Oct 24, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग ६)

Read Later
मधुरीमा (भाग ६)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 


मधुरीमा (भाग ६)

"मधु, अगं तुला कळत नाही का..? नितीन किती मागे-पुढे करतो तुझ्या. तुझा एक शब्दही खाली जाऊ देत नाही. किती काळजी घेत असतो तुझी. मला तर वाटतं की तो प्रेम करायला लागलाय तुझ्यावर." रीमा.

"काही पण..! पण मला त्याच्याबद्दल असं काही वाटत नाही. तो एक चांगला मित्र आहे बस." मधुरा.

"अगं डोळ्यात दिसतं त्याच्या, किती प्रेम करतो तो तुझ्यावर. मधु खरंच चांगला मुलगा आहे नितीन." रीमा.

"चांगला मुलगा आहे तर राहू दे तुलाच. मला नाही गं वाटत काही त्याच्याबद्दल. पहिली गोष्ट तर माझा प्रेमा-बिमावर काही विश्वास नाही. ते सगळं सिनेमात असतं. अन् त्याला वाटत असेल तर त्यानी बोलावं ना. मग मी बघेन त्याला काय उत्तर द्यायचं ते. जाऊ दे ना रीमा..प्लिज आपण दुसऱ्या कोणत्या विषयावर नाही का बोलू शकत? आणि तुला जर फक्त नितीनबद्दल बोलायचं असेल ना तर नको बोलुस माझ्यासोबत." मधुरा.

त्यानंतर रीमाने तिच्या समोर पुन्हा तो विषय काढला नाही. पण नितीनच्या मनात काय आहे हे रीमाला माहिती होतं. मधुराने त्याच्याबद्दल विचार करावा अस तिला वाटत होतं. पण मधुरा कोणाच्या ऐकण्यातली नाही हे पण तिला चांगलच ठाऊक होतं. वेळ हा सगळ्या गोष्टींवरचा उत्तम उपाय म्हणून तिनेसुध्दा हा विषय सध्याचा सोडला होता.  बघता बघता सेकंड इअर कसे संपले ते कळलं सुद्धा नाही.
   थर्ड इअर पासून पोस्टिंग लागायच्या. पोस्टिंग मध्ये वेगवेगळे वॉर्ड, OPD, लेबर रूम अशा सगळ्यांच्या रोटेशन ड्युटीज् लागायच्या. त्यामुळं आता ग्रुप म्हणून असा काही राहिला नव्हता. ज्याची जशी जिथे पोस्टिंग असेल तिथे जाऊन काम करावं लागे. आता सगळ्यांचच बाहेर हिंडणं फिरणं पहिल्यापेक्षा कमी झालं होतं. मिळालेला वेळ पेशनट्स, केस स्टडी, केस डिस्क्शन मध्ये जायचा सगळ्यांचा. बघता बघता थर्ड इअर सुद्धा संपलं.

   फायनल इअर सुरू झालं होतं. थर्ड इअर सारख्याच सगळ्यांच्या वेगवेगळ्या डीपार्टमेन्टस् मध्ये रोटेशन नुसार ड्युटीज् लागायच्या. Casuality, वेगवेगळ्या डिपार्टमेंटस् चे वेगवेगळे वॉर्ड, लेबर रूम सगळी कडे ड्युटी लागायच्या. सिनिअर असायचे सोबत पण ते या ज्युनिअर लोकांनाच कामं लावायचे.

    एक दिवस सकाळी सकाळी हॉस्टेलच्या फोनवर फोन आला होता. फोन आभाच्या घरून होता. फोनवर बोलून झाल्यावर आभा रडतच रूममध्ये आली. रीमा झोपलेली होती. आभाला रडताना पाहून मधुरा लगेच तिच्या जवळ गेली. तिनी रीमाला सुध्दा आवाज दिला. "मधु, काकांचा फोन होता, बाबांची तब्येत सिरियस आहे गं, मला लगेच घरी बोलवलं आहे." आभा अजूनच रडायला लागली.

"काही नाही होणार काकांना आभा, रडू नकोस आम्ही आहोत ना सोबत". मधुरा आभाला धीर देत होती. रीमा तू फटाफट अर्ज लिही एक प्रिंसिपॉल सरांना, एक HOD च्या नावानी, एक वॉर्डनच्या नावानी. मी आभाची अन् माझी बॅग भरते. अशा परिस्थितीत तिला एकटीला नको जाऊ द्यायला. मी जाते सोबत. रीमासुध्दा तयार झाली त्या दोघींसोबत जायला. तिघी मिळून आभाच्या गावी गेल्या. आभाच्या बाबांना पॅरॅलीसिसचा अटॅक आलेला होता. ते दवाखान्यात ऍडमिट होते. Observation साठी त्यांना ICU मध्ये ठेवले होते. रात्री तिघी आभाच्या घरी झोपायला गेल्या. आभाच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. तिचे बाबा एका प्रायव्हेट बँकेत कामाला होते आणि आई शिलाई काम करून घराला हातभार लावायची. दुसऱ्या दिवशी मधुरा आणि रीमा वापस जायला निघाल्या. जाता जाता हॉस्पिटलमध्ये गेल्या. मधुरा आभाच्या आई सोबत बोलत होती.
"काकू, कदाचित ही वेळ नसेल बोलायची, पण प्लिज तुम्ही आभाचं शिक्षण नका थांबवू. तसं पण हे फायनल इअर आहे. पुढच्या वर्षी इंटर्नशिप राहील. पुढच्या वर्षी तर आभाला दर महिन्याला पैसे पण मिळत जातील.  तिचा खर्च तर सहज निघेल. आणि तिला काही गरज लागली तर आम्ही करूच तिला मदत. पण प्लिज तिचं शिक्षण नका थांबवू. पुढे पण ती जॉब करत शिकू शकते." मधुराचं बोलणं ऐकून आभाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या पोरीला चांगल्या मुलींची संगत आहे याचा तिला आनंद झाला. मधुरा आणि रीमा वापस कॉलेजमध्ये आल्या. आभा वापस येईल का नाही याबाबत दोघी साशंक होत्या पण आठ-दहा दिवसांत आभा वापस आली. आभाचं शिक्षण थांबलं नाही म्हणून तिघी पण खुश होत्या. फायनल इअर पण जणू पंख लावूनच आलं होतं, बघता बघता संपलं.


   इंटर्नशिप मध्ये सगळ्यांनी जीव लावून प्रॅक्टिस करायची अस ठरवलं होतं. एकदा इंटर्नशिप संपली आणि या कॉलेजमधून आपण बाहेर पडलो की समाज आपल्या कडे एक डॉक्टर म्हणून पाहणार, आपल्यावर विश्वास ठेवणार. त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आता गरज होती ती मेहनतीची. सौरभ आणि प्रथमेश या दोघांना सर्जरी या विषयाची आवड होती. त्या दोघांनी सर्जरीच्या सरांची OT मध्ये येऊ देण्याची परमिशन घेतली होती आणि त्यांना ती मिळालीपण होती.

   दिवसाचे 12-18 तास पेशंट्ससोबतच जायचे. हॉस्पिटलमध्ये एक नाईट ड्युटी शांततेत गेली नसेल सगळ्यांची. Casuality मध्ये नाईट ड्युटी असेल तर एखादा तरी accident वाला पेशंट यायचाच. अगदी तुटफुट होऊन, मग त्याची इमर्जन्सी, स्कॅन करा, x-ray करा, इमर्जन्सी ऑपरेशन लागत असेल तर त्याच्या फॉर्मलिटी करा, पोलिसांना इंफॉर्म करा एका पेशंट मागे हजार कामं. टीम वर्क असायचं. पण प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहिती असायची. वॉर्डातला पेशंट अचानक क्रिटिकल झाला की लगेच त्याला ICU मध्ये हलवावं लागायचं. म्हणायला सगळे भावी डॉक्टर पण ICU मध्ये पेशंट न्यावा लागला की त्यांना पण एक वेगळीच भीती वाटायची. प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण देऊन जात होता. पेशंट चांगला झाला की नातेवाईक अगदी डॉक्टर समोर हात जोडून जायचे, अन् एखाद्या पेशंची तब्येत अजून बिघडली की भांड भांड भांडायचे. एखादा चांगला झालेला पेशंट एक क्षणात क्रिटिकल व्हायचा तर कधी खूप दिवसांपासून क्रिटिकल असलेला पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायचा. कधी कधी एका वेळेला दोन दोन इमर्जन्सी यायच्या. खायला प्यायला वेळ मोठ्या मुश्किलीने मिळायचा. बहुतेक वेळा सकाळचं जेवण संध्याकाळी व्हायचं अन् त्यामुळं रात्रीचं जेवण व्हायचंच नाही. स्वतःच दुखणं खुपणं याकडे लक्ष द्यायला वेळही मिळायचा नाही. वरवर डॉक्टर म्हणजे भरपूर पैसा असं समीकरण वाटतं लोकांना पण त्यामागची मेहनत सहसा दिसत नाही कोणाला. इंटर्नशिपमध्येच सगळ्यांना याची जाणीव झाली होती. म्हणतात ना 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नसत', बस याचीच प्रचिती अगदी पावलोपावली येत होती सगळ्यांना.
   MBBS नंतर काय करायचं हे आता सगळ्यांच ठरलं होतं. मधुरा आणि रीमा Gynaecology  and Obstetrics (स्त्री रोग तज्ञ) मध्ये MD, तर आभाला Ophthalmology (नेत्र रोग तज्ञ) , प्रथमेश ला General Surgery मध्ये MS करायचं होतं, तर सौरभला Orthopaedic Surgeon बनायचं होतं. नितीनला मात्र आपण Psychiatrist बनावं असं वाटू लागलं होतं. प्रेमात पडल्यापासून त्याचं मन आणि बुद्धी यांचं सतत द्वंद्व युद्ध व्हायचं. खरंच मन आहे का, लोकांना मानसिक आजार कसे काय होतात याबद्दल खूप कुतुहुल निर्माण झालं होतं त्याच्या मनात. कदाचित Psychiatrist बनून त्याला त्याची उत्तरं मिळतील.


   बघता बघता इंटर्नशिपचं वर्ष भर्रकन उडून गेलं. असं वाटायचं अगदी काल सुरू झालं होतं कॉलेज अन् आज सगळं संपलं पण! कायम हसत खिदळत राहणारे सहाजण आता सहा दिशेला जाणार होते. सगळ्यांनी मिळून शेवटच्या दिवशी टेकडीवरच्या मंदिरात भेटायचं ठरवलं. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर एका झाडाच्या पारावर सगळे गप्पा करत बसले होते अचानक आभाळ भरून आलं आणि सोसाट्याचा वारा सुटला. सगळेजण मंदिराकडे धावत सुटले. नितीन तिथेच थांबून होता, त्यानी मधुराला आवाज दिला. मधुरा पण पुन्हा वापस आली.

"अरे चल ना. भिजशील पावसात. चल लवकर. तिकडे जाऊन पण बोलू शकतो ना आपण."

"बोलून टाक नितीन, बोल... पुन्हा उद्या ती भेटणार नाही, कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाही, जास्तीत जास्त काय नाही म्हणेल, तुझं प्रेम नाही स्वीकारणार... आयुषभर तुला खंत तर राहणार नाही की आपण काही बोललोच नाही याची... पण....बोल..... मित्रा आता तरी बोल..."  नितीन स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता.

 

"नितीन, अरे कुठे हरवलास...बोलशील काही की मी जाऊ...पाऊस पडेल कधीही."

नितीननी मधुराचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात तिला म्हणाला, "मधुरा, आयुष्यात कधीही, कुठेही, कोणत्याही प्रकारची गरज पडली तर या मित्राला नक्की आवाज देशील. मी असेल तिथून येईल तुझ्यासाठी."

"हो नक्कीच." एक गोड स्माईल देत मधुरा त्याला म्हणाली.

पावसाच्या सरींना सुरुवात झाली,तशी मधुरा तिथून मंदिराकडे पळाली. सगळेजण नितीनला आवाज देत होते पण नितीन मात्र पावसात चिंब भिजत होता एक पाऊस ढगातून बरसत होता आणि दुसरा डोळ्यातून.
"तुझा नकार पचवायची हिम्मत नाही गं माझ्यात...त्यापेक्षा आयुष्यभर तुझा एक चांगला मित्र बनून राहील. " नितीन मनातल्या मनात बोलत होता. तितक्यात सौरभ त्याच्याजवळ आला.
"नित्या...बोललास का तिला??? काय म्हणाली ती??"

"काही नाही..मी विचारलच नाही." नितीन पावसाचे थेंब हातावर अलगद झेलणाऱ्या मधुराकडे पाहत बोलला. नितीन एका वेगळयाच भावविश्वात गेला होता जणू डोळेभरुन मधुराला पहात होता. काय माहिती पुन्हा भेट होईल न होईल.

"असा कसा रे तू...नित्या... अरे बोलायचं न एकदा..." सौरभ नितीनला खांद्याला हलवून हलवून विचारत होता. तेवढ्यात  जोरात एक विज कडाडली.. सौरभने नितीनला ओढतच मंदिरात आणले.
रीमा झालेल्या प्रसंगावरून जे समजायचं ते समजून गेली.

पाऊस थांबे पर्यंत सगळे मंदिरातच थांबले. वर्षातून एकदा नक्की भेटायचं, फोन करत राहायचे, नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहायचं अजून कितीतरी गोष्टी सगळ्यांनी मिळून ठरवल्या. नितीन मात्र शांत होता. गाभाऱ्यात जळणाऱ्या नंदादीपाच्या प्रकाशात मधुराचा चेहरा अजूनच उजळला होता. नितीन सगळं डोळयात साठवून घेत होता.
   पाऊस थांबला. सगळ्यांनी निघायचं ठरवलं. देवाच्या समोर सगळे हात जोडून उभे होते. सगळे आपापल्या पुढच्या स्वप्नांसाठी देवाजवळ आशीर्वाद मागत होते.
नितीननी मात्र एकच गोष्ट मागितली देवाकडे ती म्हणजे, "मधुरा."
   पुन्हा नवी स्वप्न घेऊन सहा जण सहा दिशेला निघाले होते.

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न