Oct 24, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग २)

Read Later
मधुरीमा (भाग २)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

मधुरीमा (भाग 2)

"मुलगी असल तरी सरळ खाली करा डॉक्टर मॅडम". मधुरा एका पेशंटला तपासत होती तेव्हा त्या पेशंटची सासू तिला म्हणाली.

"मुलगा आहे का मुलगी हे सांगता येत नसतं आजी. कायद्याने गुन्हा आहे. जेल मध्ये जाल तुम्ही. अन् मला पण सोबत न्याल तुमच्या." मधुरा.

"बघा नं काही तरी करून. कोणतातरी मार्ग असेल नं. एक पोरगी आहे माझ्या लेकाला आधीच. वंशाला दिवा नको का?" आजी मधुराला म्हणत होत्या. मधुराने नीट आजीकडे पाहिलं. आजीच्या कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं.
 

"अहो आजी, तसं नाही हो करता येत .. बरं.. आजोबा कुठे आहेत ते सांगा..त्यांच्याशी बोलते मी."

" माझा लेक एक वर्षाचा असताना शहिद झाले ते. तेव्हाच मी ठरवलं लेकाला सैन्यात पाठवणार नाही."

"अच्छा, म्हणजे तुम्हाला जमलं नसेल एकटीने मुलं वाढवणं. मग आपल्या नातीला पण तसा त्रास नको म्हणून मुलगी नको का?"

"कोण म्हणे मला जमलं नाही. सगळं मीच सांभाळलं. सासू-सासरे, शेती, घरी दुकान पण होतं ते पण मीच पाहिलं. ग्रामसेवक पण होते मी. अन् आता बचत गटाचं कामसुध्दा बघते."

"अरे वा! एवढया कणखर आजी तुम्ही. अन् नात नको तुम्हाला. अहो स्त्रिया किती उच्च पदावर गेल्यात त्या बघा. त्याहीपेक्षा स्वतःकडे बघा. एक स्त्री म्हणून  तुम्ही कुठे कमी पडलात? कुठेच नाही ना..आणि तुमच्या नातीसोबत तर तुम्ही असणार, तिची आई, बाबा, ताई असेल. मग ती कुठे कमी पडणार!. तुमच्यासारख्या कणखर बाईचा वंश चालवायला नातच लागेल ना."
 

" हो हो डॉक्टर मॅडम. तुम्ही डोळे उघडले बघा माझे. असा विचार मी केलाच नाही.  जे होईल ते होईल. मुलगा झाला तर आनंदच अन् मुलगी झाली तर अत्यानंद. सूनबाईला चांगलं औषध लिहून द्या. चांगलं झालं पाहिजे बघा बाळ."

   मधुराचे विचार ऐकून आजी खुश होऊन गेली. अशा कितीतरी कळ्या मधुराने खुडण्यापासून वाचवल्या होत्या. त्यात अजून एक भर पडली. त्याच समाधानात तिनी पुढच्या पेशंटसाठी बेल वाजवली.

   मधुराच्या आणि रीमाच्या केबिनमध्ये एक कॉमन दरवाजा होता. आतल्या आत त्या एकमेकींच्या केबिनमध्ये जाऊ शकत होत्या.साधारण दोन तासात डॉ. रीमा केबिनमध्ये आली. मधुराने तिच्याकडे बघितलं, थोडी टेन्शन मध्ये वाटली पण तिनी सगळं ठीक असं इशाऱ्यानीच सांगितलं. इतक्या वेळ डॉ. सेजल मधुराला असिस्ट करत होती. मधुराने तिला रीमाकडे पाठवलं.

  "डॉ. सेजल, मी आता ऑपरेट केलेल्या पेशंटला ब्लड लावलंय. ब्लड अर्ध संपलं असेल तर मी एक इंजेक्शन लिहून आलेय ते तिला द्या. तिचे सगळे रिपोर्ट्स सकाळी आले नव्हते. एव्हाना आले असतील ते सगळे बघून घ्या. तिला तपासून मला सगळं रिपोर्ट्ससहीत इंफॉर्म करा. आणि ICU मध्ये जो बेबी आहे त्याचं पण एकदा सगळं बघून घ्या. पेडियाट्रीशीअन सरांचे काय ऑर्डर्स आहेत ते सगळं नीट फॉलो होतंय का ? मला सगळे डिटेल्स पाहिजेत." रीमा.

   थोड्या वेळाने डॉ. सेजल सगळे रिपोर्ट घेऊन रीमाच्या चेंबर मध्ये आली. रिपोर्ट्स पाहून थोडं समाधान आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. मधुरानी तिच्या चेंबर मधूनच ते टिपलं होतं. इतक्या वर्षांची मैत्री होती, न बोलता पण बरंच काही समजत होत. रीमाचं लक्ष मधुराकडे गेलं. दोघींनी एकमेकींना स्माईल दिली अन् दोघी आपापले पेशंट पाहण्यात गुंग झाल्या. पाच वाजत आले होते. मधुराने कॉल बेल वाजवली.
 

"येस मॅम, तुम्ही बोलावलं?" सारिका.

"किती पेशंट्स आहेत अजून?" मधुरा‌.

"मॅम तुमचे पेशंट झाले. एक जुनी पेशंट होती मघा आलेली. काहीतरी काम आहे म्हणून गेलेली, तिच बाकी आहे अजून यायची. आतापर्यंत नाही आली म्हणजे येईल की नाही माहिती नाही. बाकी नवीन नाही आलं अजून कोणी." सारिका.

"डॉ. रीमाचे किती पेशंट आहेत अजून?". मधुरा.

"केबिन मधला लास्ट आहे". सारिका.

"Ok. तू दोन कप कॉफी सांग.." मधुरा.

"अगं, फोन तर कारायचास ना, इमर्जन्सी आली तर. आले असते मी लवकर." मधुरा रीमाच्या केबिनमध्ये जात बोलली.

"तुझी पण पॅरेंट्स मीटिंग महत्वाची होती ना. लेकरांसाठी एवढा तर वेळ द्यायलाच पाहिजे आपण." रीमा.

"हो गं. पण त्या मीटिंगला काही अर्थ तर असायला तर पाहिजे. नीतीच्या क्लासमधल्या दोन मुलांची भांडणं. त्यातल्या एका मुलाचे वडील पालक संघटनेचे अध्यक्ष. मग काय शाळेला दबावाखाली आणायचं अन् मीटिंग ठेवायची. ते सोड, काय केस होती गं?". मधुरा

"आपल्या इकडे दुर्गम भागात , छोट्या छोट्या खेड्या-पाड्यात अजूनही म्हणावं तशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत गं. आपण इथे शहरात आहोत म्हणून आपल्याला जाणवत नाही पण त्या लोकांना अजून साध्या साध्या गोष्टी पण माहिती नाहीत. सतरा-अठरा वर्षाची असेल ती मुलगी. बावीस वय सांगत होते घरचे लोक. थोडं दरडावून विचारलं तर म्हणे अठरा वर्षाची आहे. नववा महिना लागला अन् कळा सुरू झाल्या. म्हणून सुईण बाईला बोलावलं, अन् कळा देता देता झटके आले तिला अन बेशुद्ध झाली. मग जमतंय का सुईण बाईला.. म्हणून करा दवाखान्यात शिफ्ट. काटेच आले गं माझ्या अंगावर त्या मुलीला पाहून. एवढूशी पोर, तिची स्वतःचीच वाढ नीट नाही झालेली, अन् तिच्यावर हे आईपणाच ओझं..! चेहरा पाहूनच कळत होतं हिमोग्लोबिन कमी असेल. बाळाच्या हृदयाचे ठोके नीट होते. पण मला बाळाने पोटातलं पाणी पिलं असेल का याची भीती होती. नातेवाईकांसोबत बोलून, सगळं समजावून सांगून घेतलं मग सिझरला. मग काय हाता पाया पडायला लागले, दोघांनाही वाचवा म्हणून. नाका तोंडात पाणी गेल्यावर येतात गं हे लोक. बरं जवळच्या गावात प्रायमरी हेल्थ केअर सेन्टर होतं म्हणे, पण तिथं एकदा पण नाही दाखवलं. वेळेत सिझर झालं म्हणून बरं आहे. बाळ बाळंतीण नीट आहे. बाळ कमी वजनाचं आहे म्हणून आपल्या इथे वर ICU मध्ये ठेवलंय. वजन तरी किती असावं बाळंच दीड किलो फक्त. बाळाची आईच कुपोषित तर त्या बाळाला पोषण कुठून मिळणार?" रीमा अगदीच काकुळतीला येऊन सांगत होती.

"हो का गं. तरी मी सकाळी आले तर वेटिंग लॉबी पूर्ण भरलेली होती. पण त्या मानाने पेशंट्स तेवढे नव्हते. हे लोक सगळं गाव सोबत घेऊन आले होते की काय माहिती." मधुरा.

"हो तसंच म्हणावं लागेल. मी पेशंटची कन्डीशन सांगत होते तर एक जण अरेरावी करत बोलू लागला. मग विचारलं पेशंटचे तुम्ही कोण तर म्हणे, एकाच गावात राहतो, बहिणच समजा माझी. एवढी चीड आली ना मधु काय सांगू तुला, या अशा स्वतःला हुशार समजणाऱ्या लोकांमुळे ना मिळायची ती ट्रीटमेंट मिळत नाही. सारिकाला म्हटलं सगळ्या फॉर्म वर याची सही घे की लगेच फोन आल्याचा बहाणा करून सटकला तिथून.  जाऊ दे, चल, राउंड घेऊन टाकू. पुन्हा त्या पेशंटचे नातेवाईकांच थोडं काऊन्सिलिंग करावं लागेल. तू आहेस सोबत तर दोघी मिळून बोलू." रीमा.
 

मधुरा आणि रीमा रोज सोबत राऊंड घायच्या. कितीतरी केसेस डिस्कस व्हायच्या. त्याचा फायदा पेशंट्सना पण व्हायचा. बेस्ट जे असेल ते मिळायचं पेशंट्सना. साहजिकच पेशंट लवकर बरा होऊन घरी जायचा. 'मधुरीमा' च नाव आता चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. अगदी दुसऱ्या गावाचे पेशंट्स सुद्धा यायला लागले होते. राउंड घेऊन, ड्युटी डॉक्टर आणि सिस्टरांना सूचना देऊन दोघी पार्किंग मध्ये आल्या.

"मधु, दहा वर्षे होतील पुढच्या महिन्यात 'मधुरीमा'ला. आणि हो... नीतीचा पण वाढदिवस त्याचदिवशी. आठ वर्षांची होईल ना ती पण...!  ए... मस्त प्लॅन बनवूया काहीतरी..आपल्या स्टाफला पण एखादी पार्टी देऊ.."

" ए ..हो.. दहा वर्षे झाली. किती पटापट वेळ गेला ना. तसं पण आपला स्टाफ दरवर्षी आपल्याला सरप्राईज देतो. यावेळी आपण देऊ."

"एखादा हेल्थ चेक-अप कॅम्प ठेवायचा का?"

"ठेऊया की, करू चांगला प्लान एखादा. तुला सुचलं अजून काही तर फोन कर. बरं चल निघूयात. नीती वाट बघत असेल. आज तिचा प्रोजेक्ट बनवायचा आहे."
 

मधुरा आणि रीमा आपापल्या गाड्या काढत असतात. इतक्यात मधुराची नजर एका माणसावर जाते. त्याला बघून ती घाबरतच रीमाजवळ येते.

" रीमा, ते बघ.. तो ...तो...रुद्र....!"

"कुठे आहे?"

"तो काय गं.. तिकडे त्या झाडाखाली बघ ना गाडी काढतोय...  ती बघ...गेली त्याची गाडी...."

"नाही गं दिसला मला..आणि कशावरून तो रुद्र असेल? तो कशाला येईल इकडे?..त्याचासारखं दिसणारं कोणी असेल गं..भास झाला असेल तुला.."

"नाही गं.. भास नव्हता..मला रूद्र वाटला... असेल त्याच्यासारखा कोणी??...देवा... त्याच्यासारखच असावं कोणी..तो नसावा.."
 

"मधु...नीट आहेस ना..? घरी सोडायला येऊ का? गाडी राहू दे इथेच..सकाळी पण येईल मी घ्यायला.."

"अगं नको, जाईन मी. तस पण आज नाईटला on call मलाच यायचंय. गाडी लागेल मला."

"येशील ना तू...? नाही तर राहू दे. मी येऊन जाईल."

"येईल गं मी. तू नकोस काळजी करू. अजून किती दिवस..सॉरी वर्षं त्या भूतकाळाला भीत जगू. येईल मी. चल बाय."

मधुरा विचारांच्या तंद्रीतच गाडी चालवत निघाली. इकडे रीमासुध्दा त्याच विचारात. ' देवा, आता आता तर कुठे मधुरा या सगळ्यातून बाहेर पडलीये. आता पुन्हा तेच वादळ नको पुन्हा तिच्या आयुष्यात.'

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न