मधुरीमा (भाग २३)

Story of two friends


मधुरीमा (भाग २३)

रोषणाईने सजवलेल्या एका मोठ्या टोलेजंग वाड्यासमोर गाडी थांबली. मधुरा आणि रुद्र गाडीतून खाली उतरले. दारातच काही बायका औक्षणाचं ताट घेऊन उभ्या होत्या. सुमनताई आत गेल्या. त्यांनी रुद्र- मधुराला औक्षण केलं. भाकर तुकडा ओवाळून टाकला. उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदुळाच्या कलशाला पाय लावून, समोर ठेवलेल्या कुंकवाच्या ताटात पाय ठेऊन मधुराने लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश केला. राधिकाताईंनी सांगितला होता तसाच वाडा होता, जुना पण नवीन विचारसरणीने सजलेला. मधुरा सगळा वाडा न्याहाळत होती. सुमनताई दोघांना घेऊन देवघरात गेल्या. देवदर्शन घेऊन दोघे बाहेर आले. त्यानंतर सुमनताईंनी घरातल्या सगळ्या लोकांसोबत मधुराची ओळख करून दिली. रात्रीची जेवणं आटोपून सगळे झोपायला गेले. मधुरा आणि आत्या दोघी एका रूममध्ये होत्या. नवीन ठिकाणी मधुराला झोप येत नव्हती, या कडावरून त्या कडावर असं कूस बदलणं सुरू होतं तिचं.

"मधू, झोप येत नाहीये का?" आत्या.

"हो." मधुरा.


"ये माझ्याजवळ." आत्याने तिला कुशीत घेऊन बाळासारखं थोपटलं.

"आई बाबांची खूप आठवण येतेय. वेगळंच वाटतंय गं इकडे सगळं." आत्याच्या कुशीत रडतच मधुरा बोलली.

"हो, आठवण तर येणारच. सगळ्याजणी या मनःस्थितीतून जातात. पण जोपर्यंत तू मनापासून सगळी नाती स्वीकारत नाहीस, तोपर्यंत एक परकेपणा तुला जाणवतच राहील. आपल्याच हातात असतं कधी आणि किती नात्यांमध्ये एकरूप व्हायचं ते. घरातले सगळे लोकं चांगले आहेत मधू. नव्या नात्यांच्या दडपणाखाली तू स्वतःला नको बदलूस. एकदा इकडे रुळली ना की मग माहेरी आल्यावर इकडची आठवण येत जाईल. आमचं तर असंच होतं बघ. सासरी असलं की वाटतं माहेरी जावं अन् माहेरी आलं की सासरचे वेध लागतात." आत्या मधुराला थोपटत बोलत होती. आत्याच्या गप्पा ऐकता ऐकता मधुराचा डोळा लागला.


सकाळी सकाळी मधुराला जाग आली. दचकून उठून तिने घड्याळात पाहिलं. सात वाजले होते. रूममध्ये आत्या दिसली नाही म्हणून तिने बाथरूममध्ये पाहिलं, आत्या तिथेही नव्हती. तिला काय करावं ते सुचत नव्हतं. फ्रेश होऊन छानशी साडी नेसून ती तयार होऊन बसली. सहज म्हणून मोबाईल पाहिला.  रुद्रचा मेसेज आलेला होता.

'गुड मॉर्निंग!... आणि सगळ्यात पहिले सॉरी. कालपासून तुझ्यासोबत काहीच बोललो नाही. कधी झोप लागून गेली मला कळलंच नाही. रागावू नकोस ना. मला माहितीये, या घरात मीच तुझ्या ओळखीचा आहे आणि मीच तुला कम्पनी देत नाहीये. सॉरी... चहा घ्यायला ये. मम्मी आलीच असेल तुला बोलवायला.' मधुराने मॅसेज वाचला अन् एक गोड हसू तिच्या ओठांवर आलं. तेवढ्यात सुमनताई आणि आत्या तिच्या रूममध्ये आल्या. त्या दोघींसोबत ती चहा घ्यायला डायनिंग टेबलवर आली. रुद्र आधीच तिथे बसून होता. दोघांचं जुजबी बोलणं सुरू होतं. तेवढ्यात रुद्रने कोणालातरी फोन लावला.

"हॅलो.. हां.. हां... हो हो... सगळे मजेत.. हो हो... रात्री उशिर झाला होता म्हणून फोन नाही केला. बरं... एक मिनिट हां...." हे घे मधुरा, बाबांशी बोल. मधुराने आश्चर्याने रुद्रकडे पाहिलं. आई बाबांसोबत बोलून तिला बरं वाटलं. रुद्रबद्दल तिच्या मनात अजून आदर वाढला होता. रुद्रची अशी न बोलता, न सांगता काळजी घेणं तिला आवडून गेलं होतं.  त्यानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाला. 

सुमनताईंनी सांगितल्या प्रमाणे मधुरा छानशी साडी नेसून, सर्व दागदागिने घालून तयार झाली होती. सुनमुख बघायला गावातल्या बऱ्याच बायका आल्या होत्या. सगळ्यांनी मधुरासाठी साड्या, वेगवेगळ्या भेटवस्तू आणल्या होत्या. मधुरा बायकांच्या घोळक्यात बसली होती. रुद्र जाता-येता तिच्याकडे बघत होता. इशाऱ्या- इशाऱ्यानीच दोघांच काहीतरी बोलणं सुरू होतं. डेझी दोघांची मजा बघत होती. नव्या नात्यातलं नवखेपण मधुरा अनुभवत होती.

संध्याकाळी स्वागत-समारंभ होता. कार्यक्रमासाठी राधिकाताई आणि मधुकरराव दोघेही आले होते. त्या दोघांना तिथे पाहून मधुराला खूप आनंद झाला होता इतका जसं काही खूप वर्षांनी भेटतेय दोघांना. लग्नसोहळा जसा थाटात पार पडला होता, तसाच स्वागत समारंभही तोडीस तोड झाला होता. राधिकाताई आणि मधुकरराव रात्री आष्टेकरांकडे मुक्कामी थांबले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकरराव मधुराला मांडव परतणीसाठी सोबत घेऊन निघाले होते. मधुरा दोनच दिवस सासरी होती पण घरातल्या लोकांबद्दल एक प्रकारची ओढ तिला जाणवत होती. आत्याने सांगितलेले शब्द तिला आठवत होते. सासर आणि माहेर असं तिचं मन तळ्यात-मळ्यात होत होतं. रुद्रही एवढूस तोंड करून बसला होता. 

"जवाईबापू, अहो रीत असते तशी म्हणून नेतोय हो मधुराला. तुम्ही अगदी उद्याच तिला घ्यायला आले तरी चालतं बरं. त्यानंतर मात्र प्रत्येक वेळी तुम्ही दोघं सोबत यायचं आमच्या घरी." रुद्रचा एवढूसा चेहरा बघून  मधुकरराव बोलले. आनंदाची लकेर रुद्रच्या चेहऱ्यावर उमटली. जाता जाता मधुकररावांनी रवीश आणि डेझीला घरी येण्याचे आमंत्रण दिले.

आई बाबांसोबत मधुरा घरी आली. खूप वर्षांनंतर घरात आल्यासारखं वाटलं तिला. मधुराचं सगळं घर डोळ्यात साठवणं सुरू होतं. राधिकाताईंनी मस्त आलं घालून फक्कड चहा केला होता. चहा घेत तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. घरी आल्यानंतर खूप दिवसांनी मधुराला शांत झोप लागली होती. दोन दिवस राधिकाताईंनी मधुराच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले होते. दोन दिवसांनी रुद्र मधुराला घ्यायला आला. मधुकररावांनी आग्रहाचे आमंत्रण दिले म्हणून सोबत रवीश आणि डेझी सुध्दा होते. 

जावई पहिल्यांदा घरी आला होता. मधुकरराव आणि राधिकाताईंनी त्यांची खूप खातीरदारी केली. रुद्र त्यामुळं खूप संकोचला. 

"जावई म्हणून वागवणार असं असेल तर मी येणारच नाही पुढच्यावेळी. मी तुमच्या मुलासारखाच आहे. तुमच्या दोघांमध्ये मी माझे मम्मी पप्पा बघतो. हक्काने मला सगळं सांगत जा. प्लिज." रुद्र मधुकरावांचा हात हातात घेत बोलला. त्याच्या अशा बोलण्याने मधुराही सुखावली होती. लग्न झाल्यापासून शंकांचा एक एक पडदा गळून पडत होता. विचारांचं मळभ हळूहळू दूर होत होतं, सगळं स्वच्छ, निर्मळ दिसत होतं.


रुद्र, रावीश, डेझी आणि मधुरा वापस निघाले होते. रवीश आणि डेझिचा स्वभाव अगदी मनमोकळा होता. रुद्रही भरपूर बोलका, सतत छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करणारा होता. हसत, खेळत, दिलखुलास गप्पा करत त्यांचा प्रवास मस्त झाला.

दुसऱ्यादिवशीपासून सुमनताई आपल्या दोन्ही लेकांना आणि सुनांना घेऊन ग्राम देवतेचे दर्शन, कुलदैवताचे दर्शन, नंतर मग हा नवसाचा गणपती, ती प्रसिद्ध देवी, इथलं पुरातन मंदिर अशा खूप साऱ्या तीर्थक्षेत्री जाऊन आल्या होत्या. रवीशच्या लग्नावेळी त्यांची राहिलेली इच्छा त्यांनी आत्ता पूर्ण केली होती. दोन-तीन दिवस सतत फिरण्यात आणि प्रवासात गेले होते. सगळे थकून भागून घरी आले होते. मधुरा, डेझी आणि सुमनताई एकाच रूममध्ये होत्या, अगदी पडल्या पडल्या तिघींनाही झोप लागली होती.


दिवस उजाडला. बाजूच्या गावात देवीचा उत्सव आणि जत्रा होती. या गोष्टी डेझीने कधीच पहिल्या नव्हत्या. तिथे जाण्याची तिची खूप इच्छा होती. सुमनताईंनी रुद्र, मधुरा, रवीश आणि डेझीला तिथे पाठवले. डेझीसोबत मधुरानेही बऱ्याच वर्षांनंतर या गोष्टी अनुभवल्या होत्या. रात्रीचं जेवण बाहेरच करून चौघे वापस घरी आले. पुरुषोत्तमराव सोफ्यावर बसले होते. रवीश आणि रुद्र त्यांच्याजवळ गप्पा मारत बसले. मधुरा रोजच्या सवयीप्रमाणे गेस्ट रुममध्ये जायला निघाली होती. सुमनताईंनी तिला फ्रेश होण्यासाठी डेझीच्या रूममध्ये पाठवलं. चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन मधुरा डेझिच्या रूममध्ये गेली. त्यानंतर सुमनताई तिथे आल्या. दोघी सुना जत्रेतल्या गमतीजमती, खरेदी केलेल्या निरनिराळ्या गोष्टी सुमनताईंना दाखवत होत्या. सुमनताई पण दोघींचं कौतुक अगदी भरभरून करत होत्या.

 नंतर सुमनताईंनी "मधुराला रुद्रची रूम तरी दाखव" असं
 डेझीला सांगितलं. दोघीजणी रुद्रच्या रूममध्ये गेल्या. संपूर्ण रूम सुंदर फुलांनी सजवलेली होती. मधुरा जे समजायचं ते समजून गेली. डेझी तिला आत सोडून बाहेर निघून गेली.

ऑकवर्ड झालेल्या मधुराला काय करावं ते कळत नव्हतं म्हणून तिने रुममधली खिडकी उघडली. थंडगार हवेचा झोत अंग शहारून गेला होता. बाहेर आकाशात पडलेलं टिपूर चांदणं बघत मधुरा खिडकीपाशी उभी होती. दूर कुठेतरी जुनी गाणी वाजत होती. इतक्यात दाराचा आवाज झाला, तिने मागे वळून पाहिलं, रुद्र होता. स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकत मधुरा तिथेच उभी होती. रुद्रही खिडकीपाशी येऊन उभा राहिला. बाहेरचं आणि खिडकीतलं टिपूर चांदणं तोही न्याहाळत होता. मधुरा सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करत होता. मधुराही बऱ्यापैकी मोकळी झाली होती. बोलता बोलता रुद्रने मधुराचा हात हातात घेतला. दुरून कुठूनतरी गाण्याची धून ऐकू येत होती

             सितारों की महफ़िल ने करके इशारा 

             कहा अब तो सारा जहाँ है तुम्हारा 

             मुहब्बत जवाँ हो, खुला आसमाँ हो 

             करे कोई दिल आरज़ू और क्या 

             ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा

             कहा दो दिलों ने, 

             की मिल कर, कभी हम न होंगे जुदा
 

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

(या कथामालिकेतील सगळी पात्रं आणि घटना काल्पनिक आहेत.)
 

                                  © डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all