मायेचा पदर (भाग २० अंतिम)

कुटुंबाची एकी हेच कौटुंबिक सौख्याचे खरे गमक.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दोनच दिवसांत नंदिनीला डिस्चार्ज मिळाला. घरातील सगळेच आले होते बाळाला पाहायला. बाळाला पाहून सगळ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. साऱ्यांना आनंदी पाहून ती मात्र मनोमन सुखावली होती. आत्याबाई नेमकी गावी गेल्या होत्या. बातमी समजताच त्याही लागलीच निघून आल्या. कित्ती तो आनंद झाला त्यांना याची तर गणतीच नाही. नातवंड सुख काय असते ते आता समजत होते त्यांना. बाळाला आणि नंदिनीला पाहण्यासाठी त्या आतुर झाल्या होत्या. एकदाची दोघांचीही भेट झाली नि समाधानाने त्या अगदी भरून पावल्या.

"काय रे लब्बाड, कित्ती वाट पाहायला लावलीस हा आनंद आमच्या आयुष्यात आणण्यासाठी." बाळाला अलगद कवेत घेत आत्याबाई लाडिकपणे त्याच्याशी संवाद साधू लागल्या. तसे  बाळाने हलकेच स्मित केले. जणू आत्याबाईंचे नि त्याचे आधीपासूनच बंध जुळलेले होते की काय कोणास ठावूक. पावणे चार किलोचे ते गुटगुटीत नि गोंडस रुप साऱ्यांनाच सुखावत होते. मायेने मग त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आत्याबाईंनी कडाकड बोटे मोडली नि बाळाची दृष्ट काढली. बाळाच्या आज्या, त्याचे काका काकी सारेच बाळाला उचलून घेण्यासाठी आतुर झाले होते. पण इतक्यात कुणीही बाळाला जास्त हाताळायचे नाही असे फर्मान काढले आत्याबाईंनी. मग आताबाईंचा हुकूम मोडायची कोणाची हिम्मत तरी होती का. आणि तसेही नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पटकन इन्फेक्शन होण्याचे चांसेस जास्त असतात म्हणून हा सगळा खटाटोप.

डिस्चार्ज घेवून बाळ बाळंतीण सुखरूप घरी परतले. सगळेच जण आता मायलेकाची ज्याच्या त्याच्या परीने काळजी घेवू लागले. बाळंतीनीचा आहार, तिची पथ्ये, बाळाची मालिश, आंघोळ, त्याची झोप याकडे विशेष करून लक्ष दिले जावू लागले. नंदिनी मात्र मातृत्वसुखात अगदी न्हावून निघाली होती. साऱ्यांकडून तिचे आणि बाळाचे होणारे लाड ती मनापासून एन्जॉय करत होती. अधूनमधून बाळाचे बाबा त्याला भेटण्यासाठी आवर्जून चक्कर मारायचे सासुरवाडीला.

साधारणपणे दोन महिने माहेरी थांबून नंदिनी पुन्हा सासरी जायला निघाली. कधी एकदा प्रेमाच्या त्या गोतावळ्यात पुन्हा जाते असेच झाले होते तिला. पण खूप दिवस माहेरी राहील्यानंतर सासरी जाण्याची ओढ जरी असली तरी लग्नानंतर पुन्हा एकदा इतके दिवस माहेरसुख अनुभवल्यानंतर सगळ्यांना सोडून जाताना तिच्या मनात चलबिचल सुरू झाली. बाळानेही आता छान बाळसे धरले होते. त्याचे ते गोंडस रुप अगदी सहजच कोणालाही आकर्षित करायचे.

सारी आवराआवर झाली नि आई बाबा तिला सोडवायला निघाले. छोटया पिल्लूची आता सर्वांनाच सवय झाली होती. नंदिनी सासरी गेल्यावर आता घर पुन्हा खायला उठणार. त्यामुळे बाळाचे आजी बाबाही अस्वस्थ झाले. पण आता मनाला समजावण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. माहेरचा उंबरा ओलांडताना नंदिनीचे डोळे पाणावले.

सासरी सगळेच बाळाची आणि नंदिनीची वाटच पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली नि फायनली नंदिनी बाळाला घेवून घरी पोहोचली. बाळाच्या आजीने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला नि मगच बाळाला आत घेतले.

आता खऱ्या अर्थाने सामंतांच्या घराचे गोकुळ झाल्यासारखे वाटत होते. सर्वांच्या आनंदाचे एकमेव कारण म्हणजे हे बाळ होते. बाळ सहा महिन्यांचे झाले नि आता त्याचे बारसे करण्याचे ठरले. पुन्हा एकदा सामंतांच्या घरी मोठा उत्सव सजला. बाळाच्या काका काकीने ठरवलेले बाळाचे "वरद" हे नाव अखेर साऱ्यांनाच आवडले.

वरदच्या बाललीलांत आता सगळे घर आनंदात रोजच न्हावून निघत होते. हाच आनंद पाहण्यासाठी नंदिनी आतुर झाली होती.  छोटया वरदचे पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, चालणे, त्याचे बोबडे बोलणे यांत आता साऱ्यांचा वेळ कुठल्या कुठे जायचा तेच कळायचे नाही. घरात लहान मूल असले की घर आपोआपच बागडू लागते याचा प्रत्यय आता सारेच जण घेत होते.
वरदच्या येण्याने सारे कसे अगदी सुरळीत झाले होते. मातृत्वाचे खरे सुख नंदिनी आता अनुभवत होती. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने वरदवर संस्कारांची पेरण करत होता.

खरंच यालाच म्हणायचे का खरे सुख?? घरात कितीही टेन्शन असले तरी वरदच्या एका हास्याने घरातील सारी नकारात्मकता कुठच्या कुठे पळत असे. खऱ्या अर्थाने वरद खूपच नशीबवान होता. त्याच्यावर प्रेम करणारी सारी नाती त्याच्या अवतीभवती होती. इतकी सारी नाती नशिबानेच त्याला मिळाली होती.

सुख दुःख हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात ऊन सावलीप्रमाणे येत जात असतेच. परंतु या साऱ्या प्रसंगात आपली माणसे जर आपल्या सोबत असतील तर संकटांचे कितीही मोठे डोंगर जरी उभे राहीले तरी त्यावर एकजुटीने मात करण्याची खरी ताकद आपसूकच निर्माण होत असते.

नंदिनीच्या वाईट काळात जर तिच्या माणसांची साथ तिला मिळाली नसती तर आजचा हा आनंद माहित नाही तिच्या आयुष्यात आला असता की नाही. कारण अशावेळी मनाला सकारात्मक विचारांची खरी गरज असते आणि तेच जर निर्माण झाले नाहीत तर भविष्यात येणाऱ्या सुखालाही माणूस मुकण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच आयुष्यात जर एखादी गोष्ट वेळेत मिळाली नाही तर रडत बसण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणे केव्हाही चांगले. परंतु दरम्यानच्या काळात मनाला खंबीर करण्यासाठी आवश्यकता असते ती आपल्या हक्काच्या या नात्यांची.
आपले कुटुंब हा आपला खरा आधारस्तंभ असतो. प्रत्येक नात्यात वैचारिक मतभेद हे असूच शकतात. एकाच कुटुंबात वेगवेगळ्या विचारांची नाही मायेच्या एकाच धांग्यात गुंफली जातात. फक्त ती नाती टिकवण्यासाठी गरज असते ती समजूतदारपणे वागण्याची आणि मायेच्या प्रेमळ अशा उबदारपणाची. तरच खडतर परिस्थितीतही नक्कीच मार्ग गवसतो. त्यासाठी प्रत्येक नात्यात वेळच्या वेळी होणारा संवाद नात्यांची वीण अधिकच घट्ट करत असतो.

सामंतांच्या घराचा खरा आधारस्तंभ म्हणजे आत्याबाई आणि सुलभा काकू. ह्या दोघींनीही आपल्या मायेच्या पदरात साऱ्यांना सामवून घेतले होते. प्रसंगी कठोर होत परिस्थिती हाताळली. कुटुंबाचा कणा बनून प्रत्येक नाते मायेने सांधले. आणि हेच आवश्यक असते कुटुंबाच्या प्रगतीसाठी. प्रसंगी खचलेल्या मनाला अशा मायेची फुंकर गरजेचीच असते. तरच घरात कौटुंबिक सौख्य नांदते. आयुष्य कसे अगदी मनाप्रमाणे जगल्याचे खरे समाधान तेव्हाच मिळते.

समाप्त

"मायेचा पदर " ही कौटुंबिक कथामालिका, नात्यातील गोडवा टिकवून ठेवणाऱ्या सामंत कुटुंबाशी संबंधित. आत्याबाईंच्या प्रेमळ आणि प्रसंगी मायाळू स्वभावाचे चित्र रेखाटनारी. नंदिनी आणि निशांतच्या संसाराची एक हलकी फुलकी कहाणी सांगणारी. सुलभा काकुंच्या मायाळू स्वभावाने सासू सुनेच्या नात्याचा गोडवा टिकवून ठेवणारी आणि सुधाकर काकांच्या समाजसेवेच्या व्रताचा आदर्श निर्माण करणारी तसेच नीरजच्या गमतीशीर स्वभावाने घरातील वातावरण क्षणात बदलवनारी आणि निशाच्या येण्याने नात्यातील ही सर्व  परंपरा पुढे चालणारी तसेच सर्वात शेवटी वरद बाळाच्या येण्याने घराचे गोकुळ करणारी ही सामंत कुटुंबाची कहाणी  सुलभा काकू आणि सुधाकर काकांच्या कष्टाचे झालेले हे खरे चीज आणि त्याला आत्याबाईंच्या मायेच्या पदराची ऊब मिळाल्याने घराचे सौख्य जपणारी अशी ही हलकी फुलकी कहाणी कशी वाटली ते जरुर सांगा.

धन्यवाद..

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all