Login

मधुरीमा (भाग २८)

Story of two friends

मधुरीमा (भाग २८)

"मी घरी येणार नाही. जे काय बोलायचं ते इथंच बोल. पण तुझं बोलणं मी का ऐकून घेऊ? तू जे काही करतोयस, केलं आहेस, खरच काही बोलण्यासारखं राहिलं आहे का? एकवेळ तू माझा विश्वासघात केला असता तर तुला सोडलही असतं पण तू पूर्ण समाजाचा, मानवतेचा विश्वासघात केला आहेस. मी तुला असं सोडणार नाही. तुला याची शिक्षा मिळेलच." मधुरा चिडून बोलली आणि तिथून चालत निघाली. राग होताच डोक्यात, त्यामुळं पाऊलही झपाझप पडत होती. इतक्यात मधुराच्या बाजूने एक गाडी थांबली आणि कोणीतरी तिचा हात खचकन ओढून तिला गाडीत घेतलं. मधुराने घाबरून त्या व्यक्तीकडे पाहिलं.

'रुद्र, तू? आता हेच धंदे बाकी राहिले होते का?" मधुरा चवताळून बोलली.

"ए… चूप बसायचं एकदम. केव्हाच म्हणतोय घरी जाऊन बोलू, पण तू ऐकायचं नाव नाहीस घेत." रुद्र तिच्यावर ओरडला.

"मी चूप बसणार नाही. ओ.. टॅक्सीवाले भैय्या, थांबवा गाडी. मला उतरायचं आहे." मधुरा टॅक्सीवाल्यावर ओरडली.

"ओ भाऊ, तुम्ही इकडे लक्ष नका देऊ. हा आमचा नवरा-बायकोचा पर्सनल इश्यू आहे. चुपचाप जो पत्ता सांगितला आहे तिथे चला." रुद्र

"रुद्र मी चालत्या गाडीतून उडी मारेल बघ. गाडी थांबवायला लाव." मधुराची बाहेर पडण्यासाठी झटापट सुरू होती.

"घे, मार उडी. खाली पडलीस आणि मेली ना, तर माझाच फायदा आहे." रुद्र विचित्र हसत बोलला.

मधुरा शांत बसली. शांत बसणं भागच होतं. अस नुसतं घाईला येऊन चालणार नव्हतं. थोडं शांततेने विचार करणं गरजेचं होतं. या सगळ्यातून रुद्रला कसा धडा शिकवावा याचा विचार करत होती. डोळ्यासमोर अगदी रुद्र बघायला आला होता तेव्हापासून आतापर्यंतचा सगळा काळ पुढे सरकत होता. सुरुवातीला त्याचं ते शांत असणं, अगदी कामपूरत बोलणं, तिच्या घरच्या लोकांसोबत अगदी प्रेमानं वागणं, त्याचं ते काळजी घेणं, कधी कधी विनाकारण भांडणं, चिडणं सगळं आठवत होतं. त्याच्या वागण्या बोलण्यात तिला तो असा असेल असं कधी जाणवलच नव्हतं.

"पण आता कळलं ना. आता कसं या सगळ्या गोष्टींतून बाहेर पडावं? कसं रुद्रला पकडून द्यावं?"  मघाचा रुद्र आणि शेखर मधला सगळा संवाद मधुरा आठवत होती. "डॉ. शर्मालासुद्धा ही गोष्ट कळाली होती. तिच्यासोबत काय झालं हे मी स्वतः ऐकलय. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन नुसती कंप्लेंट करून होईल का? कारण या सगळ्याच जाळं खूप मोठं असेल. आणि मी कंप्लेंट करायला जावं आणि तो माणूसही या सगळ्यात मिसळलेला असला तर?" विचारांचं तांडव मधुराच्या डोक्यात सुरु होतं. 

तेवढ्यात टॅक्सी घराजवळ थांबली. रुद्रने हातात येतील तेवढे पैसे टॅक्सीवाल्याला दिले. तो मधुराला 'खाली उतर' म्हणून आवाज देत होता. मधुरा खाली उतरली पण घरात जायची तिची इच्छाच होत नव्हती. किती प्रेमाने सजवलं होतं तिने घर! पण आता घरातल्या प्रत्येक वस्तूला कोणाच्यातरी भावनांचा तळतळाट लागलेला जाणवत होता, पापाची लकेर प्रत्येक वस्तूवर दिसत होती. आता ते घरही तिला किळसवाण वाटत होतं. 'अग, घरभाडं काहीच नाही. माझे सर, त्यांनी तसच दिलं आहे राहायला' रुद्रचे शब्द कानात फिरत होते. मधुरा घराच्याबाहेर स्तब्ध उभी होती. रुद्रने मधुराचा हात ओढला.

"सोड.." मधुरा किंचाळली.

"हे बघ, उगी तमाशा नको. घरात चल चुपचाप. थोडीफार इमेज आहे माझी इथे. ती खराब करू नको." रुद्र चिडला, मधुराचा हात ओढत तिला घरात नेलं आणि सोफ्यावर एकदम फेकल्यासारखं केलं.

"काय इमेज आहे रे तुझी? खूपच मोठ्ठ काम करून कमावतोयस ना. सो कॉल्ड तुझी इमेज. अरे एवढं घाणेरडं काम करताना आधी आपल्या आई-वडिलांचा तरी विचार करायचा. काय वाटेल त्यांना? जेव्हा त्यांना कळेल की आपला मुलगा एवढा नीच पातळीवर गेला आहे." मधुरा रागाने बोलत होती.

"काय?आई-वडिलांचा विचार! त्यांनी केला का कधी माझा विचार? त्यांच्यासाठी तर तो रवीशच चांगला आहे. आज्ञाधारक होता न तो… हुश्शार… दहावीत बोर्डात आला होता… बारावीत बोर्डात आला होता… इंजिनिअरिंग पण गव्हर्नमेंट कॉलेजमधून झालं… जॉबही मिळाला लगेच… अन् अमेरिकेतही गेला… आणि मी… लहानपणापासून नुसतं अपेक्षांचं ओझं… 'मोठा भाऊ बोर्डात आला होता आणि तू?' मोठा इंजिनिअर झाला, मग तू आता डॉक्टर हो... नाही आलो मी बोर्डात… नव्हते मला चांगले मार्क्स… नव्हतं बनायचं मला डॉक्टर… जिथे तिथे माझ्या बापानी पैसा फेकला माझ्यासाठी… आणि तेवढाच दहा-दहा वेळेला तो उचकूनही काढला… पैसा खर्चायला दिला तर हिशोब मागायचे… आणि तो रवीश…  त्याला कधीच  हिशोब मागितला नाही… मला माझं काहीतरी करून दाखवायचं होतं… त्या रवीशपेक्षा जास्त पैसा कमवून दाखवायचा होता… मी डॉक्टर झालो की लगेच माझा बाप तयारच होता दवाखाना टाकून द्यायला. का? माझ्यात तेवढी हिम्मत नाही म्हणून का? तुला माहितीये, बाहेर स्पर्धा कितीये ते? झटपट पैसा कमवायचा असेल ना तर असा जुगाड करावाच लागतो. तुला तर माझ्या आयटमबद्दल  ऐकून वाईट वाटलं असेल. तिच्याशीच लग्न करायचं होतं मला. पण माझ्या त्या सो कॉल्ड माय-बापानी तुझ्याशी लग्न लावून दिलं माझं. त्या रवीशनी ती अमेरिकेची बायको आणली तर ती चालली आणि मला लग्न करायचं म्हटलं तर यांच्या अटी! लावलं माझं लग्न तुझ्यासोबत.. आणि आता तू…. आता तू देणार मला पोलिसांच्या ताब्यात? तू समजतेस काय स्वतःला? कधी कोणता निर्णय घेता आलाय का तुला? एक नंबरची बिनडोक आहेस तू. एवढं सोप्प वाटलं का तुला? या लोकांच जाळं किती पसरलेलं आहे तुला माहिती नाही. तुला सांगतोय, चुपचाप शांत बस आणि मी जसं म्हणतो तस कर. तेच तुझ्यासाठी, माझ्यासाठी चांगलं आहे. गोष्ट माझ्यापर्यंत आहे म्हणून ठीक आहे. तसंही तुला आज ना उद्या हे कळलंच असतं. पण कळलं ना आता? नेटाने माझ्या मागे यायचं." रुद्र मधुराची मान भिंतीवर दाबत बोलला.

"कधीच नाही, जीव गेला तरी हरकत नाही." मधुरा त्याला धक्का मारत घराच्या बाहेर पडण्यासाठी पळाली. तेवढ्यात रुद्रने तिचा हात धरून तिला जोरात ओढले. तिच्या तोंडात एक रुमाल कोंबला आणि दोन्ही हात दोरीने बांधले. मधुरा जोराने झटपटत होती. रुद्रने बॅगमधून एक इंजेक्शन काढले. ते पाहून मधुरा अजून चवताळली, दरवाज्याकडे धावली पण दोन्ही हात बांधले असल्याने तिला दरवाजा उघडता आला नाही. रुद्रने मागून येत तिच्या हातावर इंजेक्शन टोचले. मधुरा स्वतःला जागं ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करत होती, पण शेवटी तिचे डोळे मिटलेच.

रुद्रने तिला ओढत आणून बेडवर झोपवलं, तिच्या तोंडातला रुमाल काढला आणि तिच्या जवळच बसला. बेशुध्द पडल्यावरही तिच्या चेहऱ्यावर एक राग त्याला जाणवत होता. त्याने तिचा हात हातात घेतला. आज कितीतरी वर्षांनी तोही ढसाढसा रडत होता.

"मधुरा, मला माहितीये हे सगळं चुकीच आहे. तुला माहिती सुरुवातीला मला खूप मज्जा वाटली या सगळ्या गोष्टींची, नंतर मात्र नको वाटलं. या सगळ्यातून बाहेर पडायची खूप इच्छा होत होती पण… पण ही एक दलदल आहे. फसलोय मी आता यात. जेवढं बाहेर निघायचा प्रयत्न करेन तेवढा आता अजून अडकत जाईल. खूप घाणेरडे लोकं आहेत हे. या लोकांना विरोध केला ना तर ते मारून टाकतील, तुलाही आणि मलाही. मी ना…. तुला सोडूही नाही शकत, आवडते ग मला तू पण आणि ती पण आवडते. ती ऐकते माझं सगळं. तू पण ऐकत जा. तू ना आता असच राहायचं चुपचाप. झोपून राहिलीस तरी चालेल. एक दिवस हा रुद्र खूप मोठा डॉक्टर होईल… खूप पैसा असेल… सगळं विकत घेऊ आपण पैशाने… पण तू… तू ऐकायचं माझं… बाहेर पडायचं नाही… ते लोकं तुला मारून टाकतील… मी तुला मरू देणार नाही मधुरा… म्हणून तर घरी घेऊन आलो ना. आता शहाण्या बाळासारखं राहायचं." मध्येच हसत, मध्येच रडत, मधुराला पकडून रुद्र अगदी विक्षिप्तपणे बोलत होता.


 

काय होईल मधुराचं? या सगळ्या गोष्टींतून ती कशी बाहेर.पडेल ? मधुराच्या मदतीला कोणी धावून येईल का? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'मधुरीमा.'


 

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. यांचा वास्तविक जीवनाशी काहीच संबंध नाही. कथा निव्वळ मनोरंजन हेतूने लिहिली आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा वाईट संदेश पसरवण्याचा कथेचा उद्देश नाही.)

(कसा वाटला मधुराचा आजचा भाग नक्की सांगा. आवडला तर लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक लिखाणासाठी प्रोत्साहन वाढवणारं आहे.)


 

फोटो-गुगलवरून साभार


 

                                     © डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all