Login

मधुरीमा (भाग ३०)

Story of two friends



मधुरीमा (भाग ३०)





श्रीरंगाच्या कृपेनं आणि डॉ. श्रीरंग यांच्या प्रयत्नानं मधुराचं बी. पी. दोन दिवसात नॉर्मल आलं. मधुराचं व्हेंटिलेटरसुध्दा निघालं होतं. पण मधुरा कोणाशीही बोलत नव्हती. झोपेच्या औषधाच्या अतिरेकानं तिच्या मेंदूवर काही परिणाम झाला का हे बघण्यासाठी अजून काही टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्याचा रिपोर्टसुद्धा नॉर्मल आला होता. आठ दिवसांच्या आय. सी. यु. मुक्कामानंतर मधुराला आय. सी. यु. तून बाहेर स्पेशल रूममध्ये हलवण्यात आलं. 'आपण समोर आल्यानंतर मधुरा कदाचित आक्रमक होऊन, घडून गेलेल्या गोष्टी सगळ्यांना सांगेल' या भीतीने रुद्र तिच्यासमोर येणं टाळत होता. रुद्र सोडला तर मधुराच्या तब्येतीबाबत सगळेच चिंताक्रांत होते. मधुराला स्पेशल रूममध्ये आणूनही दोन-तीन दिवस झाले होते. 





"डॉक्टर, मधुरा कधी बरी होईल?" पुरुषोत्तमराव डॉ.श्रीरंग राउंडवर आले तेव्हा त्यांच्यासोबत बोलत होते.





"खरं सांगू, हे सांगणं अवघड आहे. तिच्या शरीरावर औषधांचा जो परिणाम झाला त्यासाठी आपण योग्य ती ट्रीटमेंट दिली आहे. तिच्या मनावर कोणत्यातरी गोष्टीचा खूप खोलवर परिणाम झाला आहे. त्यासाठी तुम्हाला मनोविकार तज्ज्ञांची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मधुराची आधी ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू होती त्यांच्याकडेच कन्टीन्यू केली तरी चालेल." डॉ. श्रीरंग





"आधीची ट्रीटमेंट… म्हणजे आम्हाला काही कळलं नाही डॉक्टर." मधुकरराव





"हो. आधीची ट्रीटमेंट. काही दिवसांपासून मधुराचे मनोविकार तज्ज्ञाकडे उपचार सुरू होते. डॉक्टर रुद्र बोलले नाही का तुमच्यासोबत? डॉ. रुद्र सविस्तर बोलतील तुम्हाला. आपण अजून एक दोन दिवस मधुराच्या तब्येतीबद्दल थोडं ऑब्झरवेशन करू, नंतर मग डिस्चार्ज प्लॅन करू." डॉ. श्रीरंग बोलून निघून गेले. मधुकरराव, राधिकाताई, पुरुषोत्तमराव आणि सुमनताई सगळे रुद्रभोवती उभे राहिले.





"रुद्र, काय हे? डॉ.श्रीरंग काय बोलले? हे मनोविकार तज्ज्ञ वगैरे काय भानगड आहे? तू आम्हाला कोणत्याच गोष्टीची काहीच कल्पना नाही दिली." पुरुषोत्तमराव रुद्रवर चिडले.





"सॉरी पप्पा. मला माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल. मधुराने बहुतेक जॉब न मिळाल्याचं खूप टेंशन घेतलं होतं. खूप चिडचिड करायची. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर लगेच आक्रमक व्हायची. माझ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला होता बरं तिला. एक महिना तर थांबायचे होते पण तिला तेवढा सुद्धा पेशन्स नव्हता. सगळं कसं म्हटलं की लगेच हवं असायचं तिला. स्वतःच मनोविकार तज्ज्ञांकडे जायचं म्हणत होती. मी पण विचार केला की थोडं तिचं कौनसेलिंग होईल तर तिला बरं तरी वाटेल. म्हणून मग दाखवून आणलं. हिने त्या डॉक्टरांना सांगितलं की बिलकुल झोप येत नाही मग त्यांनी गोळ्या दिल्या. अगदी खूपच गरज पडली तर द्या असं म्हणाले होते ते. मला त्यादिवशी इमर्जन्सी केस आली त्यामुळं आमचा डिनरसाठी जायचा प्लॅन कॅन्सल झाला. मी रात्री घरी परत आलो तर मधुरा झोपलेली होती. मला वाटलं नेहमी प्रमाणे झोपली असेल पण तिच्या बाजूला झोपेच्या गोळ्यांच्या औषधांची बॉटल रिकामी पडलेली दिसली. मला शंका आली, मी तिला उठवायला गेलो तर मधुरा उठतच नव्हती. चुकलं माझंच. मी औषध अशी हाताशी येतील अशी ठेवायला नको होती. मला काय माहिती हे सगळं असं होऊन बसेल." रुद्र अगदी रडवेला चेहरा करून बोलत होता.





"शक्यच नाही. मधुरा अशी वागणं शक्यच नाही. माझी पोरगी असं करूच शकत नाही." राधिकाताई





"हो ना. मला पण नाही वाटत. तिच्यासारखी गोड, मनधरणी करून चालणारी, पेशन्स असणारी दुसरी मुलगी असूच शकत नाही. मधुरा एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकते?" सुमनताई





"म्हणजे, मी जे सांगतोय त्यावर तुमचा विश्वास नाही ना?" रुद्रचा ढोंगीपणा सुरूच होता.





"तसं नाही जावईबापू. जे व्हायचं ते होऊन गेलं. आता पुढे काय? मधुरासाठी इथून पुढे काय योग्य राहील? हा विचार करावा लागेल." मधुकरराव हतबल होऊन बोलत होते.





तेवढ्यात तिथे ज्युनिअर डॉक्टर आणि नर्स आले. त्यांना बघून रुद्रचा जीव भांड्यात पडला. संधीचा फायदा उचलून रुद्र तिथून सटकला.





दोन-चार दिवसात मधुराला हॉस्पिटलमधुन सुट्टी झाली. डोळे उघडून बघण्याच्या पलीकडे बाकी तिच्या तब्येतीत सुधारणा नव्हती. तिचं बोलणही बंद होतं. बोललेलं तिला समजतंय की नाही? हे कोणालाच समजत नव्हतं. 'मनोविकार तज्ज्ञांनी सुरू केलेली औषधं मधुराला द्यावीच लागणार आहेत' असं रुद्रने सगळ्यांच्या मनावर बिंबवलं होतं. 





मधुराला घरी आणून एक आठवडा झाला होता. मधुराला घरी आणल्यापासून राधिकाताई आणि सुमनताई मधुराच्या तैनातीत असायच्या. मधुराचं खाणं पिणं, औषधी दोघी मिळून सांभाळत होत्या. रुद्रने मधुराला कोणती औषधी कधी आणि कशी द्यायची? हे सुमनताई आणि राधिकाताईंना समजावून सांगितले. स्वतः अलगद या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खूप दिवसांपासून त्याचा रखडलेला गोवा प्लॅन पूर्ण करण्यासाठी 'कॉन्फरन्स आहे' असं घरी खोटं सांगून गोव्याला निघून गेला. मधुराच्या तब्येतीत काडीचाही फरक नव्हता.







रुद्र गोव्याला गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनताईंनी मधुराला खिडकीजवळ एका खुर्चीवर बसवले. तिच्या डोक्याला तेल लावून त्या तिचे केस विंचरत मधुरासोबत बोलत होत्या. मधुरा बोलताना कोणत्यातरी गोष्टीवरून काहीतरी रिस्पॉन्स देईल ही भोळी आशा त्यांना होती. मधुकरराव आणि पुरुषोत्तमराव सुध्दा तिथे बाजूलाच सोफ्यावर बसून होते. राधिकाताई मधुरासाठी भाताची पेज घेऊन तिथे आल्या.





"सासू-सुनेच्या काय गोष्टी सुरू आहेत? आम्हालाही कळू द्या थोडं." राधिकाताई





"काही नाही हो. उगी आपली वेडी आशा. एवढं बोलतेय मी पण पोरीच्या चेहऱ्यावर त्याचा काहीच परिणाम दिसत नाही." सुमनताई डोळ्यातलं पाणी पुसत बोलल्या.





"चला, मधुरा बाळा जेवण करून घ्या. औषधही घ्यायचं आहे ना अजून. लहानपणी काही कसर राहिली असेल आमच्याकडून म्हणून पुन्हा तू अशी बाळासारखी झाली." राधिकाताईंनी आवंढा गिळला. मधुराची नजर शून्यात होती.





"मी काय म्हणत होते राधिकाताई, आज नका ना औषध देऊ तिला. बघा ना किती छान बसली आहे. आपण औषध देतो अन् ती मग ती झोपून जाते. सकाळ संध्याकाळ थोडावेळ काय ते डोळे उघडून बघते." सुमनताई भावनाविवश झाल्या होत्या.





"सुमनताई, अहो जावाईबापू औषधांची वेळ चुकवू नका म्हटले होते ना. आपण औषधी नाही दिली तर उगी मधुराला काही झालं तर?" मधुकरराव आपली काळजी बोलून दाखवत होते.





"बरं. थोड्या वेळाने औषध देते. जरा बसलीये तर बसू देते." राधिकाताई औषध बाजूला ठेवत बोलल्या. राधिकाताई आणि मधुकरराव मधुराच्या लहानपणीपासूनचे किस्से सांगत होते. एखाद्या आठवणीवर तरी मधुरा काही प्रतिसाद देईल ही आशा त्यांना होती. बोलता बोलता रुद्रचा विषय निघाला. रुद्रच नाव ऐकताच मधुराच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. पुरुषोत्तमरावांनी ते बरोबर टिपले. ते अजून रुद्रबद्दल बोलू लागले. रुद्रच नाव ऐकून मधुरा चिडतेय अस सगळ्यांना वाटू लागलं.





"मधुरा, अगं तुझं आणि रुद्रचं भांडण झालं होतं का? काय झालं होतं मधुरा?" राधिकाताई मधुराला हलवून हलवून विचारत होत्या. मधुरा एकदम चवताळली.





"मला मारून टाकेल तो. तो चांगला नाहीये. किडन्या विकतो. माझी किडनी पण विकेल आणि तुमची पण." मधुरा रडत मध्येच हसत ओरडत होती.





"कोण आहात तुम्ही लोक? इथे कशाला आले? जा…. तो मारेल बरं तुम्हाला…" मधुरा विक्षिप्तपणे हसत बोलत होती. खुर्चीवरून उठून पळून जायचा प्रयत्न करत होती. मधुकरराव आणि पुरुषोत्तमरावांनी तिला धरून पुन्हा खुर्चीवर बसवलं. मधुराचं जोरजोरात हात पाय आपटण सुरू होतं.





"मधुरा, अगं काय बोलतेय तू? कोण किडण्या विकत असं? मधुरा… " सुमनताई





"रुद्र…." मधुरा जोरात ओरडली आणि तिला एकदम भोवळ आली. मधुराच्या तोंडून रुद्रचं नाव ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. थोड्यावेळासाठी सगळेच शांत होते. मधुरा भोवळ आली तरी खुर्चीतच बसलेली होती.





"चला, आपण सगळे मिळून मधुराला पलंगावर झोपवू." सुमनताई असं म्हणाल्या आणि राधिकाताईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली. सगळ्यांनी मिळून मधुराला पलंगावर झोपवलं आणि पुरुषोत्तमराव, सुमनताई आणि मधुकरराव हॉलमध्ये येऊन बसले. राधिकाताईंनी मधुराचे औषध थोड्या पाण्यात मिसळून थोडं थोडं करत तिच्या तोंडात टाकले. मधुराच्या अंगावर पांघरून घालून त्यासुद्धा हॉलमध्ये येऊन बसल्या. हॉलमध्ये एकदम शांतता होती.





"खरंच, मधुरा बोलली ती गोष्ट खरी असेल तर?" मधुकरराव थोडे चाचरतच बोलले.





"तर रुद्रला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे." पुरुषोत्तमराव





"काही बोलता का? काय पुरावा आहे? मधुरा जे बोलतेय ते खरं कशावरून असेल?" सुमनताई चिडून बोलल्या.





"सुमन, रुद्र लहान होता तेव्हापासून तू त्याच्या चुका पाठीशी घालत आहेस. पण ही गोष्ट ना तुला वाटते तेवढी लहान नाहीये. समजतंय का तुला? प्रश्न तुझ्या-माझ्या मुलाचा नाही. हा प्रश्न समाजाचा आहे, मानवतेचा आहे. मधुरा जे काही बोलली जर ते खरं असेल तर त्या गोष्टीचा छडा आपल्याला लावावाच लागेल. आणि हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये." पुरुषोत्तमराव सुमनताईंना समजावत होते.





"पण माझा मुलगा यात असेलच कशावरून?" सुमनताई





"पुन्हा तेच. रुद्र असेल किंवा तो निर्दोषही असेल. पण तुला हे कळतंय का सुमन, मधुरा जे बोलली, काहीतरी नक्की आहे." पुरुषोत्तमराव





"आमच्या मधुराला कधी अशी मनोरुग्णांची औषधी वगैरे सुरू नव्हती. आम्ही तुमच्यापासून मधुराबद्दल कोणतीच गोष्ट लपवली नाही." राधिकाताई रडत, हात जोडत बोलत होत्या.





"राधिकाताई, अशा रडू नका. आम्ही कुठे मधुराला दोष देतोय." पुरुषोत्तमराव





"माझा मुलगाही दोषी नाहीये." सुमनताई





"नसेलही. पण दोषी असला तर? तर तो तुलाही सोडणार नाही, काही दिवसांनी मधुराच्या जागी कदाचित आपण दोघे असू. सुमन थोडा विचार कर. आपण मधुरासोबत शेवटचं कधी बोललो होतो? रुद्रच्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला हे सांगणारा शेवटचा फोन होता तिचा. नंतर मग तिचा फोन खराब झाला अस रुद्र सांगत होता. त्यानंतर तिच्याशी आपला काही संवादच झाला नाही. ही मनोविकार तज्ज्ञांची फाईल बघ, ही फाईल पण आत्ताचीच आहे. मधुरासोबत तुमचं बोलणं झालं होतं का हो राधिकाताई?" पुरुषोत्तमराव





"तिचा फोन आला होता तेव्हाच. त्यानंतर मी फोन केला तर तिचा फोन बंद येत होता. जावाईबापूंना विचारलं तर ते बाहेर वगैरे असायचे." राधिकाताई





"म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय." पुरुषोत्तमराव





"थांबा, रुद्रला येऊ द्या. चांगला जाब विचारते त्याला." सुमनताई





"ही चूक बिलकुल करायची नाही. तुला काय वाटतंय सुमन? तू विचारशील आणि रुद्र तुला सगळं खरं सांगेल. मधुरामुळे आपल्याला ही गोष्ट कळली आहे हे त्याला कळता कामा नये. हे प्रकरण खूप काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे." पुरुषोत्तमराव





"म्हणजे माझा रुद्र दोषी आहे हे तुम्ही ठरवूनच टाकलंय." सुमनताईंची ममता ही गोष्ट स्वीकारत नव्हती.





"मी मधुराला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. तिच्या या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे हे शोधायचा प्रयत्न करतोय. मी वचन दिलं होतं मधुकररावांना 'मधुरा माझी मुलगी आहे आणि मी तिला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल.' बस तेच पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. सुमन, आई म्हणून तू रुद्रसोबत राहू शकते पण बायको म्हणून माझ्यासाठी एवढंच कर, ही गोष्ट आम्हाला कळलीये एवढं रुद्रला कळू देऊ नको. आता पुढे काय करायचं हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा." पुरुषोत्तमराव बोलत होते, मधुकरराव त्यांच्यासमोर हात जोडून उभे होते. मधुकररावांच्या अश्रूंचा बांध कधीचाच फुटला होता. मधुकरराव पुरुषोत्तमरावांच्या गळ्यात पडले.





"असं काही नसावं. रुद्र निर्दोष असला पाहिजे. मी देवाजवळ प्रार्थना करेन." मधुकरराव कापऱ्या आवाजात बोलले.





"देव करो आणि तसंच होवो. पण रुद्र जर दोषी निघाला तर या सगळ्या प्रकरणात मधुराचं नाव येणार नाही. रुद्रची बायको म्हणून मधुरावर कोणत्याच प्रकारचं लांच्छन लागणार नाही. मधुराच्या केसालाही धक्का लागणार नाही. मी तुम्हाला वचन देतो." पुरुषोत्तमराव



पुरुषोत्तमरावांच पुढचं पाऊल काय असेल? रुद्र कसा पकडला जाईल? मधुरा बरी होईल ना? पाहूया पुढच्या भागात.







(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. कथा निव्वळ मनोरंजन हेतूने लिहिली आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश पसरवणे हा कथेचा हेतू नाही.)





(कसा वाटला हा भाग? नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा.)







                            © डॉ. किमया मुळावकर




🎭 Series Post

View all