Jan 29, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग २६)

Read Later
मधुरीमा (भाग २६)

मधुरीमा (भाग २६)

रुद्र स्वतःहून बोलणार नाही तोपर्यंत त्याच्यासोबत काहीच बोलायचं नाही असं मधुराने ठरवलं होतं. त्यामुळं तीही घरात अगदी शांत शांत रहात होती. अशातच एक दिवस राधिकाताईंचा फोन आला, एरव्ही बडबड करणारी मधुरा त्यांच्यासोबत तुटक तुटक बोलत होती. काहीतरी बिनसलंय याची जाणीव राधिकाताईंना होत होती. पण मधुराच्या बोलण्यावरून कोणत्या गोष्टींचा अंदाज बांधता येत नव्हता. विचारावं की नाही या संभ्रमात त्या होत्या. 'आपण विचारावं आणि पुन्हा असं वाटू नये की पोरीच्या संसारात ढवळाढवळ करतेय.' पण मधुराचं अस वागणं त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यांनी मधुराला प्रश्न विचारला, "मधुरा, जवाईबापू आहेत का घरी की अजून आले नाहीत हॉस्पिटलमधून?"

"आहे ना घरीच. का गं?" मधुरा.

"त्यांच्याजवळ फोन दे बरं , किती दिवस झाले मी बोललेच नाही त्यांच्यासोबत." राधिकाताई.

मधुराने रुद्रकडे फोन दिला. पण 'रुद्र आईला काही फटकन बोलेल का, आमच्यात भांडण वगैरे झालं हे सांगणार तर नाही' याची भीती मधुराला वाटत होती. पण रुद्र काही न झाल्याच्या अविर्भावात राधिकताईंसोबत बोलत होता.

"चला, आईसोबत तरी नीट बोलला. उगीच त्या लोकांची काळजी वाढली असती नाहीतर." मधुराचे मनात विचार सुरू होते. 

"हे घे फोन, आईंशी बोल, सुरू आहे कॉल." रुद्रने फोन वापस दिला आणि मधुराची विचारांची तंद्री भंग झाली.

"काय गं मधू, जॉब नाही मिळतंय त्याचं खूप टेन्शन घेतलंस म्हणे?" राधिकाताईंच्या प्रश्नाने मधुरा एकदम दचकली.

"नाही गं आई, टेन्शन नाही घेतलं पण वाटतं ना गं, आपण एवढं शिकलो तर त्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून. सवय नाही असं रिकामं बसून राहायची, रुद्र पण घरी नसतो." मधुरा.

"अगं मिळेल हो जॉब, तू जास्त विचार नको करू या गोष्टींचा. प्रयत्न करत रहा, कुठे ना कुठे मिळेलच की. आणि अशा गोष्टी चालतच असतात. आता रिकामा वेळ भेटतोय तर नकोसा वाटतोय, पुन्हा मग दगदग सुरू झाली की रिकाम्या वेळेची वाट बघत बसशील. तू आनंदी रहा, बघ सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. ठीक आहे. काळजी घे. बरं, नंतर करते मी फोन बेटा." राधिकाताईंनी फोन ठेऊन दिला. 

दिवस सरत होते. घरात अबोला ठाण मांडून बसला होता. मधुरा आणि रुद्रमध्ये अगदी जुजबी बोलणं सुध्दा होत नव्हतं. मधुरा स्वयंपाक वगैरे करून ठेवत होती पण रुद्र मनात आलं तर खात होता नाही तर तसाच निघून जात होता. इतके दिवस कोणावर रुसुन फुगून बसायची सवय मधुराला नव्हती. हा काळ तिला तिचा अंत पाहणारा काळ वाटत होता पण मधुराने ठरवलं होतं की रुद्र बोलल्या शिवाय बोलायचं नाही आणि ती तिच्या मतावर ठाम होती. काळ जणू तिच्या संयमाची परीक्षा घेत होता.

एकदिवस दुपारच्या वेळी मधुरा पुस्तक वाचत पडली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

"कोण असेल या वेळेला? रुद्र तर आजकल बेल वाजवत नाही. चावीनेच दरवाजा उघडून येतो. सेल्समन असेल का कोणी.?" मधुरा काहीशी निरच्छेने दरवाजा उघडायला गेली. चेहऱ्याच्यासमोर मोठ्ठा गुलाबाचा बुके घेऊन कोणीतरी उभं होत.

"कोण पाहिजे ?" मधुराने आश्चर्याने विचारलं.

"तुम्हीच पाहिजेत मॅडम, अगदी आयुष्यभरासाठी." बुकेच्या मागून डोकावून पहात रुद्र बोलला. मधुरा दाराच्या बाजूला झाली आणि रुद्र आत आला.

"हे काय आता नवीनच. एक काहीतरी ठरवून तसंच वागत जा ना. किती अप आणि डाऊन्स असतात याच्या वागण्यात." मधुरा मनाशीच बोलत होती.

"सॉरी." तिच्या हातात बुके देत रुद्र बोलला. मधुराने जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणलं.

"मनापासून माफी मागतोय." रुद्र परत बोलला.

"इट्स ओके. नाही म्हणजे काही गरज नाही याची. मला इतके दिवस कोणावर राग धरून नाही ठेवता येत." मधुरा.

"हो का. मग तरी बोलली नाहीस माझ्यासोबत." रुद्र.

"म्हणजे.. मला वाटलं तुला बोलायचं नसेल माझ्याशी… म्हणून मग.." मधुरा.

"ओह.. जाऊ दे. कुठे धरून बसते त्या गोष्टी. मी तुझ्यासाठी दोन सरप्राईज आणलेत. विचार तर काय आणलंय?" रुद्र.

"एक तर मिळालं. दुसरं काय आहे?" मधुरा अजूनही मोकळं बोलत नव्हती. रुद्र बोलतोय आणि मी नाही बोलले तर मग उगीच आपल्यावर पुन्हा आरोप नको म्हणून त्याच्याशी बोलणं सुरू होतं.

"हे बुके काय सरप्राईज असतं का? हे घे." रुद्रने एक सुंदर हिऱ्यांची अंगठी तिच्यासमोर धरली.

"ह्याची काय गरज होती?" मधुरा चेहऱ्यावर खोटं हसू आणत बोलली.

"अगं, लग्न झाल्यापासून तुला एकही गिफ्ट दिलं नव्हतं आणि तसंही या काही काळात खूप नको नको ते बोललो मी तुला. सॉरी म्हणायला…. तुला मनवायला आणलं. सॉरी ना. आता दुसरं सरप्राईज विचार ना काय आहे ते?" रुद्र.

"अरे हो, दुसरं बाकीच आहे ना अजून. माझ्या लक्षातच नाही. म्हणजे या दोन गोष्टींनी आश्चर्याचा धक्का दिला ना म्हणून.'' मधुरा.

"येस मॅडम! या अंगठी पेक्षा तुला ते जास्त आवडणार आहे." रुद्र.

"काय आहे असं?" मधुरा

"आमच्या हॉस्पिटलमध्ये मॅडम आहेत डॉ. शर्मा, सिनिअर गायनेकॉलॉजिस्ट, त्यांनी राजीनामा दिला आहे. पुढच्या महिन्यात त्या यु. एस. ला जातील. त्यांच्या जागेवर मी तुझं नाव सुचवून आलोय. पुढच्या महिन्यापासून तुझा जॉब सुरू!" रुद्र खुषीतच बोलला.

"थँक्स. कधी आहे इंटरव्ह्यू वगैरे ?" मधुरा.

"इंटरव्ह्यू! कशासाठी? आणि कोणाचा? तुझा? अरे…. डॉ. रुद्र आष्टेकर सरांची बायको.. ही एवढी ओळखच खूप आहे.. काही इंटरव्ह्यू वगैरे होणार नाहीये. मी मॅनेजमेंटला तुझं नाव सांगितलंय आणि ते तयार झालेत. एक दोन दिवसात अपॉईंटमेंट लेटर पण मिळेल. आता बघ कसं, आपण जेव्हा जमेल तेव्हा सोबत जाऊ येऊ शकू, समजा तुला उशीर होणार असेल तर मी थांबत जाईल तुझ्यासाठी." रुद्र स्वतःची फुशारकी मारत बोलला.

मधुराला खरतरं आनंद व्हायला हवा होता या गोष्टींचा, पण तिच्या पोटात एकदम गोळाच आला. " याच्या हॉस्पिटलमध्ये जॉब म्हणजे 'घर तसं दार'.... तिथेही माझ्या कामात याने लुडबुड करू नये म्हणजे झालं… घरात आजकाल सगळं स्वतःचंच खरं असं सुरू होतं याचं.. आता तिथे ही… उपकार करतोय असं तर नाही ना दाखवायचं याला?" मधुरा स्वतःच्या विचारांच्या तंद्रीत होती.

"मधुरा, तुझ्या आई-बाबांना, माझ्या मम्मी-पप्पांना सांग ना फोन करून जॉबचं. आनंद वाटेल सगळ्यांना." रुद्र.

मधुराने दोन्हीकडे फोन लावले. मधुराला जॉब लागल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला. 

"सगळेच आनंदात आहेत, पण मग माझंच मन का अस होतंय. काही कळत नाहीये." मधुरा स्वतःशीच पुटपुटली.

"चला, मस्त पार्टी करू…. डिनर करायसाठी बाहेर जाऊ कुठेतरी… मधुरा… अगं कुठे हरवली आहेस?" रुद्र.

"काही नाही रे, तू एवढे आनंदाचे धक्के दिलेस ना.. काही सुचतच नाहीये." मधुराने काहीतरी बोलायचं म्हणून वेळ मारून नेली.

डिनरसाठी दोघे एका मोठ्या हॉटेलमध्ये गेले होते. रुद्रने सगळा मेन्यु मधुराच्या आवडीचा ऑर्डर केला होता. रुद्र खूप आनंदित वाटत होता पण मधुरा खूपच कन्फ्युज झाली होती. दोघेजण रात्री थोडे उशिराच घरी आले.

"मधुरा, तू झोप गं. थकली असशील ना? मला काही रेफरन्सेस बघायचे आहेत. उद्या एक केस आहे ऑपरेशनसाठी. थोडा व्ही. आय. पी. पेशंट आहे आणि केस पण जरा कॉम्प्लिकेटेड आहे."रुद्र.

मधुरा बेडरूममध्ये गेली. एकंदरीत रुद्रच्या वागण्याचा विचार करत मधुराला झोप लागून गेली. सकाळी उठली, उशीर झाला होता. नऊ वाजून गेले होते. 'रुद्र तर गेलाही असेल' स्वतःशीच बोलत ती तिचं आवरायला निघाली तेव्हा ड्रेसिंग टेबलच्या आरश्यावर तिला एक स्टिक नोट चिपकवलेली दिसली. त्यावर लिहिलं होतं, "गुड मॉर्निंग, सकाळी सकाळी एक इमर्जन्सी केस आली. निघताना तुला उठवायचा विचार आला होता पण तू खूप गाढ झोपली होतीस म्हणून आवाज नाही दिला. आजचा दिवसभर बहुतेक बिझिच असेल मी. कदाचित फोन पण नाही उचलणार. बाय." 

लिहिलेलं ते वाचून मधुराला छान वाटलं. कुठे ना कुठे रुद्र आपला विचार करतोय ही जाणीव आनंद देत होती. पण ही जाणीव किती दिवस तग धरणारी होती काय माहिती? मनातल्या मनात तिच्या विचारांचा झिम्मा सुरू होता, "प्रॉब्लेम्स कोणाला नसतात? सगळ्यांनाच तर असतात आणि प्रत्येकाला आपापला प्रॉब्लेम मोठा वाटत असतो. मला अजून हेच कळत नाहीये की तुला प्रॉब्लेम नेमका कशात आहे? तो नीट कळला तर सोडवायला मदत करेल की मी. पण कळायला तर हवं ना. तुझ्या मनाचा काही थांगपत्ताच लागत नाही रुद्र. ज्या गोष्टी मला हव्या असतात त्यासाठी तू विरोध करतोस आणि जेव्हा मी त्या गोष्टींच्या मागे लागण सोडून देते तेव्हा तूच ती आणून देतोस. काहीच कळत नाही मला तर. पण आता तरी रुद्र तू आहेस असाच नाही का रे राहू शकत? तू आनंदी आहेस तर बघ ना सगळंच चांगलं वाटतंय. एक सकारात्मक ऊर्जा मिळते जगताना. आपण एकटे नाही कोणीतरी आपल्या सोबत आहे ही गोष्ट किती समाधान देते मनाला. प्लिज असाच रहात जा ना! देवा, आता सगळं असच राहू दे रे बाबा! असच चांगलं राहायची बुद्धी दे माझ्या नवऱ्याला!"
 

राहील ना सगळं चांगलं? की अजून काही लिहून ठेवलय मधुराच्या नशिबात? पाहूया पुढच्या भागात
 

क्रमशः

फोटो -गुगलवरून साभार

(या मालिकेतील सगळे पात्र आणि घटना काल्पनिक आहेत)

                               © डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न