मधुरीमा (भाग ३६)
"काय गरज आहे आता त्या माणसाला जाब विचारायची? तुझ्याजागी मी असते ना, तर त्याचं तोंड देखील पाहिलं नसतं." मधुराने रुद्रचं नाव घेतलं आणि रीमाचा राग अनावर झाला होता.
"हो, मला त्याला जाब विचारायचा आहे. त्याने मला फसवलं… का….? का माझ्या मनाशी… माझ्या भावनेशी असा घाणेरडा खेळ खेळला त्याने? लग्न ठरल्यानंतरचे… ते चोरटे स्पर्श… चोरून एकमेकांना बघणं… लग्नानंतरची ती काळजी… सगळं खोटं सोंग का घेतलं होतं? का… माझ्या प्रेमाची… विश्वासाची अशी अवहेलना केली? हे… हे सगळं काय कमी होतं की… की तो माझ्या जीवावर उठला… ! काय अधिकार होता त्याला असं मला मरणाच्या दारात लोटण्याचा? माझ्या आयुष्यातले हे दिवस… हे वर्ष त्याने का वाया घालवले? का माझ्या स्वप्नांची अशी राख-रांगोळी केली… का…?" मधुरा रीमाच्या खांद्यावर डोकं ठेऊन ढसाढसा रडत बोलत होती. रीमाच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"मधू, फिनिक्स पक्षी माहितीये ना? तो म्हणे राखेतून पुन्हा जन्म घेतो. तुझ्या स्वप्नांची राख झाली हे मान्य; पण तू त्या फिनिक्स पक्ष्यापेक्षा काय कमी आहेस का? तू पण तर या सगळ्यातून बाहेर आलीस ना." रीमा मधुराला समजावत होती.
खरंतर मधुराने रुद्रला जाब विचारू नये असं रीमाला मनापासून वाटत होतं; पण मधुराच्या दृष्टीने विचार केला तर तिला ते योग्यही वाटत होतं. मधुकरराव आणि राधिकाताईंची सुद्धा इच्छा नव्हती; त्या दोघांनी मधुराला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण मधुरा कोणाचं ऐकणारी नव्हती. डी.वाय. एस.पी. मंगेशच्या मदतीने आणि कोर्टाच्या परवानगीने मधुरा रुद्रला भेटायला दिल्लीच्या तुरुंगात गेली होती. रीमा मधुराच्या सोबतच होती. तिथे गेल्यावर मात्र त्या दोघींना एक वेगळीच माहिती मिळाली.
रुद्रच्या अटकेनंतर पोलिस तपास सुरू होता. त्याचे धागेदोरे कितीतरी देशात पसरलेले होते. त्यामुळे या केसचा निकाल लवकर लागला होता. कायद्याप्रमाणे रुद्रला त्याची शिक्षा झाली होती आणि त्याची रवानगी कारागृहात केली गेली होती. या सगळ्या गोष्टींचा रुद्रच्या मनावर खूप आघात झाला होता. कारागृहात आल्यानंतर रुद्र विचित्र वागत होता. तिथे त्याने हाणामारी केली होती, त्यात एका कैद्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुद्रचं वागणं अजून बदललं होतं. तो मनोरुग्ण झाला होता. त्याला तुरुंगात वेगळ्या ठिकाणी इतर कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याच्यावर तुरुंगातच मनोविकार तज्ञांचे इलाज सुरू होते.
जेलरच्या परवानगीने दोघीजणी आत गेल्या. एक पोलिस त्यांच्यासोबत आत आला होता. रुद्रला दुरुनच बघायची परवानगी जेलरने दिली होती. मधुराने रीमाचा हात हातात घट्ट पकडला होता. समोरच चित्र विदारक होतं.
\"केस विचकटलेले, दाढी वाढलेली, डोळे खोल गेलेले आणि नजर शून्यात हरवलेली.\" रुद्रला बघून मधुराच्या अंगावर सर्रकन् काटा उभा राहिला. डोळ्यात पाणी जमा झाले होते, लग्नापासून आतापर्यंतचा सगळा काळ झर्रकन् डोळ्यासमोरून निघून गेला. रीमाने मधुराच्या खांद्यावर हात ठेवला.
"कर्मा हिट्स बॅक म्हणतात ते काही खोटं नाही. इथलं सगळं इथंच फेडून जावं लागतं. ज्यानी तुझी मरणासन्न अवस्था करायचा प्रयत्न केला होता, आज तोच तिथे पोहोचला. मधु, चल आता आणि आता तू एक वचन दे मला; तुझ्या आयुष्यातला रुद्र नावाचा अध्याय आता संपला." रीमा मधुराला धीर देत बोलली. मधुराने रीमाच्या हातात आश्वासक हात दिला आणि दोघी परतीच्या प्रवासाला लागल्या.
\"मधुरीमा\" हॉस्पिटलचा प्लॅन दोघींनी राधिकाताई, सुमनताई आणि मधुकररावांपुढे मांडला. तिघेही हे ऐकून खूप आनंदित झाले होते. मधुकररावांनी मधुराला एक फाईल दिली. त्यात तिच्या घटस्फोटाचे कागदपत्र, पुरुषोत्तमरावांनी मधुराच्या नावे केलेल्या संपत्तीचे कागद आणि मधुराच्या नावे केलेल्या ट्रस्टचे कागदपत्र होते. मधुकरावांनी पुरुषोत्तमरावांनी मधुरासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी मधुराला सांगितल्या. ते सगळं ऐकून मधुराला एकदम गहिवरून आले. मधुराने पुरुषोत्तमरावांचा ठावठिकाणा मधुकररावांना विचारला. मधुकररावांना \"ते लोक अमेरिकेत गेले\" एवढंच माहिती होतं. मधुराने बरेच प्रयत्न करून रवीशचा फोन नंबर मिळवला होता. त्याच्याशी बोलून तिने पुरुषोत्तमरावांचा नंबर घेतला आणि एक दिवस हिम्मत करून त्यांना फोन लावला.
"हॅलो." पुरुषोत्तमराव.
"पप्पा…." त्यापुढे मधुरा काही बोलूच शकली नाही. तिचा कंठ दाटून आला होता.
"मधुरा…. थांब एक मिनिट, फोन स्पीकरवर टाकतो." "सुमन… ए… सुमन" पुरुषोत्तमराव सुमनताईंना आवाज देत होते. सुमनताईसुद्धा फोन जवळ आल्या. मधुराचा आवाज ऐकून दोघेही आनंदीत झाले.
"मधुरा, बाळा तू चांगली झालीस! आमची शेवटची इच्छा पूर्ण झाली. आता आम्ही कधीही डोळे मिटायला मोकळे." पुरुषोत्तमराव बोलता बोलता गहिवरले होते.
"पप्पा, असं का बोलताय? भरपूर जगायचंय अजून तुम्हाला, मम्मीला." मधुरा.
"कोणत्या मातीपासून बनली आहेस बेटा! एवढं सगळं होऊनही तू आम्हाला मम्मी पप्पा म्हणतेय." सुमनताई.
"ज्याने गुन्हा केला होता तो त्याची शिक्षा भोगतोय, ज्यांचा काहीच गुन्हा नाही त्यांना शिक्षा का म्हणून द्यायची? बाबांनी मला सगळं सांगितलंय. तुम्ही जे केलंय ते खरंच दुसरं कोणी करू शकलं नसतं." मधुरा.
"असंच मोठं मन ठेव. देव तुझं सगळं चांगलंच करणार आहे. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत." पुरुषोत्तमरावांनी फोन ठेऊन दिला. रीमाने सगळं बोलणं ऐकलं होतं. आपल्या मैत्रिणीच्या या मोठ्या मनाच्या वृत्तीने तिचा उर अभिमानाने फुलून आला होता.
\"मधुरीमा\" ची गाडी आता सुसाट वेगाने निघाली होती. ट्रस्टचे पैसे मधुराने गरीब आणि गरजू पेशंटसाठी वापरायचे ठरवले होते. दोघींनी मिळून एक जागा विकत घेतली होती. बँकेतून लोन घेऊन \"मधुरीमा मँटर्निटी ऍण्ड नर्सिंग होम\" चं बांधकाम सुरू झालं होतं. जवळपास वर्षभरात सुसज्ज असं हॉस्पिटल तयार झालं होतं. त्याचं उद्घाटन मधुकरराव, राधिकाताई आणि सुनीताताईंच्या हातून करण्यात आलं होतं. रीमाने शहरातच एक चांगला फ्लॅट विकत घेतला होता. रीमाच्या भावालाही नोकरी लागली होती. सुनीताताई कधी लेकाजवळ तर कधी लेकीजवळ रहात होत्या.
दिवस सरत होते. \"मधुरीमा\" हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिवस होता. दोघीजणींनी दरवर्षी यादिवशी कोणत्यातरी प्रकारचं शिबिर घ्यायचं ठरवलं होतं. त्यानुसार यावेळी रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. शिबिराला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. ब्लड बँकेतली माणसं आली होती. ब्लड द्यायला रीमाने सर्वात आधी सुरुवात केली होती. तोपर्यंत मधुरा इतर गोष्टी बघत होती. तितक्यात सारिका घाईघाईने तिथे आली. तिने मधुराच्या कानात काहीतरी सांगितलं आणि मधुराही तिच्या मागे घाईघाईने गेली. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये एक अँक्सिडेन्ट केस आली होती.
"मॅडम, मी या लोकांना कधीची सांगतेय की इथं अँक्सिडेन्ट केस घेत नाहीत, पेशंटला दुसरीकडे न्या; पण ही लोकं ऐकायला तयार नाहीत." सारिका मधुराच्या मागे मागे जात तिला सांगत होती. मधुरा इमर्जन्सी रुममध्ये गेली. जवळपास चोवीस-पंचवीस वर्षांची एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. डोक्याला, संपूर्ण शरीरावर मोठ्या जखमा होत्या.
"सारिका, नीट बघ; ती बाई प्रेग्नंट आहे. सात महिने झाले असतील पोटावरूनच कळतंय की. चल पटापट पुढची तयारी कर." मधुरा पेशंटला तपासत होती आणि सारिकाला सगळ्या ऑर्डर देत होती.
"पेशंटचे नातेवाईक कोण आहेत?" मधुरा जमलेल्या गर्दीकडे बघून म्हणाली.
"कोणीच नाही मॅडम; इथल्या बाजूच्या चौकात अँक्सिडेन्ट झाला. ह्या बाई आणि अजून एक पुरुष होते गाडीवर. बहुतेक त्यांचे मिस्टर असतील. ते ऑन स्पॉट गेले. या बाई गर्भार दिसल्या आणि त्यांचा श्वास सुरू होता म्हणून यांना लगेच इथं आणलं." गर्दीतून एक माणूस बोलला.
"पोलिसांनासुध्दा कळवलं आहे." गर्दीतून दुसरा आवाज आला. तितक्यात पोलिस तिथे आले.
"सर, पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे. बी.पी. खूप लो आहे. हृदयाचे ठोके पन कमी झालेत. कोणी नातेवाईक नाहीये इथे. पेशंटच्या पोटात ब्लिडिंग झाल्याची शक्यता वाटतेय आणि बाळाला काही इजा झाली का ते पण माहिती नाही. नातेवाईकांची वाट बघत बसलो तर बाळ आणि त्याची आई, दोघांच्या जीवाला धोका आहे. ऑपरेशन करून बाळ बाहेर काढावे लागेल. बाळाला कदाचित आय. सी. यु. मध्ये ठेवावं लागेल. मी माणुसकी या नात्याने पुढची ट्रीटमेंट सुरू करतेय. बाकी गोष्टी तुम्ही कायद्याप्रमाणे काय असतील ते बघून घ्या." मधुराचा आत्मविश्वास बघून पोलिसही अचंबित झाले होते. रीमाचं रक्तदान झाल्यावर रीमासुध्दा मधुरासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये आली होती. दोघींनी मिळुन पेशंटला वाचायचा प्रयत्न केला, पण पेशंट वाचली नाही. दोघी हतबल होऊन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्या. बाहेर दोन पोलिस उभे होते.
"सॉरी, आम्ही पेशंटला वाचवू शकलो नाही. बाळ मात्र वाचलं आहे. सातव्या महिनीच जन्माला आलंय आणि त्यात बाळाच्या फुफ्फुसात गर्भजल गेलं आहे. बाळाला आय.सी.यु. मध्ये ठेवावं लागेल. व्हेंटिलेटर लावावं लागेल. आमच्याकडे ती सगळी व्यवस्था नाहीये, बालरोग विभाग नाहीये म्हणून त्या बाळाला बालरोगतज्ञांकडे ठेवलं आहे. नातेवाईकांचा काही मेळ लागला का?" मधुरा पोलिसांसोबत बोलत होती.
"आम्ही तो तपास करतोय. नातेवाईकांचा शोध लागला की कळवू. तुमच्या हॉस्पिटलच्या फॉर्मलिटी पूर्ण करून बॉडी आमच्या ताब्यात द्या. तोपर्यंत ते बाळ…"
"तोपर्यंत ते बाळ दवाखान्यात राहील. त्याचा सगळा खर्च मी देईल." मधुरा पोलिसांचं वाक्य तोडत बोलली.
त्यानंतर मधुरा वेळ मिळेल तसा बाळाला बघायला जात होती. जगण्यासाठी त्या एवढूश्या जीवाची होणारी धडपड तिचं काळीज हेलावून टाकत होती. मधुरा रोज देवाजवळ प्रार्थना करत होती.
दोन दिवसांनंतर पोलिस स्टेशनमधून मधुराला फोन आला. मधुरा तिथे गेली.
"इन्स्पेक्टरसाहेब, काय झालं? नातेवाईकांचा शोध लागला का?" मधुरा.
"तेच सांगायला इथे बोलवलं आहे. अँक्सिडेन्ट झालेल्या व्यक्तीच्या खिशात आम्हाला ओळखपत्र मिळालं. तो आपल्या इथल्या बँकेतला कर्मचारी होता. तो आणि त्याची बायको साधारण वर्षभरापूर्वी इथे राहायला आले होते. निखिल आणि आरती नाव त्यांचं. लग्नाला एक वर्षच झालं होतं. दोघांचा प्रेमविवाह झालेला होता. दोघेही अनाथाश्रमात लहानाचे मोठे झाले होते. त्यांचं नातेवाईक असं कोणी नाहीये." इन्स्पेक्टर.
"ओह! सो सॅड!" मधुरा.
"ते बाळ कसं आहे आता? तुम्ही हवं तर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करू शकता. नाही… म्हणजे… तुमच्यावर खर्चाचा लोड नको म्हणून म्हणतो आहे." इन्स्पेक्टर.
"क्रिटिकलच आहे. सध्या तर त्याला कुठेही शिफ्ट करणं सोपं नाहीये. खर्चाची काळजी नका करू, मी करेल सर्व. बाळ वाचायला हवं." मधुरा.
"कोणताच पुरावा नसल्याने आमच्याकडून केस क्लोज झालीये. तरी तुम्हाला काही मदत लागली तर कळवा." इन्स्पेक्टर.
मधुरा तिथून निघाली. विचारांचं काहूर डोक्यात उठलं होतं.
"आरती… निखिल.. दोघेही अनाथ… किती स्वप्न पाहिली असतील या बाळाची. \"आपण अनाथ असलो म्हणून काय झालं या बाळाला तर त्याचे आई बाबा मिळतील\" या विचारानेच किती आनंदीत असतील दोघे; पण नशीबाने इथे तरी साथ द्यायला हवी होती." मधुरा विचारांच्या तंद्रीत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. काचेतून तिने बाळाला पाहिलं. तिचा पुढचा निर्णय तिने घेतला होता.
हळूहळू बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत होती. दहा दिवसांत त्याचं व्हेंटिलेटर निघालं होतं. बाळ ऑक्सिजन सपोर्टवर होतं. बाळाला मधुराचा स्पर्श कळायला लागला होता. तिने उचलून घेतलं की ते शांत राहायचं. तिने खाली ठेवलं की मोठ्याने रडायचं. मधुरालाही बाळाचा लळा लागला होता. चार-पाच दिवसात बाळाचा ऑक्सिजन सपोर्ट निघाला होता. कायदेशीररीत्या मधुराने बाळाला दत्तक घेतलं. मधुरा बाळाला घेऊन घरी गेली. राधिकाताई, मधुकरराव आणि रीमाने बाळाचं जोरदार स्वागत केलं.
"खूप चांगला निर्णय घेतलास मधू." मधुकरराव मधुराच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले.
"बरं, नाव काय ठेवायचं बाळाचं ते ठरवलं का? " राधिकाताई बाळाला जवळ घेत बोलल्या.
"हे बाळ आरती आणि निखिल चा अंश… तुम्ही दोघे या जगात नाही पण तुमचं अस्तित्व इथे कायमच राहील… या बाळाच्या रुपात… या बाळाच्या नावात… \"निती\"…." मधुरा स्वतःशीच पुटपुटली.
"मधु, कुठे हरवलीस? बाळाचं नाव काय ठेवायचं ते तर सांग." रीमा.
"निती… निती मधुरा कानिटकर..."
क्रमशः
कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर like नक्की करा.
(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा