मधुरीमा (भाग 20)

Story of two friends

मधुरीमा (भाग 20)


'सरप्राईज....!' म्हणून कोणीतरी ओरडलं आणि मधुराने डोळे उघडले. पाहिलं तर काय! रीमा, आभा, प्रथमेश आणि सौरभ तिच्यासमोर उभे होते. त्या चौघांना पाहून मधुरा आनंदाने ओरडतच त्यांच्याजवळ गेली. खूप वर्षांनी सगळे पुन्हा भेटले होते.  सगळ्यांच्याच चेहऱ्यावर त्याचा आनंद ओसंडून वाहत होता.


"जा, मला बोलयचंच नाहीये कोणासोबत! मी फोन केला तर एकालाही यायला वेळ नव्हता! काय काय बहाणे सांगितले सगळ्यांनी!" मधुरा लटकेच रागवत बोलली.


"मग तुला सरप्राईज कस मिळालं असत बरं?" मधुराचे बाबा मागून येत बोलले, सोबत आईही होती.


"म्हणजे तुम्ही पण या सगळ्यात सामील होते ना." मधुरा.


"हो.. अगं तुझी लग्नाची तारीख ठरली तेव्हापासूनच रीमाने सगळं ठरवलं होतं. तिने आम्हाला सक्त ताकीद दिली होती तुला सांगायचं नाही म्हणून. दुपारी मेहेंदीचा कार्यक्रम  करून घ्यायची आयडिया पण तिचीच होती म्हणजे तुम्हा लोकांना बोलायला वेळ मिळेल. बरं, चला आता तुम्हाला झोपा म्हणण्यात काही अर्थ नाही. आम्ही झोपतो, तुमच्या गप्पा चालू द्या. आणि हो, त्या टेबलवर स्नॅक्स आणि थर्मासमध्ये कॉफी आहे. हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी आहे तोपर्यंत मस्त पोटभर गप्पा मारून घ्या." राधिकाताई.


"थॅंक्यु सो मच आई!" मधुराने राधिकाताईला मिठी मारली. मधुकरराव आणि राधिकाताई तिथून निघून गेले.


गप्पांचा अगदी पाऊस पडत होता. कितीतरी आठवणी... कितीतरी प्रसंग आठवून आठवून सगळे अगदी गाल दुखेपर्यंत हसत होते. कॉलेजमधले दिवस जणू काही सगळेजण परत एकदा जगत होते. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेसचे किस्सेसुद्धा एकमेकांना सांगितले जात होते. सौरभ आणि प्रथमेशने स्वतःचे क्लिनिक सुरू केले होते तर आभा एका मल्टी- स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती. बोलता बोलता प्रथमेशने त्याचा गर्ल फ्रेंडबद्दल सगळ्यांना सांगितलं. आभाच्या घरीसुद्धा तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. सौरभला एक मुलगी आवडली होती पण त्याने त्याच्या प्रेमाची कबुली त्या मुलीजवळ अजून तरी केली नव्हती. रीमा मात्र शांत होती. अरविंदबद्दल तिला कोणासोबत काही बोलायच नव्हतं, मधुराने तिच्या मनातली ही गोष्ट हेरली होती. तिने सुद्धा तो विषय काढला नाही.


"ए... नितीन का आला नाही? मी फोन केला होता तर त्याने फोनसुध्दा उचलला नाही." मधुरा.


"ते येडं गेलंय येड्यांच्या कॉन्फरन्सला." प्रथमेश.


"म्हणजे ?" मधुरा.


"चेन्नईला सायकॉलॉजीची इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. त्यात याचा पेपर पब्लिश झाला आहे आणि जगभरातले प्रसिद्ध सायकायट्रीस्ट येणार आहेत तिथे. नितीनने काही नवीन औषधांचे कॉम्बिनेशन वापरले  काही पेशंट्सवर. त्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे. लंडनचे कोणतेतरी नामांकित डॉक्टर आहेत त्यांच्याशी ही सगळी चर्चा करायची आहे असं म्हणत होता. त्या डॉक्टरांनी पॉझीटीव्ह रिस्पॉन्स दिला तर कदाचित त्याला पुढे काही दिवस लंडनला जावे लागेल त्या सरांसोबत काम करण्यासाठी." सौरभ.


"ए वॉव..! एवढं चांगलं काम करतोय तो अन् काय तुम्ही लोक त्याला वेडं म्हणता." आभा.


"मग काय म्हणणार? इतकं कामात वाहून घेतलंय त्याने स्वतःला की आजूबाजूच्या दुनियेत काय चालू आहे हे पण त्याला माहिती नसतं. एखाद्या सर्जन पेक्षाही बिझी असतो तो. काही काम नसलं तरी सायकॉलॉजी वरचे पुस्तकं वाचत बसतो. जरा त्याच्या घरी जाऊन पाहिलं ना तर कळेल, घर नाही लायब्ररीच वाटेल." प्रथमेश.


"जाऊ द्या, असतो एकेकाचा स्वभाव." रीमा.


"हो.. एकेकाचा स्वभाव असतो... तर मग, चला. पटापट माझे गिफ्ट्स काढा." मधुरा.


"गिफ्ट्स!" सौरभ.


"हे काय, आम्ही आलोय की एवढ्या दुरून, अजून तुला गिफ्ट पाहिजेच का?" प्रथमेश मधुराला चिडवतच बोलला.


"हो मग, लग्नाला जाताना गिफ्ट्स नेत असतात हे पण माहिती नाही का? की आपलं सगळं ज्ञान लोकांना येडं म्हणण्या इतकंच आहे." मधुरा नाक फुगवत म्हणाली.


"हे घे बाई तुझं गिफ्ट. आता बोंबलू नकोस काही नाही आणलं म्हणून. आणि उघडून बघ काय आहे ते" असं म्हणत प्रथमेशने तिला एक मोठ्ठा गिफ्ट बॉक्स दिला.


मधुराने गिफ्ट बॉक्स उघडला तर त्यात अजून एक गिफ्ट बॉक्स होता. मधुराने तोही बॉक्स उघडला, त्यात अजून एक गिफ्ट बॉक्स! असे बरेच बॉक्स मधुराने उघडले. 


"आणलंय की नाही काही, की उगीचच माझी फिरकी घेतोयस." मधुरा आता चिडली होती. बोलता बोलता तिने अजून एक बॉक्स उघडला. "हे काय ! बेबी डायपर!" मधुरा अक्षरशः किंचाळलीच.


"सॉरी सॉरी, त्याला गिफ्ट पेपर लावायचा राहिला. त्याच्या आत तर बघा काय आहे." प्रथमेश.


मधुराने तो ही बॉक्स उघडला. आत एक लाईटचा मोठा गोळा होता. मधुराने तिरक्या नजरेने प्रथमेश कडे पाहिलं.


"अग, त्याच्या बाजूला एक काळ बटन आहे ते दाब ना." प्रथमेश.


मधुराने बटन ऑन केले. त्यात सुंदर लाल गुलाबाच्या फुलांचा लाईट लागला. ते पाहून मधुराने प्रथमेशला क्युट स्माईल दिलं. सौरभने मधुराला एक नावजलेलं इंटरनॅशनल गायनेकॉलॉजिचं जर्नल गिफ्ट केलं, त्यासोबत त्याची लाईफटाइम मेम्बरशीप त्यानेच तिच्यासाठी घेतली होती. 'लग्नात कोणी असं गिफ्ट देत का?'  म्हणून प्रथमेशने त्याला खूप चिडवलं. पण मधुराला ते गिफ्ट मनापासून आवडलं होतं.


आभाने मधुराला एक फोटो फ्रेम दिली होती, त्यात एक फोटो लावलेला होता. हॉस्टेलवरचा रुमवरचा फोटो.. मधुरा, रीमा आणि आभा.. मधुरा आणि रीमाने आभाच्या चार वेण्या घातलेल्या....


"ए.... किती गोड फोटो आहे हा! तेव्हा मला याची एक कॉपी दे म्हटलं तर किती भांडली होतीस तू!" मधुरा फोटो फ्रेम न्याहाळत बोलली.


"हो... पण आता दिलीये ना.. जपून ठेव.. माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता तो." आभा असं बोलली अन् मधुरा आभाच्या गळ्यात पडली. दोघींचेही कंठ दाटून आले होते.


"हे घे, माझ्याकडून छोटसं गिफ्ट." रीमाने एक छोटूसा गिफ्ट बॉक्स मधुराला दिला. मधुराने तो उघडून पहिला तर त्यात एक सुंदर नाजूकशी चैन आणि त्याला एक पेंडन्ट होतं, त्यावर एका बाजूला एम आणि एका बाजूला आर कोरलेल होतं.


"वॉव, मधुरा आणि रुद्र!" प्रथमेश ती चैन पाहत म्हणाला.


"मधुरा आणि रीमा.... मधुरीमा" मधुरा स्वतःशीच पुटपुटली.


क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

🎭 Series Post

View all