मधु इथे अन् चंद्र तिथे

कथा जोडप्याच्या एकांताची

मधु इथे नि चंद्र तिथे..



" ये रात और ये दुरी.. तेरा मिलना है जरूरी.." सुयश येता जाता तीच ओळ परत परत म्हणत होता..

" मधु इथे नि चंद्र तिथे झुरतो अंधारात.. " प्रीतीने काम करणाऱ्या मावशींकडे बघत सुरुवात केली..

ते ऐकून सुयशचा चेहरा उतरला.. आज कितीतरी दिवसांनी घरी तो आणि प्रीती एकटेच असणार होते.. त्यांची दोन्ही मुले आजीआजोंबासमवेत त्यांच्या आत्याकडे गेली होती.. त्यामुळे आजची संधी सोडायची नाही असे त्याने मनाशीच ठरवले होते.. चहापाणी करून मुले बाहेर पडेपर्यंत मावशी आल्या होत्या.. बरं मावशींना येऊ नका सांगायचे तर ती कामे आपल्या अंगावर पडण्याचा धोका जास्त.. जो त्याला पत्करायचा नव्हता. तो गाणी म्हणत मावशी जायची वाट बघत होता.. मावशी किचनमध्ये भांडी करत आहेत हे पाहून तो हळूच बेडरूममध्ये गेला.. प्रीती कोणाशीतरी फोनवर बोलत होती.. न राहवून त्याने प्रीतीला पाठून मिठी मारली.. तिच्या धुतलेल्या केसांचा वास तो भरून घेत असतानाच कानावर शब्द पडले..

" कधी? आज दुपारी?"

त्याने प्रीतीला आपल्याकडे वळवले.. मानेने जोरजोरात नाही असे सांगायला सांगितले..

"हो.. अग आज मुले गेली आहेत त्यांच्या आत्याकडे.. मला जमायला हरकत नाही.." प्रीती बोलतच होती.. सुयशला आता तिचाच राग यायला लागला होता.. आठवड्याचे सहा दिवस ऑफिस.. त्यात घरी त्याचे आईबाबा, मुले.. रात्री झोपताना मुलगी लहान म्हणून ती या दोघांच्या मध्ये झोपायची.. ती झोपते म्हणून मग मुलगा तरी का पाठी राहील? तो हि यांच्यासोबतच झोपायचा.. त्यात या दोघांना स्वतःचे असे काही क्षण मिळायचेच नाहीत.. त्यालाही मुलांसोबतच आवडायचे.. पण कधी तरी प्रीती एकटीच असावी असे सतत वाटत रहायचे.. पण हे असे क्षण फार कमी येत.. कारण बाहेर गेले तरी सगळ्यांनी एकत्रच जायचे यामुळे जे काही चोरटे क्षण मिळायचे तेच गोड मानून घ्यावे लागायचे.. शेवटी दोन दिवसांपूर्वी त्याने ताईला फोन करून एक दिवस मुलांना तिथे पाठवायचे ठरवले म्हणजे संध्याकाळी घेऊन येता आले असते.. तर आता प्रीतीचे हे काहीतरी नवीनच.. सुयश तोंड फुगवून बसला होता.. प्रीती कधी बाहेर गेली हे त्याला कळले सुद्धा नाही.. कसलातरी गोड वास आला म्हणून त्याने पाठी पाहिले.. त्याला आवडणारी नाइटी घालून प्रीती आत येत होती.. तिच्या हातात सुगंधी तेलाचे छोटे दिवे होते.. ते तिने एका कोपर्‍यात ठेवले.. मोबाईलवर मंद स्वरात गाणे सुरू केले..

" मालवून टाक दीप......"

सुयशच्या मनात लड्डू फुटायला सुरुवात झाली पण तरिही तो तोंड वळवून बसला..

" अच्छा चिडला आहेस का तू?" प्रीती त्याच्या जवळ येऊन हळूच बोलली.

" मी कोण चिडणारा? तुलाच कुठे कुठे जायचे होते ना?" खरेतर सुयशला तिला मिठीत घ्यायचे होते.. पण.. रागाचे नाटक मध्ये येत होते..

"हो.. आमचा कार्यक्रम तर ठरला होता.. मी नाही म्हटले होते.. पण तू आता म्हणतोस तर जाते बापडी मी."

प्रीती उठून जात असतानाच सुयशने तिचा हात धरला..

" पण मग तू फोनवर काय ठरवत होतीस?"

" त्याचे काय आहे, मावशी घरात काम करत असताना तुला दूर कसे ठेवायचे हा प्रश्न पडला होता.. मग काय जालिम उपाय केला.." प्रीती हसत म्हणाली..

" मावशी गेल्या?"

" कधीच.. आणि आता मी ही जाते."

" तू जाशील ग.. पण मी जाऊन देईन तर ना?" सुयशने प्रीतीला जवळ ओढले..


तृप्त असे ते दोघेही एकमेकांच्या कुशीत पहुडले होते..

" असं वाटतंच नाही ना , आपण नवराबायको आहोत?" सुयश म्हणाला.

" का रे?" प्रीती त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाली..

" बघ ना.. नवराबायको म्हणून हक्काचे क्षण मिळवण्यासाठी किती खटपटी कराव्या लागतात.. सगळ्यांपासून लपून तुला असे भेटावं लागते.. खूप काही अपेक्षा नाहीत ग.. पण शेवटी काही शारीरिक मानसिक गरजा असतातच ना.."

" हो रे.. पण आता काहीतरी तडजोड तर करावी लागणारच ना? आणि कसे असते रोज पंचपक्वान्नाचे ताट समोर आले कि खाणाराही कंटाळतो.. तसेच समज हवे तर.. मिळणारे हे क्षण सोनेरी करून ठेवायचे.. एवढेच आपल्या हातात आहे.. हो ना?"

सुयशने काहीच न बोलता प्रीतीच्या हातावर थोपटले.. मागे गाणे वाजत होते..

" आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे....."


कथा कशी वाटली नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई