मधुरीमा (भाग १७)

Story of two friends


मधुरीमा (भाग १७)

साक्षगंधाचा कार्यक्रम उत्तम पार पडला होता, 'जणू एखाद्या लग्न सोहळ्याप्रमाणेच झाला' असं कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्यांचं म्हणणं होतं. मधुरा सकाळीच उठून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार झाली होती, आज तिचा हॉस्पिटलमधला शेवटचा दिवस होता. मधुकरराव कालच्या कार्यक्रमात आलेल्या बुकेंचे फुलं काढून ते फुलदाणीत लावत होते.

"काय हे बाबा, जाऊ द्या की.. कुठे त्या फुलांच्या मागे लागताय." मधुरा आईनी दिलेला चहाचा कप घेत बोलली.

"किती सुंदर फुलं आहेत बघ, फेकायची इच्छा होत नव्हती, म्हणून मग या फुलदाणीत सजवतोय, थोडं पाणी टाकलंय खाली, मस्त ताजे दिसतील बघ अजून दोन दिवस तरी. तू कुठे निघाली सकाळीच?" मधुकरराव एक एक फुलं फुलदाणीत ठेवत बोलत होते.

"हॉस्पिटलमध्ये.. आज लास्ट डे आहे ना. जाता जाता सगळ्यांसाठी काहीतरी स्नॅक्स् घेऊन जाईन म्हणते. बरं, आई, येते गं मी." मधुरा गाडीची चावी घेऊन निघाली होती.

"अगं, थोडं खाऊन तरी जा." राधिकाताई.

"राहू दे आई, तिकडेच खाईल सगळ्यांसोबत." मधुरा बाहेर जात बोलली. जाताना तिने हॉस्पिटलमधल्या सगळ्या स्टाफसाठी स्नॅक्स्, मिठाई, कोल्ड्रिंक्स् नेले. गाडी पार्क करून ती आत गेली, पाहते तर काय तिच्यासाठी सगळ्यांनी मिळून फेअरवेल पार्टी ठेवली होती, सुंदरसा केक आणला होता. मधुरासाठी हा एक आश्चर्याचा धक्का होता.

"अरे वा, मी पण तुम्हाला पार्टी देणार होते, तर तुम्हीच मला छान सरप्राईज् दिलंत." मधुरा सगळ्या स्टाफला उद्देशून बोलली. एका वॉर्डबॉयला तिने गाडीच्या डिक्कीतलं सामान काढून आणायला लावलं.

"सिस्टर, एव्हीनिंग आणि नाईट ड्युटीच्या स्टाफसाठी सुध्दा स्नॅक्स् वगैरे सगळं आहे. मी त्या हॉटेलवाल्याला सांगितलं आहे, तो दोन्ही ड्युटीच्या वेळेस इथे आणून देईल. तेव्हढं फक्त सगळ्यांपर्यंत पोहोचेल हे बघा." सिनिअर सिस्टरला मधुराने सांगितलं.

स्टाफने आणलेला केक मधुराने कापला. त्यावर  'कॉंग्रेजुलेशन्स् मॅम' आणि दोन अंगठ्याचे सुंदर डिझाइन होते. सगळ्या स्टाफनी मिळून मधुराला एक चांदीची गणपतीची मूर्ती भेट दिली. डॉ. गिरीजांनी मधुराला भेट म्हणून एक बॉक्स दिला आणि तिला तो तिथेच उघडायला लावला. मधुराने तो बॉक्स उघडला त्यात निरनिराळे इन्स्ट्रुमेंट्स होते.

"मॅडम, हे एवढं महाग गिफ्ट मी नाही घेऊ शकत." मधुरा मोठ्या अदबीने म्हणाली.

"राहू दे गं. तसं पण लग्नात संसारोपयोगी सामान देतातच ना. स्वतःचं  हॉस्पिटल चालवणं हे पण एका संसारासारखंच असतं ना. स्वयंपाक घरात जसं प्रत्येक प्रकारचं भांडं लागतंच असतं अन् कितीही असले तरी भांडी कमीच पडतात, आपलंही तसंच नाही का होत. त्यामुळं राहू दे. आणि हो, लग्न झाल्यावर फक्त स्वयंपाक घरात अडकून नकोस बसू ही आठवण करून द्यायला हा सगळा प्रपंच." डॉ. गिरीजा.

"हो मॅडम, नाही अडकणार स्वयंपाक घरात." मधुराने एक गोड स्माईल दिल मॅडमला. तसंही आज हॉस्पिटलमध्ये एकंदरीतच पेशंटही कमीच होते, त्यामुळं विशेष असं काही कामही नव्हतं. मधुराने हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मलिटीझ् पूर्ण केल्या. चालू महिन्याच्या पगाराचा चेक अकाउंट डिपार्टमेंटने तिला दिला होता. मधुरा तो चेक घेऊन डॉ. गिरीजा यांच्या केबिनमध्ये गेली.

"निघतेय का मधुरा?" मॅडम तिला पाहून बोलल्या.

"हो, निघतच आहे. हा चेक.. माझ्याकडून.. तुम्ही जो आता चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला आहे त्याकरता.. त्यात माझा खारीचा वाटा."

"याला खारीचा वाटा म्हणतेस तू!.. अगं पूर्ण महिन्याचा पगार आहे हा तुझा! राहू दे. लग्न आहे ना. तुला हवं तिथे खर्च कर. आणि खर्च नसेल करायचा तर हाताशी राहू दे हे पैसे. कधीही, कुठेही कामी पडतील." डॉ. गिरीजा मधुराला समजावत बोलल्या.

"नाही मॅडम मी हा चेक वापस नाही घेणार. या काही महिन्यांमध्ये तुम्ही जे मला ज्ञान दिलंत, जे शिकवलं, ज्या विश्वासाने मला एकटीला प्रोसिजर करू दिल्यात, हॉस्पिटल स्टाफ पण जेवढा आपुलकीने माझ्यासोबत राहिला त्यापुढे ही रक्कम काहीच नाही. प्लिज तुम्ही याचा स्विकार करा." मधुरा

डॉ. गिरीजांनीं स्मित हास्य करत तो चेक घेतला.

"ठीक आहे मॅम, येऊ मग मी. लग्नाला या नक्की, तस मी पत्रिका द्यायला येईलच." मधुरा

"हो..हो.. नक्कीच येईल... पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि इकडे आली की येत जा भेटायला."

"हो. नक्की येईल." मधुरा डॉ. गिरीजांचा निरोप घेऊन निघाली. मोठ्या जड अंतःकरणाने ती हॉस्पिटलच्या बाहेर जात होती, इतक्यात तिला काहीतरी आठवलं म्हणून ती रिसेप्शन काउंटरवर परत आली. तिला पाहून रिसेप्शनिस्ट जागेवर उभी राहिली, तिच्या सोबत दोन ओ. पी. डी. मधल्या सिस्टर गप्पा मारत होत्या.

"अरे, बसा तुम्ही लोकं. ही माझ्या केबिनची चावी आणि ही आतल्या टेबलच्या ड्रॉवरची. चुकून माझ्यासोबत आली असती." मधुरानी पर्स उघडून त्यातल्या चाव्या तिथे दिल्या.

"थँक्यु मॅडम, आम्ही तर विसरलो पण होतो." रिसेप्शनिस्ट मधुराला म्हणाली.

मधुरा तिथून निघत होती, तेवढ्यात एक सिस्टर तिला म्हणाली, "मॅम, आता पेशंट बनून या." तिच्या या वाक्यावर सगळे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

"म्हणजे?" मधुरा

"म्हणजे, आता तुमचं लग्न होईल ना, मग पहिली डिलिव्हरी माहेरी होते ना, तर मग डिलिव्हरीसाठी इथंच या." सिस्टर बोलली तस रिसेप्शनिस्टने हातातला पेपरचा बंच तिच्या डोक्यावर मारला.

"मॅडम, तिच्याकडे लक्ष नका देऊ, अशीच काही पण बडबडते ती." रिसेप्शनिस्ट सिस्टरची बाजू सावरत म्हणाली.

"किती मस्त रुटीन बसलं होतं ना, घर, हॉस्पिटल, आई बाबा. आता सगळं सोडा अन् पुन्हा नव्याने सगळं सुरू करा. आयुष्यभर सगळं असच सुरू राहील तर काय होणार होतं, कोणाचं काय बिघडणार होतं? लग्न जमलेल्या सगळ्यांनाच अस वाटत असेल का?" मधुराच्या डोक्यात विचारांचा पिंगा सुरू होता.

तेवढ्यात रुद्रचा फोन आला, "मग, कसा झाला लास्ट डे?"

"कसा होत असतो लास्ट डे? घरी निघतेय,घरी गेले की करते कॉल नंतर. निवांत बोलू." मधुरा

मधुरा पुन्हा संमिश्र भावनेत अडकू लागली. पुढचं सगळं हवं होतं पण हातातलं सगळं सोडायच नव्हतं... भावनांच्या गदारोळात ती घरी आली. संध्याकाळ झाली होती. आईने लावलेल्या धुपबत्तीचा सुगंध अंगणापर्यंत येत होता. तुळशीवृंदावनात एवढूशी पणती मिणमिणत होती, हवेचा झोत आला तरी स्वतः तग धरून राहत होती. मधुरा घरात आली. घरात पाहुण्यांची वर्दळ नव्हती. हॉलमध्ये बाबांनी  फुलदाणीत ठेवलेली सकाळची फुलं खरंच अजूनही ताजी होती. आईनी काम करताना एफ.एम लावलेला होता, गाणं सुरू होतं

               अपने  ही बस में नहीं मैं
               दिल है कहीं, तो हूँ कहीं मैं
               जाने का पाया के मेरी ज़िंदगी ने
               हँस कर कहा..
               आज फिर जीनेकी तमन्ना है…
               आज फिर मरनेका इरादा है...
                मैं हूँ गुबार या तूफ़ां हूँ
                कोई बताए मैं कहाँ हूँ
                डर है सफ़र में कहीं खो न जाऊँ मैं
                रस्ता नया..
                आज फिर जीने तमन्ना है… 


क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

🎭 Series Post

View all