Dec 01, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग २१)

Read Later
मधुरीमा (भाग २१)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


मधुरीमा (भाग २१)


हळदीचा दिवस होता. मधुरा आणि रुद्रची हळद संध्याकाळी सोबतच लागणार होती.  सकाळपासून सगळ्यांचीच घाईगडबड सुरू होती.  संध्याकाळचा कार्यक्रम लॉनवर होणार होता. लॉनवरील स्टेज डेकोरेशन आतापर्यंत होणं अपेक्षित होतं परंतु अर्ध काम बाकीच होतं. सगळं नीट पार पडेल की नाही याची चिंता मधूकरावांना सतावत होती. सौरभ आणि प्रथमेश मधुकररावांसोबत सगळ्या कामांमध्ये मदत करत होते. रीमा, आभा मधुरासोबत होत्या. त्यांच्या गप्पा काही केल्या संपायचं नाव घेत नव्हत्या.

संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास रुद्र आणि आष्टेकर परिवाराचे आगमन झाले. कानिटकर परिवाराने मस्त बँड लावून मोठ्या धुमधडाक्यात आष्टेकरांच स्वागत केलं. रुद्रची नजर आल्यापासून मधुराला शोधत होती. पण मधुरा त्याला कुठेच नजरेस पडत नव्हती. मधुरा मात्र तिच्या रूमच्या खिडकीतून बाहेरच सगळं बघत होती. तिच्या सोबत रीमा आणि आभा होत्याच, दोघीजणी तिला रुद्रच्या नावावरून खूप चिडवत होत्या.

हळदीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी पिवळे, केशरी रंगाचे कपडे घालायचे असं आधीच ठरलेलं होतं.  मधुरा पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती. त्यावर तिने छानशी नाजूक फ्लोरल ज्वेलरी घातली होती. मेहेंदीचा रंगही मस्त खुलला होता. पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा रुद्रवर शोभून दिसत होता. स्टेजवर दोन चौरंग आणि दोन पाट टाकलेले होते.  रुद्र आणि मधुराला तिथे बसायला लावले होते. आधी रुद्रला हळद लावण्यात आली त्यानंतर त्याची उष्टी हळद मधुराला लावली गेली. नंतर दोन्ही परिवारातील एक एक व्यक्ती येऊन दोघांनाही हळद लावत होते. बँडवाल्याने बँड वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्या मुलांनी जल्लोषात नाचायला सुरुवात केली. त्यात एक एक असे करत सगळेजण सहभागी झाले. मधुरा आणि रुद्र स्टेजवर बसून सगळ्यांचा आनंद बघत होते. एकमेकांचं पिवळं रूप पाहून दोघांनाही हसू फुटत होतं. इतक्यात कोणीतरी येऊन रुद्रला नाचण्यासाठी ओढून घेऊन गेलं. मधुरा एकटीच बसून सगळं बघत होती. रीमाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिनेसुद्धा मधुराला नाचण्यासाठी खेचून नेलं. नाचता नाचता रुद्र आणि मधुरा एकमेकांच्या जवळ आले आणि बाकीचे लोक त्या दोघांभोवती नाचत होते. जल्लोषात हळदीचा कार्यक्रम पार पडला.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच सीमंती पूजनाचा कार्यक्रम होता. हळदीच्या रंगाने मधुराचा चेहरा मस्त खुलला होता. मधुराने सुंदर आकाशी रंगाची साडी नेसली होती तर रुद्र निळ्या रंगाच्या शेरवाणीत राजबिंडा दिसत होता. सुमनताईंनी मधुरासाठी केलेले सर्व दागिने तसेच तिच्यासाठी घेतलेल्या साड्या, भेटवस्तू तिला औक्षण करून दिल्या होत्या.  राधिकाताईंनीसुद्धा रुद्रला सोन्याचा गोफ, ब्रेसलेट आणि कपडे दिले. त्यानंतर माना-पानाचे आहेर झाले. सगळा कार्यक्रम पार पडायला रात्रीचे बारा वाजून गेले होते.

दुसऱ्यादिवशी सकाळी साडे दहा वाजताचा लग्नाचा शुभ मुहूर्त होता. दोन्ही परिवारांना लग्न मुहूर्तावर लावायचं होतं, त्यामुळं सगळेजण पटापट झोपायला निघून गेले. मधुरा,  रीमा आणि आभा तिघी सोबतच होत्या. रीमाला तर अंथरुणावर पडल्या पडल्या लगेच झोप लागली. दोन दिवसांचा प्रवास आणि रात्रीच जागरण त्यामुळं ती थकून गेली होती. मधुरा आणि आभा बोलत होत्या पण बोलता बोलता आभाचाही डोळा लागला. मधुरा मात्र जागीच होती. एरव्ही तिच्या डोळ्यांसोबत निद्रा देवीचा झिम्मा सुरू असायचा पण आज काही केल्या निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती. डोक्यात विचारांचा खूप काही हलकल्लोळ पण नव्हता. पण मनाला एक वेगळीच हुरहूर लागली होती. या कडावरून त्या कडावर असं सतत कड बदलणं सुरू होत. सकाळी सकाळी केव्हातरी मधुराचा डोळा लागला.

लग्न मुहूर्त सकाळी असल्याने सगळेच लवकर उठले होते. मधुरालाही जाग आली. तेवढ्यात राधिकाताई तिथे आल्या.
"मधु, उठलीस! बरं झालं. चल, लवकर फ्रेश हो आणि तयार हो. गौरी पूजा करायची आहे ना. आधी पूजा करून घे मग बाकीचं मेकअप वगैरे नंतर कर. काकु सांगतील तसं तसं कर." मधुरासोबत बोलता बोलता राधिकाताई मधुराच्या आत्यासोबत बोलायला लागल्या. "ताई, मी काय म्हणत होते, ते शगुणाच ताट द्यावं लागेल ना वरपक्षाला. येता का माझ्यासोबत? आपण देऊन येऊ आणि त्या ताटात काय ठेवायचं राहिलं का बघून घ्या ना एकदा." घाईगडबडीत राधिकाताई बोलत होत्या. बोलता बोलता आत्याला सोबत घेऊन तिथून गेल्यासुध्दा. मधुराला राधिकाताईंसोबत बोलायच होतं पण त्यांच्या पायाला जणू भिंगरीच बांधली होती.

काकूंच्या मदतीने मधुराने पूजा केली. एका हातात नाश्त्याची प्लेट आणि एका हातात ज्यूसचा ग्लास घेऊन रीमा तिथे आली.

"मधु , हे घे. खाऊन घे थोडं. सगळे विधी संपून जेवायला किती वाजतील काय माहिती." रीमा

"नको ग रीमा. खाण्याची मुळीच इच्छा नाहीये. शाळा-कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या वेळी जसा पोटात गोळा उठायचा ना, बस तसंच वाटतंय बघ. प्लिज तू आग्रह नको करू." मधुरा
 

"ठीक आहे. एवढा ज्यूस तरी पिऊन घे. पोटात काही हवं की नको. थोड्यावेळानी अजून ज्यूस आणून देते." रीमा ज्युसचा ग्लास हातात देत बोलली. मधुराने ज्यूस घेतला आणि ती तयारीला लागली. तेवढ्यात बँड वाजयचा आवाज आला, सोबत फटाक्यांची लडही फुटली. आभाने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले, वरात निघाली होती. वरात निघाली तशी राधिकाताईंची घाईगडबड सुरू झाली. नवरदेव वापस आल्यावर त्याचं औक्षण आणि अजून बाकी जे लागत ते ते त्या नीट काढून ठेवत होत्या.

"लवकर वरात निघाली म्हणजे लग्न वेळेत लागणार." आभा स्वतःशीच पुटपुटली.

मधुराची तयारी सुरू होती, जवळपास सगळं झालंच होतं. आभा तयारी करून खिडकीपाशीच उभी होती.

"अरे बापरे! झालंही यांचं फिरून! वरात आली वापस. हे काय! गेटवर सगळे जण नाचताय.. मधु तुझी सासू पण मस्त नाचतेय बरं लेकाच्या लग्नात. ये बात! आत्ता उतरवलं रे बाबा नवरदेवाला घोड्यावरून! व्वा! हीरो ! असा तर नाचतोय जसं की दुसऱ्या कोणाच्या लग्नातच गेलाय. जमलं! जमलं!" आभा मधुराला काय काय दिसतंय त्याची कॉमेंट्री करून सांगत होती. मधुराने चिडून पावडरचा डब्बा तिच्याकडे भिरकावला.

"लागला असता ना! हे काय! ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. तुला आवडेल म्हणून मी सांगत होते ना." आभा.

"तुम्ही पोरी ना कधीच नाही सुधारणार. ही काय वेळ आहे का चिडवायची." मधुरा चिडली होती.

"चिड बाई चिड! आजचा दिवस तुझाच आहे. घे चिडून. अन् आभा तू सांग गं काय काय होतंय ते. तिला नसेल ऐकायचं पण मला ऐकायचंय." रीमा मधुराच्या साडीला इथे-तिथे पिना लावत बोलली.

"झालं बाबा नाचून. आता नवरदेव अन् त्याच्या आजूबाजूला त्याचे आई-बाबा गेटसमोर उभे राहिले. मधुराची आई सगळ्यांना तिलक कुंकूम लावून ओवाळत आहे. आता नवरदेवाला काही तरी खाऊ घातलंय आणि वाटीने काही तरी प्यायला दिलंय. कोणीतरी एक जण स्त्री सजवलेला हंडा डोक्यावर घेऊन उभी आहे. बहुतेक मधुराची मावशी आहे वाटतं. नवरदेवाने त्यात पैसे टाकले आता. अन् गुलाबांच्या पायघड्यांवरून तो चालत येत आहे." आभाची बडबड सुरू होती.
 

"गुलाबांच्या पायघड्या! ही नक्की बाबांचीच आयडिया असेल." मधुरा स्वतःशीच पुटपुटली.

" ए रीमा, ये लवकर.. बघ ना किती हँडसम दिसतोय रुद्र!" आभाने रीमाला आवाज दिला. खरतरं मधुरालाही रुद्रला पहायची इच्छा होत होती पण पुन्हा या दोघी चिडवतील म्हणून ती तिथेच बसून राहिली.

"वॉव..! खरंच की! काय हँडसम दिसतोय. गोल्डन कलरची शेरवानी... त्यावर गर्द हिरव्या रंगाचा दुपट्टा... गळ्यात हिरव्या रंगाच्या मोत्यांची माळ... डोक्यावर गोल्डन फेटा अन् त्यावर मध्यभागी मोठा हिरवा खड्याचा ब्रोश..डोक्याला मुंडावळ्या.. अगदी राजबिंडा दिसतोय. असं वाटतंय की एखादा राजा चालला आहे अन् मागे त्याचे मंत्री." रीमाचं बोलण ऐकून मधुरा खिडकीजवळ आली तोपर्यंत रुद्र आणि वऱ्हाडी हॉलमध्ये पोहोचले होते.
 

"आत्ता आली. आधीच यायचं ना मग. उगीच आपला ऍटीट्युड जिथे नाही तिथे मिरवायचा." आभा

"त्यात काय... दिसेल की आता लग्नवेदीवर.. अन् आयुष्यभर त्यालाच बघायचंय." रीमा मधुराकडे बघत बोलली. लाजून मधुराचे गाल लाल लाल झाले होते.

नवरदेव लग्नवेदीवर आला तसं भटजीबुआ माईकमध्ये नेहमीच्या स्टाईलमध्ये जवळपास ओरडलेच," नवरीचे मामा, नवरी मुलीला घेऊन या."
मधुराचे मामा लगबगीने वधूपक्षाच्या रूमकडे निघाले.
"मधू." मामांनी बाहेरूनच आवाज दिला.  

क्रमशः

फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न