Aug 18, 2022
कथामालिका

मधुरीमा (भाग १०)

Read Later
मधुरीमा (भाग १०)

 


मधुरीमा ( भाग 10)

"मधुरा, हे घे. जिथे जिथे तो मुलगा शिकला ना त्या सगळ्या कॉलेजसचे नंबर आहेत यात. तूच विचारून घे. नाही, तुझा तर आमच्यावर पण विश्वास नाहीये. पण आमचा लोकांवर आहे ना, काही नाती विश्वासानीच निर्माण केलीयेत आम्ही. अगं, तुला नुसता बायोडाटा दाखवला होता, अजून मुलगा पण बघायला आला नाही, त्यांची पसंती आली नाही, अन् तू एक वेगळंच खूळ घेऊन बसली डोक्यात, अन् आमच्याही डोक्यात तेच टाकलस. दोन-चार मार्कांनी त्या मुलाचा नंबर नाही लागला म्हणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. अगं चिक्कार पैसा आहे त्यांच्या जवळ. वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. बाकी अभ्यास, परीक्षा त्याच्या त्यानेच दिल्या ना. तुमच्या डॉक्टरी पेशात पास होणं किती अवघड आहे हे तुलाही माहिती आहे ना."

 

"हो, पास होणं ही गोष्ट वेगळी. पण मी सकाळी तुम्हाला म्हटलं तर लगेच फोन लावून विचारायची काय गरज होती. त्यांनी नंबर दिले अन तुम्ही लगे लिहून पण घेतले. आपण दुसऱ्या कोणाकडून काढली असती ना माहिती." मधुरासुद्धा चिडून बोलली.

"मधुरा, प्रत्येक वेळी असं चिडून, फटकून बोलणं चांगलं नाही. सगळे लोक समजून घेणारे असतील असं नसतं." बाबांना बोलताना अचानक दरदरून घाम सुटला.


   मधुराचं लक्ष गेलं. तिनी बाबांना लगेच पलंगावर झोपवलं, धावत जाऊन बी पी चं मशीन आणलं,  बी पी पहिला, बी पी वाढलेला होता.
"बाबा, तुम्ही आज बी पी ची गोळी घेतली होती का?"
बाबांनी  तिच्या प्रश्नाच उत्तर दिले नाही.

"म्हणजे नाही घेतली." मधुराने ताबडतोब त्यांना बी पी ची गोळी दिली. आणि त्यांना झोपायला लावलं. एका तासाने परत बी पी घेण्यासाठी मशीन हाताला बांधलं तर बाबांना जाग आली. बी पी  पहिल्या पेक्षा कमी  झालं होतं.

"म्हणूनच मला लग्न नाही करायचं. मी सोबत असताना तुम्ही तुमच्या तब्येतीची हेळसांड करता, मी दूर गेल्यावर तर काय कराल?"

"आमच्या मुलीला काळजीत न टाकण्यासाठी कदाचित आम्ही जास्त काळजी घेऊ असंही होऊ शकत ना." बाबा

"ठीक आहे, तुम्हाला वाटतं तसं करा बाबा, मी नाही यात काही बोलणार." मधुरा बाबांच्या मांडीवर डोकं ठेवत बोलली.

"मग पाहण्याचा कार्यक्रम करून घ्यायचा का? तू सांग तुझ्या सोयीची तारीख कोणती? मग त्यानुसार मी दिनकरशी बोलतो." बाबा मधुराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

"कोणतीही तारीख चालेल मला. मुलगा दिल्लीला आहे म्हणता ना, इतक्या दूर यायचं म्हणजे त्याचा बराच वेळ प्रवासात जाणार. त्याच्या सोयीनी येऊ द्या. मी इथेच आहे. एक दिवसाची सुट्टी काढून घेईल. बाबा, तुम्ही आता थोडा आराम करा. कोणतंच टेन्शन घेऊ नका आणि खूप विचारही करू नका. जेवण तयार झालं की मी आवाज देते, तोपर्यंत एक झोप घ्या." मधुराने बाबांना जबरदस्ती झोपायला लावलं. आई स्वयंपाक घरात गेली. मधुराही आईच्या मागे गेली.

   "आई, पण तीन वर्षांनी मोठा आहे अगं तो." आई स्वयंपाक करत होती अन् मधुराची आईच्या मागे भुणभुण सुरू होती.

"अगं, तुझे बाबा माझ्यापेक्षा सहा  वर्षांनी मोठे आहेत. ते काय खूप म्हातारे अन् मी काय खूप तरुण दिसते का? मधु, अग थोड्याफार अशा गोष्टी चालतच असतात. लग्न जमवताना हजार लोक हजार गोष्टी सुचवतात, त्यातही जे आपल्याला पटेल, जे आवडेल तेच आपण घ्यायचं. प्रत्येक वेळी आपण नकारघंटा नाही वाजवू शकत. समाजात मग आपली तशीच प्रतिमा तयार होते. मधु, दिनकर भाऊजी तुझ्या बाबांचे चांगले मित्र आहेत. बाबांसाठी तरी एकदा त्या मुलाला बघून घे, नंतर तुला नाही आवडला तर आपण नकार कळवू. तुला न विचारता थोडी तुझं लग्न लावून देणार आहोत आम्ही."आई मधुराला समजावत होती.

"हं.. ठीक आहे ना..पण मला मुलगा नाही आवडला तर जबरदस्ती नाही करायची की हेच चांगलं, तेच चांगलं असं करून."

 

"हो गं बाई, तू म्हणशील तस. जा बाबांना उठव जेवायला."

   जेवताना कोणीच कोणाशी काही बोलले नाही. मधुराने बाबांचा झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा बी पी तपासला, नॉर्मल होता. सक्तीची आरामाची ताकीद देऊन मधुरा पण झोपायला गेली. रात्री रीमासोबत बोलणं झालं, तिचं सुध्दा म्हणणं पडलं की' एकदा मुलगा बघून तर घे.'

   दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मधुराने बाबांचा बी. पी. तपासला, "बाबा तुम्हाला नक्की काही त्रास होत नाहीये ना. नाहीतर चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन एक ई. सी. जी. काढून घेऊ."

"मधु, बाळा अरे मला काहीच त्रास होत नाहिये. काल मी गोळी घ्यायला विसरलो, म्हणून झाला गं. तू एवढं टेन्शन घेऊ नको." बाबा.

"आता मलाच म्हणा, टेन्शन नको घेऊ म्हणून. बी. पी. माहिती का केवढा वाढलेला होता ते!" मधुरा.

"अगं, पण ऐक तर माझं." बाबा बोलत होते पण मधुरा बाबांचं बोलणं न ऐकताच रागातच तिथून उठून हॉस्पिटलला जाण्याची तयारी करायला रुममध्ये निघुन गेली. दोन मिनिटात परत बाहेर आली.

"ते काही नाही बाबा, मी आत्ता फोन केला होता डॉ. मोरे सरांना, सर आहेत ओ. पी. डी. मध्ये. चला आपण एकदा जाऊन सरांना दाखवून येऊ आणि ई. सी. जी. पण काढून येऊ. आई, बाबांची फाईल देतेस का?" मधुरा.

   मधुरानी बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं. जाताना डॉ. गिरीजा मॅडमला फोन करून 'यायला थोडा उशीर होईल' असं कळवलं. बाबांचे ई. सी. जी. वगैरे रिपोर्ट नॉर्मल आले. मधुरा आणि बाबा वापस घरी आले. घरी आल्या आल्या बाबांनी मुलगी पहायला आमंत्रण देण्यासाठी दिनकर काकांना फोन लावला. त्यांनी त्यांच्या बहिणीसोबत अन् भाच्यासोबत बोलून दहा दिवसानंतर येतो असा निरोप दिला. आईची लगेच कामाची यादी तयार करत होती. बाबा पण तिला एक एक गोष्ट सुचवत होते. दोघांचा उत्साह मधुरा बघत होती. मधले हे दहा दिवस मधुरासाठी नेहमी प्रमाणे गेले. आई बाबा मात्र घरात लग्न ठरल्यासारखं सगळी तयारी मोठ्या उत्साहात करत होते.


   मुलगा पाहायला येणार त्यादिवशी मधुराने सुट्टी घेतली होती. मधुरा सकाळी उठली, आई नी तिला मस्त गरम गरम चहा, नाश्ता दिला. तो घेऊन ती अंघोळ करून रूम मध्ये आली तर आईनी तिच्या बेड वर एक अबोली रंगाची साडी ठेवलेली होती. ही तीच साडी होती  जी दोघी माय-लेकींनी मोठ्या हौशीने घेतली होती, त्यावेळी मधुरा तिच्या आईला म्हणालीसुद्धा होती, 'मी साड्या नेसत असते ना तर तुझी ही साडी मी नक्कीच ढापली असती.' मधुरा साडीवरून मायेने हात फिरवत हाती, तेव्हढ्यात आई तिथे आली.

"मधु, नेसशील ना साडी, तुला ड्रेस घालायचा असेल तर ड्रेस घाल. तुला आवडली होती ही साडी म्हणून काढून ठेवली होती मी."

आईला पाहून मधुराला एकदम भरून आलं, तिनी लगेच आईला मिठी मारली.

"ए वेडाबाई, असं रडतात का? पाहायला पाहुणे येताय, लगेच लग्न होऊन नाही जाणार तू. बरं, चल छान तयार हो, आणि मी बोलवायला येईल तेव्हा बाहेर ये." आई मधुराला सांगून किचनमध्ये गेली.

अबोली रंगाची साडी, त्यावर साजेसा हलका मेक-अप, कानात छोटे डायमंडचे कानातले, गळ्यात डायमंडचा नाजूक हार आणि हातात एक एक नाजूकशी डायमंडची बांगडी, मधुरा छान तयार झाली होती. आता रूम मध्ये बसल्या बसल्या काय करावं असा विचार केला आणि रीमाने पाठवलेले मेल्स बघत, पुस्तक वाचत नोट्स काढत बसली होती. थोड्या वेळात बाहेर लोकांचा हसायचा, बोलायचा आवाज आला. 'बहुतेक पाहुणे मंडळी आली असतील', मधुराने अंदाज लावला. पंधरा-वीस मिनिटांनी आई बोलवायला आली.


"किती शहाणं माझं बाळ ते. एवढं मस्त तयार होऊन अभ्यास करत बसलंय." मधुराच्या रुममध्ये येत आई बोलली.
"मग, काय करणार गं दुसरा टाइम पास तरी. आई थोड्या निऱ्या नीट करून दे ना." मधुरा खुर्चीवरून उतरत म्हणाली.

"आई, टी. व्ही. मध्ये दाखवतात तसं, चहा पोहे नेऊन दयावे लागतात का गं?"

 

"अगं आपण त्यांना जेवायला बोलावलंय, आणि मी त्यांना नेऊन दिलंय चहा-पाणी. तू फक्त चल आणि बस तिथे." आईने मधुराच्या निऱ्या नीट करून दिल्या आणि त्याला एक साडीपीन लावून दिली.

"खूप सुंदर दिसतेयस !"  असं म्हणत काजळाचा तीट मधुराच्या कानामागे लावला.

   आईसोबत मधुरा समोर हॉलमध्ये आली. आईने तिला मुलाच्या आई-बाबांना नमस्कार करायला लावला. एक खुर्ची रिकामी होती. आईने मधुराला तिथे बसायला लावलं आणि ती मधुराच्या मागे उभी राहिली. तेवढ्यात दिनकर काका म्हणाले, "आपण परत एकदा एकमेकांची ओळख करून घेऊ, म्हणजे मधुरालाही कळेल सगळ्यांबद्दल. दिनकर काका मुलाच्या बाबांकडे पहात म्हणाले, भाऊजी  ही  मधुकर आणि राधिका वहिणींची एकुलती एक कन्या डॉ. मधुरा कानिटकर. बरं का मधुरा, आता तुला या सगळ्यांची ओळख करून देतो. हे मिस्टर पुरुषोत्तम आष्टेकर, या त्यांच्या मिसेस सुमन आष्टेकर. आणि हे त्यांचे कनिष्ठ पुत्र डॉ‌. रुद्र आष्टेकर....."


क्रमशः 

फोटो- गुगलवरून साभार

(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत.कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )


                                   © डॉ किमया मुळावकर

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न