मधुरीमा (भाग ३२)

Story of two friends


मधुरीमा (भाग३२)
पुरुषोत्तमराव दिल्लीला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये एक रूम बुक केली आणि डी. वाय. एस. पी. मंगेशला फोन लावला. दोघांची भेटायची वेळ ठरली. निवांतपणे बोलता यावं म्हणून एका उद्यानात दोघे भेटले.

''बोला काका, फोनवर महत्त्वाचं काम आहे म्हणत होतात." मंगेश आणि पुरुषोत्तमराव एका बाकड्यावर बसले.

"हो, महत्त्वाचंच काम आहे. थोडं बोलायचं होतं; पण कुठून आणि कसं सुरू करावं तेच कळत नाहीये." पुरुषोत्तमराव.

"निःसंकोचपणे सांगा काका. कोणी त्रास देतंय का? शेतीचा काही प्रॉब्लेम? की काही फॅमिली मॅटर आहे?" मंगेश अंदाज बांधत होता.

"असं काही असतं तर किती चांगलं झालं असतं. मी जी गोष्ट सांगणार आहे; त्यावर तुझा विश्वासही बसायला पाहिजे." पुरुषोत्तमराव.

"काका, कोणतीही अडचण असू द्या, मी तुम्हाला मदत करेन. काय झालं सांगा." मंगेश.

"इथलं न्यू लाईफ लाईन हॉस्पिटल माहितीये?" पुरुषोत्तमराव.

"हो माहिती आहे की. इथल्या प्रसिद्ध हॉस्पिटलपैकी एक आहे ते. खूप नाव आहे त्या हॉस्पिटलचं." मंगेश.

"मला असं माहिती पडलं की तिथे मानवी अवयवांची तस्करी केली जाते." पुरुषोत्तमराव थोडे चाचरत, दबक्या आवाजात, आपल्याला कोणी बघत तर नाहीये याची खातरजमा करून बोलत होते.

"काय? तुम्हाला कसं कळलं?" मंगेश.

"ते महत्त्वाचं नाहीये. तिथे एक डॉक्टर आहे. डॉ. रुद्र आष्टेकर, तो ही यामध्ये सामील आहे असं कळलंय." पुरुषोत्तमराव.

"डॉ. रुद्र आष्टेकर! रुद्र तर तुमच्या मुलाचे नाव होते ना?" मंगेश.

"माझ्यासाठी तो मेलाय." पुरुषोत्तमराव.

"तुम्ही असं का बोलताय? कदाचित हे खोटंसुध्दा असेल. तुम्हाला कोणी असं सांगितलं? त्याचं नाव सांगा मी बघतो काय मॅटर आहे ते." मंगेश.

"मला त्या व्यक्तीचे नाव समोर येऊ द्यायचं नाहीये. काही करता येत असेल ना?" पुरुषोत्तमराव.

"हो, तसं आपण आपला खबऱ्या पाठवून माहिती काढू शकतो. एक मिनिट काका, तुम्ही न्यू लाईफ लाईन हॉस्पिटल म्हणालात ना? तिथल्या तीन डॉक्टर आणि दोन वॉर्ड बॉयचे आता काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाले आणि सगळ्यांचा ॲक्सिडेंट सारख्याच प्रकारे झाला होता. ते हॉस्पिटल माझ्या एरियात येत नाही. माझा एक मित्र आहे तिकडच्या पोलीस ठाण्यात तो सांगत होता. हवं तर मी त्याच्याशी बोलतो याबद्दल." मंगेश.

"नाही मंगेश. बहुतेक तिथले पोलीस सुध्दा यात मिळालेले आहेत, म्हणून तर त्यांचे हे असले धंदे नीट चालू आहेत. तुला तुझ्या लेव्हलवर काही करता येत असेल तर बघ ना." पुरुषोत्तमराव.

"हो. तुम्ही म्हणता त्यातही तथ्य आहे. मी बघतो काय करायचं ते." मंगेश.

"हवं असेल तर मी पोलीसात तशी तक्रार नोंदवतो." पुरुषोत्तमराव.

"ते हॉस्पिटल ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं तिथे तक्रार करावी लागेल. तुम्ही म्हणताय की पोलीसही त्यात सामील असू शकतात मग तिथे तुम्ही तक्रार करायला गेले तर त्यांना कळून जाईल." मंगेश

"मग कसं करायचं रे?" पुरुषोत्तमराव हतबल झाले.

"मी माझी माणसं लावतो कामाला." मंगेश.

"तुला मी जे बोललो ते खोटं तर वाटत नाही ना?" पुरुषोत्तमराव.

"आपल्या मुलाबद्दल कोणी असं का बरं बोलेल. काका, तुम्हाला मी खूप जवळून ओळखतो. तुम्ही तुमची नीती-मूल्ये कधीच, कोणासाठी सोडली नाहीत. मला आठवतं, रुद्र आणि मी एकाच शाळेत होतो. रुद्रने तेव्हा एका मुलाचे पैसे चोरले होते आणि तो पकडला गेला होता. त्यावेळी तुम्ही त्याला नुसती समज देऊन, रागे भरून सोडलं नाहीत तर तेव्हा तुम्ही त्याला पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांकडून त्याची कानउघाडणी केली होती." मंगेश.

"माझेच संस्कार कुठेतरी कमी पडले असं वाटतंय." पुरुषोत्तमराव उसासा टाकत बोलले.

"बरं काका, येतो मी. तुम्ही हे प्रकरण माझ्यावर सोडा. मी याचा छडा लावतो." असं बोलून मंगेश तिथून निघून गेला. पाठमोऱ्या मंगेशकडे पुरुषोत्तमराव बघत होते. 'जे करतोय ते योग्य की अयोग्य' त्यांच्या मनाची द्विधा मनस्थिती होत होती.

"देवा, न्याय मिळवून दे मधुराला." मनाशीच म्हणत पुरुषोत्तमराव रूमवर गेले.

डी. वाय. एस. पी. मंगेशला भेटून दोन-तीन दिवस झाले होते; परंतु मंगेशचा फोन वगैरे आला नव्हता. पुरुषोत्तमरावांनी एकदा फोन केला; पण मंगेशने फोन उचलला नव्हता. बघता बघता दिल्लीला येऊन पुरुषोत्तमरावांना दहा-बारा दिवस झाले होते. या दिवसात मंगेशचा फोन आला नव्हता.

"आपण काही चूक तर केली नाही ना?" पुरुषोत्तमरावांच मन मंगेशवर शंका घेत होतं. तरी त्यांनी पुन्हा एकदा मंगेशला फोन लावला.

"नमस्कार काका, सॉरी! मी खूप बिझी होतो. तुम्ही सांगितलेलं काम माझ्या लक्षात आहे. मी त्यावर काम करतोय." मंगेश.

"अरे, मी सहजच फोन केला होता. तुझ्या सवडीने कर. बरं, मी इथं राहणं गरजेचं आहे का? गावी परत गेलो तर चालेल का? तुला काही मदत लागली तर म्हणून विचारतोय." पुरुषोत्तमराव.

"तुम्ही इथेच आहात का? मला वाटलं गावी गेले. काका तुम्ही बिनधास्त गावी जा." मंगेश.

मंगेश सोबत बोलून पुरुषोत्तमराव गावी निघून गेले. पुरुषोत्तमराव गावी येऊनही दीड महिना झाला होता. मंगेशकडून काही हालचाली झाल्याची चिन्हं दिसत नव्हती.

या दरम्यान मधुराची तब्येत आहे तशीच होती. रुद्रने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मधुराकडून लवकर सुटका मिळावी म्हणून त्याने तिच्यासाठी सुध्दा स्वतःच वकील केला होता. दोन्हीकडच्या वकिलांना भरपूर पैसे खाऊ घालून,  'मधुरा मनोरुग्ण आहे' हे ठरवण्यासाठी त्याच्या त्या डॉक्टरकडून न जाणो कितीतरी सर्टिफिकेट लावून त्याने अगदी दोन महिन्यात घटस्फोट घेतला होता. 

दिवस सरत होते. डी. वाय. एस. पी. मंगेशला भेटून जवळपास तीन महिने होत आले होते. पुरुषोत्तमरावांनी मध्यंतरी मंगेशला फोन केले होते; पण गोष्ट पुढे जातेय की नाही हे त्यांना कळत नव्हतं. या दरम्यान मधुकरराव आणि राधिकाताईंनी मधुराला त्यांच्या शहरातल्या मनोविकार तज्ज्ञांकडे दाखवून आणलं होतं. 'मधुराची खरी केस हिस्ट्री काय आहे?' हे कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळं तिथल्या डॉक्टरांनी मधुराच्या औषधांमध्ये फारसे बदल केले नव्हते.

"हळूहळू औषधींच प्रमाण कमी करून बघू." असं डॉक्टरांनी सांगितल्यावर मधुकरराव आणि राधिकाताईंना त्यांच्यावर विश्वास ठेवणं भाग होतं.

या दिवसात रुद्रचा घरी फोन वगैरे करण्याचं प्रमाण अगदी कमी झालं होतं. तिकडे दिल्लीत तो आणि डॉ. शेखर मिळून पेशंटच्या जीवाशी खेळून अगदी आसुरी पद्धतीने पैसे कमवत होते.

"इतक्यात मंगेशचा काहीच फोन वगैरे आला नाही. प्रत्येक वेळी आपण फोन करून विचारणं देखील बरं वाटत नाही. मधुराचा घटस्फोट झाला सध्या हीच एक जमेची बाजू म्हणावी लागेल." पुरुषोत्तमराव विचार करत, टी. व्ही. वरचे चॅनल बदलत, दुपारी सोफ्यावर लोळत पडले होते. तेवढ्यात न्यूज चॅनल लागलं. त्यांना चॅनलवर मंगेश दिसल्यासारखा वाटला. विचारांच्या तंद्रीत त्यांनी पुढचं चॅनल लावलं. एकदम तंद्री भंग झाल्यासारखी वाटली आणि त्यांनी पुन्हा मागचं चॅनल लावलं. खरंच त्यावर मंगेश होता. कसलीशी पत्रकार परिषद घेऊन बोलत होता आणि त्याखाली मोठ्या अक्षरात एक एक न्युज झळकत होती.

"न्यू लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये मानवी अवयवांची तस्करी."

"हॉस्पिटलमधले जवळपास सर्वच डॉक्टर यात सहभागी."

"हॉस्पिटल सील केलं गेलं."

"तस्करीचे धागे दुबईपर्यंत."

"अनेक मोठ्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता."
 

"सुमन…" पुरुषोत्तमराव जवळपास किंचाळलेच. सुमनताई धावत बाहेर आल्या.

"सुमन, बघ. टी. व्ही. बघ…. बघ आपली मधुरा निर्दोष आहे. एवढ्या हिंमतीनं पोरीनं ही गोष्ट लक्षात ठेवली. आपलं पोरगं मात्र दैत्याच्याही पलीकडचं निघालं." बोलता बोलता पुरुषोत्तमराव एकदम ढसाढसा रडायला लागले. एवढ्या दिवसात मनात साठवून ठेवलेलं आज मनसोक्त बाहेर पडत होतं. सुमनताईंची अवस्था अजून काही वेगळी नव्हती. रडत रडतच पुरुषोत्तमरावांनी मधुकररावांना फोन लावला.

"मधुकरराव…. मधुरा जिंकली…. न्यूज चॅनल लावा." पुरुषोत्तमराव.

पुरुषोत्तमराव काय बोलत होते, मधुकररावांना सुरुवातीला समजलच नाही. त्यांनी न्यूज चॅनल लावलं. रुद्रच्या अटकेची बातमी होती. राधिकाताई आणि मधुकरराव दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

"मधु, माझं शूरवीर लेकरू. एवढं सगळं होऊनही  बरोबर कसं लक्षात ठेवलं सगळं. मधु…. जिंकलीस पोरी…." राधिकाताई मधुराला कवटाळून मन मोकळं करत होत्या. मधुरा मात्र शून्यात हरवली होती.

कोणाचाच नाव पुढे न येऊ देता मंगेशने रुद्रला पकडलं होतं. (कसं? ते येईलच पुढे. काळजी नका करू याच भागात आहे.) पुरुषोत्तमरावांना दिलेलं वचन मंगेशने पाळलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुरुषोत्तमरावांनी सुमनताईंना बॅग भरायला लावली.

"अहो, पण कुठे जायचं? काही सांगाल की नाही. तयारी कर, तयारी कर मागे लागले नुसते. कुठे जाणार आहोत हे कळलं तर तशी तयारी करता येते." सुमनताई.

"आज मधुराकडे, उद्या मुंबईला तिथून दिल्ली आणि दोन दिवसांनंतर विमानाने अमेरिकेत. रवीशकडे… कायमचं. तसही इथे आपण आता लोकांच्या नजरेला नजर देऊन राहू शकणार नाही." पुरुषोत्तमराव.

"काय! हे कधी ठरवलं?" सुमनताई.

"खूप दिवसांपासून ठरवलंय. चल, आटोप लवकर. गाडी पण येईल इतक्यात. जेवढ्या लवकर मधुराकडे पोहोचू तेवढा जास्त वेळ तिच्यासोबत राहायला मिळेल. तिथे गेल्यावर तुला अजून काही गोष्टी कळतील." पुरुषोत्तमराव बोलले आणि सुमनताईंनी तयारी केली. तोपर्यंत गाडीसुध्दा आली. पुरुषोत्तमराव आणि सुमनताई मधुराकडे पोहोचले. त्यांना असं अचानक बघून मधुकरराव आणि राधिकताईंना धक्का बसला. मधुरा व्हील चेअरवर बसलेली होती. सुमनताई तिच्याकडे बघतच राहिल्या. मधुरा ओळखुसुद्धा येत नव्हती. पहिल्यापेक्षा खूप कृश झाली होती, डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहरा अगदी निस्तेज आणि नजर मात्र तशीच शून्यात हरवलेली. मधुराला पाहून सुमनताईंना एकदम गलबलून आलं. 

सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपली. मधुराचं औषध वगैरे नीट देऊन, तिला झोपवून सर्वजण गप्पा मारत होते. पुरुषोत्तमरावांनी एक फाईल मधुकररावांना दिली.

"ही कसली फाईल?" मधुकरराव.

"मधुराच्या हक्काची. मी माझी प्रॉपर्टी, घर-दार, शेती, गाड्या सगळं विकलंय. त्यातला हा मधुराचा हिस्सा. माझ्या प्रॉपर्टीचे मी तीन समान भाग केलेत. एक मधुराला दिलाय, एक रवीशला दिलाय आणि एक सुमनच्या नावे केला आहे. खरंतर आमच्या मुलासोबत लग्न होऊन मधुराच्या आयुष्याचं एवढं नुकसान झालंय की त्यासमोर हे पैसे वगैरे सगळं नगण्य आहे; पण तरी हे घ्या. मधुरा बरी होईपर्यंत यावर तुमचा हक्क असेल. तिच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता. ती बरी झाल्यावर मात्र यावर फक्त तिचाच अधिकार असेल. मी सुमनच्या नावाने जो हिस्सा केलाय, तो ती रुद्रसोडून बाकी कोणाच्याही नावे करू शकते. जर तिने तो कोणाच्या नावे केला नाही तर मी मधुराच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केलाय, ते पैसे त्यात जमा होतील." पुरुषोत्तमराव.

"पुरुषोत्तमराव, या सगळ्याची काहीच गरज नव्हती. देवाच्या दयेने आमच्याकडे सगळंच आहे." मधुकरराव हात जोडून बोलत होते.

"मधुकरराव, मधुरा आमची कोणीच नाही का? आमचं कार्ट दळभद्री निघालं, त्याला मधुरासारख्या हिऱ्याची किंमत नाही कळली; पण…. हवं तर हे आमचं प्रायश्चित्त समजा." पुरुषोत्तमराव मधुकररावांचा हात हातात घेत बोलले.

"हे मधुरासाठी लग्नात बनवलेले दागिने. तिचं स्त्रीधन. दिल्लीला जाताना तिने माझ्याजवळ ठेवलं होतं, सुरक्षित राहील म्हणून." सुमनताईंनी एक दागिन्यांचा डब्बा राधिकताईंना दिला. राधिकाताई सुमनताईंच्या गळ्यात पडून रडत होत्या. सगळं वातावरण गहिवरलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुरुषोत्तमराव आणि सुमनताई मुंबईला गेले. तिथून विमानाने दिल्लीला गेले. डी. वाय. एस. पी. मंगेश विमानतळावर आधीच आलेले होते. त्यांच्यासोबत ते दोघे त्यांच्या घरी गेले. मंगेशच्या बायकोने खूप चांगले आदरातिथ्य केले. पुरुषोत्तमराव आणि सुमनताई खूप भारावून गेले.

"अरे मंगेश, आमची एवढी लायकी नाहीये. गुन्हेगाराचे आई वडील आम्ही."  पुरुषोत्तमराव.

"असं का बोलताय काका? तुमच्या एवढं मोठं मन कोणी शकणार नाही. आपल्या मुलाला पकडून देणं तेही एका शंकेवरून…. या काळात कोणीच असं करू शकलं नसतं." मंगेश.

"मी तर आशाच सोडली होती, खूप वेळ लागू लागला तुला; पण तू तुझं काम चोख केलंस." पुरुषोत्तमराव.

"हो काका. वेळ लागलाच. काम सोप्पं नव्हतं. तुम्हाला भेटून गेल्यावर दोन दिवस मला तर तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही तेच कळलं नव्हतं. त्यानंतर एका रात्री आम्ही गस्त घालत होतो. आमच्यासमोर रस्त्यावरून एक माणूस गाडीवर जात होता आणि एका ट्रकने त्याला उडवलं. आम्ही धावत त्याच्याजवळ गेलो, तो खूप गंभीररीत्या जखमी झाला होता. बोलायचा प्रयत्न करत होता. 'लाईफ लाईन हॉस्पिटल… खूप मोठा स्कॅम सुरू आहे…' एवढंच वाक्य बोलला आणि त्याने जीव सोडला. पुढे त्याचा पत्ता काढल्यावर तो तिथला ओ. टी. मध्ये काम करणारा एक कर्मचारी होता हे कळलं. तुम्ही बोललेलं आठवलं मला, मग मी माझी माणसं कामाला लावली; पण ठोस पुरावा काही मिळत नव्हता. आम्ही स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं पण दोन वेळा आम्हाला अपयश आलं. एक दिवस असंच एक बेवारस ॲक्सिडेंट केस आम्हाला मिळाली. माझी माणसं त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. 'आमचा रुग्ण जिवंत आहे, त्याच्यावर उपचार करा' असा धिंगाणा घालू लागली. यावेळी मात्र डॉ.रुद्र, डॉ. शेखर बरोबर जाळ्यात अडकले. त्यांनी 'पेशंटच्या मेंदूत रक्तस्राव आहे, पोटात रक्तस्राव आहे, पायाची हाडं तुटली आहेत', असं सांगून ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करायला लावलं. पहाट होत आली होती, आमच्या माणसांनी अजून धिंगाणा घालायला सुरुवात केली; त्यामुळे डॉक्टरांचे लक्ष त्यांच्याकडे परावृत्त झालं होतं. तेवढ्यात आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये आमची काही माणसं पेरली; त्यांच्याजवळ मायक्रो फोन, मायक्रो कॅमेरा सगळं होतं. ऑपरेशन दरम्यान होणारं डॉक्टरांचं बोलणं, त्यांच्या कृती, त्यांनी पेशंटचे अवयव कसे काढले सगळं त्यात रेकॉर्ड झालं आणि ते सगळं कमिशनर ऑफ पोलीस आणि सर्व उच्च अधिकाऱ्यांनी लाईव्ह पाहिलं. पहाटेपासून ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेले डॉक्टर दुपारीच बाहेर आले आणि त्यांची रवानगी सरळ तुरुंगात झाली. माझ्या पत्रकार मित्रांना मी आधीच बोलवून ठेवलं होतं; त्यामुळे सर्व देशात ही बातमी पसरली. रुद्र आता तुरुंगात आहे. या सगळ्या गोष्टींच जाळं दुबईपर्यंत पसरलेलं आहे त्यामुळं सरकार खबडून जागं झालयं. कायद्याने रुद्रला जी शिक्षा होईल ती त्याला उपभोगावी लागेल." एक मोठा उसासा टाकत मंगेशने सर्व गोष्ट सांगितली. सगळं ऐकून पुरुषोत्तमराव आणि सुमनताई एकदम स्तब्ध झाले. काही बोलायची दोघांची मनस्थिती राहिली नव्हती.

"तुम्हाला रुद्रला भेटायचं आहे का? मी तशी व्यवस्था करतो." मंगेश.
 

"बिलकुल नाही." अगदी कोरडेपणाने सुमनताई बोलल्या.

दुसऱ्यादिवशी पुरुषोत्तमराव आणि सुमनताईंचं विमान अमेरिकेच्या दिशेनं झेपावलं.

त्याच दिवशी इकडे मधुराच्या घरी-

संध्याकाळ झाली होती. राधिकाताई दिवाबत्ती करत होत्या. मधुराला व्हील चेअरवर बसवून त्यांनी तिला देवघरात आणलं होतं. मधुकरराव सुध्दा सोबतच होते. दोघे हात जोडून देवाला प्रार्थना करत होते.

"ईश्वरा…. आता तुझा चमत्कारच मधुराला यातून बाहेर काढू शकेल... काही तरी कर… तूच ये कोणत्यातरी रुपात; मधुराला लवकर बरं कर…" 

तेवढ्यात राधिकाताईंच्या फोनची रिंग वाजली…
"कोणाचा फोन असेल बरं?" राधिकाताई स्वतःशीच पुटपुटत फोन उचलायला गेल्या.

क्रमशः

कोणाचा फोन असेल ? खरंच काही चमत्कार होईल का? पाहूया पुढील भागात.
 

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. या कथेद्वारा समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रकारांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणताच वाईट संदेश पसरवणे हा या कथेचा उद्देश नाही.)

(कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर  like करा.) 

                                           © डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all