आरोग्याची पाठशाळा: शरीराचे इंधन - मॅक्रो न्यूट्रिएंट्स

Let's Learn About Macronutrients & How They Work

नमस्कार मंडळी !!!
मी आपल्या घरातली डॉक्टरीण.
आज पुन्हा आपल्या भेटीस येत आहे.
'आरोग्य आणि पोषण' या लेख संग्रहातून. या लेख संग्रहाचा उद्देश आपणास 'न्यूट्रिशन' (पोषण) बद्दल माहिती देण्याचा असून हा कोणताही वैद्यकीय सल्ला नव्हे, हे आपण कृपया लक्षात घ्यावे.
आहारात बदल करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
चला तर मग...
आजचा विषय आहे 'मॅक्रोन्यूट्रिएंट्स'


'मॅक्रोन्यूट्रिएंट्स' तीन गटात मोडतात - कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स.

1.कार्बोहायड्रेट्स -
सर्वसाधारण संतुलित आहारात कार्बोहायड्रेट्स एकूण 50% ऊर्जा देतात.
साधारणपणे आपण आहारातून घेणारया वेगवेगळ्या कार्बोहाइड्रेट्सला 'शुगर' असे म्हणतात. जी दोन प्रकारात मोडते.

नैसर्गिक स्त्रोतातून मिळणारी साखर, जी आपण आहे त्याच रूपात खातो, तिला Intrinsic शुगर म्हणतात. शब्दशः, इंट्रीन्सिक म्हणजे 'आतील'.
फळे, भाज्या, दूध यात असणारी साखर.

जेव्हा उसाच्या रसावर प्रक्रिया करून त्यातील साखर बाहेर काढली जाते, तिला एक्सट्रीन्सिक शुगर (बाहेरची) म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघरातली पांढरीशुभ्र साखर.

हीच प्रक्रिया केलेली एक्सट्रीन्सिक शुगर - सुक्रोज, मालटोज, फ्रुक्टोज. हे खाण्याचे प्रमाण नियंत्रणाबाहेर गेले की डायबेटीस व दाताला कीड लागणे या गंभीर समस्या जन्म घेऊ लागतात.

अनेक मणी दोऱ्यात ओवले की माळ तयार होते.
एक मणी म्हणजे मोनोसॅकराइड्स.
दोरा म्हणजे त्या मण्यांना एकत्रित धरून ठेवणारा रासायनिक बंध,
जो या मोनोसॅकराइड्सला जोडून त्यांची माळ म्हणजे कार्बोहायड्रेट्स तयार करतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सची रचना ह्या या वेगवेगळ्या मण्यांच्या माळा असतात.
त्यात कोणत्या रंगाचा मणी वापरला, कशा पद्धतीने ओवला यावर ती रचना अवलंबून असते.
आपण खाल्लेले अन्न शरीरात जसेच्या तसे स्वीकारले जात नाही. ही मण्यांची माळ 'एंजाइम्स' नावाच्या कात्रीने तोडली जाते आणि मग एक एक मणी (मोनोसॅकराइड्स) शरीरात स्वीकारले जाते.
काही एंजाइम्सची कात्री धारदार असते. त्या पटपट मोनोसॅकराइड्स सुट्टे करतात तर काही एंजाइम्स हळूहळू त्यांचं काम करतात.
जेवढ्या लवकर मोनोसॅकराइड्स सुट्टे होणार तेवढ्या लवकर शरीरात साखरेची पातळी वाढणार.
अशा अन्न पदार्थांचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' जास्त आहे, असे गृहीत धरले जाते.
उदा. शीतपेये
यामुळे स्थूलपणा आणि डायबेटीस( टाईप टू) फोफवायला स्थान मिळते.

डायटरी फायबर :
हे किचकट प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत, ज्यांना आपले शरीर पचवू शकत नाही. कारण त्यांना पचवण्यासाठी लागणारे एंजाइम्स आपल्याकडे नाहीत.
मग आपल्याला प्रश्न पडला असेल,
की जे आपलं शरीर पचवू शकत नाही ते खाऊन उपयोग काय ?
काही प्रकारचे डायटरी फायबर पचनसंस्थेत असताना पाणी धरून ठेवतात, ज्यामुळे आपल्या आपल्या शौचेची क्वांटिटी वाढते व बद्धकोष्टता (कॉन्स्टिपेशन) असणाऱ्यांना शौचास व्हायला मदत होते.
आता आपणास समजले की डॉक्टर सॅलड, पालेभाज्या खाण्यास का बरे सांगतात..
डायटरी फायबर्समुळे डायव्हर्टीक्युलॉसिस व कोलोन कॅन्सर यांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.
काही डायटरी फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही मदत करतात.
त्यामुळे आपल्या आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करण्यासाठी आपल्या डॉक्टरांना आवर्जून विचारा.

फॅट्स:
हा असा अन्नघटक आहे ज्यात सर्वात जास्त ऊर्जा देण्याची क्षमता असते. कमी क्वांटिटीत भरपूर ऊर्जा देणारे हे अन्नघटक असतात.
यांचे अतिसेवन हळूहळू शरीरातील चरबीचे प्रमाण वाढवते.यामुळे आहारात यांचा समावेश प्रमाणात असावा.
उदा. वनस्पतीजन्य तेल, तूप, फिश ऑइल,लोणी, मलई, बटर

प्रोटीन्स:
प्राणीजन्य स्त्रोतातून मिळणारे प्रोटीन्स - अंडी, दूध ,मांस, हे वनस्पतीजन्य स्त्रोतांपासून मिळणाऱ्या प्रोटीन्स पेक्षा जैविक दृष्ट्या उच्च दर्जाचे असतात.
वनस्पतीजन्य प्रोटीन्स हे आपण जोडीने ग्रहण करतो. जेणेकरून एकमेकांमधील पोषणाची कमतरता ते भरून काढतात व परिपूर्ण पोषण देतात.
यांचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -
"वरण-भात".
हे म्हणजे प्रोटीन विश्वातलं प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल जणू.

पुढील भागात आपण मायक्रोन्यूट्रियंट्स बद्दल माहिती पाहू. म्हणजे विटामिन्स व मिनरल्स (जीवनसत्वे आणि खनिजे)

🎭 Series Post

View all