Oct 18, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग ३)

Read Later
मधुरीमा (भाग ३)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 

मधुरीमा : भाग 3

 

 

रीमा घरी आली. फ्रेश होऊन एक कप कॉफी बनवली. स्वयंपाकवाल्या मावशींना सूचना देऊन ती कॉफी घेत बसली होती. खरंतर मधुराला घाबरलेलं बघून ती पण थोडी घाबरली होती. 'खरंच रुद्र असेल का तो? असेल तर इकडे कशाला आला असेल? माहिती काढून ठेऊ का त्याची, तो कुठे आहे, काय करतोय? त्याची माहिती काढायला जावं आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला असं होऊ नये.' विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. माझेच हे हाल आहेत तर मधुराला काय वाटत असेल. 'एक फोन लावून बोलूनच घेते', असा विचार करत तिने मधुराला फोन लावला.

   रीमा तीन-चार वेळा मधुराच्या मोबाईलवर कॉल करते पण मधुरा फोन उचलत नाही. आता मात्र रीमाला खूप घाबरायला होतं. 'मधुरा ठीक असेल नं? घरी जाऊन बघू का? काय करू?'  काकूला फोन लावून बघते, त्यांच्या बोलण्यावरून येईल अंदाज, मग ठरवते काय करायचं ते. असा विचार करून रीमा मधुराच्या आईला फोन लावते.

 

"नमस्ते काकू!"

 

"बोला डॉक्टरीण बाई, आज कशी काय या म्हाताऱ्या जीवाची आठवण झाली?"

 

"काय हो काकू..नेहमीच येते तुमची आठवण. बरं मधुरा ठीक आहे नं? म्हणजे घरी आल्यावर ती काही बोलली का तुम्हाला? मूड कसा होता तिचा? "

 

"नाही गं. काय झालं?"


 

"काही नाही.. असंच. मधूला द्या न फोन थोडं काम होतं."

 

"हो. देते हां."


 

"हाय मधू... काय करतेयस? अन् फोन कुठंय? किती कॉल केले मी."

 

"बॅग मध्येच राहीला बघ. लक्षच नाही माझं. अगं तुला म्हटलं होतं ना नीतीचा प्रोजेक्ट बनवायचा म्हणून, बस तेच सुरू आहे. तू बोल ना, काय म्हणत होतीस?"


 

"काही सुचलं का ग तुला? हेल्थ कॅम्प ठेवायचा की ब्लड डोनेशन की अजून काही..मला तर नाही सुचतंय काही.." काहीतरी बोलायला विषय हवा म्हणून रीमानी विचारलं. मूळ उद्देश्य मात्र वेगळाच होता.

 

"अगं हो, मला सुचलं एक. बघ, आपल्या हॉस्पिटलची एक ऍम्ब्युलन्स आहे. आपण एक अजून घेऊ. महिन्यातून दोन वेळा आपण ना आपल्या आजूबाजूच्या छोट्या गावात, दुर्गम भागात जाऊन महिलांची आणि मुलींची मोफत आरोग्य तपासणी करत जाऊ. गरज असेल तर औषध सुध्दा मोफत देत जाऊ. काही टेस्ट किंवा ऑपरेशन वगैरे लागलं तर आपल्या हॉस्पिटलमध्ये माफक दरात करण्याचा सल्ला देऊ किंवा त्यांना अजून दुसरे काही मार्ग असतील तर ते सांगत जाऊ. आज सकाळी तू ऑपरेट केलेल्या केस वरून तर मला हा पर्याय चांगला वाटतो. काय म्हणतेस करायचं का असं?"

 

"हो..भारीच आहे की कल्पना.. तसंच करू. एका वेळेला मी जाईन, एका वेळेला तू जात जा. म्हणजे आपलं हॉस्पिटलचं काम पण डिस्टर्ब होणार नाही."

 

"चालेल तसंच करू एकदा मी, एकदा तू. ऐक ना, नीतीला बोलायचं आहे ग बाई तुझ्याशी. बोल एकदा. राग आलाय बरं मॅडमला. तू आली नाही ना खूप दिवसात. हे घे बोल."


 

"हॅलो नीती...my little star.. काय करतंय माझं पिल्लू?"

 

"मी नाही बोलणार. जा... कट्टी फू... रीमा माऊ...तू आली का  नाहीस?"

 

"या संडेला येते हं.. पक्का येते..मग आपण आईस्क्रीम पार्टी करू. बरं मला सांग काय प्रोजेक्ट बनवतेय तू?."

 

"आम्हाला ना पुठ्ठ्यापासून बिल्डिंग बनवायला सांगितली आहे."


 

"बापरे...बिल्डिंग...! तू काय बनवलं मग."

 

"मी...हॉस्पिटल... मधुरीमा..."

 

"माझं गोड ग ते बछडं... आता तर या संडेला दोन-दोन आईस्क्रीम खाऊ...मम्माजवळ दे बरं फोन."

 

"Yessssssssss!" आनंदाने उड्या मारत नीती मधुरा कडे फोन देते. नानी रीमामाऊ काय म्हटली माहितीये म्हणत ती आजीच्या मागे गेली.

 

"मधु, तू सांगितलेली कल्पना चांगलीच आहे. तीच फायनल करून टाकू. त्यासाठी लागणारी कागदपत्र, काही प्रोसिजर आहे का ते सगळं बघते मी. तसे सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून ठेवलेत मी. काही लागलं तर सांगते मी तुला. भेटू उद्या. बाय."


 

   मधूसोबत बोलून रीमाला थोडं बर वाटलं. 'मधुरा रुद्रचा विषय विसरली. नीती आहे म्हणून बरं आहे. घरी गेल्यावर तिचा सगळा वेळ नीतीसोबत जातो.' असा विचार करतच लॅपटॉप मधले स्कॅन केलेले डॉक्युमेंट्सच्या प्रिंट काढून घेण्यासाठी तिनी लॅपटॉप सुरू केला. स्कॅन फोल्डरमध्ये बघताना तिला काही जुने फोटोज् दिसले. कॉलेज मधले..ती, मधू, आभा, नितीन, सौरभ आणि प्रथमेश... गणपतीपुळेला ट्रिपच्या वेळी काढलेला फोटो..सहाही जणांच्या चेहऱ्यावर अवखळ हसू आणि त्यांच्या मागे तसाच अवखळ, अथांग समुद्र...मन भूतकाळात कधी जाऊन पोहोचलं कळलंच नाही...


 

********************

   MBBS च पहिलं वर्ष....हॉस्टेलवरचा पहिला दिवस... पालक आपल्या आपल्या मुलींना होस्टेलवर सोडायला आले होते. फर्स्ट इयर च होस्टेल वेगळं होतं आणि सेकंड इयर पासून पुढचे वेगळ्या होस्टेलमध्ये. वॉर्डन एकेका मुलीची एन्ट्री करून, रूम नंबर देऊन तिला आत सोडत होती. रीमाचा नंबर आला तशी ती रडायलाच लागली. आईला सोडून ती पहिल्यांदाच बाहेर शिकायला आली होती. सामान घेऊन रीमा रूम मध्ये गेली आणि हातात तोंड लपवून ती रडायला लागली. तेवढ्यात एक आवाज आला,

"Excuse me!"

 

तिनी मान वर करून पाहिलं.

 

"हाय, रूममेट...मी मधुरा. मधुरा कानिटकर. तुझं नाव काय?"

 

"रीमा. रीमा सुनीता नवलकर."

 

"ए.. रडतेयस काय गं...! मी पण तर पहिल्यांदाच घर सोडून आलेय.. आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय. त्यासाठी हा थोडाफार कठीण रस्ता पार करायचाय. मग रडायचं कशाला."

मधुराला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मधुरा खूप ओळखीची असल्यासारखं वाटलं. तिला मधुराचं म्हणणं पटलं. रात्री दोघींनी रूमवर बरंच सामान नीट लावून ठेवलं.  मेसमध्ये जेवायला गेल्या. घरच्या अन्नाची सर कशाला येत नाही हे मेसच्या पहिल्या जेवणातच कळालं त्यांना. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये दोघी सोबतच गेल्या. ऑडिटोरीयम हॉल मध्ये पहिलं लेक्चर डीन सरांचं होतं. त्यांनी कॉलेज बद्दल माहिती सांगितली, कॉलेजचे, हॉस्टेलचे नियम सांगितले. बाकी फर्स्ट इयर च्या मॅडम आणि सरांनी पण स्वतःची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशीपासून सगळं सुरू होणार होतं.

 

   दोघी हॉल च्या बाहेर आल्या. आणि डोळ्यासमोर एकदम मधुराचे आई बाबा, रीमाची आई आणि भाऊ होते. पळतच दोघी आपापल्या आईच्या गळ्यात पडल्या.

 

"आई, मला तर वाटलं तुम्ही लोक गेले कालच." मधुरा.

 

"आमचंही लेकरू पहिल्यांदाच बाहेर पडलंय शिकायला. मन लागणार का मग ! तुम्ही सगळ्या मुली रूममध्ये गेल्यावर वॉर्डन शी बोलत होतो. त्यांनी आजच्या या छोट्या लेक्चरबद्दल सांगितलं. तिथं रीमाच्या आई पण होत्याच. मग म्हटलं थांबू आज अन भेटूनच जाऊ तुम्हाला. चला जेवायला जाऊ बाहेर." मधुराचे बाबा.

 

"वॉर्डन ची परवानगी काढावी लागेल नं." रीमा.

 

"अगं, आम्ही काढून आलोय. परवानगी" रीमाची आई.


 

बाहेर जेवणं करून थोडा मार्केट मध्ये फेरफटका मारला सगळ्यांनी. मुलींना अजून काही गरजेचं समान घेऊन दिले. दोन्ही कुटुंबांची पण चांगली ओळख झाली. हॉस्टेल वर जायची वेळ आली.

 

"चांगल्या राहा मुलींनो. भरपूर अभ्यास करा. एकमेकींची काळजी घ्या. भांडू नका बर." दोघींच्या आई दोघींनाही समजवून सांगत होत्या.

 

"हो हो, तुम्ही नका काळजी करू." मधुरा.

 

सगळ्यांचा निरोप घेऊन दोघी पुन्हा हॉस्टेलवर आल्या.

दोघींनी नकळतपणे हातात हात घेतले होते. तेव्हा किंचितही जाणीव नव्हती, हा मैत्रीचा हात भविष्यातही एवढा पक्का राहणार आहे म्हणून.

 

क्रमशः

 

फोटो- गुगलवरून साभार

 

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


 

                                   © डॉ किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न