Login

मधुरीमा (भाग ७)

Story of two friends

मधुरीमा (भाग ७)

मधुराचा मुंबईच्या कॉलेज मध्ये नंबर लागला होता MD साठी तर रीमाचा पश्चिम बंगाल मध्ये. दोघी मैत्रीणी दोन दिशेला गेल्या होत्या. एक पूर्वेला, तर दुसरी पश्चिमेला. सुरुवातीला सगळेच जण एकमेकांच्या संपर्कात होते. MD ला प्रॅक्टिकल वर्क  जास्त असायचे. पेशंट्स, केस स्टडी, पेपर प्रेझेंटेशन, थेसिस यामध्ये सगळे गुंतून गेले. मात्र रीमा आणि मधुरा यांचाच काँटॅक्ट राहिला एकमेकींसोबत. नितीन रीमाकडे मधुराची विचारपूस करायचा.

   एक दिवस रीमाने मधुराला कॉल केला.
"मधे.. अगं कसं सांगू तुला...जा बाबा...मला लाज वाटते.."

"तू... अन् लाज वाटते...काय प्रेमात-बीमात पडलीस की काय??"
 

"ए... तुला कसं कळलं..."

"कळलं..जसं कळायचं तसं...रीमा मॅडम, पुढे सांगाल का काही, का नुसतं blush blush करत राहणार.."
 

"किती कळतं गं तुला माझ्या मनातलं.. अरविंद आहे त्याचं नाव...इकडचाच आहे.."

"मग".

"माझ्यासोबतच आहे MD ला."

"मग?"

"माझी त्याची चांगली मैत्री होतीच. त्यानी मला काल प्रपोज केलं."

"मग?"
 

"ए जा बाबा..काय मग मग लावलंस तू...मला नाही बोलायचं तुझ्याशी..."

"रीमा.. मी नाही चिडवणार तर कोण चिडवणार तुला.. अशीच गम्मत केली तुझी.. बरं ..नाही चिडवत..पुढे काय ठरवलं मग?"
 

"काही नाही..आईसोबत बोल म्हटलं त्याला. बोलेल तो काही दिवसात...बरं ऐक ना..जर्मनीची युनिव्हर्सिटी आहे, तिथल्या फेलोशिपसाठी अर्ज करणार आहे मी. तू पण भर ना अर्ज."

"आता...लगेच?"

"अगं हो, अर्ज आता पाठवायचेत आणि सहा महिन्यात बोलावतील तिकडे. तो पर्यंत इकडे MD पूर्ण होऊन जाईल."

"बरं.. तू भर तुझा अर्ज. आई-बाबांशी बोलावं लागेल मला. आधीच लग्नसाठी मागे लागलेत माझ्या. पुढचं शिक्षण लग्नानंतर कर म्हणतात आता. MD तर पूर्ण होऊ द्या म्हणून सध्या थोपवून ठेवलंय कसंतरी. तरी बोलून बघते एकदा."
 

" अच्छा.. बोलून घे..तयार कर ना त्यांना...होतील ते तयार तुला पाठवायला..."

"हो बोलते गं."

"पैशाची तर काही अडचण नसेल तुला आणि जायचा खर्च आपल्याला करायचाय. मग तिकडे स्टायपेंड मिळेल. सांग ना समजावून काका-काकुला. जाऊ दोघी सोबत. MBBS सारखीच मजा करू तिकडे जाऊन."

"हो गं... माझी पण इच्छा आहे.."
 

" बरं मधु, चल बाय , करते मी फोन नंतर. आईला पण फोन लावून घेते. दोन दिवसात बोलणंच नाही झालं तिच्यासोबत."
"Ok, bye bye."

   रीमा पासपोर्ट, व्हिसा, थेसिस, पेपर प्रेझेंटेशन यामध्ये बिझी होऊन जाते. इकडे मधुरा पण पेपर प्रेझेन्टेशन, थेसिस मध्ये बिझी होऊन जाते. रीमानी सांगितलेल्या फेलोशिप बद्दल ती घरात बोलते. मधुराचे बाबा तयार होतात, पण आई नाही म्हणते. तिच्या आईच्या मते योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत. "आता लग्नाचं वय आहे तर लग्न करून घे. लग्न झाल्यावर जर्मनीला काय मंगळावर शिकायला गेलीस तरी आमचं काहीच म्हणणं नाही." मधुराची आई थोडी चिडूनच बोलली.
   दोघींचं MD पूर्ण होतं. रीमा तिकडच सगळं समान घेऊन घरी परत येते. 3-4 दिवसात तिला जर्मनीसाठी निघायचं होतं. घरच्यांनी विदेशात शिकायला जाऊ दिले नाही म्हणून मधुरा खूप नाराज होते. पण मधुराची आई काही ऐकण्याच्या स्तिथीत नसते. जर्मनीला जाण्याआधी मधुरा आणि रीमाची धावती भेट होते. विशेष अस बोलणं होत नाही. रीमाला खूप सांगायचं  असतं मधुराला अरविंद बद्दल. पण तेवढा वेळच मिळत नाही.

   तिकडे जर्मनीला गेल्यावर साधारण एक आठवडा रीमाला सगळ्या गोष्टी सेट करण्यात लागतो. या आठ-दहा दिवसांत तिचं आणि अरविंदच बोलणं झालंच नाही म्हणून ती अरविंदला फोन लावते. तिकडून एक स्त्री फोन रिसिव्ह करते. ती बांगलीतून काही तरी बोलते. रीमा तिला हिंदीत बोलायची request करून अरविंद कुठे आहे ते विचारते.
 

" हा..अरविंदजी के बेटे का नामकरण पूजा चल राहा है। वो उसमे बैठा है। आप कौन बात कर रहे है, दवाखानेसे बोल रहे क्या?" मोडक्या तोडक्या हिंदीत त्या स्त्रीने जणू काही बॉम्ब टाकला. कानात शिसं ओतावं कोणी अशी अवस्था झाली रीमाची. हातातला फोन गळून पडला, पाय थरथर कापायला लागले, घशाला कोरड पडली, सगळा जीव घशात येऊन अडकल्यासारखा झाला. स्वतःचीच चीड येऊ लागली.
"किती मोठा विश्वासघात, किती खोटं बोलला तो, पण...पण मी कसा काय विश्वास ठेवला त्याच्यावर...तो जे जे सांगायचा मला ते सगळं कसं काय खरं वाटायचं... किती स्वप्न दाखवले त्याने आणि मी ही ते रंगवले..आंधळा विश्वास ठेवून...प्रेमातल्या त्या आणाभाका..सगळं सगळं खोटं होतं..हरली मी हरली... का?...पण माझ्यासोबतच का हे सगळं???? कोण समजतो तो स्वतःला??.. का असा खेळ खेळला माझ्या भावनांशी??...का??..." रीमा चिडून तिच्या रूम मधल्या सगळ्या गोष्टी फेकत होती. तितक्यात तिच्या हातात एक फोटो फ्रेम आली. तिच्या आईचा फोटो असतो त्यात. त्या फ्रेम ला छातीशी गच्च आवळून कितीतरी वेळ रीमा रडते. मनात काहीबाही विचार येऊन जातात तिच्या, एका क्षणाला आत्महत्या करावी असा विचार पण येऊन जातो तेव्हाच फोनची रिंग वाजते. आईचा फोन.
"बोल आई." रीमा रडणं दाबत बऱ्यापैकी नॉर्मल आवाजात बोलण्याचा प्रयत्न करते.

"काय झालं ग? सगळं ठीक आहे ना? आवाज का असा येतोय?"  आई.

"काही नाही ग, सर्दी झालीये, अन तुझी आठवण पण येतेय.'' रीमा.

"हो का? आग तिकडचं वातावरण वेगळं असेल ना तर होणार थोडीफार सर्दी. काळजी घे. औषध घेऊन टाक. रीमा, खूप नाव कमावलंस पोरी. एवढी शिक्षणासाठी बाहेरच्या देशात गेलीस. सगळयांना खूप कौतुक वाटतं तुझं. सगळं मन लावून शिक, वापस आल्यावर आपल्या देशातल्या लोकांना तुझ्या ज्ञानाचा खूप फायदा झाला पाहिजे बघ. काळजी घे पोरी, अन् फोन करत जा गं."
 

"हो आई." म्हणत रिमाने फोन ठेवला.  "ज्यानी विश्वासघात केला, आपल्या भावनांशी खेळ खेळला आपण त्याच्यासाठी आत्महत्या करायला निघालो. त्याच्यापेक्षाही कितीतरी प्रेम करणारी माणसं आहेत आपल्या आयुष्यात. त्या सगळ्या लोकांसाठी जगायचंय. एका मूर्ख माणसासाठी मला माझं आयुष्य नाही संपवायचंय..मी हरली नाहीये, बस चुकीच्या रस्त्यावर होते. आता मला माझा नवा, हवा तो रस्ता मिळालाय". मनातलं विचारांचं मळभ बाजूला केलं अन रीमा परत नव्या उमेदीने कामाला लागली. आता प्रेम या गोष्टीवरचा तिचा विश्वास उडाला होता. त्यानंतर अरविंदने तिला बरेच वेळा फोन केले. पण तिनी कधीच त्याचा फोन उचलला नाही.

*******************

"ताई, रीमा ताई....ओ रीमा ताई....ताई....डॉक्टर मॅडम....." स्वयंपाकवाल्या मावशी रीमाला आवाज देत होत्या. रीमा लॅपटॉप च्या समोर डोकं ठेऊन होती. विचारातच तिचा डोळा लागला होता. मावशींच्या आवाजाने ती भानावर आली.

"अरे मावशी, गेल्या नाही तुम्ही, किती वाजले?" हातातल्या घड्याळा कडे बघत ती म्हणाली.

"9.30 वाजले. अहो, जातच होते पण पाऊस सुरू झाला,  म्हणून थांबले होते. इकडं येऊन पहिला तर तुमचा डोळा लागला होता. मग हॉल मध्ये बसून होते. किती वेळचा तो फोन वाजतोय. अन् ती कॉफी पण थंडीगार झाली. गरम करून देऊ का? नाही तर नकाच घेऊ. स्वयंपाक झालाय जेऊन घ्या गरम गरम."

"नको कॉफी आता मावशी. पाऊस थांबला आहे. पण सोडून देऊ का घरी?"

"नाही नाही, नको. जाते मी. म्हणूनच आवाज दिला तुम्हाला."

"बरं, सावकाश जा." म्हणत तिने मोबाईल पाहिला. 6-7 मिसकॉल होते मधुराचे. एवढे मिसकॉल पाहून तिला थोडं टेन्शन आलं काय  झालं असेल याच. तिनी त्याच टेन्शन मध्ये मधुराला कॉल बॅक केला.

"हॅलो, मधुरा.......काय???????"

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 


 

🎭 Series Post

View all