Jan 29, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग २७)

Read Later
मधुरीमा (भाग २७)

मधुरीमा भाग 27

 

रुद्रचा विचार करत मधुरा चहा घेत होती. आपणही रुद्रसाठी काहीतरी करावं असं तिला वाटत होतं.

"जेवणासाठी मस्त त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवते. पण तो तर बिझी असणार आहे असं सांगून केला. घरी कधी येईल काय माहिती? मग स्वयंपाक करून तरी काय करू." तिचा तिच्या मनाशीच संवाद सुरू होता. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली.

"तसं पण रुद्र आज बिझी आहे, काय माहिती त्याला खायलासुध्दा वेळ मिळेल की नाही? त्याला घरच्या जेवणाचा डब्बा नेऊन दिला तर?" स्वतःचीच कल्पना तिला खूप आवडली. ती उठली. पटापट तिने स्वयंपाक बनवला. सगळे पदार्थ रुद्रच्या आवडीचे बनवले. फ्रेश होऊन मस्त तयार झाली. आकाशी रंगाचा कॉटनचा पंजाबी ड्रेस घातला. साजेसं, हलकं मेक-अप केलं. रुद्रने दिलेली हिऱ्यांची अंगठी घातली. बनवलेला स्वयंपाक टिफिनमध्ये भरून घेतला आणि घराच्या बाहेर पडली.


 घरापासून थोडं अंतर चालत आल्यावर एक ऑटोरिक्षा स्टँड होते. तिथून तिने एक ऑटो ठरवला.

"न्यू लाईफ लाईन हॉस्पिटल... रुद्रचं हॉस्पिटल… जाऊ की नाही? त्याला आवडेल ना? नाहीतर परत चिडायचा! जाऊ दे. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही. कमीत कमी हॉस्पिटल तरी बघणं होईल. पुढच्या महिन्यात का होईना मी पण तर तिथे रुजू होणार आहे." विचारांचा पिंगा तिच्या डोक्यात सुरू होता.

"मॅडम, आपका स्टॉप आ गया है।" रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली. त्याचे पैसे देऊन ती खाली उतरली. तिचं हॉस्पिटलचा परिसर न्याहाळण सुरू होतं. हॉस्पिटलचा परिसर खूप मोठा होता. तिच्या समोर एक दहा मजली इमारत होती. त्या इमारतीच्या बाजूला कॅज्युलटी होती. नेहमीप्रमाणे त्याच्यासमोर दोन-चार अँबुलन्स उभ्या होत्या. रुग्ण आणि नातेवाईकांचा एकच गलका होता तिथे. मोठ्या इमारतीच्या बाजूला अजून दोन-चार मजली वेगवेगळ्या इमारती होत्या. त्यापलीकडे अजून इमारती होत्या.


"एक दिवस येऊन सगळं हॉस्पिटल, कुठे काय आहे काय नाही सगळं पाहून घेते." ती मनाशीच पुटपुटली आणि रिसेप्शनकडे जायला निघाली. त्या इमारतीच्या बाहेरच प्रत्येक मजल्यावर काय काय आहे याचा एक बोर्ड लावलेला होता. मधुरा तो बोर्ड वाचत होती. ग्राऊंड फ्लोअर रिसेप्शन, न्यूरॉफिजीशीयन अँड न्यूरॉसर्जरी ओ. पी. डी, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, फिप्थ फ्लोअर, सिक्स्थ फ्लोअर गायनेकॉलॉजी अँड ओबीस्ट्रेशीयन डिपार्टमेंट.

"चला इथे तरी रुद्र साहेबांच्या डोक्यावर मी मिरे वाटणार!" स्वतःशीच हसत ती रिसेप्शन काउंटरवर गेली.


"एक्सक्यूझ मी! डॉ. रुद्र आष्टेकर कुठे भेटतील?" मधुराने गोड भाषेत रिसेप्शनिस्टला विचारले.


"मॅम, तुम्ही चौथ्या मजल्यावर जा. ऑर्थो डिपार्टमेंट, सरांची ओ. पी. डी. तिथेच आहे. तुम्ही जर नवीन पेशंट असाल तर डाव्या हाताला रजिस्ट्रेशन काउंटर आहे तिथे आधी रजिस्ट्रेशन करून तुमची फाईल बनवून घ्या. आणि मग चौथ्या मजल्यावर जा." रिसेप्शनिस्ट मोठ्या आदराने बोलली.


"मी पेशंट नाहीये, ऍकच्युअली मला डॉ. रुद्र सरांना भेटायचं आहे." मधुरा.


"ओह!, सर असतील ओ. पी. डी. मध्ये. तुम्ही जाऊन भेटू शकता." रिसेप्शनिस्ट.


मधुरा तिथून चौथ्या मजल्यावर गेली. तिथे गेल्यावर अजून एक छोटंसं रिसेप्शन काउंटर होतं. त्या समोर पेशंटला बसायला चेअर लावलेल्या होत्या. तिथल्या रिसेप्शनिस्ट सोबत बोलून "डॉ. रुद्र एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आहे" असं तिला कळालं होतं. उभ्या उभ्या ती सगळीकडे बघत होती. रुद्रच केबिन, त्या बाजूला ड्रेसिंग रूम (रुग्णांचे प्लास्टर काढणे, मलम पट्टी करणे यासाठी) , अजून थोडं पुढे गेल्यावर ऑपरेशन थिएटर,  त्याच्या बाजूला रिकव्हरी रूम. मधुराने अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने हॉस्पिटल मोठं आणि नीटनेटकं होतं.


"ऍडमिट पेशंट कुठे असतात मग?" मधुराने रिसेप्शनिस्टला प्रश्न विचारला.


"बाजूला दुसरी इमारत आहे तिथे. तिकडे सगळ्याच डिपार्टमेंटचे पेशंट ऍडमिट असतात." रिसेप्शनिस्ट.


"हो का? दूर नाही पडत का? ओ. पी. डी. इथे, आय. पी. डी. तिकडे?" एखाद्या लहान मुलासारखा प्रश्न मधुराने विचारला.


"सगळ्या बिल्डिंग आतमधून कनेक्टेड आहेत. त्यामुळं वेळ नाही लागत. बाय द वे, एवढं सगळं विचारताय, तुम्ही कोण ते तरी सांगा?" रिसेप्शनिस्ट. 

"मी डॉ. मधुरा कानिटकर-आष्टेकर, डॉ. रुद्र सरांची मिसेस." मधुरा.


"सॉरी मॅम, तुम्ही बसून घ्या ना. मी ओळखलं नाही तुम्हाला." रिसेप्शनिस्ट.


मधुरा तिथे बसली. पण रुद्रला सरप्राईज कस देता येईल याबद्दल तिचा विचार सुरू होता. तिला अजून एक आयडिया सुचली. 

"मी आत आहे हे रुद्रला बिलकुल कळलं नाही पाहिजे." मधुराने धमकीवजा विनंती रिसेप्शनिस्ट आणि वॉर्डबॉयला दिली. रिसेप्शनिस्ट सोबत बोलून ती रुद्रच्या केबिनमध्ये गेली. रुद्रची केबिन एकदम पॉश होती. बसायला भली मोठी चेअर, त्यासमोर मोठा काचेचा टेबल, रुग्णच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना बसायला चेअर, रुद्रच्या खुर्चीच्या बाजूला पेशंटला बसायला स्टूल, त्या मागे एक्झामिनेशन टेबल त्याला पडदा लावलेला होता आणि टेबलच्या एका बाजूला ह्युमन स्केलेटन (हाडांचा सांगाडा).


"कोणतं हाड तुटलंय हे सांगत असेल यावरून." स्केलेटन कडे बघत मधुरा पुटपुटली.

"हॅलो,  डॉ. रुद्र." मधुरा स्केलेटनचा हात हातात घेत बोलली. तिच्या डोक्यात अजून एक कल्पनेचा लाईट पेटला. आपलं सगळं समान, बॅग वगैरे घेऊन ती एक्झामिनेशन टेबल वर जाऊन बसली आणि पडदा लावून घेतला.

"रुद्र आला की त्याला थोडी भीती घालून त्याची मज्जा घेईल." स्वतःच्या बालिश कल्पनेवर तिलाच हसू आलं. रुद्रची वाट बघत ती बसली होती.


इतक्यात केबिनच दार वाजलं. रुद्र सोबत अजून एक कोणीतरी माणूस होता. त्या माणसाला जाऊ द्यावं आणि मग आपण बाहेर जावं म्हणून मधुरा तिथेच थांबली. रुद्र आणि त्या माणसाचं बोलणं सुरू होतं.


"रुद्र, काय पेमेंट, पेमेंट बोलत होतास तू? तेही त्या ट्रस्टी लोकांसमोर. अरे मिळतील ना तुला तुझे पैसे, मी काय पळून चाललो का? काम कोणतं आणि तू कोणासमोर बोलत होतास काही कळतंय का?" रुद्र सोबतचा माणूस.


"हे बघा डॉ. शेखर, जो पर्यंत मला माझे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी पुढच काम करणार नाही." रुद्र.


"कसं करणार नाही? तुला करावंच लागेल. तो भाई, तिकडून दुबईवरून मला हजारवेळा फोन करतोय, त्याला अजून तीन किडण्या पाहिजेत." डॉ. शेखर.


"तुमचा भाई पण ना! काय तर किडण्या पाहिजे म्हणे! त्या काय अशा पानपट्टीवर विकत मिळतात का? एक तर मी ऑर्थोवाला डॉक्टर. तसा पेशंट तर येऊ द्या माझ्याकडे. मी काय चालत्या बोलत्या पेशंटच्या किडण्या काढू? जेव्हा जमलं तेव्हा दिल्या नाही का? त्याचंच पेमेंट अजून पूर्ण नाही केलं. आधी पैसा.. मग बघेन मी." रुद्र.


"हे घे. मला माहीतच होतं. एवढया पैशाच काय करतो रे?" शेखर रुद्रच्या हातात पैशाची बॅग देत म्हणाले.


"काय बॉस, काय विचारता तुम्ही? तुमच्यासारखंच  आपल्याला पण सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचं आहे. मोठ्ठा बंगला, गाडी, वर्ल्ड टूर.. असा खोऱ्यानं पैसा ओढायचाय. आणि थोडंफार आपल्या आयटमला पण द्यावं लागतं ना. या विकेंडला गोव्याला जायचा प्लॅन केला आहे." रुद्र.


"लग्न झालं ना रे आता तुझं? अजूनही आयटम फिरवतोस का? बायकोला कळलं तर?" शेखर.


"तिला काय कळतंय येडीला? अन् कळलंच तरी थोडं मोठ्यानं बोललं, दोन-चार वस्तू फेकफाक केल्या की ती माझ्याशी बोलतच नाही. आपलं काम अजून सोप्प." रुद्र.


"इंटरेस्टिंग! बरं तिचं हॉस्पिटल जॉईन करायचं काय झालं? बोलला का तिला तू? तयार आहे न ती?" शेखर.


"हो, बोललो की. तुमच्या त्या शर्मा मॅडम पुढच्या महिन्यात जाणार आहेत ना?" रुद्र.


"अरे जाणार काय! गेल्या पण! अमेरिकेला नाही, डायरेक्ट वरचंच तिकीट काढलं त्यांचं." शेखर


"म्हणजे? थोडं कळेल असं सांगता का?" रुद्र.


"अरे काही अमेरिकेला जाणार नव्हती ती. तुला तर माहिती आपला पुढचा प्लॅन काय होता ते. सगळेच आपल्या सपोर्ट मध्ये आहेत. त्या शर्माला पण ऑफर दिली होती पण ती बाई काही ऐकेना. पोलिसात गेली होती, पण पोलिसवाला आपलाच माणूस निघाला. मग काय, काल इथून घरी जाता जाता बिचारी वरच गेली. न्यूज नाही वाचली का तू? अँक्सिडेन्ट!" शेखर कुत्सितपणे हसत बोलत होता. 


"हो का? मी नाही वाचली." रुद्र थोडं चाचरतच बोलला.


"सोड ते. तुझ्या बायकोला लवकर जॉईन करायला लाव मग इन्फर्टीलिटी वाला प्लॅन आखू." शेखर.


"म्हणजे? मला नाही कळालं तुम्हाला काय म्हणायचं ते?" रुद्र.


"काय रे तू! बघ, आजकाल इन्फर्टीलिटी खूप वाढत आहे. आपण बरोबर लोकांची दुखती नस पकडायची. लेकरू व्हावं म्हणून लोकं काहीही करायला तयार असतात. लोकं त्यासाठी कितीही पैसा ओतायला तयार असतात, बस आपण बरोबर तेच करायचं. परदेशात तर त्या लोकांना असे रेडिमेड बच्चे दिले तरी ते पैसे देऊन घेतात. समजलं?" शेखर.


"मान गये बॉस, एकीकडे किडणी तर एकीकडे बच्चे! पैसा कसा ओढायचा ते तुमच्याकडून शिकावं." रुद्र.


"बस. पुरे झालं आता. लवकरात लवकर कामाला लागा म्हणजे झालं." शेखर रुद्रसोबत बोलला आणि तिथून निघून गेला.


हातातली पैशाची बॅग ठेवायची म्हणून रुद्र मागे वळला. मधुरा त्याच्या मागेच उभी होती. रागाने चेहरा, डोळे लालबुंद झाले होते तिचे. हाताच्या मुठी गच्च आवळून उभी होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. स्वतः अपराधी असल्यासारखं वाटत होतं तिला.


"नीच माणसा! मानवी अवयवांची तस्करी! कुठे फेडशील ही पापं? आपण शिकलो काय? आणि तू करतोस काय? अरे ज्या पेशाकडे हा समाज देवाचं रूप म्हणून बघतो त्याचा थोडा तरी विचार करायचा ना. देव तर नाही तू तर दैत्याच्याही पलीकडचा आहेस. अरे थोडी तरी लाज-शरम बाळगायची ना! या समाजाचं देणं लागतो आपण आणि तू त्याच समाजाच्या पाठीत खंजीर खुपसतोय? आणि अजून काय? आयटम म्हणे!  शी… तुझ्याशी तर बोलणं पण किळसवाण वाटतयं. आता मीच जाणार आहे पोलीस स्टेशनमध्ये."  उद्विग्नपणे मधुरा बोलली आणि तिथून निघाली.


"मधुरा, अग थांब. थोडं ऐकून तर घे माझं." रुद्र तिच्यामागे जात बोलला.


रागाने तणतणतच, डोळे पुसतच मधुरा हॉस्पिटलच्या बाहेर आली. रुद्र तिच्या मागेच येत होता. त्याने मधुराचा हात ओढून तिला थांबवलं.


"मधुरा, ऐकून तर घे. तू अर्ध्या गोष्टी ऐकल्यास. तुला आधीच काहीच माहीत नाहीये. तू प्लिज घरी चल माझ्यासोबत. आपण घरी बोलू सगळं. इथे नको. कोणी ऐकेल. शर्माचं काय झालं ऐकलंस ना. प्लिज घरी चल." रुद्र तिला समजावण्याचा प्रयत्न करत बोलत होता.

 

 

काय करायला हवं मधुराने? रुद्रसोबत घरी जाऊन त्याची बाजू ऐकून घ्यावी की सरळ पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा?

पाहूया पुढील भागात.


क्रमशः


फोटो- गुगलवरून साभार


(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. कथा निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिली आहे. कोणत्याच प्रकारचा वाईट हेतू पसरवणे हा कथेचा उद्देश नाहीये.)


( प्रिय वाचकहो, कथा भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. इथून पुढे कथेचे नियमित भाग पोस्ट होत जातील. 'मधुरीमा' वर असच प्रेम करत रहा. हा भाग आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक पण लिखाणाची प्रेरणा वाढवणारं आहे)

 

                          © डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न