मधुरीमा (भाग ४)

Story of two friends

मधुरीमा भाग 4

   दुसऱ्या दिवशी दोघी सोबतच कॉलेजला निघाल्या. रस्त्यात एक मुलांच टोळकं उगीच काही तरी कमेंट पास करून फिदीफिदी हसत होतं. मधुरा आणि रीमा तिथुन गेल्यावरसुद्धा त्या टोळक्यानी तसंच केलं. मधुरा एकदम चिडून मागे आली. मुलांच्या गळ्यात आय कार्ड होतंच, तिनी सगळ्यांची नावं वाचली.

"थोड्या वेळात प्रिन्सिपॉल सरांच्या चेंबरमध्ये बोलावणं येईल, जा मग तिकडे." मधुरा.

मुलांची तोंडच उतरली एकदम. मधुरा होतीच तशी .. नावाप्रमाणेच मधुर.. दिसायला गोड, वागायलाही तशीच,.. पण बोलायला ती कोणालाच घाबरायची नाही..तिच्याशी कोणी पंगा घेतला तर समोरच्या व्यक्तीला ती तिथंच माती खाऊ घालून यायची. त्यामुळं मुलंही फटकूनच असायची तिच्यासोबत.

   दोघी वर्गात आल्या. सगळेजण एकमेकांशी बोलत होते. पहिल्या डेस्कवर एक मुलगी अभ्यास करताना दिसली. दोघी तिच्या मागच्याच डेस्कवर बसल्या. मधुरानी तिची आणि रीमाची ओळख करून दिली.
"हाय! मी मधुरा आणि ही रीमा."

"हॅलो! मी आभा."

"हॉस्टेलवर कोणती रूम मिळाली तुला?" रीमा.

"नाही मिळाली अजून. काल उशीर झाला होता पोहोचायला. तो पर्यंत ऑफिस बंद झाले होते. आई बाबांसोबत एका लॉजवर थांबलो रात्री. आज मिळेल रूम." आभा.

"सगळ्या रूम मध्ये तीन-तीन मुली झाल्यात. आमच्या रूममध्ये आम्ही दोघी आहोत. बहुतेक तुला हीच रूम मिळेल." मधुरा.

मधुराचा अंदाज खरा ठरला. आभाला त्यांचीच रूम मिळाली. आभा तशी शांत होती, जास्त बोलायची नाही कोणासोबत, लवकर मैत्री करायची नाही ती. हळु हळु कॉलेजमध्ये सगळे रुळत होते. साहजिकच ग्रुप तयार झाले. सौरभ, नितीन,प्रथमेश यांच्यासोबत मधुरा आणि रीमाचं चांगलं पटायला लागलं. आभाही सोबत होतीच.
 

  कॉलेजमध्ये लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आता नियमित सुरू झाले होते. Anatomy च प्रॅक्टिकल होतं. सगळ्यांना लॅब मध्ये जमायला सांगितलं. Anatomy च्या सरांनी डेड बॉडी disection कस करायचं ते सांगितलं. सगळ्या मुलांनी आधी किळसवाणे चेहरे केले. मधुरा फार उत्साहात तयार झाली सर्वात पहिले करायला. सरांनी तिला सगळ्यात पुढे यायला लावलं. टेबलवर बॉडी होती, disection कसं करायचं ते सर explain करत होते. तिनी समोरच्या डेड बॉडीकडे पाहिलं, तिला दरदरून घाम आला आणि मधुरा एकदम चक्कर येऊन पडली. सगळे विद्यार्थी 'काय झालं? काय झालं ?' म्हणून एकदम गलका करायला लागले. सरांनी सगळयांना शांत बसायला लावलं.  

   लॅब असिस्टंट आणि तिथल्या एका नर्सने तिला उचलून बाजूला, दूर एक चेअरवर बसवलं. पंखा सुरू केला, थोडं पाणी प्यायला दिलं. मधुराला थोडं बर वाटलं पण मधुराची पुन्हा तिथं उठून जाण्याची हिम्मतच होत नव्हती. पूर्ण प्रॅक्टिकल होईपर्यंत ती तिथंच बसली होती. जसं प्रॅक्टिकल संपलं तशी ती हळूच चोरपावलाने लॅबच्या बाहेर जायला निघाली, मुलांच्या हे लक्षात राहीलं, तसं तिला सगळे चिडवायला लागले. एरवी कोणत्याच गोष्टीला न घाबरणारी मधुरा डेड बॉडी ला घाबरली होती.  चिडून ती क्लासमध्ये येऊन बसली. पुन्हा सगळे चिडवत क्लासमध्ये आले.आता मात्र मधुरा खूप वैतागली, सगळयांना चिडून म्हटली, "तुम्हाला माहितीये मी का एवढी घाबरले. नाही ना. तुम्ही डेड बॉडी नीट पाहिली का? फिजिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये एक काम करणारा माणूस आहे तो सेम तसा दिसतो. खोटं वाटतंय! चला आता जाऊन बघू."

   सगळा क्लास मधुराच्या मागे फिजिओलॉजी डिपार्टमेंट मध्ये गेला. मधुराने सांगितलेला माणूस अन् ती डेड बॉडी यात काहीच सारखेपणा नव्हता पण तिनी सांगितल्यापासून सगळ्यांना ते दोघे सेम वाटायला लागले.  आपण घाबरलो होतो याचं भांडं तिनी साळसूदपणे तिसऱ्याच व्यक्तीच्या डोक्यावर फोडलं होतं.

   एकदिवस रीमाच्या नावावरून 'रीमा सुनीता नवलकर' रीमाला एका मुलाने टॉन्टिंग केलं. नेमकं ते मधुरानी ऐकलं. मधुरा त्या मुलाजवळ गेली.

"Excuse me! आता काय म्हणालास तू? काय, नाव काय तुझं?"
"वैभव."

"वडिलांचं नाव, आडनाव लावायची पद्धत नाही का तुमच्यात? नाही दुसऱ्याला त्याच्या नावावरून चिडवता म्हणून म्हटलं." मधुरा.
"ए... तुला काय करायचं...मला वाटलं तर मी बापाच नाव लावीन नाही तर नाही लावणार." वैभव.
"बरोबर आहे तुझ्यासारखे लोकं असंच बोलणार." मधुरा खूप भांडली त्या मुलासोबत, एवढी की रीमानी तिला जबरदस्ती ओढत ओढत होस्टेलवर नेलं, जाई जाईपर्यंत ती त्या मुलांना ओरडून ओरडून भांडत राहिली.
   रीमा तिच्या आईचं नाव लावायची त्याला कारणही तसंच होतं. रीमा तीन वर्षांची होती, आणि तिचा भाऊ तिच्या आईच्या पोटात होता. रीमाच्या बाबांनी बिझनेससाठी म्हणून कर्ज काढले होते. बिझनेस काही चालला नाही, कर्जाचा डोंगर वाढला म्हणून रीमाच्या बाबांनी आत्महत्या केली होती. रीमाच्या आईनी मोठ्या कष्टाने, हिंमतीने मुलांना वाढवलं होतं. आईच्या कष्टाची जाणीव रीमाला होती. कळायला लागल्यावर रीमाने स्वतःच्या नावाच्या मागे आईचं नाव लावायला सुरुवात केली. तिचा भाऊ सुद्धा तिच्यासारखाच आईचं नाव लावायचा.

"तुझ्या आईवडिलांनी चुकून तुझं नाव मधुरा ठेवलं." प्रथमेश मधुराला नेहमी चिडवायचा. प्रथमेश एकदम जॉली माणूस. कुठलंही वातावरण त्याच्या बोलण्याने लगेच बदलून जायचं. सौरभ सगळ्यांना मदत करणारा, सिनिअर असो, ज्युनिअर असो किंवा क्लासमेट कोणीही त्याची मदत मागितली की तो सर्वोपतरी मदत करायचा. नितीन मात्र शांत, थोडासा अबोल, दहावेळा विचार करून वाक्य बोलणारा.
 

कॉलेज,  कॅन्टीनमध्ये हे सहाजण सोबतच असायचे. अभ्यासाच्या भरपूर टॉपिकस् वर ग्रुप डिस्कशन व्हायचे, पैजा लागायच्या, कुठेही वाद घालायचा म्हटलं की मधुरा सगळयात पुढं असायची. ग्रुपवर तिचीच दादागिरी चालायची. पण सगळयांना तिची कंपनी आवडायची. रविवारी हॉस्टेलवरून  बाहेर जायची परवानगी असायची, फक्त वेळेच्या आत वापस यायचं बंधन होतं. आठवडाभर भरपूर अभ्यास करून रविवारी पूर्ण दिवस मज्जा करायचा प्लॅन असायचा या सहा जणांचा. कधी एखादा सिनेमा तर कधी उगीच बाजारात हिंडायचे, कधी टेकडीवरच्या मंदिरात, तर कधी एखाद्या चहाच्या टपरी वर गप्पांच्या रंगात कितीतरी चहाचे ग्लास रिकामे व्हायचे, रविवारी फिरून आजूबाजूचा कितीतरी परिसर या लोकांनी पालथा घातला होता. आभा बरेचदा यायची नाही, तिच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, त्यामुळे शक्यतो ती कमी आणि गरजेपुरतेच पैसे खर्च करायची.

   हॉस्टेलच्या लँडलाईनवर घरून फोन यायचे. संध्याकाळची एक ठराविक वेळ दिलेली असायची त्यावेळातच फोन येई. घरी फोन करायचा असेल तर कॉलेजच्या आवारात एक STD बूथ होता तिथून करावा लागे. दोन चार महिन्यात घरचं कोणीतरी भेटीला येऊन जायचं. खर्चासाठी थोडेफार पैसे आणि घरचा खाऊ देऊन जायचे. आधी एका जणापुरता खाऊ यायचा नंतर मग सहा जणांसाठी यायचा.

   लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, मध्ये मध्ये होणाऱ्या टेस्ट यामध्ये बघता बघता पहिलं वर्ष संपत पण आलं. फायनल एक्झाम देऊन सुट्टी साठी सगळे आपापल्या घरी गेले.

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 
 

🎭 Series Post

View all