मधुरीमा (भाग१३)

Story of two friends

मधुरीमा भाग 13

   सकाळी सकाळी आईची नाश्ता, स्वयंपाकाची गडबड सुरू होती आणि सोबतच बाबांसोबत बोलत बोलत साक्षगंधासाठी कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं याची यादी बनवणं सुरू होतं. मधुरा मात्र जसं काही आपला या लोकांशी, या कार्यक्रमाशी काही संबंध नाही या आविर्भावात चहा घेत बसली होती. तेवढ्यात बाबांचा फोन वाजला, अनोळखी नंबरवरून फोन होता.

"हॅलो, कोण...? अरे वा वा.... बोला बोला... काय म्हणता?  कसे आहात तुम्ही...?" बाबांनी बोलता बोलता फोन थोडा कानाच्या बाजूला केला आणि फोनवर ऐकू न जाईल अशा पद्धतीने हात ठेवून "डॉ. रुद्रचा फोन आहे." असं हळूच आईला सांगितलं. आईसुध्दा हातातलं काम सोडून बाबांजवळ येऊन उभी राहिली होती. बाबांनी फोन स्पीकरवर टाकला होता.

"मी मजेत आहे काका.. ऍक्च्युअली बरेच दिवसांपासून फोन करायचा होता. पप्पा पण रोज विचारात होते,' फोन केला की नाही' म्हणून. तुम्ही लोक कसे आहात सगळे काकु वगैरे?"
 

"काकु मजेत आहेत आणि वगैरे तर नेहमीच मजेतच असते."   बाबा म्हणाले तस रुद्रही तिकडून थोडा लाजतच बोलत होता.

"नाही, तसं नाही... म्हणजे.... आपलं ते...." रुद्रला पुढे काय बोलावं ते कळतच नव्हतं.

" हो.. ते म्हणजे... इन मिन तीन माणसं आम्ही घरात. काय राव लाजता तुम्ही!... सरळ सरळ मधुराचं नाव घ्यायचं की. थांबा देतो मधुराला फोन." बाबा बोलत होते आणि मधुरा त्यांच्याकडे मोठे डोळे करून पहात होती. बाबांचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि तिचे हृदयाचे ठोके एकदम जोर जोरात धावू लागले. कानात पण हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता जणू काही मोठ्या मोठ्याने ढोल, ताशे, नगारे वाजत होते. त्या आवाजापुढे 'रुद्र काय बोलेल ते ऐकू येईल की नाही ' असं वाटलं तिला क्षणभरासाठी.

"हॅलो!" मधुरा थोडी लाजत, चाचरत, चेहऱ्यावरचे भाव लपवत बोलत होती.

"हाय, कशी आहेस? काय करतेय?" रुद्र.
 

" काही नाही, बस, हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करतेय. तू काय करतोयस?" मधुराने जसं रुद्रला उद्देशून 'तू' म्हटलं तस आई तिच्याकडे मोठे डोळे करून बघत होती.

" ओ. टी. मध्ये होतो. जस्ट एक केस संपली. राउंडला जाईल आता."

"अच्छा."

"ठीक आहे, कर मग तयारी. बोलू आपण नंतर."

"हो, हो. चालेल. ठेऊ का फोन?" रुद्रनी नंतर बोलू म्हटलं आणि मधुराला एकदम हायस वाटलं. तिला सुचतच नव्हतं की रुद्रशी आपण काय बोलावं.

"एक मिनिट, फोन नको ठेऊस. मला थोडं काकांशी बोलायच होतं." रुद्र घाईघाईने म्हणाला. मधुराने बाबांजवळ फोन दिला. रुद्रने बाबांना मधुराचा फोन नंबर मागितला होता.

  मधुरा तिचं सगळं आवरायला तिच्या रूममध्ये गेली होती. आरशासमोर उभं राहून उगीच स्वतःला न्याहळण सुरू होतं. कानामध्ये मघाचे वाजणारे ढोल, ताशे बंद झाले होते.  आता गिटार, व्हायोलिनचे मंजुळ सूर ऐकू येत होते. डोक्यात उगीचच एक गाण्याची धून वाजत होती.
 

         चाहे तुम कुछ ना कहो,
         मैने सुन लिया
         के साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया

मधुरा मनातल्या मनात गोड हसत होती. गाण्यातल्या अमीर खान प्रमाणे तिलाही सगळ्या गोष्टी हवेत अलगद फेकून मस्त बागडावं वाटत होतं.

           पहला नशा, पहला खुमार
           नया प्यार है, नया इंतज़ार
           कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिल-ए-बेकरार
           मेरे दिल-ए-बेकरार, तू ही बता

   त्याच धुंदीत ती तयार होऊन बाहेर आली आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हणून तिने गाडीची चावी घेतली होती. आई-बाबा तिच्याकडेच पहात होते. मधुरा आपल्याच धुंदीत, ब्लश करत निघाली होती. आई बाबा ही तिच्या मागे मागे आले होते. अंगणात येऊन मधुरा कार अनलॉक करत होती. पण कार अनलॉक होत नव्हती. मधुरा कितीतरी वेळ चावीवरच अनलॉकच बटन दाबत होती. अजूनही ती स्वतःच्याच धुंदीत होती.

"नाही होणार... अगदी इथे उभी राहून म्हातारी झालीस तरी नाही होणार." बाबांच्या आवाजाने मधुराची तंद्री भंग झाली.

"म्हणजे? काय नाही होणार?" मधुराने आई बाबांकडे बघत विचारलं.

"अगं तू स्कुटीच्या चावीने कार उघडायचा प्रयत्न करतेय ना. ती नाही उघडणार." आई
मधुराने हातातली चावी पहिली. स्वतःचच हसू आलं तिला पण तिनी ते लपवलं आणि कारची चावी आणायसाठी ती घरात जाऊ लागली होती. आईनी तिला आवाज दिला.

"मधु, हे घे चावी. आणि आता माझी पर्स आणि बाजाराच्या पिशव्या घेऊन जाणार आहेस का हॉस्पिटलमध्ये!" आई बोलली तसं तिनी स्वतःच्या हाताकडे पाहिलं, खरंच तिने आईची पर्स आणि बाजारच्या पिशव्या घेतल्या होत्या, ज्या आईनी डायनिंग टेबलच्या खुर्चीला अडकवलेल्या होत्या. मधुरा अजूनच लाजून पाणी पाणी झाली. आई-बाबाही तिच्याकडे बघून हसत होते. ते पाहून मधुराही खळखळून हसली. आईने मधुराची बॅग तिला दिली.
 

"मधु, नीट जाशील ना? की सोडून देऊ? तुझं झालं की सांग, घ्यायला येऊन जाईल. म्हणजे तुला गाडी चालवणं सुचेल ना!"

"नको बाबा, जाते मी." मधुरा स्वतःच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली आणि कार काढून हॉस्पिटलला निघून गेली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिने बॅग मधून फोन काढला. नेहमी  फोन सायलेंटवर करून बॅगमध्ये ठेवायची सवय होती तिला. तिनी फोन हातात घेतला, तिला एक नवीन मेसेजच नोटिफिकेशन दिसलं, उघडून पाहिलं तर मेसेज होता, 'हाय, मी रुद्र. हा माझा नंबर.'
   तिनी पण रिप्लाय केला,' हाय, मी मधुरा. नंबर सेव्ह केला.' रोज बॅगमध्ये मोबाईल ठेवत होती ती. पण आज मात्र रिंगिंग व्हॉल्यूम लो करून तिने फोन टेबलवरच ठेवला होता. एक पेशंट झाला की दुसरा येईपर्यंत तिचं रुद्रसोबत मेसेज मेसेज खेळणं सुरू होतं.
   एरव्ही कोणाला आजूबाजूला फटकू न देणारी मधुरा, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडणारी मधुरा, फटकन कोणालाही बोलणारी मधुरा, बोलून दुसऱ्याच्या तोंडच पाणी पळवणारी मधुरा प्रेमात पडली होती. आजकाल लाजत-मुरडत होती, गालातल्या गालात हसत होती,  स्वप्न बघत होती, स्वप्न रंगवत होती.

( आपल्याला पहिल्या भागात भेटलेला 'रुद्र' हाच. असं काय झालं होतं मधुराच्या आणि रुद्रच्या आयुष्यात की मधुरा त्याला घाबरून पळाली होती? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'मधुरीमा'.)
 

क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार

ही कथा वाचण्यासाठी  सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )

                                   © डॉ किमया मुळावकर 

 

🎭 Series Post

View all