"डॉ. रुद्र आष्टेकर." दिनकर काकांनी ओळख करून दिली.
मधुराने त्याच्याकडे पाहिले आणि आपसूकच एक गोड स्माईल तिच्या चेहऱ्यावर आलं. रुद्र पण तिच्याकडेच बघत होता. तिची अन् त्याची नजरानजर झाली आणि लाजून तिनी मान खाली घातली, गोरे-गोबरे गाल, गुलाबी होऊ लागले होते. 'हँडसम' या शब्दाची व्याख्या जर एका शब्दात कोणी विचारली तर त्याच उत्तर म्हणजे 'डॉ. रुद्र'.
"पहिल्याच नजरेत रुद्र खूप ओळखीचा, आपलासा, जवळचा वाटू लागला. Love at first sight ते हेच असतं का? आतापर्यंत कोणाबद्दलच असं काही वाटलं नाही...हे अस काय होतंय? पुन्हा पुन्हा त्याच्याकडे का पहावं वाटतंय? तो माझ्याकडे पाहतोय की नाही हे का जाणून घ्यावं वाटतंय? असं वाटतंय कोणीच नसावं आजूबाजूला, तो अन् मी... अन् नजेरेचीच भाषा...किती वेडी होते ना मी! न पाहताच त्याला नाकारत होते..." मधुरा खाली मान घालून, साडीच्या पदराचा कोपरा हातात खेळवत मनातल्या मनात बोलत होती, अगदीच बेधुंद होऊन.
तेवढ्यात दिनकर काका म्हणाले, "सुमनताई, तू विचार मधुराला काही विचारायचं असेल तर.?"
"मधुरा, तुला स्वयंपाक करता येतो का?" सुमनताई.
मधुरा मात्र स्वतःच्याच धुंदीत होती. आई मागे उभी होतीच. तिने हळूच मधुराच्या खांद्यावर हात ठेवला. तशी मधुरा एकदम तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.
"सॉरी, ते..आपलं..माझं लक्ष नव्हतं? काकू, तुम्ही मला काही विचारलं का?" मधुरा रुद्रच्या आईकडे बघत जीभ चावतच म्हटली. रुद्रच्या आईने तिचे हे भाव बरोबर टिपले. मिश्किल हसत त्यांनी परत विचारलं, "अगं, स्वयंपाक येतो ना तुला?"
"हो, अगदी पुरणावरणाचा नाही, पण साधं वरण-भात, भाजी-पोळी बनवता येतं." मधुरा.
"काय हे सुमन! अग, पोरीचं शिक्षण तरी बघ. एवढी गोल्डमेडलिस्ट पोर ती. पुढे क्लिनिक टाकेल, पेशंट्स बघेल की स्वयंपाक करत बसेल. आपण असं विचारणही चुकीचं. अन् भविष्यात ती आपली सून झाली तर तशी तिच्याकडून तशी अपेक्षा करणं तर त्याहून चुकीचं." रुद्रचे बाबा बोलले. मधुरा आणि तिच्या आईबाबांसाठी हा एक सुखद धक्का होता.
"हे मात्र बरोबर बोलले भाऊजी तुम्ही. रुद्र तू विचार तुला काही विचारायचं असेल तर. तुम्ही डॉक्टर लोकं, तुमच्या फिल्डच्या गोष्टी तुम्हालाच जास्त माहिती." दिनकर काका रुद्रकडे पाहत म्हणाले.
"मी काय विचारणार मामा." रुद्र मधुराकडे पाहत म्हणाला. मधुराचं खाली मान घालून पदराचा कोपराशी खेळणं सुरु होतं. रुद्रचा आवाज ऐकताच तिनी वर पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. "जेव्हा जेव्हा मी याच्याकडे पाहते हा माझ्याकडेच पाहत असतो. त्याला पण तेच वाटत असेल का जे मला वाटतंय? कानांनाही किती गोड वाटतो याचा आवाज. अस वाटतंय ह्यानी बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं." मधुरा मनातल्या मनात बोलत होती. तेवढ्यात मधुराच्या आईने सर्वांना जेवण्यासाठी आग्रह केला.
"जेवणाच कशाला करत बसल्या राधिकाताई, कांदेपोह्यांचा कार्यक्रम.. जेवणाचं राहूच द्या. उगीच त्रास घेत बसू नका." सुमनताई.
"त्रास कसला त्यात, तशी ही जेवणाची वेळ आहे, यावेळी जेवणच केलेलं चांगलं वाटतं. एवढा प्रवास करून आले तुम्ही लोकं. अन् न जेवता जाणार का? काही जास्त नाही केलंय, साधा बासुंदीचा बेत आहे. ते काही नाही, मी पानं घेतेय, या सगळे."
सगळेजण उठून, हात वगैरे धुवून डायनिंग टेबलवर येऊन बसले. मधुराला आता आपण काय करावे ते कळले नाही. ती पण उठून आईच्यामागे स्वयंपाक घरात गेली. ओट्याला टेकून उभी होती, हातात पदराचा कोपरा घेऊन खेळणं तर सुरूच होतं तिचं. डायनिंग टेबलवर सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मधुराची आई आणि रुद्रची आई यांच्या तर कितीतरी ओळखी निघाल्या होत्या, अगदी दूर दूरचे नातेवाईकांपासून कितीतरी जण ओळखीचे निघत होते. रुद्र, त्याचे बाबा अन् मधुराचे बाबा यांचेही सूर मस्त जुळत होते. मधुरा स्वयंपाकघरातून सगळ्यांच्या गप्पा ऐकत होती. जेवणं झाली, अन् परत सगळे हॉल मध्ये गेले. मधुराची आई बासुंदी फ्रिजमध्ये ठेवायला स्वयंपाकघरात आली तेव्हा मधुरा तिथेच उभी होती.
"अगं मधु, अजून इथेच उभी का तू? तुझ्या रूममध्ये गेलीस तरी चालेल आता. नाहीतर जेऊन घेतेस का? भूक लागली असेल ना."
" आई, तुझंही जेवण बाकी असेल ना."
"हो. पण हे पाहुणे मंडळी निघतील ना आता. नंतरच जेवते मी शांततेत."
"ठीक आहे दोघी सोबतच जेऊ." अस म्हणून मधुरा तिच्या रूममध्ये गेली. गेल्या गेल्या तिने आधी साडी बदलून घरचा ड्रेस घातला. अगदी पाचच मिनिटात हॉलमधून येणारे बोलण्याचे आवाज बंद झाले. 'गेले बहुतेक हे लोक,' मधुराने अंदाज लावला. खिडकीची फट थोडी किलकिली करून पाहिलं, आई बाबा त्या लोकांना सोडायला फाटकापर्यंत गेलेले होते. अजून थोडी जास्त खिडकीची फट तिनी उघडली पण रुद्र काही तिला दिसला नाही. "मी रुद्रला का शोधतेय?" स्वतःवरच हसत मधुरा हॉलमध्ये येऊन बसली. तेवढ्यात आईबाबाही घरात आले.
"मधुराची आई, अबोली रंगाची साडी घालून एक बाई आल्या होत्या आपल्याकडे, त्या दिसल्या का तुम्हाला? त्यांना एक विचारायचं होतं. साडीच्या पदराचा कोपरा फाटला, का आहे तसाच, नीट बघून घ्या म्हणून. हो, अन् पाहायला आलेले पाहुणे नंतर कळवतो म्हणे, अबोली रंगाच्या साडीतल्या बाई त्यांना आवडल्या की नाही ते." मधुराचे बाबा तिला चिडवत म्हणाले.
"हे काय हो बाबा...! जा बाबा... आई तू येणार आहेस का जेवायला? मला खूप भूक लागलीये." मधुरा पाय आपटत स्वयंपाक घरात गेली. आई बाबा ही तिच्या मागेच गेले.
"मग , कसा वाटला रुद्र? " बाबानी खुर्चीवर बसत मधुराला प्रश्न विचारला.
"चांगला आहे दिसायला, सध्या एवढं सांगू शकते. बाकी एवढ्या कमी वेळात स्वभाव काय कळणार?" मधुरा.
"इथे तीस-तीस वर्षं होतात लग्नाला तरी लोकांचे स्वभाव कळत नाहीत. तू काय अर्ध्या तासाच्या भेटीवरून अंदाज लावणार." बाबा मधुराच्या आईकडे बघत, चिडवत बोलले.
"तेच म्हटलं मी, दिवस अर्धा संपला पण माझ्यावर अजून एकही टॉण्ट कसा नाही पडला ." आईच्या या वाक्यावर सगळेच खळखळून हसले. हसत खेळत दिवस संपला.
दुसऱ्या दिवशीपासून मधुराचं रुटीन पुन्हा सुरू झालं होतं. एरव्ही हॉस्पिटलमध्ये, पेशंटच्या सहवासात सगळं विसरणाऱ्या मधुराला आजकाल रुद्र डोळ्यासमोर दिसायला लागला होता. त्याची आठवण काढावी वाटत होती, त्याच्याबद्दल कोणी बोलावं, तिला कोणीतरी विचारावं रुद्रबद्दल अस वाटू लागलं होतं. चार-पाच दिवस असेच गेले. रुद्राच्या घरून काही फोन आला नव्हता. 'बहुतेक नकार असावा त्यांचा' मधुरा स्वतःचेच अंदाज बांधत होती.
एक दिवस सकाळी सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला होता. डॉ. गिरीजा कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. तसं त्यांनी मधुराला आधीच कल्पना देऊन ठेवली होती. फोन आला तसा मधुरा सकाळीच हॉस्पिटलमध्ये निघून गेली. दिवसभर भरपूर काम पुरलं. निघायची वेळ झाली पण जणू आज काही सगळ्या पेशंटनी ठरवलं होतं 'आजच दवाखान्यात जायच'. पेशंटची लाईन संपता संपत नव्हती. तिनी कसातरी दोन मिनिटांचा वेळ काढून आईला मेसेज पाठवला "यायला उशीर होईल." रात्री आठ-साडे आठ वाजता मधुरा घरी गेली. आई बाबा अंगणात खुर्ची टाकून बसले होते. बाबांचं फोनवर बोलणं सुरू होतं. मधुरा आली तस त्यांनी फोनवरच बोलणं आवरतं घेतलं. मधुरा तिथेच आईजवळ बसली.
"आष्टेकरांचा फोन होता. त्यांच्याकडून होकार आहे. पण.."
"पण ..मग पुढे काय म्हणाले ते..." मधुराची आई बाबांचं बोलणं अर्धचं तोडत म्हणाली.
"पण..आपल्या मधुराला लग्नच तर नाही करायचंय आणि तिला तर रुद्र मुळीच आवडला नाही." बाबा.
"मी कधी असं म्हणाले." मधुरा पटकन बोलून गेली.
आई बाबा दोघेही तिच्याकडे पाहून हसायला लागले.
"बरं का मधुराच्या आई, आष्टेकरांनी निमंत्रण दिलंय आपल्याला. घर बघायला या म्हणून. येणाऱ्या रविवारी बोलावलंय. मधुराला पण घेऊन या म्हणे". बाबा मधुराकडे बघत बोलले.
"अहो, पण रुद्र नाहीये म्हणे ना तिथे, तो तर त्याच दिवशी दिल्लीला वापस गेला. मग मधुरा कशी येईल." आई पण मधुराची मस्करी करत बोलली.
"झालं तुमचं? की अजून चिडवायचं बाकी आहे? एव थकून-भागून आलं लेकरू. गरिबाला कोणी जेवायला देणार आहे का?" मधुरा नाक फुगवत घरात निघून गेली.
खूप खुश झाली होती मधुरा. राहून-राहून रुद्रचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. पटकन रीमाला फोन करून सांगावस वाटलं. पण पुन्हा तिने विचार केला,' त्या लोकांनी फक्त होकार दिलाय, अजून लग्न कुठे पक्क ठरलंय. लग्न ठरल्यावरच सांगते. आता नकोच.' पण रीमाला सांगितल्याशिवाय मधुराला कुठे करमणार होतं. तिनी लगेच रीमाला फोन लावला. पण रीमा फोन उचलत नव्हती. मधुरानी तिला,' महत्त्वाचे बोलायचे आहे' असा मॅसेज पण केला, मेल पाठवला. मधुराने चार-पाच दिवस सतत फोन, मॅसेज केले पण रीमाने फोन उचलला नव्हता आणि मॅसेज ला उत्तर पण दिल नव्हतं.
क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार
ही कथा वाचण्यासाठी सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )
© डॉ किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा