मधुरीमा (भाग ३१)
"रुद्र गोव्यावरून परत आला की तुम्ही मधुराला तुमच्या घरी घेऊन जा. रुद्रच्या माघारी नेलं तर उगी त्याला काही वाटायला नको." पुरुषोत्तमराव
"हो, म्हणजे मी म्हणणार होते. मधुराला तेवढाच बदल मिळेल. कदाचित घरी गेल्यावर तिच्या स्थितीत काही सुधारणा होईल, ही वेडी आशा बाकी काही नाही." राधिकाताई
"हो. तेसुध्दा आहे. पण मी थोडा वेगळा विचार करत होतो. आपल्याला जी शंका येतेय, जर तसं असेल मधुराच्या जीवाला इथे धोका आहे. आपण घटस्फोटाचा विचार करूया." पुरुषोत्तमराव
"घटस्फोट!" राधिकाताईंच अवसान गळालं.
"आपण शंका घेतोय, रुद्र अजून गुन्हेगार आहे हे सिद्ध नाही झालंय आणि तुम्ही लेकरांचा संसार मोडायची गोष्ट करताय." सुमनताई
"सुमन, तसं नसेलही. मधुराला जाऊ दे तिकडे काही दिवस. तुला एकच गोष्ट कितीदा सांगायची. इथे मधुराच्या जीवाला धोका आहे. रुद्र दोषी असेल तर त्याची शिक्षा मधुराला का द्यायची? तिला तिचं आयुष्य जगायचा पूर्ण अधिकार आहे. म्हणूनच म्हणतोय घटस्फोटाचा विचार करू. तसंही या प्रकरणाचा छडा लावायला वेळ लागणार आहेच, सगळं सावधगिरीने करावं लागेल. मधुराला जाऊ दे तिच्या घरी. वेळ आल्यावर मी रुद्रसोबत घटस्फोटाबद्दल बोलतो आणि त्यासाठी तो सहज तयार झाला तर मग बघू काय करायचं ते." पुरुषोत्तमराव
"एवढी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ना, काय बोलावं काही सुचतच नाहीये. माझी हसून खेळून राहणारी मधुरा मला परत हवी आहे, बस एवढंच मागणं आहे आता." मधुकरराव काकुळतीने बोलत होते.
झालेल्या प्रकाराने सगळ्यांनाच निःशब्द केलं होतं. मधुरासाठी चांगलं काय करता येईल? याचा सगळे विचार करत होते. मधुराच्या म्लान चेहऱ्याकडे पाहिलं की सगळ्यांनाच अपराधीपणा वाटायचा.
गोव्याला दोन दिवसासाठी म्हणून गेलेला रुद्र चार दिवसांनी वापस आला. या चार दिवसात त्याने एखादा फोन करून मधुराची साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. रुद्रचं असं वागणं पुरुषोत्तमरावांना अपेक्षितच होतं. सुमनताई मात्र रुद्रच्या वागण्यात कुठेतरी मधुराबद्दल प्रेम दिसतंय का? हे शोधत होत्या.
"मी काय म्हणतो जावईबापू, मधुराला घरी घेऊन जाऊ का काही दिवस? नाही म्हणजे, आम्ही किती दिवस असं इथे राहणार ना आणि तुम्हालाही उगी त्रास नको. तुम्हाला तुमचा जॉब, केसेस आहेतच की, मधुरालासुद्धा तेवढाच वातावरण बदल होईल." मधुकरराव
"अहो बाबा, असं विचारताय का? मधुराला निःसंकोचपणे घेऊन जा आणि हवं तेवढे दिवस ठेवा. तुम्ही जाण्याआधी एकदा मनोविकार तज्ज्ञांना भेटून घेऊ. तुम्ही मधुराच्या औषधांबद्दल बोलून घ्या. काही औषधी तिकडे कदाचित मिळणार नाहीत. काळजी करू नका. मी जास्तीची औषधं घेऊन देईल." रुद्र अगदी सहज बोलत होता. तेवढ्यात त्याला फोन आला, कोणासोबत तरी बोलत तो बाहेर निघून गेला. पुरुषोत्तमराव रुद्रची प्रत्येक हालचाल बारकाईने टिपत होते.
दुसऱ्या दिवशी मधुराला मनोविकार तज्ज्ञांकडे नेलं. त्यांनी मधुराच्या औषधींबद्दल मधुकरराव आणि राधिकाताईंना समजावून सांगितलं.
"कोणतंही औषध बंद करायचं नाही. तिकडे हवं तर एखाद्या डॉक्टरला दाखवू शकता; पण मधुराला औषधांचे खूप हाय डोस लागतात, त्यामुळं सध्या तरी तिचे औषधं कमी होणार नाहीत. हे सगळं किती दिवस चालत राहील हे सांगणे अवघड आहे." मनोविकार तज्ज्ञ बोलत होते, ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडत होता. डॉक्टरांच बोलणं झालं आणि सगळे माघारी निघाले. रुद्रने सगळ्यांना बाहेर थांबायला लावले आणि तो परत डॉक्टरच्या केबिनमध्ये आला.
"हे घ्या. मस्त काम केलं बरं तुम्ही! बरं मला एक शंका होती, मधुरा खरंच बरी होणार नाही ना? म्हणजे ती बरी झाली नाही पाहिजे." रुद्र डॉक्टरचा खिसा गरम करत बोलला.
"बिलकुल नाही. आपण एवढे हाय डोस दिले आहेत की काही दिवसांनी तिच्या शरीराला आणि मेंदूला त्याची सवय होऊन जाईल. यातून बाहेर पडणं इम्पोसीबल आहे. तुम्ही बिनधास्त राहा डॉक्टर रुद्र." डॉक्टरही विक्षिप्तपणे हसत बोलले. रुद्र स्वतःच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपवत बाहेर आला.
दोन दिवसांनी मधुराला गावी न्यायचे असे ठरले होते. पुरुषोत्तमराव आणि सुमनताईसुध्दा मधुराला तिच्या घरी सोडून पुढे जाणार होते. मधुरापासून सुटका मिळणार म्हणून रुद्र खूप आनंदीत होता. अखेर तो दिवस उजाडला. सगळ्यांना सोडायला रुद्र स्टेशनवर आला होता. दूरचा प्रवास होता म्हणून ट्रेनने जाणं सगळ्यांना सोयीचं वाटत होतं. रुद्रने त्यासाठी मधुराच्या डॉक्टर कडून तसं सर्टिफिकेटही घेतलं होतं. सगळे दिल्ली स्टेशनवर आले. मधुराला ट्रेनमध्ये चढवून उतरवून देण्यासाठी हॉस्पिटलमधले दोन वॉर्डबॉय रुद्रने सोबत पाठवले होते, ते मधुराला घरी सोडून लगेच परत येणार होते. मधुराला सीटवर व्यवस्थित झोपवून रुद्रने सगळ्यांचा निरोप घेतला, तसं गाडी निघायला अजून पंधरा मिनिटे अवकाश होता; पण तेवढा वेळही तिथे थांबणं रुद्रच्या जीवावर आलं होतं. 'महत्त्वाचे काम आहे', असं सांगून तो तिथून सटकला.
ट्रेनला निघायला वेळ होता म्हणून पुरुषोत्तमराव थोडं प्लॅटफॉर्मवर उतरले. पुढे काय करता येईल या बद्दल विचार सुरूच होता, इतक्यात त्यांना कोणीतरी आवाज दिला.
"काका, ओळखलं की नाही?"
"चेहरा तर ओळखीचा वाटतोय, अरे… मंगेश तू! तू इथे कसा?" पुरुषोत्तमराव
"इकडे करोल बाग पोलीस स्टेशनला बदली झाली, आता काही दिवसांपूर्वी, डी. वाय. एस. पी. म्हणून प्रमोशनवर. सासरवाडीची मंडळी आलेली होती, त्यांना सोडायला आलो होतो. आत्ताच ट्रेन गेली त्यांची." मंगेश
"अरे.. वा.. वा! बढती मिळाली, मस्तच एकदम." पुरुषोत्तमराव
"तुम्ही इकडे कसे काय?" मंगेश
"आलो होतो असंच." पुरुषोत्तमराव थोडा विचार करत बोलले.
"बरं काका, हे घ्या माझं कार्ड, मोबाईल नंबर आहे यावर. कधीही काहीही मदत लागली तर नक्की फोन करा. आमच्या कुटुंबावर तुमचे खूप उपकार आहेत." मंगेश
"अरे, उपकार कसले? तुझे बाबा चांगले मित्र होते माझे. देवाच्या मर्जीने जे नाही व्हायचं ते झालं. मी आपली जमली तेवढी मदत केली. बस बाकी काही नाही." पुरुषोत्तमराव
"हो पण, तेव्हाची मदत खूप मोठी होती; त्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत." मंगेश
"बरं, चल निघतो आता, ट्रेन निघेल माझी. दिल्लीला आलो परत तर नक्की भेटेल." पुरुषोत्तमराव डी. वाय. एस. पी. मंगेशचा निरोप घेऊन निघाले. ट्रेन निघाली. ट्रेनने स्पीड पकडली तशी पुरुषोत्तमरावांच्या विचाराने गती पकडली. पुढे काय आणि कसं करायचं हे त्यांचं पक्क ठरलं होतं. रुद्रच्या हॉस्पिटलमधले माणसं सोबत असल्यामुळे कोणी फार काही न बोलता प्रवास सुरु होता.
दुसऱ्यादिवशी सगळे घरी पोहोचले. घरी आले तेव्हा मधुरा जागी होती.
"मधुरा, बघतेयस ना? आपण आपल्या घरी आलो बरं." राधिकाताई मधुरासोबत बोलत होत्या. मधुराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहरा पूर्ण निर्विकार होता. कदाचित 'आपण घरी आलोय' ही संवेदना तिच्या मेंदूला झाली होती. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून सगळ्यांना गहिवरून आलं. हॉस्पिटलमधले माणसं मधुराला घरी सोडून निघून गेली. दोन दिवसांनी पुरुषोत्तमराव आणि सुमनताईसुध्दा आपल्या गावी निघून गेले.
पंधरा दिवस झाले होते घरी येऊन.घरी आल्यापासून डोळ्यातून पाणी वाहण्यापलीकडे मधुराच्या तब्येतीत विशेष सुधारणा नव्हती. सुमनताई रोज फोन करून मधुराच्या तब्येतीची चौकशी करायच्या, तिच्यासोबत फोनवरही बोलायच्या. ती मात्र एका शब्दाने हु की चू नाही करायची. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. या पंधरा दिवसात रुद्रने औपचारिकता म्हणून सुध्दा मधुराची चौकशी केली नव्हती. सुमनताईंना हे कळलं तेव्हा त्यांनी रुद्रला फोन केला आणि सरळ मुद्द्याला हात घातला.
"रुद्र, मी काय म्हणते, मधुरापासून घटस्फोट घ्यायचा का तुला? ती कधी बरी होईल हे सांगता येत नाही. तू तुझं आयुष्य, तुझा वेळ कशाला वाया घालवतो? " सुमनताई
"मम्मी, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. खरंच, माझी इच्छाच नाहीये तिच्यासोबत नातं ठेवायची. मी सगळी चौकशी केली आहे, स्पेशल केसमध्ये मला लवकर घटस्फोट सुध्दा मिळू शकतो. मी उद्याच वकिलांसोबत बोलून पुढच्या फॉर्मलिटी करतो आणि नोटीस पाठवून देतो." रुद्र मनातला आनंद लपवत बोलला.
"बरं, रुद्र.. अरे.." सुमनताईंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रुद्रने फोन ठेवूनसुद्धा दिला. 'रुद्र एवढ्या लवकर घटस्फोटासाठी तयार होईल' असं सुमनताईंना वाटलं नव्हतं. पुरुषोत्तमरावांच्या अपेक्षेप्रमाणे रुद्रने उत्तर दिलं होतं. या पंधरा दिवसात पुरुषोत्तमरावांनी काही कागद पत्र तयार करून घेतली होती. पुरुषोत्तमराव उठून बॅग भरायला लागले.
"अहो, कुठे जायची तयारी करताय?" सुमनताई
"उद्या दिल्लीला जातोय, पण तू तुझ्या मुलाला सांगू नको की मी तिकडे आलोय म्हणून." पुरुषोत्तमराव
"माझा मुलगा, कोणता मुलगा? तो माझा मुलगा असू शकत नाही. समोरच्या माणसाच्या मनाचा विचार न करणारे, माणुसकीला काळिमा फासणारे माझे संस्कार असे नव्हतेच. तुम्ही जा दिल्लीला खुशाल. मी कोणाला काही सांगणार नाही." सुमनताई बोलल्या आणि उठून देवघरात गेल्या. देवाजवळ दिवा लावला.
"देवा, आमची सगळी पुण्याई तुझ्या पायाशी आहे. रुद्रच्या पापांची शिक्षा मधुराला देऊ नको. या सगळ्यातून बाहेर पडण्याची शक्ती मधुराला दे." सुमनताई हात जोडून उभ्या होत्या. पुरुषोत्तमरावसुद्धा देवाला प्रार्थना करत होते.
"सगळं अवघड आहे. कदाचित आपल्या मुलाला शिक्षा देणारा मी पहिला बाप असेल. पण मला योग्य ते करण्याची सद्बुद्धी दे. माझं पुत्रप्रेम कुठे आड येऊ देऊ नको. मधुराला लवकर बरं कर." पुरुषोत्तमरावांच्या डोळ्यात नकळत अश्रू गोळा झाले.
दुसऱ्यादिवशी पुरुषोत्तमराव दिल्लीला गेले. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. एक फोन लावला.
"हॅलो मंगेश, मी पुरुषोत्तम आष्टेकर."
क्रमशः
पुरुषोत्तमरावांच पुढचं पाऊल काय असेल? पाहूया पुढच्या भागात.
(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. या कथेद्वारा समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रकारांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. समाजात कोणताच वाईट संदेश पसरवणे हा या कथेचा उद्देश नाही.)
(कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर लाईक करा.)
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा