Login

मधुरीमा (भाग २५)

Story of two friends

मधुरीमा (भाग २५)

रुद्र रागारागाने तिथून निघून गेला. मधुरा त्याच्याकडे बघतच राहिली. 

"एवढं काय चुकीचं बोलले मी राग येण्यासारखं? एवढे दिवस घरी होते तर खाणं-पिणं, हिंडण-फिरणं यात मी काही ठरवलं तर बरं वाटत होतं सगळं. आता माझ्या करीयरचा विचार, नोकरीचा विचार, त्याबद्दलचा निर्णय माझा मी घेतेय तर त्यात माझी हुशारी काढायची? पण का? एवढही स्वातंत्र्य नसावं का मला?" मधुरा मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. रुद्रच्या बोलण्याचा विचार करून तिचं डोकं गरगरायला लागलं होतं.

"जाऊ दे ना. बोलला असेल. कामाचा ताण असेल काही. आपणही त्याच क्षेत्रातले ना. मी नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार त्याला. माझंही चुकलंच ना, मी असं फटकन बोलायला नको होतं. त्याच्याही मनात काही प्लॅन्स असतील, मी ते न जाणून घेता उगीचच बोलले. " मधुराने झालेल्या गोष्टीचा पुन्हा विचार केला. आपल्याकडून उगीच भांडण वाढायला नको म्हणून ती रुद्रला जेवणासाठी बोलवायला गेली. रुद्रही अगदी एक शब्दही न बोलता जेवण करून झोपून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करत होता. मधुरा नेहमीप्रमाणे त्याच्या मागे मागे करत होती पण रुद्र तिच्यासोबत अगदीच तुटकं बोलत होता. तयारी केली आणि रुद्र हॉस्पिटलमध्ये निघून गेला. रुद्रच्या अशा वागण्याचे मधुराला खूप वाईट वाटत होतं पण त्याला त्याचा वेळ द्यावा असा तिने विचार केला. सगळं आवरून ती सुद्धा जॉब शोधायला गेली. 

दोन-तीन दिवसात तिने ठरवलेल्या यादीप्रमाणे हॉस्पिटल्समध्ये स्वतःचा रेझ्यूमे दिला होता. काही हॉस्पिटल्सनी 'आमच्याकडे सध्या जागा रिक्त नाही. ती रिक्त झाली की आम्ही तुमचा नक्की विचार करू' असा प्रेमळ नकार कळवला होता. तर एक-दोन ठिकाणी तिची लगेच मुलाखत घेतली होती. पण मधुराच्या शिक्षणाच्या मानाने त्यांनी तिला खूपच कमी सॅलरी ऑफर केली होती आणि कामाचे तास पण इतर ठिकाणच्या मानाने जास्तच होते. घरात रुद्र नीट बोलत नव्हता आणि बाहेर हे अस होत होतं. ''काहीच चांगलं होत नाहीये, काय करावं? नैराश्य असंच असत का? बाप रे ! नकोच तो विचार. असं नोकरीसाठी दुसऱ्याच्या हाताकडे बघणं नकोच. त्यापेक्षा स्वतःच क्लिनिक सुरू केलं तर काय बिघडलं?"  तिने रुद्रला याबाबत बोलायच ठरवलं.

संध्याकाळी रुद्र घरी आला. मधुरा त्याला आवडतो तसा चहा बनवत होती. 

"सॉरी ना. जास्तच बोललो मी त्यादिवशी." मधुराला मागून मिठी मारत रुद्र बोलला.

"खरं तर मीच सॉरी म्हणायला हवं. मी किती फटकून बोलले ना तुला. तुझं मत विचारात न घेताच बोलले. पण आज मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. तुझी इच्छा असेल तर बोलू." मधुरा.

"बोल की. मस्त गरमागरम चहा आणि त्या सोबत पोटभर गप्पा.. मस्तच.. मग मॅडम, काय झालं जॉबच? कोणतं हॉस्पिटल जॉईन करणार मग?" रुद्र.

"तेच बोलायचं होतं रे. आपण स्वतःच क्लिनिक सुरू करायचं का? म्हणजे असं किती दिवस दुसरीकडे जॉब करणार ना. म्हणून म्हटलं" मधुरा.

"क्लिनिक सुरू करू पण आत्ताच नाही. मला माझ्या हिमतीवर सगळं सुरू करायचं आहे. आपण दहा बेडच हॉस्पिटल सुरू करायचं म्हटलं तर पप्पा पंचवीस बेडच सुरू करून देतील पण मला कोणाची मदत नकोय. सध्या हा जॉब करून थोडा पैसा जमवेन आणि मग बघू क्लिनिकचं. तसं पण माझा या इथल्या हॉस्पिटलबरोबर बॉण्ड केलेला आहे, तो संपेपर्यंत मला क्लिनिक वगैरे सुरू करता येणार नाही." रुद्र.

"अच्छा, किती दिवसांचा आहे बॉण्ड?" मधुरा.

"तीन वर्षे. आता कुठे एक वर्ष संपत आलंय." रुद्र.

"काय? तीन वर्षे. एवढ्या मोठ्या काळासाठी करतं का कोणी बॉण्ड वगैरे?" मधुरा.

"कोणी करतं का म्हणजे? मला योग्य वाटलं म्हणून मी केला. मला माहिती नव्हतं ना की तुझ्यासारख्या हुशार गोल्डमेडलिस्ट मुलीसोबत माझं लग्न होणार आहे. माहिती असतं तर केला नसता. तुझं गोल्डमेडल पाहून पेशंट आले असते ना क्लिनिकमध्ये." रुद्र वाकडं तोंड करत फटकन मधुराला बोलला.

"अरे, आपण अडकून पडतो ना अशा बॉण्डमुळे म्हणून म्हटलं. बरं, जाऊ दे. तू नको क्लिनिक सुरु करू. मी सुरू करते क्लिनिक, तू तुझा जॉब कर." मधुरा स्वतःवर ताबा ठेवत बोलली. रुद्रने परत मधुराची बुद्धिमत्ता काढली होती, खरंतर मधुराला रुद्रचा खूप राग आला होता. पण परत आपल्या बोलण्याने विषय चिघळायला नको म्हणून ती स्वतःला सावरत बोलत होती.

"अरे वा! काल परवापर्यंत मॅडमला जॉब करायचा होता, आता क्लिनिक सुरू करायचं आहे का? एक निर्णय तरी घेता येतो का ठामपणे? बरं तुझ्या निर्णयाचं बघू नंतर, आधी हे सांग इथं जागेच भाडं किती द्यावं लागतं तुला माहिती तरी आहे का? जागा भाड्याने घेतो म्हटलं तर डिपॉझिटचे पैसे वेगळे, तीनचार महिन्यांचं भाडं ऍडव्हान्स मध्ये ते वेगळं. एवढं करून तुझं क्लिनिक नीट चाललं तर बरं. नाही तर माझा सगळा पगार फक्त भाडं भरण्यातच जाईल." रुद्र खूप चिडून बोलत होता.

"एवढा कसा रे नकारात्मक बोलतोस तू. मी फक्त माझ्या डोक्यातले विचार बोलून दाखवले. अजून सुरुवात पण नाही केली तर लगेच नकारघंटा वाजतोय. सुरुवात तर करावी लागेल ना. प्रत्येक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काय अगदी पाहिल्यादिवसापासून अगदी शंभर-शंभर पेशन्ट्स येतात का? आणि पैशाचा प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे आहेत माझे सेविंग्स, ते वापरून प्रश्न सुटू शकतो. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी क्लिनिक सुरू केलं तर ते नक्की व्यवस्थित चालेल." मधुराचाही पारा वर चढला होता.

"कर ना मग. खूप पैसा पैसा करतेस, कर मग तुला हवं तसं. आणि तसंही मी कमावलेल्या पैशात तुझं काही होत नसेल ना. तुला तुझा पैसा हवा असेल. कर..." हातातला कप फाटकन जमिनीवर फेकून रुद्र घराबाहेर निघून गेला. फुटलेल्या कपाच्या तुकड्यांकडे मधुरा एकटक बघत होती. डोळ्यातल्या धारा थांबायचं नाव घेत नव्हत्या. तेवढ्यात सुमनताईंचा फोन आला.

"हॅलो, मधुरा. कशी आहेस गं? एवढी आठवण येतेय तुझी काय सांगू! मधुरा आता आम्ही नाही तर तुला एकटं वाटत असेल ना घरात. तू पण आता नोकरीच बघ गं. एवढी शिकलीस ते काय घरात बसायसाठी का? एक सासू म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून सांगतेय, हवं तर मैत्रीण समज. स्वतःच्या पायावर उभं असणं कधीही चांगलंच." सुमनताई तिकडून बोलत होत्या. आवंढा गिळून, आपलं रडणं दाबत मधुरा शांतपणे ऐकत होती. तिच्याच्याने एक शब्दही बोलल्या जात नव्हता.

"फोन लागला की नाही, की मी एकटीच बडबड करतेय? हॅलो, मधुरा.. मधुरा. नेटवर्क खराब असेल बहुतेक." अस म्हणत सुमनताईंनी फोन ठेऊन दिला.

"माझं बोलणंच चुकीच आहे ना. मी बोलले की भांडणं होतात आजकाल. दोन-चार दिवस मी काहीच बोलले नाही तर सगळं सुरळीत सुरू होतं. आज बोलले.. झाला ना पुन्हा वाद. रुद्र पण सांगत नाही नेमकं त्याच्या मनात काय सुरू आहे ते. एवढीच नोकरी न करणारी, घरदार सांभाळणारी बायको हवी होती तर कमी शिकलेली करायची होती ना. वरून माझंच शिक्षण काढायचं. काय तर म्हणत होता, 'मी पैसा पैसा करते, मला पैसे पुरत नाहीत म्हणून मला जॉब करायचा.' काही आत्मिक समाधान, समाजसेवा नावाची गोष्ट असते की नाही. आपला पेशा कोणता? आपण बोलतोय काय? काही तरी तारतम्य असावं." मधुरा खूप विचलित झाली होती. 

'सगळं असच सुरू राहील का? हे नातं न्यावं का पुढे? की खूप घाई होतेय असा विचार करण्यामागे? आई बाबा त्यांना काय वाटेल? रुद्रचे मम्मी पप्पा, ते काय विचार करतील? असं तर होत नाहीये की मी या नात्याला तेवढा अजून वेळच देत नाहीये?' कितीतरी प्रश्न मधुराच्या डोक्यात फिरत होते. विचारांचा गुंता सोडवता सोडवता मधुराला सोफ्यावरच झोप लागली. रुद्र रात्री उशिरा घरी आला होता. मधुराला सोफ्यावर झोपलेलं पाहून तो तसाच आत निघून गेला.

सकाळी मधुराला जाग आली. रडून रडून तिचे डोळे खूप सुजले होते आणि डोकंसुद्धा दुखत होतं. तिने घड्याळात पाहिलं, रुद्रची निघायची वेळ व्हायची होती. "माझा राग उगी खाण्यावर काढेल. रात्री पण काही खाल्लं की नाही काय माहिती" स्वतःशीच बडबडत  तिने पटकन उठून चहा आणि नाश्ता बनवला. रुद्र स्वतःच आवरून हॉलमध्ये आला, मधुराकडे न बघताच सरळ निघाला होता.

"रुद्र." मधुरा आवाज देईपर्यंत तो गेला होता.
 

क्रमशः

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.)

फोटो- गुगलवरून साभार

                              © डॉ. किमया मुळावकर

 

🎭 Series Post

View all