Aug 16, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग १४)

Read Later
मधुरीमा (भाग १४)

 

 

मधुरीमा (भाग १४)

 

दोन्ही घरांमध्ये साक्षगंधाची तयारी अगदी जोरात सुरू होती. साक्षगंधानंतर दोन महिन्यातच लग्नाची तारीख होती त्यामुळं मधुराच्या घराचा कायापालट झाला होता आणि आष्टेकरांचा वाडाही अगदी नववधूप्रमाणे सजवणं सुरू होतं. सुमनताईंनी सोनाराला घरीच बोलवून घेतलं होतं. पुरुषोत्तमराव फोनवर कोणाशीतरी बोलत घरात आले होते. सुमनताईंनी त्यांना आवाज दिला, "अहो, आष्टेकरसाहेब, थोडा वेळ आहे का आमच्यासाठी? होणाऱ्या सूनबाईंसाठी दागिन्यांची ऑर्डर द्यायची आहे. तुम्ही पण पाहून घ्या.''

"मला काय कळतंय त्यातलं? तुला जे पटेल ते कर तू." पुरुषोत्तमराव फोनवरच बोलणं थोडं थांबवून म्हणाले.

"ते काही नाही. तुमचा फोन झाला की या. मी तोपर्यंत डिझाइन फायनल करते, तुम्ही पण एकदा नजरेखालून घाला." सुमनताईंनी डिझाइन सिलेक्ट केले तोपर्यंत पुरुषोत्तमरावांच फोनवरच बोलणं झालं होतं. सुमनताई त्यांना एक एक दागिन्याचं डिझाइन दाखवत होत्या.

"हा नेकलेस, ही ठुशी, हा पोहेहार, लक्ष्मीहार, ही चिंचपेटी, एकदानी, या पाटल्या, बांगड्या, पैंजण, जोडवी, हा बाजूबंद, हे दोन-तीन वेगवेगळे कानातले, नथ आणि हे ब्रेसलेट. मंगळसूत्र आणि डोरल्याच डिझाइन मला नाही आवडले. सगळे जुनाट डिझाइन आहेत. उद्या ते दुसरे आणून दाखवतील त्यातून सिलेक्ट करून घेईल मी." सुमनताई.

"झालं की अजून बाकी आहे काही. होणाऱ्या सुनबाई डॉक्टर आहेत. घालतील का एवढे दागिने?" पुरुषोत्तमराव.

"घालेल की. न घालायला काय झालं? रोज थोडी घालायचेत एवढे दागिने. सणावाराला घालेल. रोज घालायसाठी हे छोटे छोटे कानातले, या नाजूक बांगड्या आणि छोटं मंगळसूत्र करून घेतेय की. तसंह रवीशच्या (रुद्रचा मोठा भाऊ) लग्नात सगळी हौस-मौज करायची राहून गेली. दोन वर्षांसाठी म्हणून अमेरिकेला गेला. येताना लग्न करून आला. आपण आपल्या समाधानासाठी इथे आल्यावर सगळे विधी करून घेतले.  डेझीसाठी (रवीशची बायको) सुद्धा बनवले होते एवढेच दागिने, पण ती, अर्धे इथेच ठेऊन गेली. उद्या साडी वाल्याला पण बोलावलंय." सुमनताई.

"सूनबाईंसाठी दागिने तू बनवून घेतेय, ठीक आहे पण कपडे तरी त्यांना त्यांच्या मनाने घेऊ दे."

"मी कुठे साक्षगंधात, लग्नात घालायचे कपडे घेतेय. ते तर तिच्याच पसंतीने घेऊ आपण. पण पाच-सहा मानाच्या साड्या घ्याव्या लागतील ना तिच्या साठी त्या घेते. आपल्याकडे पै-पाहुणे येतील, त्यांना आहेर घ्यावा लागेल. आणि माझ्यासाठी, डेझिसाठी सुद्धा घेऊन घेते."

"मग एक काम कर, तूच साडीच्या दुकानात जा. तो दुकानदार किती साड्या इथे आणणार बिचारा. तुला रंग  आवडतो तर साडीचा पोत नाही आवडत, दोन्ही आवडलं तर डिझाइन नाही आवडत, डिझाइन आवडलं तर साडीचा प्रकार नाही आवडत. एक साडी घ्यायची म्हटलं तर तू पन्नास साड्या बघते आधी. एवढ्या साड्या घायच्या म्हणजे दुकान उलथापालथ करशील. बरं, ते जाऊ दे. ही सगळी लग्नाची तयारी झाली. पण त्या आधी साखरपुडा आहे. त्यासाठी अंगठी तर घेतलीच नाही."
 

"ते मी मधुराच्या आईला फोन करून सांगणार आहे. तिकडेच घ्या म्हणून. मधुराच्या आवडीने घेतल्या जाईल आणि पुन्हा लहान झाली, मोठी झाली असं नको व्हायला म्हणून." सोनार बिचारा केविलवाण्या नजरेने त्या दोघांकडे बघत होता. सुमनताईंच सोनारकडे लक्ष गेलं.

"अहो, या सोनार भाऊंना काही ऍडव्हान्स द्यावा लागेल दागिने बनवण्यासाठी. तो तुम्ही देऊन द्या आणि अजून काय हिशोब आहे ते तुम्ही पाहून घ्या." सुमनताई तिथून उठत बोलत होत्या.

"हे बरं आहे तुम्हा लोकांचं, खरेदी तुम्ही करणार आणि बिलं आम्ही भरायची." पुरुषोत्तमराव.

"ठीक आहे, उद्या साड्यांची खरेदी तुम्ही करा, बिल मी भरते." सुमनताई.

"नको, राहू दे. मीच भरतो बिल. हे काम सोपं आहे. आणि हो, आपल्या लाडक्या चिरंजीवांचं काय?"

"तो सगळीच खरेदी, त्याच्या सोयीने तिकडे दिल्लीलाच करणार आहे. आता तुम्ही कोणतेच प्रश्न विचारू नका बरं. ते अंगठीच डोक्यात आलंय तर राधिकाताईंसोबत बोलून घेते." सुमनताई मोबाईलवर फोन लावून घाईतच तिथून उठून गेल्या.
 

   मधुरा उठल्यापासूनच थोडी शांत शांत वाटत होती. झोप नसेल झाली किंवा एखादी केस असेल आज ऑपरेट करण्यासाठी म्हणून घरातलं कोणी काही बोललं नाही तिला. तिचं सगळं आवरून ती सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेली होती. पण कधी नव्हे तर दुपारी ती घरी आली . घराला कुलूप होतं. मधुराचे आई बाबा कामानिमित्त मार्केटमध्ये गेलेले होते. तिनी जवळच्या चावीने घराचं कुलूप उघडलं. घरातली शांतता तिला अजूनच बोचत होती. तिनी आईला फोन लावला.

"हॅलो,आई कुठे आहेस?"

"शंभर वर्षं आहेत गं मधु तुला. आताच तुझ्या होणाऱ्या सासूबाईंचा फोन येऊन गेला. अंगठी तुझ्या पसंतीने इकडेच घ्या म्हणत होत्या. तसही थोडी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आलो होतो आम्ही दोघे. तुला वेळ आहे का आता? जमत असेल तर ये ना. नाहीतर मग उद्या परवा बघून घेऊ."

"आई, अर्जंट नसेल काही तर ये ना घरी, ते अंगठीच आपण नंतर बघू, प्लिज ये न लवकर." मधुराचा आवाज रडवलेला आला.

"मधु, अग काय झालं? बरं नाहिये का? आवाज का असा येतोय तुझा?" मधुराचा रडवलेला आवाज ऐकून राधिकाताई एकदम घाबरून गेल्या. मधुराच्या बाबांना त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि दोघे हातातलं काम सोडून आधी घरी निघाले. घरी गेले तर दरवाजा उघडाच होता. मधुरा सोफ्यावर बसून दोन्ही गुडघ्यांमध्ये डोक खुपसून रडत होती.  आई मधुराजवळ बसली, तिने हळूच मधुराला आवाज दिला, तसं मधुरा आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडायला लागली. आई-बाबा दोघांचे चेहरे चिंताक्रांत झाले होते. काय झालं होतं मधुराला?

क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न