मधुरीमा (भाग३४)
नितीनने काही न बोलताच फोन ठेवून दिला होता. रीमाने पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला होता; पण फोन आऊट ऑफ रेंज येत होता. रात्री रीमा आणि सुनीताताई तिथेच मुक्कामी होत्या. सकाळ झाली, प्रत्येकजण आपापलं आवरण्यात गुंग होते. रीमाने मधुराला व्हीलचेअर बसवून खिडकीजवळ आणलं होतं. सूर्याची कोवळी किरणं मधुराच्या चेहऱ्यावर पडली होती.
"घे मधे, व्हिटॅमिन डी खाऊन घे जरा. हाडं बळकट होतील तुझी." रीमा चेष्टेने बोलत होती.
"तू जर आता पहिल्यासारखी असती ना, तर लगेच मला मारायला धावली असती. हाडं बळकट झाल्याचा पुरावा लगेचच दिला असता." रीमा एकटीच बोलत होती. मधुरा तिच्याकडे टक लावून बघत होती.
"तुला काय वाटलं, तू बरी हो. ही सगळी सेवा मी वसूल करणार आहे बरं." रीमा बोलली आणि तिला मधुराच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं जाणवलं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मधुकरराव दार उघडायला गेले. दारात एक उंचपुरा, व्हाईट शर्ट, ब्लॅक फॉर्मल पॅन्ट, ब्लॅक ब्लेझर, डोळ्यांवर फ्रेमलेस चष्मा घातलेला, चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला तरुण उभा होता.
"कोण आपण?" मधुकरराव.
"मी डॉ. नितीन देशमुख, मधुराचा क्लासमेट." नितीन.
"अरे, डॉक्टरसाहेब! या.. या… रीमा बघतेय का कोण आलंय ते?" मधुकररावांच्या आवाजाने रीमा बाहेर आली. समोर नितीन उभा होता.
"नितीन, तू..! मी तर आशा सोडली होती की तू येशील; थँक्स." रीमाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
"अरे आता दारातच बोलणार का? आत या म्हणावं डॉक्टरसाहेबांना." राधिकाताई.
"तुला इथला पत्ता कोणी दिला? काल मीच सांगणार होते; पण तुझा फोन लागत नव्हता. मला वाटलं की तू लंडनला परत गेला." रीमा, नितीन, मधुकरराव आत आले आणि सोफ्यावर बसले.
"हो, परत जायला निघालोच होतो; पण तुझा फोन आला. मग विचार केला की भेटून जावं एकदा. मला आधी वाटलं की तुम्ही सगळे भेटले असावेत आणि मी यावं म्हणून काहीतरी गेम खेळताय म्हणून मग सौरभला फोन केला, तर तो जयपूरला कॉन्फरन्स मध्ये, प्रथमेशला केला तर तो केसमध्ये होता. आभाला केला मग तिने सांगितलं 'भेटायचा असा काही प्लॅन नाही केलाय, मधुरा आणि रीमाने केला असेल तर मला माहिती नाही.' तिनेच मला इथला पत्ता दिला. झालं? आलो मी. बोलवं आता मधुराला." नितीन, रीमाने काहीतरी थट्टा केलीये असे गृहीत धरून बोलत होता. राधिकाताई चहा पाणी घेऊन आल्या.
"नितीन तुला मी थट्टा केलीये असं वाटतंय, थांब मी मधुराला आणते." रीमा मधुराला आणायला आत गेली. मधुकरराव आणि नितीन चहा घेत गप्पा करत बसले होते. मधुकरराव नितीनची जुजबी विचारपूस करत होते. इतक्यात रीमा मधुराला घेऊन आली. मधुराला पाहून नितीन एकदम शॉक झाला. हातातला चहाचा कप तसाच ठेवून तो उठून उभा राहिला. डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती. तो तसाच मधुराच्या व्हीलचेअर जवळ गेला आणि गुडघ्यावर बसला.
"मधुरा… हे….हे सगळं…. " नितीन पुढे काही बोलू शकला नाही. मधुकरराव आणि राधिकाताईंनी घडलेल्या सगळ्या घटना नितीनला सांगितल्या. मधुराची मनोविकार तज्ञांची फाईलसुद्धा दाखवली.
"व्हॉट इस धीस नॉनसेन्स! काय हा मूर्खपणा! असं वाटतंय अगदी बुद्धी गहाण ठेवलीये." नितीन थोडा चिडून बोलला.
"म्हणजे काय झालं? आमच्या कडून काही चूक झाली का?" राधिकाताई.
"सॉरी, आय मीन… म्हणजे त्या डॉक्टरने सगळे चुकीचे औषध सुरू केले आहेत. सी रीमा, धीस मेडिसिन इस फॉर…. " नितीन रीमाला सांगत होता. चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्न चिन्ह घेऊन राधिकाताई, मधुकरराव नितीनकडे बघत होते. तेवढ्यात नितीन पुन्हा मधुराजवळ गेला.
"मी आलोय ना आता, तू लवकर बरी होशील." नितीन मधुराचा हात हातात घेत बोलला आणि मधुराने तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला.
"ओह, इट्स अ गुड साईन. मधुराचा ब्रेनपर्यंत काही संवेदना जात आहेत. ही सगळी औषधी बंद. आता मी जे सांगेल तेच औषध द्यायचं. सुरुवातीला मधुरा थोडा त्रास देईल पण आता आपल्याला हात-पाय गाळून होणार नाही. आपल्याला स्ट्रॉंग बनावं लागेल. रीमा आहेच तुमच्यासोबत. सो.. तुम्हाला थोडं ईझी जाईल. काका-काकु तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर?" नितीन मधुकरराव आणि राधिकाताईकडे बघत बोलला.
"हो, तुम्ही मधुराचे मित्र आहात. तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तर कोणावर ठेवणार?" मधुकरराव.
"ओ के देन, जस्ट अ मिनिट." नितीन कोणालातरी फोन लावत बाहेर गेला. राधिकाताईंनी नाश्त्याला पोहे बनवले होते. बराचवेळ झाला नितीन बाहेर उभा होता म्हणून रीमा त्याला बोलवायला गेली.
"तुला काय प्रॉब्लेम आहे? मी म्हटलं तसंच करायचं. हवं तर फर्स्ट क्लास ए सी चं तिकीट काढ. मी जी औषधी सांगितलीये ती सगळी घेऊन ये….. नाही रे बाबा…. कुरिअरनी वेळ लागतो…. अरे जाण्या-येण्याचं तिकीट मी देतोय… तुला साधं एवढसुध्दा जमत नाही? मला मग दुसऱ्या मेडिकल स्टोअरचा विचार करावा लागेल…. ठीक आहे…. ये मग." नितीन कोणासोबत तरी खूप चिडून बोलत होता. रीमा मागे उभं राहून सगळं ऐकत होती. फोनवर बोलणं झालं तरी नितीन स्तब्ध उभा होता. रीमाने त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवला. नितीनने दचकून मागे वळून पाहिलं आणि पटकन आपले डोळे पुसले.
"असं का असतं गं? देवाला बरोबर कळतं सगळं, नाही? एवढा सहा जणांचा ग्रुप आपला; पण सायकायट्रिस्ट बनायची बुद्धी मलाच का द्यावी देवाने? मधुराला बरं करायचं काम, तिला पुन्हा तिचं आयुष्य परत देण्याचं काम माझ्याच हातून का लिहिलं असावं? रीमा, आपल्याला खूप पेशन्स ठेवून मधुराला यातून बाहेर काढावे लागेल. मधुरा बरी झाली ना तर माझं शिक्षण खऱ्या अर्थाने सार्थक होईल." नितीन खूप भावनाविवश झाला होता.
"हो, आपण सगळे प्रयत्न करू. आधी तू आत चल, काकूंनी नाश्ता बनवला आहे." रीमा आणि नितीन घरात गेले.
"मधुराला ही औषधी देऊ का मग?" राधिकाताई मधुराची औषधांची वेळ झाली म्हणून विचारत होत्या.
"एक मिनिट, आणा इकडे. ही एकच गोळी द्या." नितीनने एक गोळी काढून दिली आणि बाकीच्या बंद करायला लावल्या. राधिकाताईंचा चेहरा थोडा चिंताक्रांत झाला.
"काकु, मी आहे इथेच. मधुराला काही होणार नाही. मी माझ्या मुंबईच्या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवाल्याला सगळी नवीन औषधी घेऊन बोलवलं आहे. कुरिअरनी यायला वेळ लागेल ना म्हणून, तोच आणून देत आहे. तोपर्यंत आपण इमर्जन्सी म्हणून ही काही औषधी घरी आणून ठेऊ." नितीन बॅगमधलं प्रिस्क्रिप्शन पॅड काढून त्यावर लिहीत बोलला.
"द्या इकडे, मी घेऊन येतो." मधुकरराव औषधी आणायला बाहेर गेले.
नितीनने मधुराला काय काय त्रास होऊ शकतो, त्यावर कोणतं औषध द्यायचं; हे सगळं रीमाला आणि राधिकाताईंना समजावून सांगितलं. मधुकरराव औषधी घेऊन लवकरच आले. नितीन दिवसभर तिथेच थांबला. औषधी एकदम बंद केल्यामुळे मधुराला त्याचा फार त्रास झाला. ती अचानक खूप आक्रमक झाली होती, मोठमोठ्याने ओरडत होती. उठून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. नितीनने तिला फटाफट योग्य ती औषधं, इंजेक्शन दिले, त्यामुळं मधुरा शांत झाली.
"डॉक्टरसाहेब, तुम्ही होते म्हणून सगळं जमलं हो. मधुरा रोज अशी करायला लागली, रात्री बेरात्री असं करायला लागली तर आम्ही काय करायचं?" मधुकरराव काळजीने बोलले.
"काळजी करू नका काका. रीमा आहे तुमच्यासोबत. ती सगळं बरोबर मॅनेज करेल. माझा तिच्यावर विश्वास आहे. मी पण थांबतोय की इथे. पुढच्या आठवड्यात जाईल मी लंडनला परत, तोपर्यंत इथलं हॉटेल सेन्टर इन आहे ना तिथे रूम बुक केलीये, तिथे थांबतो. रोज सकाळ-संध्याकाळ मधुराला भेटायला येत जाईल." नितीन.
"थॅंक्यु सो मच नितीन." रीमा.
"खरंतर अशा पेशंटला देखरेखीसाठी ऍडमिट करायला हवं; पण हॉस्पिटलचं वातावरण खूप विचित्र असतं. काका-काकु ते बघू शकणार नाहीत. शक्यतो आपण सगळं घरीच मॅनेज करू. या आठवड्यात नवीन औषधांचा परिणाम काय होतो ते पाहून पुढचं ठरवू." नितीन बोलत होता. राधिकताईंच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. नितीनला ते कळून आलं.
"काकु… हे बघा, मी म्हटलं होतं ना, मधुराला यातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला खंबीर बनावं लागेल. सगळं चांगलच होणार आहे." नितीन राधिकताईंना समजावत होता. त्याचं बोलणं राधिकाताईंना आश्वासक वाटलं. संध्याकाळी नितीन हॉटेलवर निघून गेला.
रीमा आता मधुराला सोडून एक क्षण सुध्दा रहात नव्हती. मधुराचं सगळं मन लावून करत होती. सुरुवातीला दोन-तीन दिवस मधुराला खूप त्रास झाला; पण नंतर मात्र तिने ट्रीटमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. नितीनसुद्धा दिवसभर मधुराच्या सोबत असायचा. मधुराचा ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स पाहून त्यालासुद्धा एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखी वाटली.
हा आठवडा मधुराच्या दृष्टीने प्रगतीचा आठवडा गेला होता. मधुरा आता गोष्टींना 'हो, नाही' च्या स्वरूपात उत्तरं देत होती. राधिकाताई, मधुकररावांचे चेहरे ओळखत होती. रीमाशिवाय तर तिचं पानही हलत नव्हतं. नितीनचा लंडनला परत जायचा दिवस आला.
"खूप आभार तुमचे डॉक्टरसाहेब! आता दर चौथ्या रविवारी मधुराला मुंबईला तुमच्या क्लिनिकमध्ये आणून दाखवायचे का?" राधिकाताई.
"नाही, त्याची गरज नाहीये आता." नितीन.
"म्हणजे?" रीमा एकदम दचकलीच.
"म्हणजे, मी आता लंडनला जाऊन पुन्हा परत येतोय. आता मुंबईतच क्लिनिक सुरू ठेवणार आहे. त्यामुळं तुम्ही कधीही येऊ शकता. किंवा मी रविवारी येत जाईल म्हणजे मधुराला प्रवासाचा त्रास नाही." नितीन बोलला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.
"ए रीमा, एखादं टॉनिक दे तुझ्या मैत्रिणीला, कसा हाडांचा सापळा झालाय बघ. थोडं वजन वाढलं पाहिजे. चांगलं खाऊ घालत जा तिला, नाहीतर तिच्या हिश्याचं तूच भरशील आपल्या पोटात." नितीन रीमाला चिडवत होता आणि कितीतरी दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर खळखळून हसू आलं होतं.
नितीन लंडनला जाऊन पंधरा दिवसाने परत आला. त्याने मुंबईच्या क्लिनिकमध्ये पूर्ण वेळ प्रॅक्टिस सुरू केली होती. नितीनने सुरू केलेल्या औषधांचा मधुरावर चांगला परिणाम सुरू झालेला दिसत होता. मधुरा बऱ्यापैकी बोलायला लागली होती; पण अशक्तपणा अतिशय जास्त होता. चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम शरीरावर दिसत होते. मुंबईत आल्यानंतर नितीन एकदा मधुराला भेटून गेला. मधुराचा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स पाहून तोही आनंदित झाला होता. त्याने अजून औषधांमध्ये थोडा बदल केला. नितीनच्या या चकरेत मधुराने त्याला ओळखलं होतं; त्यामुळं तो अजूनच सुखावला होता.
दिवस सरत होते. नितीन ची ट्रीटमेंट सुरू होऊन सहा महिने झाले होते. मधुकरराव आणि राधिकाताईंची प्रार्थना, रीमाचं मैत्री रुपी प्रेम, नितीनच्या औषधांची मात्रा आणि सगळ्यांपासून लपवलेल्या त्याच्या देवाजवळच्या प्रार्थना यामुळे सहा महिन्यात मधुराच्या तब्येतीत खूप फरक पडला होता. मधुरा बऱ्यापैकी चालायला लागली होती, आहार पहिल्यापेक्षा सुधारला होता; पण कधी कधी मात्र ती एकाच ठिकाणी बसून राहायची, विचारात हरवल्यासारखी वाटायची, रात्री बरेचदा दचकून उठायची. नितीनच्या मते मधुराने ट्रीटमेंटला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. रीमाने घरापासून जवळच एक जागा भाड्याने घेऊन तिथे स्वतःच छोटसं क्लिनिक सुरू केलं होतं. रीमाची तारेवरची कसरत सुरू झाली होती; पण 'मैत्रीसाठी सगळं' म्हणून ती सगळं आवडीने करत होती.
एकदा संध्याकाळी रीमा तिची ओ. पी. डी. संपवून घरी आली होती. मधुराला वेळ देता यावा म्हणून ती संध्याकाळची ओ. पी.डी. कमी वेळेची ठेवली होती. रीमा मधुराकडे आली आणि तिला एक कॉल आला. तिची ओ.पी.डी. ची प्रेग्नंट पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. रीमा तिची प्रायमरी डॉक्टर म्हणून तिला त्या हॉस्पिटलमधून ऑन कॉल बोलवलं होतं. रीमा मधुराला सांगून बाहेर जायला निघाली आणि मधुराने एकदम रडायला सुरुवात केली.
"काय झालं मधु?" रीमा.
"जाऊ नको ना गं कुठं. मला तुझ्यासोबत खूप बोलायचंय. आज तर तू दुपारीपण आली नाही." मधुरा लहान बाळासारखं रडत होती. रीमाने तिला खूप समजावलं पण ती काही ऐकायला तयार नव्हती.
"तू पण चल माझ्यासोबत." रीमा म्हणाली आणि मधुरा लगेच तयार झाली. खूप दिवसांनी मधुरा घराच्या बाहेर निघाली होती. मधुरा गाडीतून रस्ता, दुकानं, गाड्या सगळ्या गोष्टी कुतूहलाने बघत होती आणि रीमा कार चालवताना मध्ये मध्ये मधुराला कुतूहलाने बघत होती. रीमाला जिथे जायचं होतं ते हॉस्पिटल आलं. रीमाने गाडी उभी केली आणि मधुराचा हात धरून ती तिला हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत नेत होती. मधुराने हॉस्पिटलची इमारत पहिली आणि तिचे पाय लटलट कापायला लागले, तरी रीमाचा हात धरून ती हॉस्पिटलमध्ये गेली. रिसेप्शन काउंटर, पेशंटच्या बसायची जागा, डॉक्टरांचे केबिन सगळं बघून तिला दरदरून घाम फुटला. मधुरा घाबरून रीमाचा हात सोडून बाहेर पळाली. रीमासुद्धा मधुराला आवाज देत तिच्या मागे धावली. मधुरा रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिली. भरधाव वेगाने रस्त्यावरून गाड्या जात होत्या. मधुरा पूर्णपणे ब्लॅंक झाली होती. रीमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिने दचकून पाहिलं.
"रीमा, हॉस्पिटलमध्ये जाऊ नाही. डॉक्टर लोकं चांगले नसतात. आपल्याला मारतात आणि मग… मग आपले अवयव विकतात… आणि आपण त्यांचं ऐकलं नाही तर आपल्याला इंजेक्शन देऊन मारतात…" मधुरा खूप रडत बोलत होती. हॉस्पिटल बघून तिच्या मनावर झालेल्या जखमेची खपली निघाली होती, मनावरची खोल जखम पुन्हा भळभळत होती.
क्रमशः
(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. या कथेद्वारा समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रकारांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणताच वाईट संदेश पसरवणे हा या कथेचा उद्देश नाही.)
(कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर जरूर like करा.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा