिचा सत्कार झाला होता आपल्या बँकेत, त्या नंतर आपली तरी कुठे भेट झाली? मग डॉ. मधुरा, सध्या काय सुरू आहे क्लिनिक टाकलं की अजून काही?" दिनकर काका

"क्लिनिक नाही टाकलं काका अजून. डॉ. गिरीजा चौधरी यांचं हॉस्पिटल जॉईन केलंय सध्या. जॉबच म्हणा ना एका प्रकारचा. बरं बाबा मी आताच आलेय हॉस्पिटलमधून, थोडं फ्रेश होते." मधुरा कशीतरी सटकलीच तिथून.

  फ्रेश होऊन एक कप कॉफी बनवली आणि कॉफीचा आस्वाद घेत मधुरा जरा निवांत बसली होती. तसं पण आजचा दिवस खूप हेक्टिक गेला होता. सकाळपासून मोबाईलला हात लावायला सुद्धा वेळ नव्हता मिळाला. रीमाचे बरेच मेसेजेस आलेले होते. रीमाने तिकडे वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्या पद्धती मधुराला मेल केल्या होत्या. दुसरी एखादी मैत्रीण असती तर तिनी स्वतःला मिळालेलं ज्ञान स्वतःपुरत राखून ठेवलं असतं. पण रीमा त्यातली नव्हती, ती जे काही नवीन शिकेल ते सगळं मधुराला शक्य तेवढं मेल करत होती.  मधुरासुद्धा सगळ्या नोट्स लिहून ठेवत होती. रीमामुळे मधुरा थेरोटीकली सगळं शिकत होती, पण प्रॅक्टिकली सगळं कसं सांभाळायचं हे थोडं अवघड वाटत होतं तिला. डॉ. गिरीजा बऱ्याच नव्या गोष्टींचा, पद्धतींचा वापर करत होत्या त्यामुळे रीमा ने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींचा मधुराला उपयोग होत होता.


   रात्रीचे नऊ वाजले होते, आईनी मधुराला जेवणासाठी आवाज दिला, मधुरा किचनमध्ये जाऊन आईला हवी ती मदत करत होती. डायनिंग टेबलवर सगळं आणून ठेऊन, ताट वाढून तिने बाबांना आवाज दिला. बाबा आज भलतेच खुश वाटत होते. 'जुना मित्र भेटून गेला म्हणून खुश असतील कदाचित', मधुराने आपला अंदाज लावत होती. जेवताना आईच्या-बाबांच्या एकमेकांना काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या. आपल्याबद्दल काहीतरी बोलायचंय हे मधुराला कळलं होतं. पण दोघेही असं का करताय हे काही कळत नव्हतं म्हणून ती शांततेत जेवण करत होती. जेवणं आटोपली होती आणि बाबा हॉल मध्ये जाऊन न्यूज बघत बसले होते. मधुराने आईला सगळं आवरू लागलं आणि त्या दोघी पण हॉलमध्ये येऊन बसल्या होत्या. मधुराचं समोरच्या टी पॉय वरचा पेपर घेऊन उगीच तो चाळणं सुरू  होतं. तेवढ्यात बाबा म्हणाले,

"मधू, आज माझा तो मित्र आला होता ना... दिनकर.. त्याच्या आत्ये-बहिणीचा मुलगा आहे म्हणे डॉक्टर. चांगला हाडाचा डॉक्टर आहे म्हणे. अग, म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला??? ऑर्थो सर्जन आहे म्हणे. एम. एस.  झालंय त्याचं. आता दिल्लीला आहे सध्या, एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब  करतो म्हणे. घरी आई-वडील आहेत त्याच्या. ते गावाकडे असतात, भरपूर शेती आहे ती पण बागायती. एक मोठा भाऊ आहे, तो अमेरिकेत असतो त्याच्या कुटुंबासोबत. दिनकर हा त्याचा बायोडाटा देऊन गेला बघ."  बाबा एक दमात सगळं बोलून गेले.


   मधुराने तो बायोडाटा घेतला, न वाचताच तसाच टेबलवर ठेऊन तणक्यात तिच्या रूममध्ये निघून गेली होती.

"काय करावं या पोरीचं काहीच समजत नाही. एक गोष्ट पण धड बोलू देत नाही. गेली लगे तणक्यात. आपल्यालाच जुमानत नाही तर सासू सासाऱ्यांना काय विचारेल. मला तर वाटते हीचं लग्नच करू नाही. केलं तर हिच्या सासरी पदोपदी माझाच उद्धार व्हायचा, आईनी हेच शिकवलं का म्हणून." मधुराची आई थोडं चिडूनच बोलली.

"शांततेत घ्या थोडं , मधुराची आई. आपलीच मुलगी आहे. आपण नाही समजून घ्यायचं तर कोण घेईल तिला समजून. तसंही जेव्हा योग असेल लग्नाचा तेव्हाच होईल ते, आपण कितीही हात पाय मारले तरी जी गोष्ट जेव्हा व्हायची, तेव्हाच होणार."

"हो, योग असेल तेव्हाच होईल लग्नाचं. तेव्हा बरोबर बुद्धी ही होईल निर्णय घ्यायची. पण ही अशी बोलत नाही ना, मग आपण तरी कसं ठरवायचं काही, कस पुढं जायचं. आता बायोडाटा पाहून तिला योग्य वाटतंय, नाही वाटत काही तर बोलायला पाहिजे ना. आपल्यालाही मग समोरच्या माणसाला त्याप्रमाणे उत्तर देता येतं." आई.

" हम्मम्म...बरोबर आहे तुमचं...उद्या परत एकदा बोलतो मधुरासोबत..परमेश्वरा.. काय चालू आहे या मुलीच्या मनात ते तरी कळू दे.." बाबा.

"चिडचिड होणं साहजिकच आहे म्हणा. मला पण खूप राग यायचा जेव्हा माझे आई बाबा माझ्यासाठी मुलं शोधत होते. माहीत नाही पण थोडी विचित्रच मनस्थिती होते त्यावेळेला. नंतर लग्न जमल्यावर मात्र माणूस पुढची स्वप्न रंगवायला लागतो." मधुराच्या आईला तिच्याच वेळच्या गोष्टी आठवत होत्या.

"पोरगी तुमच्या वर गेली तर.. मी विचार करत होतो मी तर असा नाही मग ही का अशी वागतेय." बाबा चेष्टेने म्हणाले.

"कुठेही अन् कधीही काय चेष्टा सुचते हो तुम्हाला. उद्या बोलून घ्या तुमच्या लाडक्या लेकीशी."

   मधुरा सकाळी उठली तेव्हा आई नाश्त्याची तयारी करत होती तर बाबा पेपर वाचत बसले होते. कालचा बायोडाटा तसाच टेबलवर पडून होता. मधुराने बायोडाटा वाचला. बाबांनी पेपरच्या कोपऱ्यातून हळूच वाकून पाहिले. 'चला, आपल्या पोरीनी कमीत कमी बायोडाटा पहिला. एक पाऊल पुढे प्रगती केली असच म्हणावं लागेल'. बाबा स्वतःशीच पुटपुटले.

"बाबा, या मुलाचं  MBBS जिथून झालं ते तर कॉलेज ओळखीचं आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे ते. पण हे MS जिथून केलंय त्या कॉलेजच नाव कधी ऐकण्यात नाही आलं. आजकाल खोट्या डिग्र्या पण मिळतात. फ्रॉड डॉक्टर पण खूप सापडतात आजकाल." मधुरा बायोडाटा वाचत म्हणाली.

"बघ, म्हणून तर तुला म्हटलं ना की तू बायोडाटा बघून घे. तुझ्या फिल्ड मधल्या गोष्टी नाहीत गं कळत आम्हला. बरं झालं तू लक्षात आणून दिलं ते. अहो, मी काय म्हणते, एकदा त्या दिनकर भाऊजींशी बोलून निट माहिती काढून घ्या त्या मुलाची. लग्नासारख्या गोष्टी इतक्या सहज घेऊन नाही चालणार." आई पोह्याची प्लेट बाबांच्या हातात देत म्हणाली. बाबांनी हो म्हटलं आणि मधुरा हॉस्पिटल मध्ये जायची तयारी करून निघाली. जाताना आईने तिला डब्बा दिला.

"आई, तू असा रोज डब्बा देतेस, पाण्याची बॉटल देतेस , मला तर ना रोज शाळेत जातेय अस फीलिंग येतं." मधुरा डोळे मिचकावत म्हणाली.

"आपली लेकरं कितीही मोठी झाली ना तरी आई-वडिलांना ती लहानच वाटतात, कितीही मोठ्या पदावर गेली तरी त्यांची काळजी लागूनच असते. तुला आत्ता नाही कळणार, आई होशील ना तेव्हा कळेल."

"हे काय गं आई, मी मस्करी केली तुझी, तू तर लगेच सिरियस मोड ऍक्टिव्हेट केलास. बरं, चल बाय, निघते मी उशीर होतोय मला. बाहेरून काही आणायचं असलं तर फोन कर, मी येताना घेऊन येते." मधुरा आईसोबत बोलून हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे गेली की तिला घरातल्या सगळ्या गोष्टींचा विसर पडायचा. पेशंटच्या गराड्यात तिचा  वेळ कसा निघून जायचा तिलाही कळायचं नाही. संध्याकाळी मधुरा घरी आली, तिचे बाबा हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. बहुतेक चिडले असावेत, घरातलं वातावरणही एकदम गरम वाटत होतं, वेगळीच शांतता होती घरात. मधुरा काहीच न बोलता तिच्या रूममध्ये जात होती. तेव्हढ्यात तिच्या बाबांनी तिला आवाज दिला. त्यांच्या हातात एक कागद होता.

क्रमशः 

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

🎭 Series Post

View all