मधुरीमा (भाग ३३)

Story of two friends

मधुरीमा (भाग ३३)


संध्याकाळी मधुराला व्हील चेअरवर बसवून राधिकाताई आणि मधुकरराव देवासमोर दिवा लावून प्रार्थना करत होते; तेवढ्यात राधिकाताईंचा फोन वाजला.


"हॅलो, कोण बोलतंय?" राधिकाताई.


"काकु, ओळखलं नाही का? मी रीमा." तिकडून रीमा एकदम आनंदात, उत्साहात बोलत होती.


"रीमा, अगं तुझा नंबर बदलला का? हा माझ्याकडे सेव्ह नाहीये म्हणून म्हटलं गं. कुठे आहेस बेटा?" राधिकाताई.


"काकु, मी कालच भारतात परत आले. कालपासून किती फोन केले मधूला; पण तिचा फोन स्वीटच्ड् ऑफ येत आहे. नंबर बदलला का तिने? मला तर तिला कधी भेटू आणि किती बोलू असंच झालंय. तिचा नंबर द्या ना मला, नाहीतर तिचा दिल्लीचा पत्ताच द्या. मी सरळ तिला भेटायला जाते आणि तिला सरप्राईज देते." भारतात परत आल्याचा आनंद, मधुराला भेटता येण्याचा आनंद रीमाच्या बोलण्यातून अगदी ओसंडून वाहत होता.


"अगं, मधुरा इथेच आलेली आहे." राधिकाताई.


"हो का? मस्तच! तिला माहितीये का माझा फोन आलेला आहे म्हणून?" रीमा.


"नाही गं….तिला..." राधिकाताई.


"थांबा... थांबा काकु… तिला सांगू नका माझा फोन आहे म्हणून… मी उद्या येऊन तिला भेटेल… सरप्राईज…" रीमाच्या आनंदाला तर आता पारावार उरला नव्हता.


"बरं, ये… लवकरच ये गं जरा." राधिकाताई.


"हो काकु, पहाटेच्या ट्रेनने निघते, अकरा- साडे अकरापर्यंत पोहोचेन मी. काकु.. पुढच्या महिन्यात मधूची पहिली अँनिव्हर्सरी आहे… तिचा काही प्लॅन ठरलेला आहे का? नसेल तर मला एक भन्नाट आयडिया सुचलीये." रीमा.


"वेळ आहे गं त्याला...तू ये तर घरी, मग आपण ठरवू काय करायचं ते." राधिकाताई आवंढा गिळत बोलल्या.


"हो चालेल, उद्या भेटू. बरं झालं मधुरा इकडेच आहे. पोटभर गप्पा मारू आम्ही दोघी. येते उद्या." रीमाने उत्साहात फोन ठेऊन दिला. 


"मधुराच्या आई, कोणाचा फोन होता? मधुकरराव.


"रीमाचा. भारतात आलीये, येतेय उद्या घरी." राधिकाताई.


"तुम्ही तिला मधुराबद्दल सांगितलं का?" मधुकरराव


"नाही ओ, नाही सांगितलं. ती एवढी आनंदी होती ना. मला तिचं मन मोडावं वाटलं नाही. उद्या येतेय ती. भेटून घेईल मधुराला." राधिकाताई मधुकररावांसोबत बोलत होत्या.


"एक वर्ष होईल मधुराच्या लग्नाला. कसे दिवस गेले ना! आपल्या लेकीच्या नशिबात का हे सगळं लिहून ठेवलंय काय माहिती? आपलं काय चुकलं हो मधुराच्या आई?"  मधुकरराव स्वतःला दोष देत बोलत होते. राधिकाताई त्यांना समजावून सांगत होत्या. एकमेकांना समजावून सांगण्याचा त्यांचा जणू दिनक्रमच झाला होता.

पहाटेच्याच ट्रेनने रीमा मधुराच्या घरी येण्यासाठी निघाली होती. 'मधुराला भेटतोय' याच आनंदात तिचा प्रवास कसा संपला हे तिला कळलंसुध्दा नाही. बरोबर साडे अकरा वाजता ती मधुराच्या घरी पोहोचली. तिने दारावरची बेल वाजवली. मधुकररावांनी दरवाजा उघडला.


"काका, मधुरा कुठेय?" हळू आवाजात बोलायचा इशारा करत तिने विचारलं.


"तिच्या रूममध्ये." मधुकरराव.


हातातली बॅग हॉलमध्ये भिंतीजवळ ठेवून ती दबक्या पावलाने आत गेली. समोरच दृश्य  कधी तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. व्हील चेअरवर बसलेली, निस्तेज चेहऱ्याची, शून्यात नजर हरवलेली मधुरा!


"मधू…." रूमच्या दारात उभी राहून रीमा कापऱ्या आवजात बोलली. डोळ्यात डबडब पाणी साचलं होतं, त्या पाण्यामुळे मधुराचा चेहरा स्पष्ट दिसतही नव्हता; डोकं अगदी सुन्न झालं होतं.

"मधू…" रीमा रडतच मधुरा जवळ गेली मधुराच्या गळ्यात पडली.


"री……...मा………" मधुराच्या तोंडून रीमाचं नाव निघालं आणि तीही रडायला लागली. दोन जीवाभावाच्या मैत्रिणी उष्ण पाण्याच्या वर्षावात मनसोक्तपणे भिजत होत्या.

राधिकाताई दोघींना सावरायला जाऊ लागल्या; पण मधुकररावांनी त्यांना अडवलं.


"होऊ दे मोकळं….दोघींनाही गरज आहे त्याची आणि तू ऐकलं का? आज कितीतरी दिवसाने मधुरा बोलली!" मधुकररावांचा कंठही दाटून आला होता. राधिकाताईंच्या डोळे तर कधीपासून वाहत होते. बराच वेळ झाला, दोघीही मुसमुसत होत्या. नंतर रीमाने मधुराला झोपवण्यात राधिकाताईंची मदत केली. राधिकाताईंनी जेवणासाठी पानं घेतली. 


"काकु काय झालं हे?" रीमा डोळ्यातलं पाणी पुसत बोलली.


"तू आधी जेवून घे, मग बोलू आपण निवांत." राधिकाताई.


"काकु, तसं पण आता घशाखाली काही उतरणार नाही. मला जेवायचा आग्रह करू नका. प्लिज." रीमा.


"असं अन्नाला पाठ लावू नये. दोन घास खाऊन घे." राधिकाताईंनी रीमाला समजावलं आणि जेवायला बसवलं. 'अन्नाचा अपमान नको' म्हणून तिने दोन घास कसेतरी घशाखाली उतरवले. मधुराचा चेहरा राहून राहून तिच्या डोळ्यांसमोर येत होता आणि तिचे डोळे पुन्हा पाणावत होते.


राधिकाताई आणि मधुकररावांनी मधुरासोबत जे घडलं ते सगळं रीमाला सांगितलं,अगदी रुद्रच्या अटकेपर्यंत. ते सगळं ऐकून रीमा एकदम स्तब्ध झाली. तिचं डोकं एकदम सुन्न झालं. पुढे काय बोलावं तिला काहीच सुचेना.


"या अशा लोकांमुळे आता समाजाचा डॉक्टरवरचा विश्वास उडून जाईल. किती नीच वृत्ती… बापरे! आपल्या मधूने नक्कीच विरोध केला असणार त्याला म्हणूनच त्याने हा असा घाणेरडा प्रकार केला. मी जर मधुराच्या जागी असते ना त्याला तर मी…." रीमा खूप चिडून बोलत होती.


"आता भोगतोय तो त्याची शिक्षा. आता त्या दुष्ट माणसाचं नाव घेऊन आपल्याला मनस्तापाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. आता आपण आपलं सगळं लक्ष मधुरावर केंद्रित करायला पाहिजे." मधुकरराव.


"हो काका, बरोबर बोलले तुम्ही. मला जरा मधुराची फाईल दाखवता का?" रीमाने मधुराची फाईल बघितली.


"काकु, कसं सांगू तुम्हला? खूप हाय डोसमध्ये औषधी सुरू आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर अगदी ठार वेड्या माणसाला देण्याची औषधं सुरू आहेत. नक्कीच हा त्या दुष्ट माणसाचाच प्लॅन असेल. जेवढं आपण सगळे मधुराला ओळखतो, मधुरा अशी नव्हतीच कधी." रीमा.


"आता काय करायचं ग? आम्ही आता इथल्याच डॉक्टरांना दाखवतोय, ते म्हणाले हळूहळू औषध कमी करावं लागेल. एकदम बंद करता येणार नाही." राधिकाताई चिंताक्रांत झाल्या होत्या.


"सध्या ते म्हणतील तसंच करूया आपण. सगळं चांगलं होईल काकु, मी आलीये ना. तुम्ही बघा, मधुरा पुन्हा तशीच होईल.. पूर्वीसारखी." रीमा राधिकाताईंचा हात हातात घेत आश्वासक बोलली.


"थांबशील ना काही दिवस इथे?" राधिकाताई.


"म्हणजे काय, हे काय विचारणं झालं? तुम्ही हाकललं तरी मी सध्यातरी जाणार नाही. तसही माझे जर्मनीच्या विद्यापीठातले कागदपत्र यायचे आहेत. ते आल्याशिवाय मला पुढे काही करता येणार नाही." रीमाचं बोलणं ऐकून दोघांनाही थोडं हायसं वाटलं.


रीमा आली तसं घरात पुन्हा चैतन्य आल्यासारखं वाटत होतं, जणू घरावरची सगळी मरगळ गळून गेली होती. मधुरा जागी असली की मधुरासोबत तिची बडबड सुरू असायची. 'मधुरा काही प्रतिक्रिया द्यायची नाही' ही गोष्ट वेगळी होती; रीमाचे प्रयत्न मात्र सुरू होते. मधुरा झोपल्यावर रीमा राधिकाताई आणि मधुकररावांच्या मागेमागे करत होती. तिची बडबड, विनोदी किस्से ऐकून कितीतरी दिवसांनी दोघांच्या चेहऱ्यावर थोडं का होईना हसु उमटलं होतं.


रीमाला मधुराच्या घरी येऊन चार-पाच दिवस झाले होते. 'आवाजाच्या दिशेने बघणे' हा मधुराच्या तब्येतीतला मोठा आणि सकारात्मक बदल होत होता. रीमा मधुरासोबत बडबड करायला लागली की तिची नजर आता शून्यात वाटत नव्हती. बरेचदा ती 'रीमा..' एवढंच म्हणून खूप रडत होती. रीमा मात्र आपल्या मैत्रीणीचं सगळं मन लावून करत होती.


रीमाला तिथे येऊन जवळपास एक आठवडा झाला होता.


"काकु, मी जरा काही दिवस घरी जाऊन पुन्हा परत येते." रीमा.


"हो, जा बाळा. तुला असं किती दिवस आम्ही अडकवून ठेवणार. मधु कधी बरी होईल ते काहीच सांगता येत नाही. तुलाही आता तुझे करिअर आहे. लग्न कधी करतेय?" राधिकाताई.


"लग्न तर बिलकुल करणार नाही. माझ्या बाबांनी काय केलं तुम्हाला माहितीच आहे, मधुरासोबत काय झालं हेही तुम्ही बघतच आहात. चुकून प्रेमात पडले होते तर तिथेही विश्वासघात झाला. माझा तर आता पुरुषांवरचा विश्वासच उडाला आहे. चुकूनही मी लग्न करणार नाही. करिअरचं म्हणाल तर त्यासाठी घरी जाऊन येतेय. माझे जर्मनीचे कागदपत्र आले आहेत पोस्टाने. येताना आईला सोबत घेऊन येते. इथे तुमच्या घराच्या शेजारी एक घर आहे, तिथे तीन रूमचा ब्लॉक भाड्याने घेतला आहे. कालच त्या काकूंशी बोलले मी. इथे आल्यावर माझं क्लिनिक सुरू करेल. मला काय कुठेही क्लिनिक सुरू करायचं आहे. गावी केलं काय अन् इथे केलं काय; मला त्याचा फरक पडत नाही. आई इथे यायला तयार झाली पाहिजे फक्त. माझ्या भावाचं शिक्षण सुरू आहे अजून. तो मुंबईला असतो. मला आता आईला एकटं सोडायचं नाहीये म्हणून तिला घेऊनच येते." रीमा एका दमात सगळं बोलून मोकळी झाली.

"मधे, घरी जाऊन येते हां. काळजी घे आणि काका काकूंना त्रास देऊ नको बरं. मग मी परत आल्यावर आपण अजून खूप गप्पा करू." रीमा मधुराच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली आणि दोघांचा निरोप घेऊन रीमा परत घरी जायला निघाली; पण तिचा पाय तिथून ओढवत नव्हता. स्वतःला समजावून ती घरी गेली.


घरी गेल्यावर 'आईला मनवने सोप्पं नाहीये' हे रीमाला माहिती होतं. तरी तिने तिचे प्रयत्न सुरू ठेवले. तिने सुनीताताईंना मधुराच्या बाबतीत घडलेलं सगळं सांगितलं. 

आपलं घरदार सोडून दुसरीकडं जाऊन राहायची सुनीताताईंची इच्छा नव्हती; पण रीमा खूप हट्टला पेटली होती. तिने सुनीताताईंना 'मधुराच्या गावी राहायला जाऊ' म्हणून तयारही केलं. सुनीताताई लग्नासाठी रीमाच्या मागे लागल्या होत्या. अरविंदबद्दल सगळं सांगून रीमा मोकळी झाली आणि सुनीताताईंनी सध्याचा 'लग्न' हा विषय बंद केला. या सगळ्या गोष्टीत एक आठवडा गेला. आठवड्याभराने दोघी मायलेकी कामपूरतं सामान घेऊन मधुराच्या शेजारी राहायला आल्या. संध्याकाळ झाली होती. रीमा लगेच मधुराला भेटायला गेली. सुनीताताईसुध्दा सोबत होत्या. मधुराला बघून सुनीताताईंच्या काळजात धस्सं झालं. रीमा इथे येऊन राहायला का मागे लागली होती हे आता चांगल्या प्रकारे कळलं होतं.


"बरं झालं सुमनताई, तुम्ही इथे आल्या ते. मधुराला रीमा सोबती आणि मला तुमची सोबत. आधार वाटला." राधिकाताई.


"तुम्ही आता अगदी निःसंकोचपणे राहा. आम्ही दोघी आलोय ना! आता कायम तुमच्या सोबत राहू." सुनीताताई

"काय म्हणतेय मधु?" रीमा राधिकाताईंसोबत बोलत होती.


"काय म्हणणार? तू गेली तसं पुन्हा फक्त टक्क डोळे उघडे ठेवून बघतेय. आम्ही आपलं 'मधुरा, मधुरा' करतोय; पण जरा म्हणून आम्हाला रिस्पॉन्स नाही." राधिकाताई.


"रीमा, अगं मधुराची महिन्याची औषधं संपत आली होती, प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाहीत ही औषधी म्हणून मग तिला इथल्या डॉक्टरांकडे नेऊन आणलं. त्यांनी एका डॉक्टरचं नाव सुचवलंय, 'डॉ. देशमुख' म्हणून आहेत कोणी. लंडनला असतात म्हणे, दर चौथ्या रविवारी मुंबईत येतात. त्यांचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत म्हणे. डॉक्टर म्हणत होते, मधुराला तिकडे नेऊन दाखवा. एक महिना आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यांची. पुढच्या महिन्यात दाखवून येऊ, असा विचार करतोय. हे बघ त्यांचं कार्ड." मधुकरराव रीमाच्या हातात कार्ड देत बोलले.


"डॉ. नितीन डी. देशमुख." रीमा कार्डवरच डॉक्टरच नाव वाचत होती आणि एकदम किंचाळलीच.


"काका, हे माझ्या डोक्यात कसं नाही आलं? अहो, हा नीत्या... आमचा मित्र…. आमच्यासोबत एम. बी. बी. एस. ला नव्हता का सोबत…?  नितीन…" रीमा आनंदात बोलली, जणू हरवलेलं काही सापडल्यासारखी.


"अरे हो, नितीन होता तुमच्या वर्गात; पण आता त्याचा चेहरा आठवत नाहीये. खूप शांत मुलगा होता तो." मधुकरराव.


"हो काका, तोच…. एक मिनिट…. शीट…. आजचा रविवार आहे ना? कितवा आहे? चौथा…. म्हणजे नितीन आज मुंबईत आलेला असणार…. एक मिनिट बस… थांबा मी त्याला फोन लावते. तो परत लंडनला गेला नसेल म्हणजे मिळवलं." रीमाने बोलत बोलत नितीनला फोन लावला. रिंग जात होती.


"रिंग जातेय म्हणजे अजून फ्लाईटमध्ये बसला नाहीये… उचल नितीन… फोन उचल…." रीमाचं स्वतःशीच बडबडण सुरू होतं.


"हॅलो, नितीन, रीमा बोलतेय." रीमा.


"कोण रीमा?" नितीन.


"अरे मी, रीमा सुनीता नवलकर. ओळखलं नाही का?" रीमा.


"हां, रीमा तू आहेस होय. तुझा नंबर सेव्ह नव्हता ना, म्हणून विचारलं. बोल ना. कशी आहेस आणि कुठे आहेस?" नितीन.


"आधी तू मला सांग, तू कुठे आहेस?" रीमा.


"एअरपोर्टवर आहे. मुंबईला आलो होतो आता लंडनला जातोय परत." नितीन.


"नितीन, तू तुझं जाणं एक-दोन दिवस पुढे ढकलू शकतो का? प्लिज जमत असेल तर बघ ना." रीमा


"असं वेळेवर कसं करणार, माझं आता महिन्याचं शेड्युल फिक्स असतं अगं." नितीन


"नितीन, प्लिज बघ ना. काही तर होत असेल ना? नितीन, अरे मधुराला गरज आहे आता तुझी.. आपल्या मधुराला… फोनवर सगळं सांगता येणार नाही… बघ ना काही जमत असेल तर." रीमा.

रीमाने मधुराचं नाव घेतलं आणि नितीनच्या डोळ्यासमोर टेकडीवरच्या मंदिरात पाहिलेली मधुरा उभी राहिली. त्याने तिला शेवटचं तिथेच तर पाहिलं होतं. नंदादीपाच्या प्रकाशात अजून सुंदर दिसणारा तिचा हसरा, खोडकर चेहरा… पावसाचं पाणी अलगद हातावर झेलणारी मधुरा… कॉलेजमध्ये लोकांसोबत भांडणारी मधुरा… जबरदस्ती भांडण ओढवून घेणारी मधुरा… दादागिरी करणारी पण आपलेपणा जपणारी मधुरा…


एअरपोर्टवर नितीनच्या नावाची अनाऊन्समेंट होत होती. त्याच्या फ्लाईटमधले सगळे प्रवासी बसले होते, हा एकटाच मागे राहिला होता. नितीन स्तब्ध झाला होता. काचेतून ब्रिटिश एअर लाईन्स विमान दिसत होतं… एकीकडे पैसा होता… तर एकीकडे मधुरा… एकीकडे प्रसिद्धी होती… तर एकीकडे पहिलं प्रेम… काय करावं? त्याला काहीच सुचत नव्हतं. हातातला फोन सुरूच होता. एकीकडे नावाची अनाऊन्समेंट होत होती आणि एकीकडे रीमा तिकडून बोलत होती..


"नितीन, ऐकतोय का? नितीन… हॅलो नितीन….."

क्रमशः

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. या कथेद्वारा समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रकारांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणताच वाईट संदेश पसरवणे हा या कथेचा उद्देश नाही.)


(कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर जरूर like करा.)


© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all