Aug 16, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग १५)

Read Later
मधुरीमा (भाग १५)

 


मधुरीमा (भाग 15)

"मधु, बोलशील का काही? काय झालं? बरं नाहीये का? काही दुखतंय, त्रास होतोय का? हॉस्पिटलमध्ये काही झालं का? कोणी काही बोललं का? कोणत्या पेशंटचे नातेवाईक बोलले का काही? की भांडण झालं कोणाशी? रुद्र काही बोलला का?" आईची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

"नाही गं, अस काहीच नाही झालं." मधुरा.

 

"मग, काय झालं बेटा." बाबांनी डोक्यावरून हात फिरवत विचारलं.

"माहिती नाही पण खूप भीती वाटते आजकाल.... लग्न होऊन तिकडे जावं लागेल, नवीन घर, नवीन लोकं, त्यांच्या घरातल्या खाण्या-पिण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, अजूनही काही रूढी-परंपरा असतील, सगळं नवीन राहील..... मला जमेल का सगळं..? कसं होणार माझं....? नवीन गोष्टी नाही जमल्या, नाही समजल्या तर मला कोणी समजून घेईल की नाही..... तुम्ही दोघे इकडे एकटे राहाल, तुम्हाला माझी गरज पडली आणि मी येऊ नाही शकली तर.....? किंवा अस झालं मी तुम्हालाच महत्व देतेय असं तिकडच्या लोकांना वाटू लागलं तर....? इथे हॉस्पिटलमध्ये जात होते तर आई सगळं हातात देत होती... पण तिकडे गेल्यावर घर हॉस्पिटल दोन्ही सांभाळणं होईल का मला....? घरातल्या कोणाशी नाही जुळलं माझं, भांडण झालं तर कोणी घेईल का मला समजून....? कसं सांभाळणार गं आई दोन्हीकडची नाती...? सासरच्या लोकांना वाटायला नको हिला माहेरच प्रिय अन् माहेरच्या लोकांनी अस म्हटलं की ही सासरी जाऊन आम्हाला विसरली तर...?  कसा समतोल साधणार गं आई... सांग ना? आणि रुद्र, तो कधी चिडला, रागावला, भांडला तर मग....?" मधुरा आईच्या कुशीत शिरून खूप रडत होती, रडता रडता बोलत होती.

"आई, खूप खराब स्वप्न पडलं ग मला सकाळी. आपण तिघे कुठेतरी फिरायला गेलो होतो आणि अचानक तुमच्या दोघांचा हात माझ्या हातातून सुटला... खूप मोठं जंगल होतं... मी किती आवाज देत होते... आई... बाबा.... पण कोणालाच माझा आवाज जात नव्हता... अंधार पडत होता... आणि मी एकटीच त्या जंगलात.... समोर काहीच दिसत नव्हतं... नुसता अंधार.... " मधुरा खूप रडत होती. स्वप्न सांगताना तर तिला अजूनच रडू येत होतं. आई काही बोलणार इतक्यात बाबांनी 'तिला थोडं शांत राहा' अस इशाऱ्यानीच सांगितलं.

   बऱ्याच वेळानंतर मधुरा शांत झाली, डोळ्यातून अश्रू वाहण बंद झाले होते. आई प्रेमानी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती, मधुराला समजावत होती, "मधु, ए बेटा, हे बघ इकडे, आपण जंगलात नाही बरं. घरात आहोत आपल्या. आणि आम्ही दोघे तुला सोडून कुठंच जाणार नाहीत. खूप जास्त विचार करतेय तू या सगळ्या गोष्टींचा म्हणून तुला असं स्वप्न पडलं. या जगात तूच एकटी स्त्री नाहीस की तिला लग्नाआधी असे प्रश्न पडले असतील, अशी भीती वाटली असेल. सगळ्याच स्त्रियांना वाटत असतं असं, तुझ्यासारख्या खूप कमी जणी या गोष्टी आई वडिलांशी बोलतात. न बोलणाऱ्या आतल्या आत घुसमटत राहतात.  खरंच, अवघडच असतं सगळं. आपलं घर, आपली माणसं सोडून जाणं आणि सगळं नवीन स्वीकारणं  सोप्प नसतंच. आपण मात्र एक करायचं, जेवढं प्रेम आपण आपल्या आई बाबांवर, भावंडांवर करतो तेवढंच किंवा त्यापेक्षा कणभर जास्त प्रेम आपल्या सासू- सासऱ्यांवर, नणंदा-जावांवर करायचं. सगळ्यांना आपल्या प्रेमाने, चांगल्या वागणुकीने जिंकायचं. छोट्या छोट्या गोष्टीतूनच नात्यांचा बंध बांधल्या जातो गं. खूप काही अस वेगळं नसतं करावं लागत त्यासाठी. आपल्याला कोणत्या गोष्टीला किती आणि कधी प्राधान्य द्यायचं हे कळलं पाहिजे. वेळ आल्यावर सुचतं ते बरोबर. कधी तू तुझ्या सासरच्या लोकांना प्राधान्य दिलंसही तरी आम्ही थोडी रागावणार आहोत तुझ्यावर, आमची मुलगी नवीन नात्याला दृढ करायचा प्रयत्न करतेय तर आम्ही तुला त्यात मदतच करू आणि राहता राहीला प्रश्न रुद्र भांडला तर... ते तर होणारच.. कधी तू बोलशील एखाद्या गोष्टीवरून कधी तो बोलेल.. संसार हा असाच असतो.. एकानं पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं, एकानं चिडलं तर दुसऱ्याने समजून घ्यायचं असतं.. संसाराची गाडीचे दोन्ही चाक एकाच गतीने धावायला हवे.. त्यासाठी ज्या चाकाची गती जास्त त्यानं दुसऱ्यासाठी ती थोडी कमी करावी लागते आणि ज्याची कमी त्यानं ती वाढवावी लागते, म्हणजे गाडी चांगली चालते, कोणा एकाचीच फरफट होत नाही. सगळं जमेल गं मधु तुला.. एवढी शिकलेली आहेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुझ्या होणाऱ्या सासरी आर्थिक चणचण नाही कोणत्याच गोष्टीसाठी... बस स्वभावच समजून घ्यायचे.. ते जमलं की जिंकलस सगळं."

 

   "चला, मग या गोष्टीवर एक फक्कड चहा होऊन जाऊ द्या आणि चहा मी करणार आहे बरं." बाबा असं म्हणत स्वयंपाकघरात गेले.

आईच्या बोलण्याने मधुराच्या डोक्यातल्या विचारांचं वादळ बऱ्यापैकी शांत झालं होतं. एकदम अंधारून आल्यानंतर सगळं आभाळ दूर जाऊन सूर्यप्रकाश पडावा आणि सगळं लख्ख व्हावं तस आता सगळं स्पष्ट होत होतं. संध्याकाळ झाली, दिवेलागणीची वेळ होती. आई देवघरात दिवा लावायला गेली. कधी नव्हे तर मधुराही आईच्या मागे गेली. आईने दिवा लावला, धुपबत्ती लावली. वातावरण अजूनच प्रसन्न वाटू लागलं होतं.

"आई, किती छान वाटतं ग दिवा लावल्यावर. मी एवढ्या दिवसात कधीच ही गोष्ट ऑब्झर्व नाही केली. एवढूसाच तो दिवा, अन तुपासोबत जळणारी लहानशी वात पण किती मांगल्य आणतात न वातावरणात!"

"हो ना, हीच तर सकारात्मक ऊर्जा असते, या जगात कोणी आपल्यासोबत नसलं ना तरी तो अपल्यापाठिशी आहे ही भावनाच जगण्याचं बळ देते, ही भावनाच संकटांशी लढायची शक्ती देते." गणरायाच्या मूर्तिपूढे हात जोडत आई म्हणाली.

"थॅंक्यु आई, लव्ह यु सो मच." मधुरा आईच्या मिठीत घुसत म्हणाली.

"मायलेकींचा प्रेमाचा महापूर ओसरला असेल तर या चहा घ्यायला." बाबा.

 

"आईचे डायलॉग बरोबर मारता येतात तुम्हाला." मधुराच्या या वाक्यावर सगळे खळखळून हसले.

   दिवस भर्रकन उडू लागले होते.  कधी रुद्र घरी तर मधुरा ओ. टी. त असायची, कधी रुद्र ओ. पी. डी. तर मधुरा राऊंडवर असायची. दोघांचा वेळ खूप कमी वेळा जुळून यायचा. पण आता बऱ्यापैकी मधुराचं रुद्रसोबत रोज बोलणं होत होतं पण जास्तीत जास्त वेळ मेसेज पाठवयचे ते दोघे एकमेकांना. इथे बोलायचा वेळही जुळून येत नव्हता आणि त्यात रुद्रचा सुट्ट्यांच्या प्रॉब्लेम त्यामुळं साक्षगंधाची, लग्नाची खरेदी सोबत करणं शक्य नव्हतं दोघांना. फोनवर बोलूनच त्यांनी सेम रंगांचे कपडे घ्यायचे ठरवलं होतं. 

   अवघे दोन दिवस उरले होते कार्यक्रमासाठी, मधुराच्या आई-बाबांची कामाची लगबग सुरू होती. साक्षगंधासाठी जो हॉल बुक केला होता, त्याच्याच बाजूला असलेल्या मोठ्या हॉटेलमध्ये आष्टेकरांची उतरण्याची व्यवस्था केली होती. घरी पै-पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. मधुराच्या मावश्या, आत्या, काकी, मामी आणि त्यांचे लेकरं-बाळं सगळा गोतावळा जमला होता, जो-तो मधुराला रुद्रच्या नावानी चिडवायचा, मधुरा मात्र रूद्रचं नाव ऐकूनच मोहोरत होती. 


क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न