Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

मशीन

Read Later
मशीन
" बाई, पोरगी वाचंल ना? " तिने विचारलं.

मी एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकून ऑपरेशन थिएटर गाठलं.

सीझर करून बाहेर आले, पोरगी आणि तिचं लेकरू सुखरूप आहेत सांगितलं पण ICU त ठेवावं लागेल, पुढचे दोन दिवस महत्वाचे असं समजून सांगितल्यावर ती माऊली हात जोडू लागली.

" लई उपकार झाले वो ताई , मी काय केलं असतं नाही तर? " म्हणून रडू लागली.

" आता रडून काय उपयोग? तुम्ही चुकीचं वागता आणि शिक्षा मुलींना किंवा डॉक्टरला, हो ना? आई वडिलांची चूक कोणीच लक्षात घेत नाही पण बाळंतपणात बाई गेली कि जणू डॉक्टरने मुद्दाम मारली असं समजून आमच्याच डोक्यावर पिस्तूल धरली जाते " मी चिडले होते.

" तसं न्हाई ओ, आमचा बी नाईलाज असतोय.... " ती म्हणाली.

" पोरगी सोळा सतरा वर्षांची झाली कि जड होते का लगेच? इतकी वर्ष खाऊ पिऊ घालता अन अचानक पैशाची नड होते? देता लावून लग्न लगेच! " मी कडाडले.

" काय सांगू ताई? खाऊ पिऊ घालायचं काही नाही, शाळा आहे गावात पण कालिज न्हाई मग तालुक्याच्या गावाला रोज कसं पाठवायचं? बरं पोरीला अभ्यासात काय रस न्हाई, ती बी तयार न्हाई जायला. घरी दिसभर ती एकलीच रहाणार, तिचा मोठा भाऊ हास्टेलला असतो, बाप दारू पिऊन पडतो अन म्या शेतात. कसं करायचं सांगा? " तिने विचारलं.

" अगं म्हणून काय झालं? घरात बसून केलं असतं काही शिवणकाम, स्वयंपाक, त्यात काय एवढं? नाहीतर तिला शेतात न्यायची कामाला " मी म्हंटल.

" एवढं सोयीचं न्हाई ते, सरकारने गावागावात कालिज न्हाई काढले पर ते फोनमधलं काय म्हणतात ते यंटरनेट धाडलं. लई आगाऊ झाल्याती पोरं पोरी..... आपल्या मागं काय करतील सांगता येत न्हाई. आणि..... " बोलता बोलता ती थांबली. कसं सांगू हे तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं.

" बोल...." मी म्हंटलं.

" पोरं पोरी जाऊ द्या, तिचा बा काय करेल म्या सांगू शकत न्हाई. घरातच गिधाड हाये माझ्या, काय करायचं ? पोरगी वयात आली तेव्हापासन डोळा हाये त्याचा, अंगलटीला येतो सारखा. मग त्यापरीस म्या बी पडू देते त्याला पिऊन..... काय करणार होते मी, दिलं लगीन लावून, पोर सुखाची तरी रहान म्हंटलं " ती म्हणाली.

" अरे देवा, आपलेच दात अन आपलेच ओठ! तक्रार करायची ना मग पोलिसांत? " मी म्हंटलं.

" त्यानं काय हुणार? काय केलं न्हाई तुवर कसं पकडणार म्हणत्यात अन काही केल्यावर मी काय करू? बरं त्याला पोलिसात धाडल्यावर माझी अब्रू राहील का? मला धरतील गिधाडं!पोरीला बी समध कळतंय. तिकडं सासरला बी सासू लै तरास देती पर तरी बी लगीन झाल्यावर घरला आलीच न्हाई पुरगी , आता डायरेक डिलिव्हरीला आणलं हुतं परवाच आन काल रात्री फिट आली तर तिथल्या आशा ताईंनी इथं धाडलं, शिरीयस हाय म्हणली " तिने सांगितलं.

माझा राग जाऊन तिथे आता हतबलतेची भावना आली होती. घरी, दारीं, माहेरी, सासरी किती सोसायचं त्या मुलीने? कोपऱ्याकोपऱ्यावर तिला कधी शारीरिक कधी मानसिक लोचणारी गिधाडं आहेत भोवती. लहान वयात होणारं लग्न, मातृत्व, परावलंबन आणि त्यातून तिची होणारी होरपळ, कसा सोसत असेल तो एवढासा जीव? आणि आई? ती तरी कशी सांभाळणार सगळं? रागा ऐवजी माझ्या मनात आता तिच्याविषयी करुणा दाटून आली.

" पण तरी, लवकर लग्न, नको असलेलं अकाली आईपण , त्यातून होणारी तिच्या शरीराची झीज हे काही उत्तर नाही गं ह्या सगळ्यांचं. जीव गेला असता तिचा आज..... " मी हताश होऊन म्हंटलं.

" बाईच्या आयुष्यात किती तरी वेळा काळ येतो पण वेळ येत नाही अन ती जगून मरत रहाते, काय करता ताई? बाई भोगवस्तू आणि लेकरं बाहेर काढायचं मशीन आहे असं वाटतंय तोवर काय बदलायचं नाही..... "

ती म्हणाली आणि मला आठवलं, आमचे एक सर म्हणायचे, Women are considered a medium of creation and recreation, thats it!

खरंय, कळतंय पण समाजाला अजुनही वळत नाही......!

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Shilpa Kshirsagar

Doctor

I am a gynaecologist and love to write and read.

//