मधुरीमा (भाग २४)

Story of two friends


मधुरीमा (भाग 24)

चार-पाच दिवसात मधुरा बऱ्यापैकी रुळली होती घरात. मधुरा सुमनताईंच्या सतत सोबतच राहत होती. सुमनताई सुध्दा आपल्या लेकीची राहिलेली सगळी हौस-मौज मधुरासोबत पूर्ण करून घेत होत्या. डेझी आणि रवीश अमेरीकेला परत गेले होते. रुद्रच्या सुट्याही संपत आल्या होत्या. मधुराला सोबत घेऊन त्यालाही दिल्लीला जायचे होते. लग्नाच्या काही दिवस आधीच रुद्रने दिल्लीत एक घर भाड्याने घेतले होते. त्या घरात सामान घेण्यापासून लावण्यापर्यंत सगळं काम बाकी होतं. मधुराला एकटीला दिल्लीला पाठवायची पुरुषोत्तमरावांची इच्छा होत नव्हती.

"मी काय म्हणतो सुमन, दोन दिवसात रुद्र आणि मधुरा दिल्लीला जातील. तिकडं अजून सगळं व्यवस्थित नाहीये. घर वगैरे सगळं नीट लावणं गरजेचं आहे. मधुरा एकटीच गेली तर कामाचा सगळा भार तिच्यावरच पडेल. आत्ता नवीन लग्न होऊन आली ती पोर आपल्याकडे, सगळा कामाचा भार तिच्यावर टाकायची मुळीच इच्छा नाहीये माझी. बरं, जाऊ नको असं म्हणणं पण आपल्याला योग्य वाटणार नाही. काय करायचं मग?" पुरुषोत्तमरावांनी मनातली चिंता सुमनताईंना बोलून दाखवली. इतक्यात मधुरा तिथे आली.

"मम्मी-पप्पा, तुम्ही पण चला ना दिल्लीला आमच्यासोबत. आम्ही तिकडे गेलो की लगेच रुद्र हॉस्पिटलमध्ये जॉईन होईल आणि मला गेल्या गेल्या लगेच जॉब मिळेल का? कधी मिळेल हे ही माहीत नाही. शहर नवीन, सगळंच नवीन आणि  मला एकटीलाच राहावं लागेल. तुम्ही दोघे सोबत आलात तर नवीन शहरात मला एकटं वाटणार नाही. मग येताय ना आमच्यासोबत? मी रुद्रला तुमचेही तिकीट्स काढायला लावते." पुरुषोत्तमराव आणि सुमनताईंच हो-नाही उत्तर ऐकायच्या आत मधुरा तिथून गेलीसुध्दा होती. मधुराचं असं हक्क गाजवणं दोघांनाही सुखावून गेलं होतं.

राधिकाताई आणि मधुकररावांची धावती भेट घेऊन सगळेजण दिल्लीला जायला निघाले होते.

"दिल्ली… आतापर्यंत फक्त सिनेमात आणि टी. व्ही. वरच पहिलं होतं .. कसं असेल शहर? मोठ्ठं शहर… कितीतरी मोठे हॉस्पिटल्स असतील तिथे...कोणत्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळेल मला? रुद्रचं हॉस्पिटल कसं असेल? कस असेल त्याने घेतलेलं घर, मोठं शहर म्हणजे राहायला जागा कमी असं तर नसेल ना? घराची अवस्था खूप खराब तर नसेल? काय सामान आणावं लागेल बरं?" असे एक नाही हजार प्रश्न डोक्यात घेऊन मधुराचं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. टॅक्सीतून घरी जाताना मधुरा डोळे भरून दिल्ली बघत होती. विचारांच्या तंद्रीतच टॅक्सी घराजवळ थांबली. मधुरा खाली उतरून सगळीकडे बघत होती. घर खूप चांगल्या वसाहतीमध्ये होते. सगळे रो-हाऊस.. एकसारखे… प्रत्येकाच्या घरासमोर वॉल कंपाउंड, छोटं छोटं अंगण आणि एक कार बसेल एवढी जागा. मधुरा सगळं न्याहाळत होती. रुद्रच्या आवाजाने ती भानावर आली. रुद्रने तोवर गाडीतून सामान वगैरे उतरवून घेतलं होतं. 

"हे घे चावी. तूच उघड कुलूप. हा इथला गृहप्रवेश समज." घराची चावी मधुराला देत रुद्र म्हणाला.

रुद्रजवळची चावी घेत मधुराने दरवाजा उघडला. विचार केला होता तेवढं घर खराब नव्हतं. घरात बरचस फर्निचरसुध्दा होतं. सुमनताईंनी आधी जाऊन स्वयंपाकघर आणि बाथरूम पाहिलं. दोन्ही सुस्थितीत होते, नळांना पाणी होतं हे पाहून त्यांना हायसं वाटलं. सोबत आणलेलं सामान एका कोपऱ्यात ठेऊन दोघी घराची साफ सफाई करायला लागल्या. पुरुषोत्तमरावही त्यांना सामील झाले होते. रुद्र चहा नाश्त्याची सोय करण्यासाठी बाहेर गेला होता.

पार्सल घेऊन रुद्र परत आला. सुमनताईंजवळ पार्सल देत त्याने मधुरा कुठे आहे विचारलं आणि आतल्या रूममध्ये गेला. नाका तोंडाला रुमाल बांधून मधुराची तिथली साफ सफाई सुरू होती. रुद्रने मधुराला हळूच जवळ ओढलं,

"सॉरी मधुरा, माझ्यामुळे तुला हे सगळं करावं लागतंय. घरातही काहीच सामान नाही.  सगळं विकत आणत बसावं लागेल. मी सगळं सेट करून ठेवणार होतो गं, पण लग्नाची खरेदी, त्यात माझ्या इमर्जन्सी केसेस… वेळ नाही मिळाला गं. प्लिज तू राग नको ना मानू." मधुराच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढत अगदी केविलवाणा चेहरा करत रुद्र बोलत होता.

"सॉरी कशाला म्हणतोस. उलट मीच थँक्स म्हणायला हवं. माझं घर मी हवं तसं लावू शकेल, माझ्या मनासारखं सजवू शकेल त्यामुळे. रुद्र, या घराचं भाडं किती आहे रे? तसं नाही, घर चांगल्या एरियामध्ये आहे आणि बरच मोठं आहे म्हणून विचारलं." मधुरा.

"आमचे डीन आहेत ना, त्यांच्या कोणत्यातरी नातेवाईकांचं आहे हे घर. ते विदेशात असतात म्हणे. भाडं नको देऊ अगदी तसंच राहा असं म्हणत होते सर. पण आपल्याला चांगलं दिसतं का तसं. म्हणून उगी नॉमिनल भाडं आहे. जाऊ दे ना, तू नको डोकं घालू त्यात." रुद्र.

"बरं, आता गप्पा आणि प्रेमानीच पोट भरायचंय की आणलंय काही खायला?" मधुरा.

"हो. आणलंय की मॅडम. चला बाहेर. खाऊन घेऊ." रुद्र आणि मधुरा दोघे बाहेरच्या रुममध्ये आले, रुद्रने आणलेल्या पदार्थांवर सगळ्यांनी ताव मारला आणि पुन्हा सगळे कामाला लागले. रात्र होईपर्यंत बऱ्यापैकी घर साफ झाले होते. रात्री जेवायला सगळे बाहेर गेले होते. घरी परत आल्यावर सोबत आणलेल्या चटई-बेडशीटवर सगळयांना अगदी गाढ झोप लागली.

सकाळी उठल्यावर सुमनताईंनी स्वयंपाकघरात लागणाऱ्या सामानाची आणि वाण-सामानाची यादी बनवली. रुद्र हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पुरुषोत्तमराव, सुमनताई आणि मधुरा खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. मधुरा काय हवंय, काय नको ते दोघांनाही हक्काने सांगत होती. दोघेहीजण आपल्या या लेकीचं सगळं कौतुकाने करत होते. बघता बघता पंधरा-वीस दिवसात सगळं घर नीट लागलं होतं. पुरुषोत्तमरावांनी छोट्याश्या अंगणात वेगवेगळी छोटी छोटी झाडं आणून छोटुशी बाग तयार केली होरी. तरी पण घरात कोणत्या तरी गोष्टीची कमकरता मधुराला जाणवत होती, कोणती ते तिलाही कळत नव्हतं. घरातलं आवरता आवरता तिला एकदम काही तरी आठवलं. पुरुषोत्तमराव आणि सुमनताईंना सोबत घेऊन ती दुपारी मार्केटमध्ये गेली. तिथे तिने एक सुंदर, रेखीव लाकडी देवघर विकत घेतलं. सुमनताईंच्या मनाप्रमाणे त्या देवघरात नीट बसतील अशा देव-देवतांच्या मूर्ती घेतल्या. दिवा, धूपबत्ती पासून पूजेसाठी लागणारे सर्व सामान विकत घेतले. सुमनताई आपल्या सुनेच्या या वागणुकीने अगदी धन्य धन्य झाल्या होत्या.

दुसऱ्यादिवशी दोघीजणींनी सकाळी लवकर उठून पूजा, अभिषेक वगैरे करून विधिवत देवघरात देवस्थापना केली. देवासमोर दिवा लावला, धूपबत्तीचा सुगंध घरभर दरवळला. सगळं वातावरण अगदी प्रसन्न, चैतन्यमय झाल होतं.

"मधुरा, अगं घरातलेच देव इथे तुझ्यासोबत द्यायची इच्छा होती माझी. पण मग मी विचार केला, तू आधुनिक युगातली मुलगी, तुला आवडेल की नाही, त्यात तू पेशाने डॉक्टर. उगी माझी श्रध्दा मी तुझ्यावर थोपवते असं नको व्हायला. पण काल तू माझा गैरसमज दूर केलास." सुमनताई मधुराच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बोलल्या.

"मम्मी, खर सांगू. हे पूजा वगैरे मला येत नाही. घरी आई करायची, इकडे गावी तुम्ही करायच्या. त्यामुळं घरात एक सकारात्मक ऊर्जा जाणवायची. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न वाटायचं. मग वाटलं इथेही करूयात हे सगळं. तुम्ही शिकवा मला पूजा, मी करत जाईन आणि पुढे जॉब सुरू झाला आणि एखाद्यावेळी मला वेळ नाही मिळाला पूजा करायला तर चालत असेल ना देवबाप्पाला?" मधुरा.

"हो गं. चालतं. आपल्या मनात भाव निर्माण होणे महत्त्वाचे." सुमनताई.

दिवस सरत होते.  रुद्र आणि मधुराचं प्रेमही मस्त फुलत होते. एकमेकांची काळजी घेणं, समजून घेणं, सगळं अगदी स्वप्नवत सुरू होतं. रुद्रला सुट्टी असेल त्यादिवशी दिल्ली दर्शन होत होतं. तो दिवस मस्त हिंडण्या-फिरण्यात, बाहेर खाण्या-पिण्यात जात होता. बघता बघता मधुराच्या लग्नाला तीन महिने झाले होते. पुरुषोत्तमराव आणि सुमताईंचा दिल्ली मुक्कामही बराच दीर्घ झाला होता.

"सुमन, खूप दिवस झाले आता इकडे येऊन. पहिल्यांदाच शेतीकडे एवढं दुर्लक्ष केलंय. पण आता परत गावी जायची इच्छा आहे माझी. असं दुसऱ्याच्या भरवशावर एवढे दिवस सगळा कारभार सोपवणं बरं नाही वाटत. तुझी इच्छा असेल तर राहा तू इथे अजून काही दिवस." पुरुषोत्तमराव.

"तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. तसं पण रुद्र आणि मधुराला हवा तसा वेळ मिळाला नाहीये. मी पण येते सोबत. त्या दोघांचं आयुष्य आहे, जगू देऊ आता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे. संध्याकाळी रुद्र आला की तुम्ही बोलून घ्या. एक-दोन दिवसात निघू आपण. आणि हो ट्रेनचंच तिकीट काढा. मला बाई त्या विमानात भीतीच वाटते. एवढ्या वरून पडलं-बिडलं तर!" सुमनताईंच्या या वाक्यावर पुरुषोत्तमरावांना हसू आलं. रात्री रुद्र घरी आल्यावर पुरुषोत्तमरावांनी गावी जाण्याबद्दल सांगितलं. पुरुषोत्तमराव आणि सुमनताईंनी जाऊच नये अशी मधुराची इच्छा होती, परंतु पुरुषोत्तमरावांनी सांगितलेलं कारणही योग्य होतं त्यामुळे मधुरा काही बोलली नाही. 

दोन दिवसांनंतर सुमनताई आणि पुरुषोत्तमराव गावी गेले. रुद्रला वेळेवर इमर्जन्सी आल्यामुळे मधुरा त्या दोघांना स्टेशनवर सोडून दुपारी घरी आली होती. घरी आल्यावर तिला घर एकदम शांत वाटायला लागलं होतं. या दोन-तीन महिन्यात तिला दोघांची खूप सवय झाली होती. आता मात्र घरात तिला उदास वाटत होतं. रुद्रची वाट पहात तिचा डोळा लागला होता. संध्याकाळच्या सुमारास रुद्र घरी आला, तो फ्रेश होईपर्यंत मधुराने छान चहा बनवला.

"रुद्र, मी काय म्हणतेय, मी जॉब करू का रे आता? पहिली गोष्ट म्हणजे खूप दिवसांचा ब्रेक झालाय आणि आता तर मम्मी पप्पा पण नाहीयेत इथे. मला खूप कंटाळा येतो रे एकटीला घरात बसून." मधुरा चहाचा कप रुद्रच्या हातात देत बोलली.

"हो, कर ना जॉब. मी कधी नाही म्हटलोय का तुला? पण एक सांगू का? मला ना असं खूप छान वाटतं.. असं मी थकून-भागून घरी येतो मग तू असा मस्त वाफाळलेला चहाचा कप हातात देतेस.. माझ्या मागे मागे करत राहतेस.. घरात तुझी बडबड सुरू असते. पण मग तू हॉस्पिटलमध्ये जाशील तेव्हा कदाचित मी घरी असेल आणि जेव्हा तू घरी असशील कदाचित मला इमर्जन्सी येईल काही. एकमेकांना वेळही देता येणार नाही." रुद्र. 

"हो. पण एकमेकांसाठी वेळ काढण्यातही मजा असेल ना? कदाचित अशा मिळणाऱ्या वेळेची आपल्याला जास्त किंमत वाटेल. आणि तसंही आज तुझ्यासोबत जॉब बद्दल बोलले तर लगेच उद्या मी हॉस्पिटल जॉईन करतेय असं तर नाही ना?" मधुरा.

"ठीक आहे. इथले काही चांगले हॉस्पिटल्स आहेत, मी तुला त्यांची नावं आणि पत्ता सांगतो. बघ त्यापैकी तुला कोणतं योग्य वाटेल ते." रुद्र थोडं तिरकस बोलला.

"रुद्र, मला करू दे हे काम. दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायची सवय नाहीये मला. तू माझी ही सवय बदलू नकोस प्लिज. मी यादी बनवलीये हॉस्पिटल्सची. आधी तिथे बघते काय होतं ते, नाहीच काही जमलं तर तू सांग मग मला." मधुरा.

"आता तुझं सगळं ठरलंच आहे, काय आणि कसं करायचं ते, तर मग कर ना. उगीच हे सगळं मला विचारायचा आव कशाला आणायचा? एवढी हुशार आहेस तर कर मग सगळं मॅनेज. काय तर म्हणे 'दुसऱ्यावर अवलंबून नाही राहत'" रुद्र रागारागाने तिथून निघून गेला. मधुरा त्याच्याकडे बघतच राहिली.
 

भांडणाची ठिणगी पडली होती. ही ठिणगी विझून जाईल की धुमसत राहील अशीच आणि वणवा पेटवेल? रुद्र करू देईल का मधुराला जॉब? काय झालं होतं मधुरा आणि रुद्रमध्ये असं की मधुरा 'तो असेल' या विचारानेच घाबरली होती? पाहूया पुढच्या भागात.
 

क्रमशः

फोटो - गुगलवरून साभार

(या कथामालिकेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.)
 

                                    © डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all