Oct 24, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग ५)

Read Later
मधुरीमा (भाग ५)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

मधुरीमा (भाग ५)

  या सुट्टया नेहमीपेक्षा वेगळ्याच वाटत होत्या. कधी नाही तर नितीन, कॉलेज कधी सुरु होईल याची वाट पाहत होता. घरी आल्यापासून त्याला त्याच्या ग्रुपची विशेषतः मधुरा ची जरा जास्तच आठवण येत होती. तिचं ते हसणं, बोलणं, लोकांसोबत भांडणं, ग्रुपवर असलेली तिची दादागिरी नितीन सगळं खूप मिस करत होता. आपण प्रेमात तर नाही ना या विचारानेच त्याला मनातल्या मनात हसू आलं. अंगावर मोरपीस फिरल्या सारखं वाटलं. हवेत उडल्यासारखं वाटलं. जिथं तिथं त्याला मधुराच दिसायची. आजकाल रोमँटिक गाणे ऐकायला लागला की त्या गाण्यात त्याला तो आणि मधुरा दिसायचे.

किती दिवस झाले मधुराचा आवाज पण नाही ऐकला, काय करू? एक फोन लावून बघू का? असं म्हणत, खूप हिम्मत करून त्याने तिच्या घरी फोन लावला. फोन मधुराच्या बाबांनी उचलला. त्यांचा आवाज ऐकून नितीननी फोन कट केला.
   "आपल्या मनात काय आहे हे आपल्यालाच माहिती. कशाला घाबरतोस नितीन. कर कर...फोन कर...बोल तिच्याशी...आताच एवढ घाबरशील तर प्रेमाचं कसं सांगशील तिला." स्वतःलाच समजावत त्याने पुन्हा फोन लावला. पुन्हा फोन तिच्या बाबांनीच उचलला.

"हॅलो! "

"हॅलो! कोण?? काका...काका मी नितीन बोलतोय.. मधुराचा मित्र. मधुरा आहे का?"

"हो हो..थांब हं देतो आवाज." मधुराला आवाज देऊन त्यांनी नितीनची,त्याच्या घरच्या लोकांची खुशहाली विचारली आणि मधुराला फोन दिला.

"बोला नितीनराव." मधुरा तिरसट बोलली.
 

"काय हे नवीनच.. नितीनराव वगैरे!"

"बोल नं..कसं काय फोन केला होतास?"
 

"रिझल्ट बद्दल काही कळलेलं का हे विचारायसाठी फोन केला होता." काही तरी बोलायचं म्हणून नितीननी विचारलं.

"नाही माहिती मला.अन् तुला कधी पासून रे एवढा रिझल्ट आणि अभ्यासाचा पुळका यायला लागला?"

"तुला काय करायचं त्याचं?  बरं...घरी आहेस तर माझं एक काम कर ना."

"बोला."
 

"काका काकूंना म्हणावं मधुरा नाव बदलून दुसरं ठेवा. कडू कारलं किंवा भांडकूदळ वगैरे." अन् त्यावर तिचं उत्तर ऐकण्या आधीच नितीन ने फोन ठेऊन दिला.

"मी भांडकूदळ का? थांब कॉलेज सुरू होऊ दे बघतेच तुला." मधुरा मनातल्या मनात बोलली.

   रिझल्ट लागला. सगळे चांगल्या मार्कांनी पास झाले. आभा वर्गातून पहिली येईल असं सगळ्यांनाच वाटलं होतं पण मधुरानी इथंसुद्धा बाजी मारली होती.

   सेकंड इअरच कॉलेज सुरू झालं. नितीन मधुराच्या विचारतच कॉलेजमध्ये आला. समोरचं दृश्य त्याच्या ओळखीचंच होत...मधुरा एका ग्रुपसोबत भांडत होती आणि रीमा, आभा तिला मागे ओढून नेत होत्या, तरी तिचं मोठ्याने ओरडून बोलणं सुरूच होतं. 'हिला प्रेमाची कबुली देण्यापेक्षा स्वतःला तोफेच्या तोंडावर देणं सोपं नाही का' असा विचार करत नितीननी सध्या तरी प्रेमाचा विचार पुढे  ढकलला.

   मधुरा आणि रीमा यांच्यात आता घनदाट मैत्री झाली होती. दोघी एकमेकींसाठी काही पण करायला तयार असायच्या..रूमवर त्या दोघींची कॉफी प्यायची ठरलेली जागा होती रूमची खिडकी.... किती तरी वेळ दोघी तिथे बसून गप्पा मारायच्या. गप्पांना विषय नाही असं कधीच व्हायचं नाही. एकमेकींची सगळी सुख दुःख वाटून घ्यायच्या. अशी मधुराची कोणती गोष्ट नव्हती की जी रीमाला माहिती नाही अन रिमाची अशी गोष्ट नव्हती की जी मधुराला माहिती नाही. त्या दोघींकडे पाहिलं की मैत्रीवरचा विश्वास अजूनच पक्का व्हायचा.
   सगळं पुन्हा रुटीन सुरू झालं. लेक्चर्स सुरू झाले, सोबत प्रॅक्टिकल्ससुध्दा.

    'या वर्षी लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स संपल्यावर जो वेळ मिळतो तेव्हा वार्डात, ओ. पी. डी. मध्ये जाऊन पेशंट्स पहात जा.' असा मोलाचा सल्ला पॅथॉलॉजी वाल्या सरांनी दिला. आता इथूनपुढे खऱ्या अर्थाने MBBS म्हणजे नेमकं कसं ते कळणार होतं. बघता बघता सहा महिने कसे गेले कळलंही नाही. सगळ्यांना आवडणारी नोटीस क्लासमध्ये येऊन धडकली होती, ती नोटीस ट्रिपची होती.

   सेकंड इअरची ट्रिप यावर्षी गणपतीपुळेला जाणार होती. या ट्रिपमध्ये मधुराला अजून समजून घेण्याचा मोका मिळेल, अवखळ समुद्रासमोर समुद्रासारख्याच अवखळ मधुराला प्रपोज करू असं नितीननी ठरवलं होतं.
   अन् शेवटी तो दिवस उजाडला, ज्याची नितीन आतुरतेने वाट पाहत होता, गणपतीपुळेला जायचा दिवस. कॉलेजनी एक प्रायव्हेट बस केली होती.

'बसमध्ये मी मधुराच्या बाजूला बसेन, मग हवेनी तिचे खूप केस उडायला लागतील, तिला खिडकी काही बंद करता येणार नाही, मग मीच ती खिडकी बंद करून देईल. मग ती एक क्युट स्माईल देईल.मधुरा झोपली की झोपेत तिचं डोकं आपोआपच माझ्या खांद्यावर येईल, मी पण मग तिला बिलकुल डिस्टर्ब न करता तसंच झोपू देईल. थोड्यावेळाने तिला जाग येईल आणि ती लाजून माफी मागेल.' असं दिवास्वप्न बघत, नितीन रमत गमत कॅम्पसमधून  बसकडे येत होता. नितीन येताना दिसला अन् बसमधली मुलं त्याच्या नावानी ओरडायला लागली, कारण त्याच्या एकट्यासाठी बस थांबली होती, बाकी सगळे आले होते. आपली मधुराजवळची जागा गेली की काय या भीतिने तो पळतच बसपर्यंत आला. समोरचं चित्र पाहून नितीनचा चेहराच उतरला. बसमध्ये सगळ्या मुली अन् मॅडम एका साईडला तर मुलं आणि सर एका साईडला बसले होते. मधुराच्या एकदम विरुद्ध बाजूस एक सीट सोडून सौरभ आणि प्रथमेश बसले होते. नितीन प्रथमेशला मागे बस म्हणून खूप विणवत होता पण तो काही जागचा हलेना, शेवटी सौरभ उठून मागे गेला.

   मुली विरुद्ध मुलं अशी अंताक्षरी सुरू झाली. प्रत्येक वेळेला नितीन बरोबर रोमँटिक गाणं शोधून काढत होता. आणि मधुराकडे बघत म्हणत होता. वाटेत बस जेवणासाठी थांबली होती. तेव्हा पण नितीन मधुराच्या मागे-पुढे करत होता. तिची जरा जास्तच काळजी घेत तिला हवं नको ते पाहात होता ही गोष्ट आता सगळ्या ग्रुपच्या लक्षात येत होती, फक्त एक व्यक्ती सोडून...ती म्हणजे मधुरा...

    चार वाजण्याच्या सुमारास सगळे गणपतीपुळेला पोहोचले. आधी श्री गणरायाचं दर्शन घेऊन सगळे मनसोक्त समुद्रकिनारी खेळत होते. नितीन मात्र दूर एकटाच जाऊन बसला होता. वाळूवर तो, मधुराचं आणि त्याच नाव लिहायचा, समुद्राची लाट यायची अन नावं मोडून जायची. कितीतरी वेळ त्याचा हा उद्योग सुरू होता. त्याला अस एकटं पाहून सौरभ त्याच्याजवळ गेला.

"असं नावं लिहिण्याने काय होणार आहे?" सौरभ.
 

" चल, जाऊ तिकडे." नितीन उत्तर टाळत होता.

"अरे बोल ना नितीन, सांगून तर बघ तुझ्या मनातलं, काय होईल नकार देईल? स्वीकारू पण शकते ना?" सौरभ.
 

"हा समुद्र आणि मधुरा मला सारखेच वाटतात. दोघांच्या मनाचा कुठे थांगपत्ता लागतो. दोघही तसेच अवखळ. पण एकदा रौद्र रूप धारण केलं की समोरचा नष्ट झालाच म्हणून समजा.अजून ती वेळ आली नाही असं वाटतं सौरभ मला. चल, दोन्ही समुद्र डोळा भरून पाहून तर घेऊ दे." नितीन आणि सौरभ दोघे पुन्हा ग्रुप मध्ये जॉइन झाले.  

   रात्रीचा मुक्काम जवळच्याच एका रिसॉर्ट वर होता. तिथे गेल्यावर सगळे फ्रेश होऊन, जेवणं करून शेकोटी भोवती बसले. सगळे पासींग द पार्सल गेम खेळत होते. नितीनची वेळ आली, सगळ्यांनी नितीनला गाणं म्हणायला लावलं. तसंही नितीननी आज खूप रोमँटिक गाणी म्हटली होती, अन् त्याचा आवाजही चांगला होता. नितीननी गाणं सुरू केलं...अर्थात मधुराकडे पाहतच
 

           छुपाना भी नहीं आता
           जताना भी नहीं आता
           हमें तुमसे मोहब्बत है
           बताना भी नहीं आता

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न