मधुरा हॉस्पिटल बघून खूप घाबरून गेली होती. रीमा तिला समजावत होती; पण तिच्यावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. मधुरा कारमध्ये बसायलाही तयार नव्हती. रीमाने घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा ठरवला, रिक्षातही मधुरा रीमाचा हात घट्ट पकडून बसली होती. दोघीजणी घरी आल्या. मधुराला असं घाबरलेलं बघून राधिकाताई काळजीत पडल्या होत्या. रीमाने घडलेला सर्व प्रसंग राधिकाताईंना सांगितला. मधुकरराव तिथेच होते.
"चावी दे, मी कार घेऊन येतो." मधुकरराव रीमाला म्हणाले.
"नको काका, मीच आणते. तसं पण माझा पेशंट बघायचाच राहिला. मी माझं काम पूर्ण करून येते." रीमा बोलली आणि मधुराचं लक्ष नसताना तिथून सटकली. हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने तिचं काम केलं आणि नितीनला फोन लावला. झालेला प्रसंग रीमाने नितीनला सांगितला.
"एका अर्थाने बरंच केलंस तू तिला बाहेर नेऊन, आपल्याला कळलं तरी. आता लाईन ऑफ ट्रीटमेंट पुन्हा चेंज करावी लागेल. आता काऊनसेलिंग, मेडिटेशन, काही ब्रेन अँड माईंड एक्सरसाईझ ऍड कराव्या लागतील. काऊनसेलिंगच्या सिटिंग्ज घ्याव्या लागतील. तिच्यात आत्मविश्वास निर्माण करावा लागेल." नितीन फोनवर सांगत होता.
"मग, पुढे सगळं कसं करायचं? तू काका-काकूंसोबत बोलतोस का? त्यांना बरं वाटेल जरा. घाबरून गेलेत बघ." रीमा.
"हो, बोलतो. या रविवारी येऊन जातो. पुढचं सगळं समजावून सांगतो." नितीन.
नितीनसोबत बोलून रीमाला बरं वाटलं.
ठरल्याप्रमाणे नितीन रविवारी आला होता. त्याने मधुकरराव आणि राधिकाताईंना पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट समजावून सांगितली.
"अजून किती दिवस चालणार हे सगळं? मधुरा आता चांगली बोलतेय, स्वतःची बरीचशी कामं पण करतेय. हा अट्टाहास कशाला की तिला बाहेर जाता आलं पाहिजे, तिने डॉक्टरला, हॉस्पिटलला घाबरलं नाही पाहिजे. सात-आठ महिने झाले हेच सुरू आहे. खरंच मधुरा पूर्वीसारखी होणार आहे का? की आपण उगीचच आपली वेडी आशा लावून बसलोय? मधुरा आता आहे तशीच राहिली तरी ठीक आहे. देवाच्या दयेने एवढं आहे आमच्याजवळ की नुसतं बसून खाल्लं तरी पुरेल; पण आता माझ्या मुलीच्या जीवाशी कोणतेच खेळ नको मला." राधिकाताई उद्विग्नपणे बोलत होत्या.
"काकु, बरोबर आहे तुमचं. इव्हन मलापण असंच वाटतं बरेचवेळा. काय करायचं ना? या समाजाला काय गरज आहे मधुराची? एक चांगला डॉक्टर या समाजाला नाही मिळाला तरी काय अडणार आहे? मधुरा गोल्ड मेडलिस्ट होती… ठीक आहे… होती गोल्ड मेडलिस्ट… आपण ते अगदी फोटोसहीत फ्रेम करून भिंतीवर टांगून दिलं आहे तसंही… खरंच खूप पैसा आहे तुमच्याजवळ… मधुराला इकडची काडी तिकडं करायचंसुद्धा काम नाही...आज तुम्ही, मी, आपण आहोत तिला साथ द्यायला… पण… पण उद्याचं काय? आपल्यापैकी कोणीच राहिलं नाही तर? तेव्हा मधुराचं कसं होईल, हा विचार केला आहे का? सॉरी, मी थोडं हार्ष बोलतेय; पण असं उद्विग्न होऊन चालणार नाही ना. ते म्हणतात ना, \"हत्ती गेला आणि शेपूट बाकी राहिलं\", बस तसंच समजा. एवढी साथ दिलीत मधुराला, बस अजून थोडी द्या." रीमा.
"बरोबर आहे बेटा तुझं. मधुराच्या आई, अहो, खरंच लेकरू समजुतदारीचं बोललं बरं. आता थोडी कळ सोसा अजून. डॉक्टर नितीनसाहेबांची ट्रीटमेंट खरंच खूप योग्य आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला मधुरा परत मिळाली आहे, मागचा काळ आठवून बघा थोडं." मधुकररावांनी राधिकाताईंना समजावून सांगितलं. राधिकाताई मधुराची पुढची ट्रीटमेंट करून घ्यायला तयार झाल्या.
नितीन दर रविवारी मधुराच्या घरी येत होता.
"डॉक्टरसाहेब, अहो अजून किती त्रास द्यायचा तुम्हाला? आता आम्हालाच अपराध्यासारखं वाटतंय. तुम्ही दर रविवारी इकडे येता. रविवार तुमचा हक्काचा दिवस. तो दिवस तुमच्या कुटुंबासोबत घालवावा असं त्यांना पण वाटत असेल ना? आम्ही येत जाऊ आता मुंबईला." मधुकरराव अपराधी असल्यासारखं बोलत होते.
"अहो काका, तुम्ही त्याचं टेंशन घेऊ नका. मी एकटाच राहतो इथे. म्हणजे फॅमिली आहे माझी. बाबा मागच्या वर्षी वारले. आई आणि मोठी बहीण आहे. बहीण विदेशात असते. लग्नाला सात वर्षं झाली तिच्या. आता प्रेग्नंट आहे. तिला पूर्ण बेडरेस्ट सांगितली आहे तर आई तिकडे गेली आहे. त्यामुळं सध्या \"एकटा जीव सदाशिव\" असं झालंय माझं. रविवारी तसं पण क्लिनिक बंद असतं. घरी तरी काय करणार एकटा? मीच येत जाईल इकडे म्हणजे मग काकूंच्या हातचे रुचकर पदार्थ खायला मिळतील." नितीन.
"असं असेल ना तर कधीही येत जा इकडे." राधिकाताई मोठ्या आनंदाने म्हणाल्या.
जवळपास तीन महिने झाले होते, नितीन दर रविवारी येऊन मधुराच्या काऊनसेलिंगच्या सिटिंग्ज घेत होता. त्याचा बराच फायदा मधुराला होत होता. नितीनने आभा, सौरभ, प्रथमेश, रीमा यांच्यासोबत मधुराला पुन्हा कॉलेजमध्ये न्यायचा प्लॅन केला होता. त्याच्यामते तो त्याच्या ट्रीटमेंटचा एक भाग होता. ठरल्याप्रमाणे सगळेजण कॉलेजमध्ये भेटले. टेकडीवरचं मंदिर, कॉलेजचा परिसर, कॅन्टीन, जुने प्राध्यापक लोकं सगळ्यांना भेटून मधुराला खूप गहिवरून आलं होतं. कॉलेजचं हॉस्पिटल, डिपार्टमेंट फिरता फिरता मधुराला खूप भीती वाटत होती; पण डोळ्यात तेल घालून केलेल्या ड्युटीझ्, पेशंटचे वाचवलेले जीव, मिळवलेल्या शाबासक्या, या सगळ्या आठवणींनी भीतीवर मात केली होती.
पुढच्या एका महिन्यात मधुराची सगळी औषधं बंद झाली होती. मधुरा आता बरी झाली होती फक्त एकाच गोष्टीची कमी होती; ती म्हणजे "आत्मविश्वास."
दिवस सरत होते, सगळी औषधी बंद होऊन सुद्धा दोन महिने झाले होते. एक दिवस सकाळी सकाळी रीमा मधुराच्या घरी आली. आल्या आल्या तिने "मधुरा आजपासून माझ्यासोबत ओ. पी.डी. मध्ये येणार" अशी जणू घोषणा दिली. राधिकाताई आणि मधुकरराव आनंदाने तिच्याकडे बघत होते. मधुरा मात्र खूप घाबरली होती.
"रीमा, मी नाही येणार क्लिनिकमध्ये. मला खूप भीती वाटते गं." मधुरा.
"भीती! कोणाची? आणि अजून असं किती दिवस घाबरणार?" रीमा.
"माहिती नाही; पण मी येणार नाही. वाटलं तर मी दुसरं काही शिकते. हे दवाखाना, पेशंट वगैरे माझ्याकडून होणार नाही. प्लिज. मी येणार नाही म्हणजे नाही." मधुरा जिद्दीला पेटली होती.
"काय येणार नाही, येणार नाही लावलंस गं! एक वर्ष झालं तुझंच ऐकतेय. तू एक जिद्दी असशील तर मी लाख जिद्दी आहे, तुला यावंच लागेल." रीमासुद्धा माघार घ्यायला तयार नव्हती.
"कर तुला काय करायचं ते, मी येणार नाही." मधुरा.
"नक्की?" रीमा.
"हो." मधुरा नाक फुगवत बोलली. तिला असं खूप दिवसांनी नाक फुगवत बोलताना पाहून रीमाला हसू आलं; पण तिने तिचं हसू लपवलं.
"ठीक आहे, जातेय मग मी. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. मी एवढं तुझ्यासाठी केलं; पण तू मात्र माझ्यासाठी काहीच करायला तयार नाहीस. जातेच आता मी." रीमा रागारागाने निघाली. मधुराने पळत जाऊन तिचा हात पकडला.
"सॉरी, तू कुठे जाऊ नको. मी येते सोबत." मधुरा क्लिनिकमध्ये जायला तयार झाली. दोघी मैत्रिणी गाडीवर बसून क्लिनिकमध्ये गेल्या. मधुराने क्लिनिकचा बोर्ड वाचला, "मधुरीमा."
"रीमा…, अगं… हे… माझी लायकी नाहीये गं तेवढी… मी करू शकणार नाही सगळं." मधुराचा कंठ दाटून आला होता. मधुरा क्लिनिक न्याहाळत होती. एक छोटंसं केबिन, बाहेर रिसेप्शनिस्टला बसायला एक चेअर-टेबल आणि पेशंटला बसायला दोन-चार खुर्च्या.
"ते ठरवणारी तू कोण? चल आत. तुला तसं व्हील चेअरवर पाहिलं होतं तेव्हा मी ठरवलंच होतं, तुला यातून बाहेर काढेलच आणि तेव्हाच मी एक स्वप्न पाहिलं होतं, \"मधुरीमा\" ते मी पूर्ण करेन." रीमा मधुराचा हात हातात धरून तिला आत आणत बोलत होती.
दोघी आत आल्या. रीमाने बेल वाजवली. बाहेरची रिसेप्शनिस्ट आत आली.
"ही सारिका, आपली नर्स कम रिसेप्शनिस्ट. सध्या दोन्ही कामं तीच बघतेय. अजून एक आया मावशी आहेत, त्या साफ-सफाई वगैरे करतात. एवढंच परवडतं सध्या मला. आता तू आली आहेस ना. सगळं मस्त मोठं करू आपण. मधु, इथे फक्त आपण ओ.पी.डी. चे पेशंट बघतो, आपले आय.पी. डी. चे पेशंट डॉ. गिरीजा चौधरी यांनी एक ट्रस्टचं हॉस्पिटल सुरू केलय तिथे असतात. डॉ. गिरीजा चौधरी आठवतात ना?" रीमा मधुराला सगळं सांगत होती.
"आणि सारिका, ही मधुरा. सॉरी, ह्या डॉ.मधुरा. तू मला विचारलं होतं ना, \"मधुरीमा\" मधलं \"मधु\" कोण? त्या ह्याच आहेत. बरं बाहेरची एक चेअर आण, इथे माझ्या चेअरच्या बाजूला लाव. आजपासून मॅडमसुध्दा माझ्यासोबत पेशंट बघतील." रीमाने सारिकाला सांगितलं.
मधुराचा चेहरा घामाने डबडबला होता. मधुरा घाम पुसत चेअरवर बसली. रीमा काय सांगतेय याकडे तिचं लक्षच नव्हतं.
"रीमा, मी जाऊ का घरी परत? मला भीती वाटतेय. माझ्या हातून कोणी मेलं तर!" मधुराने घाबरत घाबरत रीमाला विचारलं.
"नाही मधुरा, आता परत मागे वळून बघायचं नाही. तुला भीती वाटतेय, ठीक आहे. तरी रोज इथे यायचं. मी आहे ना सोबत. काही होणार नाही." रीमा मधुराला समजावत बोलली.
मधुरा रोज रीमासोबत क्लिनिकमध्ये जात होती; पण तिथे जाऊन ती नुसती बसून राहायची. रीमा ने पेशंटच्या संदर्भातले अभ्यासक्रमातले प्रश्न तिला विचारायची; मधुरा घाबरत घाबरत बरोबर उत्तर द्यायची. रीमा तिला रोज समजावून सांगायची. जवळपास दोन महिने असंच सुरू होतं. रीमा कधी कधी खूप चिडून जायची; पण मधुरातला स्पार्क तिला माहिती होता, योग्य वेळेची ती वाट बघत होती.
एक दिवस मधुरा आणि रीमा दोघी क्लिनिकमध्ये बसलेल्या होत्या. तेवढ्यात रीमाला एक कॉल आला, डॉ. गिरीजा यांच्याकडे भरती असलेल्या तिच्या ऍडमिट पेशंटची तब्येत अचानक सिरीयस झाली होती. रीमा लगेच जायला निघाली.
"रीमा, मी पण येते तुझ्यासोबत. इथे मी एकटी थांबणार नाही. मला भीती वाटते, पेशंट आला तर मी काय करू?" मधुराचं लहान लेकरसारखा हट्ट करणं सुरू होतं.
"मी तुला सोबत नेणार नाही. इमर्जन्सी म्हणजे काय असतं? ते माहितीये ना तुला? तुला तिथे नेऊन मी काय करू? तिथं जाऊन घाबरली, रडायला लागली तर पेशंट पाहू की तुला पाहू? ते काही नाही, चुपचाप इथे बस. तसं पण सध्या कोणी पेशंट नाहीये बाहेर." रीमा चिडून बोलली.
"सारिका, मधुरा मॅडम आहेत आत. मी जाऊन येते. तोपर्यंत जर पेशंट आला तर एक फोन करशील मला आणि मॅडम बघत असतील तर मॅडमला बघू दे. मी येते लवकरच." रीमा रागाने बाहेर गेली. मधुरा आतमध्ये बसून होती. थोड्यावेळाने कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला.
"पेशंट आला की काय?" मधुरा स्वतःशीच पुटपुटली.
"मॅडम, एक पेशंट आलीये, नऊ महिने झालेत म्हणे तरी अजून कळा सुरू झाल्या नाहीत म्हणत आहे." सारिका आत येऊन बोलली.
"हो का? त्यांना सांग मोठ्या मॅडम नाहीयेत, ज्युनिअर डॉक्टर आहेत, मॅडम आल्या की तपासून सांगतील." मधुरा.
चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन सारिका बाहेर गेली. बराच वेळ झाला होता, रीमा अजून आली नव्हती. थोड्यावेळाने सारिका परत केबिनमध्ये आली.
"मॅडम, त्या बाहेरच्या पेशंटला आता बसवल्या जात नाहीये. तिला इथे पेशंट एक्सामिनेशन टेबलवर झोपवू का? तुम्ही थोडं तपासूनसुद्धा घ्या. तेवढंच पेशंटच्या नातेवाईकांचं समाधान होईल." सारिका.
"हो, ठीक आहे. झोपव तिला इथे." मधुरा.
सारिका पेशंटला घेऊन आता आली, तिने पेशंटला टेबलवर झोपवलं. मधुराने घाबरत घाबरत तिला तपासायला सुरुवात केली. कानात स्टेथोस्कोप घातला तर तिला स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकू येत होते. हाता-पायांना कंप सुटला होता तरी हिम्मत करून तिने पेशंटच्या हृदयाचे ठोके ऐकले, पोटावर स्टेथोस्कोप ठेऊन बाळाचे ठोके ऐकायला लागली आणि पेशंटला प्रसव वेदनेला सुरुवात झाली. मधुराला क्षणभर सुचलं नाही काय करावं ते. तिने डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला. तिचं ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून पेशंटला तपासलं.
"सारिका… अगं फुल्ली डायलेटेड आहे, फटाफट सगळे इन्स्ट्रुमेंट्स, फोर्सेप्स आण…." मधुरा सारिकाला फटाफट सूचना देत होती, एकीकडे पेशंटला धीर देत होती. काही वेळातच पेशंटची डिलीव्हरी झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे तीन वेढे होते, मधुराने बाळाला इजा न पोहोचवता ते वेढे काढले आणि त्याक्षणी त्या इवल्याशा जीवाने जोरदार ट्या...हा….ट्या...हा… रडून स्वतःच्या येण्याची चाहूल सगळ्यांना दिली. गोड, गुलाबी, कापसापेक्षाही मऊ, कुरळ्या केसांचा एवढूसा रडणारा जीव बघून मधुराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. \"आपल्या हाताने कोणाचातरी जीव जाईल\" ही भीती त्या एवढुश्या जीवाने पळवून लावली होती. मधुराने पुढच्या सूचना सारिकाला दिल्या. आयाबाईंनी बाळाला स्वच्छ केलं. मधुरा बाळाला घेऊन नातेवाईकांच्या जवळ गेली.
"अभिनंदन! मुलगी झाली आहे! बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत. आमचे ऍडमिट पेशंट ठेवायची जागा वेगळी आहे. काळजी करू नका, अँबुलन्स येईल तुम्हाला न्यायला. अँबुलन्समध्ये सोबत डॉक्टरही असतील." मधुरा पेशंटच्या नातेवाईकांना समजावून सांगत होती. तोपर्यंत सारिकाने अँबुलन्स बोलवून घेतली होती. सोबत आलेल्या डॉक्टरांना मधुराने योग्य त्या सूचना दिल्या आणि अँबुलन्स पेशंटला घेऊन तिथून निघाली. दुसऱ्याच क्षणी रीमा तिथे पोहोचली. तिला अँबुलन्स जाताना दिसली होती.
"सारिका, अगं फोन तर करायचा, तसाच पेशंट पाठवून दिला का? डॉक्टर झालीस का आता तू? आणि मधुरा कुठेय?" रीमा चिडतच आत येत बोलली. मधुराने पेशंट पाहिलाही नसेल असं तिने गृहीतच धरलं होतं.
"मॅडम, मधुरा मॅडम हँड वॉश करत आहेत." सारिकाने घाबरत उत्तर दिलं. रीमा तनक्यात आत आली.
\"मधुरा, काय हे? तू पेशंट न बघताच तिकडे पाठवून दिलास ना? अगं, मला फोन करून बोलायचं तर होतं थोडं. कसं वाटतं ते? गिरीजा मॅडम काय विचार करतील? आपण लहान राहिलो का आता?" रीमा चिडून तोंडाला येईल ते बोलत होती.
"अगं, बस! किती चिडशील! कोणी सांगितलं तुला? सारिका, आया मावशी तुम्हीच सांगा तुमच्या मॅडमला काय झालं ते?" मधुरा बोलत होती, आत्मविश्वासाची चुणूक तिच्या बोलण्यात जाणवत होती. सारिका आणि मावशीने घडलेला सगळं प्रसंग रीमाला सांगितला. ते ऐकून रीमाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मधुराला एक गच्च मिठी मारली. मधुराच्या अश्रूंचाही बांध फुटला होता.
"मधु, मला माहिती होतं. अँक्च्युअली मी याच दिवसाची वाट बघत होते. तुझ्यात तो स्पार्क होताच. तू एक दिवस पुन्हा पहिलेसारखी होणारच!" रीमा.
"रीमा, अगं किती साथ दिलीस तू. थॅंक्यु बिलकुल म्हणणार नाही, कारण तू जे केलंस माझ्यासाठी ते या दोन शब्दात बसण्यासारखं मुळीच नाहीये." मधुरा रीमाचे अश्रू पुसत बोलली.
"बस झालं कौतुक! आता मोठं हॉस्पिटल सुरू करू. ही जागा आता कमीच पडणार. बरं का सारिका! तूच आमची हेड नर्स राहशील. मस्तच! मोठं हॉस्पिटल, त्यात मोठीशी वेटिंग रूम, तुझं केबिन, माझं केबिन, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम…" रीमा मधुराला आणि सारिकाला आनंदाने तिचं स्वप्न सांगत होती.
"सगळं करू, पण त्याआधी मला एक काम करायचं आहे." मधुरा.
"आता कोणतं काम?" रीमा.
"जाब विचारायचा आहे." मधुरा.
"आता कोणाला जाब विचारायचाय मधु?" रीमा थोडं त्रासिकपणे बोलली.
"रुद्रला……"
क्रमशः
(या कथामालिकेतील पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा