Aug 09, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग १६)

Read Later
मधुरीमा (भाग १६)

 

 

मधुरीमा (भाग १६)
बघता बघता साक्षगंधाचा दिवस उजाडला. मधुराचे बाबा आणि काका सकाळपासूनच कार्यक्रमाच्या हॉलवर होते. आष्टेकर परिवार आणि आप्तजन सकाळीच येऊन पोहोचले होते, त्यांची उतरण्याची व्यवस्था बाजूच्याच हॉटेलवर केलेली होती. मधुराचे मामा त्या लोकांची व्यवस्था पाहण्यातच गुंग होते. त्या लोकांचा चहा, नाश्ता सगळं व्यवस्थित करवून घेऊन मधुराचे मामा त्यांना हॉलवर घेऊन आले.

   हॉलच्या बाहेरच शोभिवंत फुलांची सुंदर, मोठी कमान उभी केलेली होती, थोडं बाजुलाच सुरेख, मोठी रांगोळी काढलेली होती. त्या रांगोळीत दोन हृदय मिळत आहेत असं प्रतिकात्मक चित्र रेखाटलं होतं, त्या हृदयांवर मधुरा आणि रुद्रचं नाव लिहिलेलं होतं. कमानीच्या बाजूलाच 'कानिटकर परिवार आपले सहर्ष स्वागत करत आहे' असा बोर्ड लावलेला होता. हॉलच्या पायऱ्यांपासूनच सगळी फुलांची सजावट केलेली होती. हॉलच्या प्रवेश द्वाराजवळ आष्टेकर परिवाराचं स्वागत करण्यासाठी श्री. व सौ. कानिटकर उभे होते , त्यांनी  गुलाब पुष्प देऊन सगळ्यांच छान स्वागत केलं. दोन्ही परिवारांनी हॉलमध्ये प्रवेश केला. सुंदर अशा रंगीबेरंगी फुलांनी हॉल छान सजवलेला होता. हॉलच्या मधोमध नाजूक फुलपानांनी, रंगीबेरंगी लाईट लावलेला, नाजूक डिझाइनचे पडदे लावलेला एक छोटा चौकोनी मंडप तयार केलेला होता. मंडपाभोवती  खुर्च्या टाकून सगळ्यांची बसायची व्यवस्था केली होती. त्या मंडपात एक चौरंग, एक पाट ठेवलेला होता. भटजीबुआ त्या मंडपात बसून साक्षगंधाच्या विधींची तयारी करत होते. भटजीबुआंनी आधी रुद्रला त्या चौरंगावर बसायला सांगितले. तोंडातल्या तोंडात मंत्र उच्चारत त्यांनी कानिटकर परिवारतल्या पाच सवाष्णींना रुद्रला औक्षण करण्यास सांगितले, आणलेल्या निरनिराळ्या भेटवस्तू  द्यायला लावल्या. भटजीबुआंनी  रुद्रला नवीन कपडे घालून येण्यास सांगितले. तोपर्यंत मधुराला चौरंगावर बसवून रुद्र प्रमाणेच तिचं आष्टेकर परिवारातल्या पाच सवाष्णींनी औक्षण केलं, भेटवस्तू दिल्या आणि मधुरासुद्धा नवीन कपडे परिधान करण्यासाठी रुममध्ये गेली.

थोड्याच वेळात रुद्र तयार होऊन बाहेर आला. स्टाईल्ड बीअर्ड, जेल लावून सेट केलेले केस, पीच कलरचा इंडो-वेस्टर्न ड्रेस, त्यावर मॅचिंग मोजडी,  मधुराने हट्ट केला होता म्हणून गळ्यात सोनेरी रंगाच्या टपोऱ्या मोत्यांचा हार, डाव्या साईडला, खिशाच्या थोडंवर खड्यांचा चमचमता ब्रोश, एखाद्या राजकुमारालाही लाजवेल एवढा राजबिंडा दिसत होता. त्याची नजर मधुराला शोधत होती, तेवढ्यात बहिणींच्या घोळक्यात मधुरा येताना दिसली. दोघांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे तिनीही पीच रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती. त्यावर साजेशी हेअरस्टाईल आणि मंद सुवासाचे कुंदाचे गजरे माळलेले, तिच्या सौन्दर्यात भर घालणारा मेकअप, साडीवर मॅचिंग दागदागिने, एखाद्या अप्सरेपेक्षा मधुरा काही कमी दिसत नव्हती. रुद्र तिच्याकडे पाहतच राहिला.
 

   हृदयाच्या आकाराच्या तबकात गुलाब फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या, त्यात दोघांच्याही अंगठ्या ठेवलेल्या होत्या. भटजीबुआंनी एकमेकांना अंगठ्या घालायला लावल्या. एकमेकांच्या बोटात अंगठी घालताना होणारे चोरटे स्पर्श दोघांनाही सुखावून जात होते. त्यात फोटोग्राफर निरनिराळ्या प्रकारच्या पोझ द्यायला लावून फोटो काढत होता. सगळं कसं हवंहवंसं वाटत होतं दोघांनाही. खूप सारे फॅमिली फोटो काढून झाले, मधुरा-रुद्रचे सुद्धा भरपूर फोटो काढले होते. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे रुद्र-मधुराचे अभिनंदन करत होते, एक फोटो काढून जात होते.  सगळ्यांची जेवण्याची व्यवस्था हॉलच्या वरच्या मजल्यावर केली होती.

एरव्ही लोकांच्या लग्नात विहिण पंगत असते, परंतु मधुकरराव आणि राधिकताईंनी साक्षगंधाच्या कार्यक्रमात विहिण पंगतीची तयारी केली होती. सगळी व्यवस्था चोख झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी राधिकाताई दोन-चारवेळा वरच्या मजल्यावर जाऊन आल्या होत्या. सगळं नीट मनासारखं झाल्यावर श्री. व सौ. कानिटकरांनी आष्टेकर परिवाराला सन्मानपूर्वक जेवण्यासाठी नेलं. टेबल खुर्च्यांची छान मांडणी केलेली होती, प्रत्येक ताटाभोवती सुरेख रांगोळी काढलेली होती, मधोमध मधुरा-रुद्रसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. आष्टेकर परिवाराला जेवण्यास बसवलं, कोणीतरी आवाज दिला म्हणून राधिकाताई तिकडे गेल्या. इतक्यात सुमनताईंना काय झालं माहिती नाही, त्या एकदम उठून मधुराच्या बाबांना उद्देशून बोलू लागल्या, "हे मला बिलकुलच नाही पटलं कानिटकर साहेब तुमचं. आता असं केलंत तुम्ही, पण लग्नात परत अस केलं तर मला असं चालणार नाही."
 

"काय झालं? काही चुकलं का कोणाकडून? काही राहिलं का?" मधुकरराव अदबीने विचारत होते.

"तुमच्याशी काय बोलणार? राधिकाताई कुठे आहेत ? मला त्यांच्याशी बोलायचंय." सुमनताई असं म्हणाल्या आणि कोणीतरी धावत जाऊन राधिकताईंना बोलावून आणलं.

"काय झालं सुमनताई? " राधिकाताई काळजीतच बोलल्या.

"काय झालं म्हणून काय विचारता? विहिण पंगत ना ही.. ! मग विहिण सोबत नको का पंगतीत. ते काही नाही, तुमच्या सगळ्या परिवारासाठी पण अशीच अरेंजमेंट करायला लावा. आम्ही थांबतो अजून थोडं. सगळे सोबतच जेऊ. काय हे राधिकाताई? मधुरा जशी आमची होणारी सून आहे तसाच रुद्रही तुमचा होणार जावई आहे ना. सगळा मान-पान फक्त मुलांकडच्या लोकांना द्यायचा असं थोडी असतं. आता आपणच अशा प्रथांना बाजूला केलं पाहिजे."   सुमनताई राधिकाताईंचा हात हातात घेऊन बोलत होत्या.
 

    विहिणींच्या उखाणा घेण्याच्या स्पर्धेत विहिण पंगत हसत खेळत संपली होती. पान सुपारी नंतर आष्टेकर परिवार आणि आप्तजन वापस निघण्यासाठी तयारी करत होते. सगळेजण एकमेकांशी बोलण्यात गुंग होते. रुद्र आणि मधुरा सगळ्यांची नजर चुकवून गप्पा मारण्यात हरवून गेले होते. राधिकाताईंची नजर गेली त्यांच्याकडे, दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याही आनंदीत झाल्या होत्या.

  आता मात्र दिवसांना पंख लागले होते, फुलपाखरासारखे  रंगीबेरंगी पंख, भविष्याचे स्वप्न, स्वप्नांचे पंख. दोन महिने बाकी होते लग्नाला. दोन महिने....! की फक्त अजून दोन  महिने...? मधुरा भविष्याकडे पहात प्रत्येक दिवस धरून ठेवायचा प्रयत्न करत होती, वेळच तो हातातून निसटतचं होता.

क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ. किमया मुळावकर 


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न