मधुरीमा (भाग ३७ -अंतिम)
नितीच्या पावलाने घरात एक चैतन्य आलं होतं. राधिकाताई आणि मधुकरराव दोघे तर नितीच्या तैनातीतच रहात होते. नितीला जन्म दिला नसला तरी मधुरा हे आईपण खूप आनंदाने जगत होती. नितीच्या लसीकरणाच्या वेळी मधुराच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटायचा. निती आजारी असली की मधुराच्या कितीतरी रात्री जागून निघायच्या.
रीमाच्या म्हणण्यानुसार नितीच्या जन्मानंतर "मधुरीमा" हॉस्पिटलमध्येच बालरोग विभाग सुरू करण्यात आला होता. बाळांसाठी आय.सी.यु. पासून सगळीच व्यवस्था तिथे करण्यात आली होती. हळूहळू "मधुरीमा" हॉस्पिटलची ख्याती सर्वदूर पसरत होती. आलेला प्रत्येक पेशंट चेहऱ्यावर एक समाधान घेऊनच तिथून बाहेर पडायचा.
नितीच्या दुडूदुडू धावणाऱ्या पावलांसोबत वेळही तसाच पुढे निघून आला होता.
************************************
मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता. सकाळचे सहा वाजले होते. मधुरा डॉक्टर्स रेस्ट रूममध्ये तिच्या एम.डी.च्या वेळेस मिळालेल्या गोल्ड मेडलवाल्या फोटोसमोरच उभी होती. जवळपास एक तप कसं झर्रकन् डोळ्यासमोरून निघून गेलं होतं. खूप वेळापासून उभी असल्याने तिच्या पायाला मुंग्या आल्या होत्या. रात्रभर जागरण झाल्याने आणि न जाणो कितीवेळा तरी रडल्यामुळे मधुराचे डोळे लाल झाले होते. डोळ्यांची आग होत होती. मधुरा बाथरूममध्ये गेली, थंडगार पाण्याचे शिपके तिने चेहऱ्यावर मारले त्यामुळे तिला थोडं फ्रेश वाटलं. बाहेर येऊन तिने कॉल बेल वाजवली आणि नर्सला एक स्ट्रॉंग कॉफी आणायला लावली. कॉफी घेऊन तिला अजून तरतरी जाणवली. तिने पुन्हा एकदा हॉस्पिटलचा राऊंड घेतला. सगळे पेशंट शांतपणे झोपलेले होते.
मधुरा पार्किंगमध्ये आली. तिचं लक्ष पुन्हा त्याच झाडाकडे गेलं. तिथे ती गाडी नव्हती.
"म्हणजे हा भासच होता." ती स्वतःशीच पुटपुटली आणि घरी गेली. नितीची शाळा, प्रोजेक्ट, \"मधुरीमा\" चा वाढता व्याप यात मधुरा आणि रीमा व्यस्त होऊन गेल्या.
एक महिन्यानंतर……
"हॅप्पी बर्थडे निती…. माझं शोनं गं ते…. माझी प्रिन्सेस…." रीमा चॉकलेट चा बुके घेऊन सकाळी सकाळी मधुराकडे आली होती. मधुराने घरात रात्रीच सगळीकडे फुगे, फुलं लावून सजावट केली होती. निती उठल्यावर हे सगळं पाहून हरखून गेली होती.
"थॅंक्यु नाना, थॅंक्यु नानी, थॅंक्यु मम्मा, थॅंक्यु रीमा माऊ…. ए रीमा माऊ आपण संध्याकाळी कुठे जायचं गं?" निती रीमाच्या गळ्यात हात टाकत बोलली.
"मस्त बाहेर जाऊ कुठेतरी. आज \"मधुरीमा\" चा सुद्धा बर्थडे असतो ना. तू आता मस्त न्यू ड्रेस घाल. शाळेत जा. शाळेतल्या सगळ्या मुला-मुलींना, टीचर्सला चॉकलेट दे. स्कुल बसमधल्या सगळ्या फ्रेंड्सला पण दे बरं. तोपर्यंत आम्ही आमचे कामं उरकतो मग आपण मस्तपैकी मज्जा करू. हे बघ.. किती चॉकलेट्स आणले मी! चल… पटापट तयार हो…" रीमाचं ऐकून निती शाळेच्या तयारीला लागली.
मधुरा आणि रीमाने ठरवल्याप्रमाणे एक अँबुलन्स घेतली होती. दुर्गम भागात आणि खेड्यापाड्यात जाण्यासाठी त्या अँबुलन्समध्येच फिरते रुग्णालय तयार केले होते. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. डॉ. गिरीजा आणि त्यांचे दोन सहकारीसुध्दा या उपक्रमात सहभागी झाले होते. एक फार्मा कंपनी अगदी अत्यल्प किमतीत औषधी पुरवायला तयार झाली होती, त्याचप्रमाणे शहरातील नामवंत पॅथॉलॉजी लॅबसुध्दा कमी दरात टेस्ट करून द्यायला तयार झाली होती. सगळं अगदी मनाप्रमाणे घडत होतं. संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम संपला.
"रीमा, नितीला घेऊन बाहेर जाऊ कुठेतरी." मधुरा.
"हो, जाऊ या की. मी तुला पत्ता मेसेज करते तिथे पोहोच साडेसातपर्यंत आणि हो… नितीला त्यादिवशी आपण घेतलेला तो प्रिन्सेसचा ड्रेस घालशील. काका काकूंना पण आणशील गं सोबत." रीमा बोलली आणि दोघी तिथून निघाल्या. मधुराने पुन्हा त्या झाडाखाली पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं.
रीमाने एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये नितीच्या बर्थडे पार्टीची तयारी केली होती. नितीसाठी हे सगळं सरप्राईज होतं आणि मधुरासाठीसुध्दा. पार्टीचं डेकोरेशन प्रिन्सेस थीमचं केलेलं होतं. बरोबर साडेसात वाजता मधुरा नितीला घेऊन राधिकाताई, मधुकरराव आणि सुनीताताईंसोबत रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. रीमा आधीच तिथे पोहोचलेली होती. सगळीकडे मस्त फुगे लावून सजावट केलेली होती. गार्डन रेस्टॉरंटच्या एका बाजूला मुलांसाठी प्ले स्टेशन तयार केलं होतं. निती सगळं बघून हरखून गेली होती. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. थोड्याच वेळात सगळे बोलावले पाहुणे, नितीचे शाळेतले मित्रमैत्रिणी, \"मधुरीमा\" चा स्टाफ पोहोचले. केक कटिंगचा कार्यक्रम झाला. केक कापला की निती लगेच मुलांसोबत खेळायला पळाली. सगळेजण एकमेकांशी बोलण्यात गुंग होते. फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढत होता. तेवढ्यात एक वेटर गुलाबाच्या फुलांचा मोठा बुके घेऊन आला.
"मधुरा मॅडम तुम्हीच का?" वेटरने बुके देत विचारलं. त्यासोबत एक चिठ्ठीसुध्दा होती.
"हो, मीच मधुरा. कोणी पाठवला बुके?" मधुरा.
"नाव नाही माहिती त्यांचं, बाहेर गेटजवळ एक काळा कोट घालून एक सर उभे आहेत त्यांनीच पाठवला. ही सोबत चिठ्ठी दिलीये." वेटर बुके देऊन निघून गेला. मधुराने चिठ्ठी वाचली, तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. तिने ती चिठ्ठी रीमाला दाखवली. मधुराच्या चेहऱ्यावरचे भाव बघून रीमा सुद्धा घाबरली.
"मधुरा, कितीही पुढे गेलीस, कुठेही गेलीस तरी तुझा एक भूतकाळ आहे आणि तो नेहमीच तुझ्या मागे मागे येत राहील." रीमाने चिठ्ठी वाचली.
"चल पटकन, कोणी ही चिठ्ठी दिली जरा बघूनच येऊ." रीमा मधुराच्या हाताला पकडून बाहेर नेत होती. मधुराच्या हातातला बुके हातातच होता. दोघी बाहेर गेटजवळ आल्या. तिथे एक काळा कोट घातलेला एक इसम उभा होता.
"एक्सक्युझ मी!" रीमा थोडं कडक आवाजात बोलली. त्या इसमाने मागे वळून पाहिलं.
"नित्या तू!" मधुराने हातातला बुके त्याच्या तोंडावर मारला.
"कोणी बुके दिला तर त्याच्याच तोंडावर तो परत मारायची प्रथा आहे का तुमच्याकडे? बरं झालं बुके घेतला मी, त्याऐवजी गुलाबाचं झाडं कुंडीसहीत घ्यायचा विचार केला होता. म्हटलं झाड बहरत राहील; पण बरं झालं घेतलं नाही ते. टाळकं फोडलं असतं तू तर माझं." नितीन.
"अशी थट्टा करतात का? घाबरले ना मी." मधुरा.
"सॉरी… सॉरी… आता इथंच बोलत बसायचं की बर्थडे गर्लला भेटू की नाही." नितीन,रीमा आणि मधुरा बोलत बोलत आत आले.
"निती कुठे आहे?" नितीन.
"ती काय… मुलांसोबत खेळतेय." रीमा.
"खेळू दे तिला. तोपर्यंत काका काकूंसोबत बोलतो." नितीन मधुकरराव आणि राधिकताईंसोबत बोलत उभा होता. सुनीताताईसुद्धा तिथेच होत्या.
"काका, एक गोष्ट बोलायची होती… नाही… विचारायची होती… नाही… मागायची होती… " नितीन शब्दांची जुळवाजुळव करत होता.
"म्हणजे?" मधुरा.
"तू इकडे लक्ष देऊ नको, मी काकांशी बोलतोय ना? अशी डीवचलेल्या म्हशीसारखी माझ्याकडे बघू नकोस. तुझी भीती वाटते मला." नितीन.
"कधीपासून?" मधुरा.
"कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून! ए बाई… बोलू दे ना मला… तू इकडे लक्ष देऊ नको. प्लिज!" नितीन.
मधुराने जाणीवपूर्वक लक्ष दुसरीकडे असल्यासारखं केलं पण तिचे कान मात्र नितीन काय बोलतो तिकडेच होते.
"काका, मधुराचा हात माझ्या हाती द्याल का? मला मधुराला आयुष्यभराची साथ द्यायची आहे… जीवनसाथी म्हणून.... माझं कॉलेजपासून प्रेम आहे तिच्यावर पण कधी मी हिम्मतच केली नाही तिच्यासोबत बोलायची. आज बोलेन उद्या बोलेन असं करत तिचं लग्न झालं… नंतर… नंतर तिला असं वाटू नये की मी मुद्दाम तिला आधार द्यायला वगैरे हे सगळं करतोय म्हणून मी बोललोच नाही; पण आज हिम्मत करून बोलतोय. तिच्या प्रत्येक गोष्टीत साथ देईल. मनापासून सांगतोय आणि एकच गोष्ट मागतोय… मधुरा… " नितीन थोडं घाबरत बोलला. मधुकरराव आणि राधिकताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी अपेक्षेने मधुराकडे पाहिलं. मधुराचे डोळे भरून आले होते. काय बोलावं तिला काहीच सुचत नव्हतं.
"निती… नितीला काय वाटेल? तिला काय सांगू मी?" मधुराचा कंठ दाटून आला होता.
"त्याची काळजी तू करू नकोस. नितीला नितीन माहिती आहे आणि ती तयार आहे या सगळया गोष्टींना." रीमा
"हे कधी ठरलं!" मधुरा अचंबित होऊन बोलली.
"आमच्या संडेच्या आईस्क्रीम पार्टी त्यासाठीच असायच्या. तू कधी आमच्यासोबत आलीच नाही तर तुला कसं कळेल. एक-दोन वेळा नितीन भेटून पण गेला नितीला." रीमा.
"कसली आतल्या गाठीची आहेस गं तू! माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच करायचंय असं ठरवूनच आलीस का? पागल कुठची!" मधुरा रीमाच्या गळ्यात पडली. दोघींच्याही डोळ्यातून श्रावणधारा बरसत होत्या.
"तुला काय वाटलं, हे सरप्राईज वगैरे फक्त तुलाच देता येतं." मधुरा.
"म्हणजे?" रीमा.
"मागे वळून बघ." मधुरा.
रीमाने मागे वळून पाहिलं. कोणीतरी चालत येत होतं.
"अरविंद…" रीमाचा आवाज कातर झाला होता. डोळ्यात पाणी जमा झालं होतं; पण सोबतच विश्वासघाताची आगही होती.
"अरविंद, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये." रीमा त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली.
"रीमा, तुला ऐकावंच लागेल. तू अरविंदची बाजू कधीच ऐकून घेतली नाहीस." मधुरा थोडं कडक बोलली.
"रीमा, एकदा ऐक तर तो काय म्हणतोय." सुनीताताई रीमाच्या खांद्यावर हात ठेवत बोलल्या.
"आय एम सॉरी रीमा. प्लिज माझं बोलणं एकदा ऐकून घे. मग तुला हवी ती शिक्षा दे. मी काहीच म्हणणार नाही." अरविंदच्या बोलण्यावर रीमाने नुसती मान हलवली. ती अरविंदकडे पाठ करूनच उभी होती.
"तुला आठवतं, तू जर्मनीला जाण्यापूर्वी एक आठवडा आधीच मी घरी गेलो होतो. \"फॅमिली प्रॉब्लेम आहे, आल्यावर सांगतो\" असं म्हणून मी गेलो होतो. माझी बहिण प्रेग्नंट होती. डिलीव्हरीसाठी आमच्याकडे आलेली होती. आठ महिने झालेले होते. तिच्या प्रेग्नन्सी मध्ये अचानक कॉम्प्लिकेशनस आले. तिला इमर्जन्सी ऍडमिट करावं लागलं. हे ऐकून माझे भाऊजी यायला निघाले. माझ्या डोळ्यासमोर माझी बहिण गेली आणि भाऊजी अपघातात वारले. छोटं बाळ वाचलं होतं. बहिणीच्या सासरकडचे बाळाला सांभाळायला तयार नव्हते. त्या बाळाला अपशकुनी म्हणत होते. माझ्या सख्या बहिणीचं बाळ ते… त्याला काय अनाथ आश्रमात सोडणार का? मी दत्तक घेतलं त्याला. तुझा फोन आला तेव्हा माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आणि बाळाचं नाव ठेवण्यासाठी पूजा सुरू होती घरात. त्यांनंतर मी किती फोन केले तुला, पण तू फोन उचलले नाहीस. नंतर नंबर चेंज केलास. मला वाटलं तू आयुष्यात पुढे निघून गेलीस, लग्न वगैरे झालं असेल तुझं म्हणून मग तुला शोधलंच नाही. तुला माहीती होत ना, मागच्या महिन्यात डॉ.मधुरा कोलकात्याला आल्या होत्या कॉन्फरन्ससाठी. तुझ्याकडून त्यांचं नाव कितीदातरी ऐकलं होतं. त्यांच्याकडून तुझ्याबद्दल कळलं आणि आज मी इथे आलो. रीमा, मी ठरवलं होतं, लग्न करेल तर तुझ्यासोबत, नाही तर करणारच नाही. मी अजूनही लग्न केलं नाहीये. माझ्यासोबत लग्न करशील?" अरविंद बोलत होता. रीमाच्या डोळ्यातली विश्वासघाताची आग कधीचीच विझली होती, प्रेमाच्या श्रावणधारा मुक्तपणे बरसत होत्या. रीमाने अरविंदकडे बघितलं आणि त्याला गच्च मिठी मारली. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते.
"मोठा भाग्याचा दिवस आजचा! दोन-दोन जावाई मिळाले!" मधुकररावांच्या या वाक्यावर सगळे खळखळून हसले.
तेवढ्यात निती पळत आली, "आज तर माझा बर्थडे आहे ना! मग बिगवाला हग आणि बिगवाली किसी तर मला मिळायला पाहिजे आणि गिफ्ट पण!" मधुराने आणि नितीनने नितीला उचलून घेतलं, दोघांनी दोन्हीकडून तिच्या गालावर पापी घेतली, दोघेही सोबतच म्हणाले, "आय लव्ह यु."
"आय लव्ह यु मम्मा-पप्पा." नितीच्या वाक्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड, समाधानाचं, प्रेमाचं हसू उमटलं.
इतक्यात फोटोग्राफर तिथे आला,"अरे वा! सगळी फॅमिली सोबत. एक फॅमिली फोटो तो बनता है!"
"स्माईल प्लिज………!"
पूर्णविराम!
(प्रिय वाचक, खरतर पूर्णविराम लिहिलं आणि मलाच खूप रडायला आलं. तुमच्या सगळ्यांसोबत मी सुध्दा या कथेत तेवढीच गुंतले होते. \"मधुरीमा\" मी लिहीत गेले असं म्हणण्यापेक्षा \"मधुरीमा\" मी जगत गेले असं म्हणेन. आज कथेला पूर्णविराम मिळाला, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतयं. खरंतर कथेचा भाग लिहायचा, तो पोस्ट करायचा मग त्यावर तुमच्या उत्साह वाढवणाऱ्या कमेंट्स वाचायच्या, सवयच लागली होती या सगळ्यांची. \"मधुरीमा\" वर भरभरून प्रेम केलंत त्यासाठी बिगवाला थॅंक्यु. माझी ही पहिलीच कथामालिका तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे, प्रेरणेमुळे पूर्ण झाली. हा शेवटचा भाग कसा वाटला, ही कथामालिका कशी वाटली, मधुरा आणि रीमाची मैत्री कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेवटचा भाग आहे likes च्या श्रावणधारेत नक्की भिजू द्या. लवकरच भेटू एका नवीन कथामालिकेसोबत. तोपर्यंत ईरा वरील कथांचा आस्वाद घेत राहा.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा