Aug 16, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग ८)

Read Later
मधुरीमा (भाग ८)

 

मधुरीमा (भाग ८)


"हॅलो, हां बोल मधुरा."

"रीमा, हॉस्पिटलमध्ये आलीये मी. अगं सकाळी तू ऑपरेट केलेली पेशंट, तिच्या खूप पोटात दुखतंय. तसं तर पोट सॉफ्ट वाटतंय, पण ज्या प्रकारे ती रडतेय, सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतल गं तिने. ड्युटी डॉक्टर, सिस्टर सगळ्यांना घाबरवून सोडलं. तिचं ते रडणं बघून मला तर इंटर्नल ब्लीडिंग ची भीती वाटतेय. मी डॉ. सदाशिव सरांना फोन केलाय. एक सोनोग्राफी करून घेऊ सेफ साईड. सोनोग्राफीच्या रीपोर्टवरून ठरवू काय करायचं ते."

"मला नाही गं वाटत इंटर्नल ब्लीडिंग असेल म्हणून. पण मग पोट दुखायचं काय कारण असेल बरं?"

"तेच गं, शक्यता कमीच आहे इंटर्नल ब्लीडिंगची. मी पेन किलरची ड्रीप लावलीये.  ड्रीप लावल्यापासून आता ती बऱ्यापैकी स्टेबल आहे. पण नातेवाईक खूपच अग्रेसिव्ह आहेत. म्हणून म्हटलं एक सोनोग्राफी करून घेते."

"मधु, तुला योग्य वाटतंय तर घे करून. मी पण निघते तिकडे यायला. तो पर्यंत डॉ. सदाशिव येतील. सोनोग्राफी होऊन जाईल."

"अगं, राहू दे रीमा. सोनोग्राफी होऊ दे. मी कळवते तुला. मग ये तू गरज असेल तर." मधुरा रीमासोबत बोलून, ड्युटी डॉक्टर सोबत सगळ्या पेशनट्सचा राउंड घेत असते. तो पर्यंत डॉ. सदाशिव येतात. त्या पेशंटची सोनोग्राफी होते. मधुराच्या अंदाजाप्रमाणे सगळं नॉर्मल निघतं. सोनोग्राफी करून मधुरा आणि डॉ. सदाशिव तिथून निघलेले असतात.

" डॉ. मॅडम." पेशंट मधुराला आवाज देते.
"काय गं? अजून दुखतंय का पोटात? तुझे रिपोर्ट सगळे चांगले आहेत. वाटेल हां थोड्यावेळात बरं. बघ तुला सलाईन मधून इंजेक्शन दिलं ना मी. आता आराम कर. जीव जन्माला घालणं  एवढं सोपं असतं का? नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सिझर, वेदना तर होणारच ना. त्या छोट्या गोड जीवाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, बघ सगळ्या वेदना दूर पळून जातील." मधुरा.
 

"मॅडम, माझी आई असती तर ती पण असच बोलली असती मला. संध्याकाळी माझ्या सासूबाई आल्या होत्या भेटायला. जोरात कळा का दिल्या नाही म्हणून रागावल्या. सिझर करायचं काम पडलं, एवढा पैसा लावला आणि मुलगी झाली, तिलाही ICU मध्ये ठेवलं म्हणून मला खूप बोलून गेल्या. तेव्हापासून माझ्या पोटात खूप दुखतंय." पेशंट अजूनच रडायला लागली. डॉ सदाशिव आणि मधुराच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या.

"काही होत नाही. तू रडू नकोस. मी सांगते तुझ्या घरच्या लोकांना समजवून. आणि कोणाला कळणार पण नाही की तू मला ही गोष्ट संगीतलीस. ठीक आहे. उद्या तुला चालायची परमिशन मिळाली की आपण वर ICU मध्ये जाऊन तुझ बाळ बघून येऊ. पाहायचं आहे न तुला? झोप आता शांतपणे." मधुरा मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.

"सदाशिव सर, तुमची मदत लागेल मला थोडं कॅऊन्सिलिंग करताना." मधुरा.
"हो, नक्कीच." डॉ सदाशिव.

   डॉ. सदाशिव आणि मधुरा दोघे मिळून पेशंटच्या नातेवाईकांच सर्व शंका निरसन करतात. दोघे मिळून पेशंटबद्दल बऱ्याच गोष्टी नातेवाइकांना समजावून सांगतात. त्या लोकांना सगळ्या गोष्टी पटतात. झालेला सगळा प्रकार मधुरा रीमाला सुद्धा कळवते. या सगळ्या गडबडीत रात्रीचे साडेबारा वाजतात. घरी जाऊ की नको या विचारातच मधुरा पार्किंगमध्ये आली. तेव्हा तिचं लक्ष पुन्हा त्याच झाडाकडे जातं. तिने संध्याकाळी पाहिलेली तीच गाडी पुन्हा त्याच झाडाखाली उभी असते. पुन्हा तिच भीती... घरी जाण्याचा विचार सोडून मधुरा तिच्या केबिन मध्ये येते.  तिच्या केबिनच्या खिडकीतून ते झाड दिसत होतं. ती पुन्हा तिकडे बघते तर तिला आता ती गाडी दिसत नाही. 'पुन्हा भास झाला! काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. पण आपण अस गाफील राहून नाही चालणार, योग्य ती काळजी घ्यावीच लागेल'. असा विचार करत मधुरा इंटरकॉम वरून वॉचमन आणि सेक्युरिटी ला फोन लावते.

"रात्री इमर्जन्सी मध्ये कोणताही पेशंट आला तर आधी  ड्युटी डॉक्टरांना किंवा मला फोन करायचा, आमच्यापैकी कोणी तरी खाली येऊन आधी पेशंट बघेल मगच पेशंटला वर येऊ द्यायच. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवायची, ओळखपत्राचा नंबर लिहून ठेवायचा. पेशंटचा नातेवाईक आहे असं सांगून कोणीही घुसू शकत. त्याची नीट चौकशी करायची. तुम्हाला अजून कोणी मदतीला लागेल. उद्या सेक्युरिटी एजन्सी सोबत बोलून अजून माणसं वाढवून घेते. मी सांगितलेल्या गोष्टी नीट फॉलो झाल्या पाहिजे. दिवसा सुद्धा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद झाली पाहिजे." सगळ्या सूचना देऊन मधुरा खुर्चीवर बसते. "आपण अतीच तर नाही ना करत? काही कळत नाहीये ? काय करू? तो रुद्र असेल, आणि परत मला शोधत आला असेल तर? माझ्यामुळे बाकी सगळ्या लोकांना त्रास होणार. बापरे! हे सगळे विचारच किती त्रासदायक आहेत. माझं तर डोकं भांडावून सोडताय हे विचार. कुठे तरी डोकं आणि मन गुंतवायला पाहिजे."
   तेवढ्यात तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या फाइल्सकडे जातं. सकाळी तिनी सारिकाला त्या फाइल्स काढून ठेवायला लावलेल्या होत्या. एका इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी तिला शोधनिबंध लिहायचा होता. 'हॉस्पिटलमध्ये थांबलो आहोतच तर हे काम करून घेऊ, तसं पण घरी गेल्यावर नीतीला पण तिचा वेळ द्यावा लागतो आणि इथे दिवसभर पेशंट्स असतातच.' असा विचार करत तिनी त्या फाइल्स उचलल्या आणि डॉक्टर्स रेस्ट रूम मध्ये घेऊन गेली.
   रात्री थांबायची गरज पडली तर  ही डॉक्टर्स रेस्ट रूम मुद्दाम मधुरा आणि रीमानी बनवून घेतली होती. रूम बरीचशी त्यांच्या हॉस्टेलच्या रूम सारखी बनवली होती मुद्दामच. भिंतीवर रीमाचे अन मधुराचे कितीतरी फोटोज् लावलेले होते. कॉलेजमधले, हॉस्टेलवरचे, ट्रिपच्या वेळेसचे, नीती सोबत असे कितीतरी फोटोज् होते. मधुरा खूप दिवसांनी मन लावून सगळे फोटोज् पाहत होती. "नीतीचा पहिला वाढदिवस.. केक आणि मेणबत्तीकडे कशी मन लावून पाहत होती नीती.. मेणबत्तीची वात पकडायची होती तिला...'मधुरीमा'च्या उद्घाटनाच्या वेळेसचा फोटो.. आई,बाबा, रीमाच्या आई फीत कापायला उभे... हॉस्टेलवरचा रुमवरचा फोटो.. मधुरा, रीमा आणि आभा.. आभाच्या चार वेण्या घातल्या दोघींनी मिळून... बिचारी आभा... ट्रिपच्या वेळी काढलेला ग्रुप फोटो... टेकडीवरच्या मंदिरात जाताना पायऱ्यांवर काढलेला फोटो...कॉलेज लाईफ .. गोल्डन डेज्..."
   एका फोटो समोर ती मात्र स्तब्ध उभी झाली. तो फोटो होता convocation च्या वेळेसचा. MD ला असतानाचा, गोल्ड मेडल मिळालं होतं तिला. फोटोत आई , बाबा अन दोघांच्या मध्ये ती, काळा लॉंग गाऊन, डोक्यावर त्या ड्रेसवरचीच कॅप, हातात MD ची डिग्री अन गोल्ड मेडल, चेहऱ्यावर आनंद. बाबांची छाती तर अभिमानाने फुललेली, त्यांचा तर रुबाबच वेगळा वाटत होता. त्या दिवशी नंतर मधुराचं आयुष्यच बदललं. किती वेगळं होतं ना आयुष्य. कोण होतो आपण , कसे होतो ??? सगळच कसं बदलून गेलं. आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं पण त्यासाठी इतक्या विचित्र मार्गावरून जावं लागेल, इतका अवघड प्रवास असेल असं वाटलं नव्हतं. डोळ्यांसमोर भूतकाळ उभा होता अगदी जसाच्या तसा....

**************************

पेपर प्रेझेंटेशन, थेसिस वर्क, केस प्रेझेंटेशन, हाऊस ऑफिसरची ड्युटी, कम्प्लिशन या सगळ्यात MD ची दोन वर्षे कशी भुर्रकन उडाली कळलंच नाही.
   मधुरा घरी आलेली होती. या दोन वर्षात जास्त घरी पण नव्हतं येता आलं. घरी आल्यापासून नुसत्या झोपा काढणं सुरु होत तिचं. आईची मागे भुणभुण सुरु होती, " अगं, एखादं हॉस्पिटल जॉईन नाहीस करत तोपर्यंत थोडाफार स्वयंपाक शिकून घे. नाही खूप काही, पण स्वतःच पोट भरण्याइतकं तरी. कुठे दुसऱ्या देशात गेलीस, शिकायला, नोकरी करायला अन् तिथलं खाणं नाही आवडलं तर स्वतःसाठी थोडंफार तरी बनवता आलं पाहिजे ना."

"जेव्हा जायचं होत तेव्हा नाही जाऊ दिलंस.आता काय करू स्वयंपाक शिकून. झोपू दे ना आई, दोन वर्ष मी पूर्ण जागूनच काढलंय असं समज, फक्त रिझल्ट लागेपर्यंत. नंतर शिकते मी स्वयंपाक वगैरे." मधुरा रागातच बोलली.

   MD च्या रिझल्टचा दिवस उजाडला. सकाळी 10 वाजता रिझल्ट लागणार होता.मधुराने वेबसाईटवर पाहिले पण वेबसाईट ओपन नव्हती होत. तेवढ्यात तिच्या फोन वर डॉ. कामत, HOD मॅडमचा फोन आला.
"Good morning Madam!"

" Very good morning, डॉ. मधुरा, रिझल्ट पहिला का?."
 

"नाही मॅम, साईट ओपन होत नाहीये."

"हो का? बरं..आधी सांगा पार्टी कुठे देणार? युनिव्हर्सिटीमधून पहिली आलीस तू, गोल्ड मेडल मिळालंय तुला. आई बाबा कुठे आहेत, मला त्यांचं पण अभिनंदन करायचंय."
   मॅडमच बोलणं ऐकून मधुराला आनंदाने ओरडावं वाटलं पण मुद्दाम एवढूस तोंड करून ती फोन घेऊन तिच्या बाबांजवळ गेली.

"बाबा, आमच्या HOD डॉ. कामत मॅडम, तुमच्याशी बोलायचंय त्यांना." मधुराने फोन स्पीकरवर टाकत बाबांजवळ दिला. मधुराचं एवढूस तोंड बघून तिच्या बाबांना टेन्शन आलं. त्याच टेन्शन मध्ये ते मॅडमसोबत बोलू लागले.
"नमस्ते मॅडम."
"नमस्ते मि. कानिटकर, तुमची लेक पहिली आलीये युनिव्हर्सिटीमध्ये, गोल्ड मेडल मिळालंय बरं. अभिनंदन तुमचं."
"धन्यवाद मॅडम, तुमचीच शिकवण आहे." मधुराच्या बाबांच्या डोळ्यात आत्मविश्वास, प्रेम, अभिमान सगळ्या भावना ओथंबून आल्या होत्या. आईने पण लगेच देवासमोर साखर ठेवली. सगळ्यांच तोंड गोड केलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सगळ्यांच्या कष्टाला मधुराने एक सोनेरी फळ दिल होतं. सगळेच खूप खुश होते. इकडे रीमा सुद्धा चांगल्या मार्कानी पास झाली होती. तिची जर्मनीला जायची सगळी तयारी झाली होती. Convocation पर्यंत थांबता येणार नव्हतं म्हणून ती स्वतः युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन डिग्री घेऊन आली होती. जाता जाता रीमा मधुराला भेटून गेली. धड बोलणं पण नाही झालं त्यांचं.  मधुराला अरविंद बद्दल जाणून घ्यायचं होतं आणि रीमाला पण सगळं सांगायचं होत पण वेळ नावाचा शत्रू सारखा समोर येत होता.

   मधुरा, आई आणि बाबा सगळे convocation च्या प्रोग्रामसाठी गेले होते. एवढ्या भव्यदिव्य कार्यक्रमात, एवढ्या मोठ्या लोकांच्या हातून मधुराला डिग्री मिळाली, गोल्ड मेडल मिळालं. माय बापासाठी याहून अभिमानाचा क्षण असेल का कोणता? कार्यक्रम आटोपून सगळे रात्री उशिरा घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा थोडी उशीराच उठली. ती उठली तेव्हा आई बाबांचं बोलणं सुरू होतं.

"अहो, मी काय म्हणतेय, मधुराचं नाव वधू वर सूचक मंडळात द्यायचं का? तेवढीच आपल्याला त्यांची पुस्तिका पण मिळेल. भरपूर मुलांची माहिती तरी कळेल. फोन नंबर कळतील, आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या मुलांसोबत आपण काँटॅक्ट करू शकू."

"हो मधुराची आई, बरोबर बोलल्या तुम्ही. मी आजच फॉर्म घेऊन येतो आणि भरून देतो."

"जड झाले ना मी आत्ता, ओझं वाटत असेल माझं, म्हणूनच लग्नाची एवढी घाई करताय ना. पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये." मधुरा चिडून बोलत आई बाबांसमोर आली.

"इतक्यात करायचं नाही, मग कधी करणार? म्हातारी झाल्यावर. अग मधु आत्ता वय आहे लग्नाचं, एकदा वय निघून गेल्यावर कोणते मुलं भेटणार तुला लग्न करायला. मी तुझ्याएवढी होते तेव्हा मला तू झालेली होतीस, अन् शाळेतही जायला लागली होतीस. आमचे डोळे बंद व्हायच्या आत करा लग्न. म्हणजे आम्ही समाधानाने मारायला मोकळे. तसही सगळं तुझ्याच मनानी सुरू असतं, एवढी एक गोष्ट आमच्या मनानी केलीस तर बिघडणार आहे का काही तुझं?" मधुराच्या आईचा पारा चांगलाच चढला होता.

" काय माझ्या मनासारखं केलं ग मी? तू जाऊ दिलंस का जर्मनीला?" मधुरा.
 

"लाव आता आयुष्यभर ठपका माझ्यावर, 'जर्मनीला जाऊ नाही दिलं' याचा. ज्याच करायला जावं भलं तो म्हणे माझंच खरं." मधुराची आई अजूनच चिडली.

"अहो मधुराच्या आई, विषय कुठल्या कुठे जातोय, शांत व्हा. मी समजावून सांगतो मधुराला." बाबा आईला समजावत होते.

"हम्म, सांगा, चालू द्या तुमच्या बाप-लेकीचं गुळपीठ. मी बोलायला लागले की विषय कुठल्या कुठेच जातो. बोला तुम्हीच." मधुराची आई तणतण करत अंगणात निघून गेली.
 

"मधु, बाळा कोणी आहे का तुझ्या मनात. असेल तर तस सांग, आपण बोलू त्याच्या घरच्यांशी. आम्हाला श्रीमंत-गरीब, जाती-पाती च काही म्हणणं नाहिये." बाबा मधुराला समजावत होते.

"नाहीये बाबा कोणी तसं. पण मला लग्न करून तुमच्या पासून दूर नाही जायचंय."

"अगं कोण म्हणतंय तू दूर जाणार म्हणून. बघ, तू MBBS ला होतीस तेव्हापासूनच घराच्या बाहेर आहेस. 2-4 महिन्याला येऊन जातेस. लग्न झाल्यावरही तसंच होणार ना. तेव्हा तू हॉस्टेलवर राहत होतीस, आम्ही भेटायला आलो तर आम्हाला तुझ्यासोबत थांबता पण येत नव्हतं. लग्न झाल्यावर तुझं घर राहील, आम्ही पण येऊन राहू शकू तुझ्यासोबत. आणि सगळ्यात महत्वाचं एक भावनिक गरज असते सगळ्यांनाच. कोणीतरी हक्काचं माणूस सोबत हवं असतं. आम्ही काय गं आहोतच तुझ्यासोबत. पण कुठपर्यंत? वरच्यानी बोलवलं की तर जावंच लागेल ना. तुला सुख-दुःखात आधार देणारा, साथ देणारा लागेल ना कोणीतरी. आम्हालाही जावयाच्या रुपात एक मुलगा मिळेल. आणि लग्नाच काय आज म्हणलं तर लगेच उद्या होणार नाही ना. तुला मुलगा आवडायला पाहिजे, मुलाला तू आवडायला पाहिजे, आम्हा लोकांना त्याचे घरचे, त्यांना आपण पटलो पाहिजे. सगळं काय एका दिवसात थोडी होणार आहे. सहा महिने-वर्ष जाणार सगळ्यात. आणि आई म्हणते ते पण बरोबरच आहे. योग्य वयात योग्य त्या गोष्टी झाल्याचं पाहिजे. आता तूच बघ तुझं वय किती? लग्न होऊन, तुला तुझं हॉस्पिटल सुरू करून सगळं सेटल होईपर्यंत तू किती वर्षाची होशील? मुलं बाळं कधी होतील? हेच योग्य वय आहे बेटा. आपण योग्य तो निर्णय घेऊ. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत आणि नेहमी सोबतच राहू. हो किनई?"
 

"हो बाबा." मधुरा बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून मुसमुसत होती. आई पण खिडकीतून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून तर गंगा जमुना कधीच्याच वाहत होत्या.

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न