Login

मधुरीमा (भाग २९)

Story of two friends

मधुरीमा (भाग २९)


रुद्रने झोपेचं इंजेक्शन दिल्यामुळे मधुरा शांत झोपली होती. मधुराला असं शांत बसवून रुद्रची समस्या तात्पुरती सुटली होती. 'पण पुढे कसं होईल?' हा विचार रुद्राच्या डोक्यात सुरू होता. इतक्यात मधुराच्या फोनवर राधिकाताईंचा कॉल आला. रुद्रने फोन उचलला आणि 'मधुराची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे ती झोपली आहे' असं राधिकाताईंना खोटं सांगितलं. मधुराचा मोबाईलसुध्दा त्याला पकडवून देण्याचं साधन बनू शकतो असं वाटून त्याने तो फोन पाण्याच्या बकेटमध्ये टाकून दिला. रुद्रच्या डोक्यात एक विचार आला, पटकन त्याने कोणालातरी फोन लावला आणि घराला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. थोड्यावेळाने तो परत आला तेव्हा त्याच्या हातात एक फाईल, काही औषधं आणि थोडं खायचं सामान होतं. आल्या आल्या त्याने बेडरूममध्ये बघितलं, मधुरा तशीच निपचित पडून होती.


थोड्या वेळाने मधुरा शुद्धीत आली आणि पलंगावरून उठून बसली. तिच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली, डोकं एकदम जड पडल्यासारखे वाटत होते आणि अशक्तपणा जाणवू लागला. ती उठून चालायचा प्रयत्न करत होती पण औषधांच्या प्रभावामुळे तिला अजूनही ग्लानी येत होती. ती बेडरूमच्या बाहेर येताना दाराला अडखळली त्यामुळं आवाज झाला. हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या रुद्रला मधुरा शुद्धीत आली हे कळलं. त्याने मधुराजवळ धावत जाऊन, तिला आधार देत पुन्हा पलंगावर बसवले. तिच्यासाठी बाहेरून येताना त्याने जो फळांचा ज्यूस आणला होता त्यात अजून काही औषधी मिसळून तो ज्यूस मधुराला दिला. मधुराने अर्धवट शुद्धीत तो ज्यूस पिला. थोडीशी तरतरी तिला जाणवली, तिने डोळे नीट उघडून पाहिलं, तिच्यासमोर रुद्र बसलेला होता. रुद्रला पाहताच तिने हातातला ज्युसचा ग्लास फेकून दिला. तिथून उठून ती पळून जाऊ लागली. हॉलच्या दरवाज्याजवळ येऊन ती भोवळ येऊन पडली. रुद्रने फळांच्या ज्यूसमध्ये मिसळून दिलेल्या औषधांचा परिणाम सुरु झाला होता.


रुद्र मघाशी आणलेली फाईल हातात घेत मधुराकडे बघत दुष्टपणे हसत बोलत होता, "तुला काय वाटलं, तू मला पकडून देशील आणि माझा खेळ संपेल. खेळ तर तुझा संपलाय आता! तू किती लोकांना, या दुनियेला ओरडून सांगितलं तरी ही फाईल बघून कोणी तुझ्यावर विश्वास ठेवेल का? माहितीये या फाईलमध्ये काय आहे? यात ना असं लिहिलंय की तुला पंधरा- वीस दिवस झाले तुला मानसिक झटके येत आहेत त्यामुळे तू काहीपण विचित्र बोलतेस, विचित्र कृती करतेस, अचानक आक्रमक होतेस आणि त्यासाठी मी तुला मनोविकार तज्ञांकडे नेऊन तुझ्यावर उपचार करून घेत आहे. आता तूच सांग, कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? आणि हा मनोविकार तज्ञ पण माझ्याच हॉस्पिटलमधला आहे बरं." रुद्र विक्षिप्तपणे मोठ्याने हसत बोलत होता.

दोन-चार दिवसात रुद्रने मधुराला झोपेचं औषध त्याचबरोबर अजून दुसरी औषधं द्यायचं वेळापत्रक बरोबर बसवलं. मधुराच्या औषधांच्या वेळेच्या मध्ये तो आपली हॉस्पिटलची कामं उरकून घेत होता. यादिवसात मधुरा एकदम शांत झाली होती. चोवीस तासातला बराच वेळ ती झोपूनच असायची. याच दरम्यान एक दोन वेळा राधिकाताईंचा फोन येऊन गेला होता. 'मधुराचा फोन खराब झालाय, तिची तब्येत बरी नाही, मी घरी नाही' असे टोलवाटोलवीचे उत्तरं रुद्र देत होता. याच गोष्टी त्याने सुमनताईंनाही सांगितल्या होत्या.

इकडे लेकीसोबत काही बोलणं होत नाहीये, लेकीबद्दल काही कळत नाहीये म्हणून राधिकाताईंचा जीव कासावीस होत होता. त्यांनी त्याबद्दल मधुकररावांसोबत बोलणंही केलं पण मधुकरराव राधिकाताई एवढे बेचैन झाले नव्हते. 


"दोघेही आपापल्या व्यापात बिझी असतील तू जास्त काळजी करू नको, मधुराचा फोन येईल". मधुकररावांनी राधिकाताईंना समजावून सांगितलं. राधिकाताईंच्या मनाचं समाधान झालं, पण ते एक-दोन दिवसाच्या वर टिकलं नाही कारण मधुराचा फोन आला नव्हता. राधिकाताईंचा धीर आता सुटत चालला होता. दहा-बारा दिवस झाले होते मधुरासोबत कोणत्याच प्रकारचा संवाद नव्हता. त्यांनी त्याच चिंतेत सुमनताईंना कॉल केला.


"नमस्कार विहिणबाई, कशा आहात तुम्ही?" राधिकाताई


"बोला राधिकाताई, आज आमची आठवण कशी काय आली?" सुमनताई


"आठवण न यायला काय झालं? नेहमीच तुमची आठवण येते. पण आजकाल प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुंग असतो. मग आपणही कसा त्रास द्यावा म्हणून मग फोन नाही केला जात." राधिकाताई थोडं विचारात वाक्यांची जुळवाजुळव करत बोलत होत्या.


"हो, आपली मुलंच बघा ना, किती व्यस्त असतात आजकाल? एखाद्यावेळेस या म्हाताऱ्यांना विचारावं असंही नाही वाटतं त्यांना " सुमनताई


"असं का बोलताय बरं? रुद्रचा फोन येत नाही का आजकाल? मधुरा पण बोलत नाही का तुमच्यासोबत? थांबा, कानउघाडणी करते तिची." राधिकाताई


"मी तर म्हणेल तिची नक्की कानउघाडणी करा. आधी कशी रोज फोन करून विचारायची, गप्पा करायची. या दहा-बारा दिवसात एकही फोन नाही. सवय लागली होती तिच्यासोबत बोलायची बाकी काही नाही आणि आमचे राजकुमार तर पहिलेपासून मूलखाचे बिझी असतात, त्यांना काही विचारायची सोयच नाही." सुमनताई काकुळतीने बोलत होत्या.


"खरं सांगू सुमनताई, मी पण याच कारणामुळे फोन केला. मला वाटलं, मधुराचं तुमच्यासोबत तरी काही बोलणं झालं असेल, तिची ख्याली खुशाली कळेल." राधिकाताई अगदी अगतिक झाल्या होत्या. 


"राधिकाताई तुम्हालाही मधुराचा फोन नाही आला का? मी रुद्रसोबत बोलून तुम्हाला तिला फोन करायला लावते." सुमनताई राधिकताईंची मनधरणी करत बोलल्या. पण मधुराची काळजी त्यांनाही होत होती.


भरीस भर राधिकताईंना रीमाचाही मधुराची चौकशी करणारा फोन येऊन गेला होता. रीमानेसुद्धा मधुराला फोन केला होता पण तिचा फोन बंद येत होता. 

"तडक पळत जाऊन दिल्ली गाठावी अन् आपल्या लेकराला डोळेभरून बघावं." माय माऊलीचा जीव तिच्या लेकराचा आवाज ऐकाण्यासाठी आसुसला होता.


इकडे रुद्रचा मधुराला झोपेची औषधं त्याचप्रमाणे अजून दुसरी मनोविकारांवर दिली जाणारी औषधं मधुराला देऊन तिच्या जीवाशी आसुरी खेळ खेळणं सुरू होतं. अशातच एक दिवस संध्याकाळच्या वेळी मधुरा खूप जास्त आक्रमक झाली, रोज देण्यात येणाऱ्या औषधात रुद्रकडून गडबड झाली होती. मधुरा त्वेषाने घरातल्या वस्तू फेकत होती, मोठमोठ्याने ओरडत होती. रुद्रला तिला सांभाळणे अवघड होतं होते. त्यातच त्याने रागारागात मधुराला झोपेचं इंजेक्शन दिलं, तरी मधुराचं चवताळण सुरूच होतं. ते पाहून रुद्रने मधुराला अजून एक इंजेक्शन दिलं. त्यामुळं मधुरा एकदम शांत झाली. रुद्र तिच्यासमोर बसला, चिडून तिला काहीबाही बोलू लागला. थोड्यावेळात मधुराचा श्वास मंद झाल्याचं त्याला जाणवलं. रुद्र घाबरून गेला, त्याने तिची नाडी बघितली. पल्स रेट एकदम स्लो वाटत होता. त्याने धावत जाऊन त्याच्या बॅगमधलं बी. पी. च मशीन आणि स्टेथोस्कोप आणला. मधुराचं बी. पी. पाहिलं तर एकदम लो झालं होतं. तेव्हा मात्र रुद्रला दरदरून घाम फुटला. दोन क्षणांसाठी काय करावं हे त्याला सुचलंच नाही. स्वतःला कसंबसं सावरत त्याने हॉस्पिटलमध्ये फोन लावला, "मी डॉ. रुद्र बोलतोय, ताबडतोब अँबुलन्स पाठवा."

दुसऱ्या दिवशी सकाळी राधिकाताई आणि मधुकरराव चहा घेत असताना पुरुषोत्तमरावांचा त्यांना फोन आला.

"हॅलो, हां… बोला पुरुषोत्तमराव. काय?.... मधुरा…. आय. सी. यु. मध्ये…" मधुकरराव पुरुषोत्तमरावांच बोलणं ऐकून मटकन खालीच बसले. हातातला फोन सुरूच होता.

"अहो, काय झालंय सांगता का?" राधिकाताई त्यांना हलवून विचारत होत्या. पुरुषोत्तमराव तिकडून "हॅलो, हॅलो." मोठ्याने ओरडत होते.राधिकाताईंनी फोन उचलला आणि त्या बोलू लागल्या.

"व्याहीबुवा, काय झालं हो?"


"राधिकाताई, तुम्ही घाबरू नका. मधुराची तब्येत बरोबर नाहीये. आपल्याला ताबडतोब दिल्लीला जायचंय. आम्ही पोहोचत आहोत तिथे, तुम्ही तयारी करून ठेवा. आपण कार घेऊन मुंबईला जातोय, तिथून संध्याकाळच्या विमानाने दिल्लीला जातोय. मी सगळी व्यवस्था केली आहे. तुम्ही निघायची तयारी करा लवकर. आम्ही अर्ध्या तासात पोहोचतोय. हॅलो, राधिकाताई ऐकताय ना?" पुरुषोत्तमराव तिकडून बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून राधिकाताईंच अवसान गळून गेलं होतं. हाताला येईल त्या बॅगेत, हाताला येतील ते कपडे त्यांनी टाकले, मधुकररावांची औषधी टाकली. तेवढ्यात पुरुषोत्तमराव आणि सुमनताई तिथे पोहोचले. 


"काय झालं असेल हो मधुराला?" पुरुषोत्तमरावांना बघून मधुकरराव धाय मोकलून रडत होते.


"मधुकरराव, तुम्ही असं हातपाय गाळून होणार आहे का? चला, आपल्याला निघावं लागेल." पुरुषोत्तमराव मधुकररावांना समजावत होते. सगळेजण कारने मुंबईच्या दिशेने निघाले. मधुराच्या काळजीने रस्तासुद्धा लवकर संपत नव्हता. मुंबईला पोहोचून दिल्लीसाठीच्या विमानाने सगळे दिल्लीला पोहोचले आणि विमानतळावरून सरळ हॉस्पिटलमध्ये गेले.


रुद्र आय. सी. यु. च्या बाहेर, वेटिंग रूममध्ये बसला होता. सुमनताईंना बघून तो एकदम त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागला.


"मम्मी, बघ ना गं. मधुराने काय करून घेतलं. अग छोटसं भांडण झालं होतं आमचं आणि त्यातच तिने हे पाऊल उचललं, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला." रुद्र आपलं कपटी कारस्थानातून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एक एक फासा टाकत होता.


"काय? मधुरा… आत्महत्या!" राधिकाताईंच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. त्यांना तिथेच भोवळ आली. सुमनताईंनी पटकन त्यांना खुर्चीवर बसवून पाणी दिलं.


"जावईबापू, आम्ही मधुराला दुरून का होईना बघू शकतो का?" मधुकरराव रुद्र समोर अक्षरशः हात जोडून बोलत होते.


"हो बाबा, दुरून बघायची गरज नाही. तुम्ही तिला आत जाऊन पण बघू शकता. आता डॉक्टरांचा राउंड सुरू आहे. तो झाला की ते मधुराच्या तब्येतीबद्दल बोलतील आपल्याला. त्यांची परवानगी घेऊन मग तुम्ही सगळे मधुराला भेटून या." रुद्र अगदी स्वतः खूप निष्पाप असल्यासारखा बोलत होता.


मधुराच्या नशिबाने तिची केस एका खूप निष्णात आणि चांगल्या डॉक्टरांच्या हातात गेली होती. डॉ. यादव क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, त्यांच्याकडे आलेल्या केसमध्ये दुसऱ्या कोणी लुडबुड केलेली त्यांना आवडत नव्हती. रुद्र आणि बाकी रुद्रचा दुष्ट सहकारी मंडळाचा डॉ. यादवांशी काही संबंध येत नव्हता. त्यामुळे डॉ. यादवसुध्दा त्या हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या स्कॅमबद्दल अनभिज्ञ होते. इतक्यात डॉक्टर राऊंड घेऊन बाहेर आले. रुद्र, मधुकरराव, राधिकाताई, सुमनताई आणि पुरुषोत्तमराव बाहेर उभेच होते.


"डॉ. रुद्र." डॉ. यादव बोलणं सुरु करणार होते.


"सर, एक मिनिट, हे माझे मम्मी-पप्पा आणि मधुराचे आई-बाबा प्लिज तुम्ही या लोकांना समजेल असं सांगा मधुराबद्दल." रुद्र पुन्हा तोच घाणेरडा निष्पापपणाचा आव आणत बोलत होता.


"ओह, येस. ऑफकोर्स. नमस्कार अंकल, आंटी. मी डॉ. श्रीरंग यादव. मधुराची केस मी बघतोय. हे बघा, तिने खूप मोठ्या प्रमाणात झोपेचं औषध घेतलं होतं. त्यामुळे तिचा बी. पी. एकदम कमी झाला. त्यामुळे तिच्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा किती परिणाम झाला आहे हे आता आपण सांगू शकत नाही. तिचा श्वासही एकदम मंद झाला होता, त्यामुळे आम्ही तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे, बी. पी. वाढावे म्हणून औषधी सुरू आहेत. जोपर्यंत बी.पी. नॉर्मल होत नाही आणि बी.पी.ची औषधी बंद होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. म्हणजे अस समजा सध्या सगळं क्रिटिकल आहे. डॉ.रुद्र, इथलेच स्टाफ असल्यामुळे आपण पोलीस केस केली नाही. व्हेंटिलेटर काढल्यावरही मधुरा त्यानंतर कशी ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देते हे आता सांगता येणार नाही. लेट्स होप फॉर बेटर. बाकी तुम्ही ईश्वराला प्रार्थना करा. आपण आपले बेस्ट प्रयत्न करूच." डॉ. यादव


"डॉ. एक विनंती होती, प्लिज आम्ही आमच्या लेकीला बघू शकतो का?"  मधुकरराव काकुळतीने विचारत होते.


"हो,हो. नक्कीच. आता जाऊन बघा. नंतर मग विझिटिंग अवर्समध्ये भेटून येत जा. जमलं तर तिच्याशी बोलायचा प्रयत्न करा. तुमचा आवाज ऐकून कदाचित ती ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देईल." डॉ. यादवांच्या वाक्याने सगळ्यांना थोडा धीर आल्यासारखं वाटलं.


एकेक करून सर्वजण मधुराला बघून आले. एवढी हसून खेळून राहणारी, एवढी धैर्याची मधुरा खरच आत्महत्या कशी करू शकेल?हा प्रश्न मधुरराव, राधिकाताई यांच्याप्रमाणेच सुमनताई आणि पुरुषोत्तमराव यांनाही पडला होता.

रुद्र सगळ्या गोष्टींमधून आपला बचाव करण्यात सध्याचा तरी यशस्वी झाला होता. किती दिवस टिकेल हा त्याचा ढोंगीपणा? मधुरा शुद्धीत येईल का? आणि शुद्धीत आल्यावर या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर काही परिणाम होईल का? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'मधुरीमा'.

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. कथा निव्वळ मनोरंजन हेतूने लिहिली आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश पसरवणे हा कथेचा हेतू नाही.)


(कसा वाटला हा भाग? नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा.)

                            ©  डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all