Dec 08, 2021
कथामालिका

मधुरीमा (भाग १९)

Read Later
मधुरीमा (भाग १९)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 


मधुरीमा (भाग१९)

आई बाबांसोबत दिवसभर लग्नाची खरेदी, घरी येताना मग पाणी पुरी, शेव पुरी, दही पुरी, पाव भाजी, दाबेली, चायनीज, साऊथ इंडियन डिश रोज काहीना काही खाऊनच घरी यायचं असा जणू काही शिरस्ता ठरला होता तिघांचा. अगदी वाण-सामानापासून सगळ्या गोष्टींच्या खरेदीत मधुरा आईसोबत असायची. लग्न पत्रिकेवर नावं टाकणे, बाहेरगावी ज्या पत्रिका पाठवायच्या होत्या त्यावर पत्ता लिहून तिकीट लावणे, पत्रिका पोस्टात नेऊन टाकणे या कामात मधुरा मधुकररावांची मदत करत होती. रुद्रचा फोन आला की कोणत्याही कामात कमीत कमी अर्ध्या तासाचा ब्रेक ठरलेला हे गणित घरच्या लोकांनाही आता पाठ झाले होते. सुमनताईंचाही दोन-चार वेळा फोन येऊन गेला होता, डेझिने देखील अमेरिकेहून एक-दोन वेळा व्हिडीओ कॉल केला होता. मधुराची घरातल्या सगळ्यांशी किमान तोंडओळख तरी झाली होती. त्यामुळं 'लग्नानंतर कसं' याचं टेंशन तिला आता येत नव्हतं.

 

प्रत्येक दिवस भुर्रकन् उडून जात होता. लग्नाला अवघे सात दिवस राहिले होते. मधुराच्या घरी सगळ्या नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. सगळं घर रोषणाईने सजलं होतं. दारी मांडव टाकला होता. मधुराच्या मामाने दारात पाच प्रकारच्या झाडांच्या फांद्यांपासून मानाचा हिरवा मांडव टाकला होता. मधुकरराव आणि राधिकाताईंनी प्रथेप्रमाणे लग्नाचे सर्व विधी करायचे असे ठरवले होते. त्यामुळं आठवडाभर आधीपासूनच रोज एक नवीन विधी मधुराला माहिती होत होता. रुखवतांत ठेवण्यासाठी, शिदोरी म्हणून देण्यासाठी अनारसे, करंज्या, लाडू, शेव, चिवडा, चकली अन् अजून न जाणो किती तरी पदार्थ आत्या-मावश्या बनवत होत्या.

   मधुकररावांनी लग्नासाठी एक रिसॉर्ट बुक केल होतं. मेहेंदी,  हळद आणि लग्नाचा कार्यक्रम तिथेच होणार होता. रिसॉर्ट शहरापासून थोडं दूरच होतं. मेहेंदीच्या, हळदीच्या, लग्नाच्या विधींसाठी लागणारं सर्व सामान आठवणीने नेणं गरजेचं होतं आणि त्याची सगळी जबाबदारी मधुराच्या काकी आणि मामींनी घेतली होती. वेळेवर शोधाशोध होऊ नये म्हणून मधुराच्या मावस, चुलत बहिणींनी मधुराचे प्रत्येक कार्यक्रमाला घालायचे कपडे, त्यावरचे दागदागिने क्रमाने बॅगेत भरून ठेवले होते. लगीनघाई कशाला म्हणतात याची प्रचिती सगळ्यांनाच येत होती.

   लग्नाला चार दिवस बाकी होते. येणारं मंगलकार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून राधिकाताईंनी घरात एक पूजा ठेवली होती. आलेल्या सर्व नातेवाईकांनी मनोभावाने पूजेत सहभाग घेतला होता. मधुरा सगळ्यांना प्रसाद देत होती, इतक्यात तिचा फोन वाजला. "रीमाचा फोन..आत्ता? निघाली म्हणून केला असेल." मनातल्या मनात पुटपुटत तिने हातातलं पूजेच्या प्रसादाचं ताट मावशीकडे दिलं आणि ती फोनवर बोलत तिच्या रुममध्ये गेली.

 

"रीमा, निघालीस का?"

"बापरे, पहिलाच प्रश्न निघालीस का?"

"हो, मग!  तू येणार आहेस ना लग्नाला, तर हेच विचारणार ना."

"सॉरी मधु, अगं फक्त दोनच दिवसांची परवानगी दिली माझ्या एच. ओ. डी. ने. दोन दिवसात कसं गं जाऊन येणार परत."

"फक्त दोन दिवसांची परवानगी! खूपच खडूस दिसतोय तुझा एच. ओ. डी. त्यांना सांगायचं असतं ना की बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे.  ए.. तू कुठे आहेस? मला काही तरी अनाऊन्समेंट सारखा आवाज येतोय."

"अगं, मी इथे स्टेशन वर आहे. इकडे दोन दिवसांचा स्थानिक उत्सव आहे कसला तरी, त्याची आम्हाला सुट्टी दिलीये. मी आणि माझे इथले फ्रेंड्स बाहेर फिरायला जातोय. तसंह रूमवर राहून तुझ्या लग्नाला नाही आले त्याचा विचार करून अजून वाईट  वाटलं असतं. मग म्हटलं फिरून येते."

 

"जा... बाई... फिरून घे... तसही गरीबाच्या लग्नाला कोणाला यावं वाटेल!"

"मधे, तू अन् गरीब! देव तुझ्यासारखी गरीबी सगळ्यांना देवो."

"रीमा, झाली असेल चेष्टा करून तर सरळ सांग येतेय की नाही ते."

"मधु, अगं थोडा तर विचार कर. इथून विमानाने दहा-अकरा तासांचा प्रवास ते ही मुंबईपर्यंत, तिथून तुझ्याकडे पाच-सहा तास ट्रेनचा प्रवास, त्याआधी इथल्या विमानतळावर दोन-अडीच तास आधी या, मग मुंबईच्या विमानतळावर दोन-अडीच तास जाणार. ट्रेनचा वेळ या वेळात बसणारा असेल तर ठीक नाहीतर अजून ट्रेनची वाट पहा. बरं, एवढं सगळं करून मी आले तरी तू लग्नात बिझी राहणार. नीट  बोलणं पण नाही होणार तुझ्याशी. त्यापेक्षा मी भारतात वापस आले की भेटू ना आपण.  मी येईल की तुझ्या सासरी तुला भेटायला."

"ठीक आहे. तू इतक्या दूर गेलीयेस की जबरदस्ती पण नाही करता येत ये म्हणून."

"मधु, नाराज नको होऊस. मी भारतात आले ना की आधी तुलाच भेटेल. प्रॉमिस! एन्जॉय कर तुझं लग्न. चल बाय, ट्रेन आली माझी."

    रीमाने फोन ठेऊन दिला. 'आपल्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी आपली बेस्ट फ्रेंड आपल्या सोबत नाही' या विचारानेच मधुराचा चेहरा एवढूसा झाला. राधिकाताई काहीतरी शोधत तिथे आल्या होत्या. मधुराचं एवढूसं तोंड पाहून त्यांनी मधुराला विचारलं, "काय झालं गं मधु? रीमाचा फोन होता नं, काय म्हणाली ती?"

 

"लग्नाला येणं होणार नाही म्हणत होती."

"हो का, अग एवढी दूर गेलीये ती. कस येणार बरं? तूच थोडा प्रॅक्टिकली विचार कर. अन् तू तिची बेस्ट फ्रेंड ना. मग, तू ही समजून घे की तिला थोडं. ती इकडे वापस आली की भेटा ना दोघी. तुम्हाला वाटलं तर इथे या दोघीजणी. दोन-चार दिवस सोबत राहा मस्त. बरं, मधु माझ्यासोबत थोडं येतेस का? बाहेर बायकांची पंगत बसली आहे, तुझ्या हाताने थोडं गोड वाढ." राधिकाताई असं म्हणाल्या आणि मधुरा त्यांच्यासोबत गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळ्यांनी आपापली तयारी केली. दुपारी मेहेंदीचा कार्यक्रम रिसॉर्टवर होणार होता. तिकडे जाण्यासाठी पटापट सगळे तयार झाले होते. मधुकररावांनी एक बस बुक केली होती. सर्वजण सामान ठेऊन बसमध्ये जाऊन बसले होते. राधिकाताई सगळं सामान नीट घेतलं की नाही, काही विसरलं तर नसेल म्हणून घरात बघायला आल्या. मधुरा तिच्या रूममध्ये होती.

"मधु, अगं इथेच आहेस का तू अजून? मला वाटलं की सगळ्यांसोबत बसमध्ये जाऊन बसली." राधिकाताईंच्या बोलण्याकडे मधुराचं लक्षच नव्हतं. राधिकाताईंनी तिला परत आवाज दिला. डबडबलेल्या डोळ्यांनी तिने राधिकाताईंकडे पाहिलं. राधिकाताईंनी तिला कुशीत घेतलं.

"सगळं तुझंच आहे, आणि सगळं आहे तसंच राहणार आहे, एक अन् एक वस्तू आणि आम्हीपण. शुभकार्य आहे, आता डोळ्यात पाणी नको." राधिकाताई मधुराची समज काढत होत्या. मधुकरराव दोघींना शोधत घरात आले होते. दोघींची गळाभेट बघून जे समजायचं ते समजून गेले.

"मधु, चला, निघायचं ना?" मधुराच्या डोक्यावर हात फिरवत मधुकरराव बोलले. मधुराने होकारार्थी मान हलवली. निघताना पुन्हा एकदा मधुराने संपूर्ण घराला डोळे भरून बघून घेतलं. बसमध्ये आधीच डावीकडच्या सीटवरचे विरुद्ध उजवीकडच्या सीटवरचे अशी अंताक्षरी सुरु झाली होती. मधुरा बसमध्ये चढली तस तिच्या सगळ्या भावंडांनी 'तू आमच्या टीमकडे ये' म्हणून एकच गोंधळ केला. "मी दोन्ही टीमकडून आहे" म्हणत मधुरा समोरच्या सीटवर बसली. अंताक्षरी खेळत सगळे रिसॉर्टवर पोहोचले.

शहरापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट होते. एखाद्या गड-किल्ल्याच्या दरवाज्याप्रमाणे त्याचा मोठा दरवाजा होता. आत प्रवेश केल्यावर सगळीकडे लॉन, लॉनच्या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे कारंजे, ठिकठिकाणी निरनिराळ्या फुलांनी बहरलेली छोटी छोटी झाडं होती. एक मोठा हॉल होता. राहण्यासाठी सुंदर मोठ्या रूम्स होत्या. सगळेजण पटापट फ्रेश होऊन, लंच करून मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी हॉलमध्ये जमले होते. सगळ्यांनी मेहेंदी-ग्रीन रंगाचे कपडे घातले होते. मधुराही मेहेंदी रंगाच्या साडीत अगदीच सुंदर दिसत होती. मेहेंदीवाल्या सुंदर, नाजूकशी मेहेंदी मधुराच्या हातावर रेखाटत होत्या. ज्यांच्या हातावर मेहेंदी काढायची बाकी होती त्या सगळ्याजणी नाच-गाणे म्हणत मजा घेत होत्या. प्रत्येक स्त्रीला तिच्या आवडीप्रमाणे आणि शांतपणे मेहेंदी काढायला मिळाली म्हणून सगळ्याजणी खूप खुश होत्या.

रात्रीच्या जेवणानंतर तर सगळी छोटी मुलं मधुराच्या मागे लागली, "ताई, आमच्यासोबत लपंडाव खेळ ना."

"आता कुठे लपंडाव खेळतात का?" मधुरा मुलांकडे बघत थोडं दटाऊन विचार होती.

"मग कधी खेळणार, तू परवा लग्न करून जाशील. मग आपली भेट कधी होणार परत." एक छोटा मुलगा केविलवाणं तोंड करून म्हणाला.

"ठीक आहे, इमोशनल ब्लॅकमेल करायची गरज नाही. चला खेळू आपण." मधुरा म्हणाली आणि सगळी मुलं आनंदाने ओरडायला लागली.

"आम्ही लपतो, तू आम्हाला शोधायला ये." अस म्हणत अर्धी मुलं लपायला धावली.

"जोपर्यंत सगळ्यांना शोधत नाहीस तोपर्यंत डाव पूर्ण होत नाही बरं ताई." एक जण पळता पळता मधुराला सांगून गेला. मधुराही सगळ्यांना शोधत होती. दोन मुलं सोडली तर बाकी सगळ्यांना तिने शोधून काढल होतं. मधुराने रिसॉर्ट पूर्ण पालथा घातला पण तिला ती दोघे काही सापडली नाही. तिचं लक्ष वरच्या मजल्यावर असणाऱ्या रूमकडे गेलं. रूमचा दरवाजा बंद होता. मधुरा त्या रूमच्या दिशेनी गेली. रूमच्या दाराजवळ गेल्यावर तिला तिथे काहीतरी खुडबुड जाणवली म्हणून तिने दाराला कान लावला. "अरे, शांत बस ना. नाहीतर ताईला कळेल आपण इथे आहोत म्हणून." आतून आवाज आला. मधुराने रूमचा दरवाजा लोटला, आतले सर्व लाईट बंद होते, मधुरा अंधारात चाचपडत आत जात होती. तेवढ्यात तिचा पाय कशावर तरी पडला आणि मोठा फट्ट् आवाज झाला. मधुराने घाबरून डोळे बंद केले, इतक्यात कोणीतरी लाईट लावले आणि मोठ्याने ओरडले,

"सर SSSS प्राईज SSS!"

 
क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न