मायेचा पदर (भाग १९)

घरात नवीन पाहुण्याचे आगमन म्हणजे स्वर्ग सुखाची अनुभूती.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

"नंदिनी बाळा आता उद्या तुला नववा सुरू होईल. तुझ्या आईचा मला रात्री फोन आला होता की नंदिनीला घ्यायला केव्हा येवू म्हणून? मग केव्हा यायला सांगू, आई बाबांना?"सुलभा काकू म्हणाल्या

पण नंदिनी मात्र काहीही बोलेना. कारण ही सगळी जीवाभावाची माणसं सोडून तिला मात्र माहेरी जावू वाटेना. अर्धा जीव माहेरी तर अर्धा सासरी अशा द्विधा मन:स्थितीत ती अडकली. कारण तिच्यावर माया करणारे, तिला जीव लावणारे तिचे सासर म्हणजे जणू माहेरचीच प्रतिमा होते. त्यामुळे हा सारा गोतावळा सोडून ती कशी आनंदी राहणार होती माहेरी.

दुसऱ्याच क्षणी थोडा विचार करुन ती उत्तरली, "आई मला आता तरी नाही जायचे माहेरी.मी नंतर डिलिव्हरी झाल्यावर गेले तर नाही चालणार का?"

"अगं बाळा अगदीच चालेल ग. का चालणार नाही. पण लेकीचे पहिले बाळंतपण हे तिच्या माहेरीच व्हावे शक्यतो असा नियम आहे ना. आईला देखील तुझी ओढ लागली असेल ग. आणि त्या नाजुक क्षणात आईच असावी सोबत असे  वाटते प्रत्येक मुलीला आणि तू मात्र या साऱ्याला अपवाद आहेस बरं का. नाही म्हणू नकोस, जा माहेरी आईसाठी बाबांसाठी. त्यांच्यासाठी देखील हा खूप मोठा आनंददायी क्षण असेल ना. मग थोडे दिवस त्यांनाही या गोड पिल्लाच्या आगमनाआधीचे काही क्षण तुझ्यासोबत घालवू दे."
नंदिनीच्या पोटावर हलकेच हात ठेवून सुलभा काकू बोलल्या. त्यांनी तिची समजूत घातली नि ती माहेरी जायला तयार झाली.

दुसऱ्याच दिवशी मग सुलभा काकूंनी नंदिनीच्या आई बाबांना तिला घेवून जाण्यासाठी बोलावले. सासरचा तो मायेचा उंबरा ओलांडताना तिच्या डोळ्यांत नकळतपणे पाणी आले. खरंच खूपच भाग्यवान होती नंदिनी, असं मायेचं सासर तिला लाभलं होतं. आईरुपी सासूकडून तर मायेचा प्रेमवर्षाव अखंड सुरुच होता. तर आत्याच्या रुपात तिला मायेचा सागरच जणू लाभला होता.
नीरज आणि निशा म्हणजे तिच्या  चेहऱ्यावर आपसूकच हास्य फुलवणारे खरे जादुगारच होते तिच्या आयुष्यातील. तर वडिलांची माया लावणारे सासरे म्हणजे दुसरे वडिलच. त्याबरोबरच तिच्यावरून जीव ओवाळून टाकणारा तिचा नवरा निशांत म्हणजे जणू तिचा अगदी जीव की प्राण. असं प्रेमाचं सासर असेल तर मग माहेरची आठवण तरी कशी येणार ना. म्हणूनच हे सगळं सोडून माहेरी जाताना तिच्या मनाची द्विधा मनःस्थिती झाली होती. परंतु आता सुलभा काकूंनी समजावल्यानंतर तिला आई बाबांसाठी देखील येणाऱ्या बाळाचा हा आनंद किती महत्त्वाचा आहे याची जाणीव नंदिनीला झाली नि ती त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाली.

माहेरी गेल्यावर आईसोबत किती बोलू नि किती नाही असेच झाले नंदिनीला. तिच्या बोलण्यात फक्त आणि फक्त सासरच्या मंडळींचा उल्लेख होता. त्यांच्याविषयीचे प्रेम तिच्या वाणीतून बरसत होते. तेव्हा आईला एक गोष्ट कळून चुकली, आपली लेक तिच्या सासरी किती सुखात नांदत आहे. सासरच्या मंडळींसाठी ती आणि तिच्यासाठी तिच्या मनातील सासरच्या मंडळींचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे याची आईला जाणीव झाली. खरंच देवा असेच प्रेम राहू दे साऱ्यांचे तिच्यावर. आणखी एका आईला दुसरे काय हवे.

बघता बघता कसा महिना सरला ते समजलेच नाही. नंदिनीची डिलिव्हरीची तारीख अखेर दोन दिवसांवर येवून ठेपली. साऱ्यांनाच आता हुरहूर लागली होती. मनातून नंदिनीची खूप काळजी वाटत होती सर्वांनाच. सासरचे सारेच एकदा भेटून गेले तिला. त्यामुळे तीही खूपच फ्रेश झाली. अखेर दिलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच नंदिनीला कळा सुरु झाल्या. तिला दवाखान्यात भरती करण्यात आले.

निशांतने आणि सुलभा काकूंनी लागलीच दवाखाना गाठला. नंदिनीची अवस्था मात्र निशांतला बघवेना. दुरुनच त्याने तिला आधार देण्याचा खूप प्रयत्न केला. तिला होणारा त्रास, तिच्या वेदना पाहून त्याच्या पायातील त्राणच नाहीसे झाल्यासारखे झाले होते.
"देवा खरंच आई होताना हा असा त्रास होतो हे माहिती असताना देखील प्रत्येक स्रीला मातृत्वाची किती ओढ लागलेली असते. अक्षरशः मरण यातना सहन करुन त्यानंतरच तिला हा स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. पण त्यासाठी आधी तिला हे महादिव्य पार पाडावे लागते ते वेगळेच. हे फक्त एक आईच करु शकते."
तेव्हापासून त्याला आईपणाची खरी महती समजली.
"आयुष्यात कधीही कोणत्याच आईला चुकूनही दुखावणार नाही" अशी शपथ त्याने त्या दिवशी घेतली.

तिकडे नंदिनी मरणयातना सहन करत होती. " देवा किती बरे झाले असते रे कर का मी नंदीनीला होणारा हा त्रास वाटून घेवू शकलो असतो. माझ्या नंदिनीला होणाऱ्या या त्रासातून लवकर मोकळं कर देवा. बघवत आता तिचा हा त्रास."

सुलभा काकू आणि नंदिनीची आईदेखील देवाचा धावा करत होत्या. लवकरात लवकर नंदिनीची या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून दोघीही मनातून देवाची प्रार्थना करत होत्या.

अखेर तब्बल दोन तासांच्या त्या मरणयातना सोसल्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आला नि साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. नंदिनी आणि निशांतच्या संसारवेलीवर एक गोंडस असे फुल उमलले. छोटासा बाळकृष्ण सोन्याच्या पावलांनी त्यांच्या आयुष्यात आला होता.
बाळाला पाहण्यासाठी सारेच आतुर झाले होते. काही वेळातच नर्सने बाळाला नंदिनीच्या घरच्यांच्या ताब्यात सोपवले. साऱ्यांचेच चेहरे आनंदाने खुलले. निशांतला तर आता अश्रू अनावर झाले परंतु तसेच त्याने भावनांना आवर घातला. लहानग्याचे ते गोंडस रुप पाहून बाप झाल्याचे वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. 
सगळया नातेवाइकांना ही आनंदाची बातमी देण्यात आली.

खरंच घरात असे लहानग्याचे होणारे आगमन क्षणात घरातील वातावरणच बदलून टाकते. त्यात इतक्या वर्षानंतर सामंतांच्या घरात हे सुख आले होते. त्यामुळे साऱ्यांच्याच आनंदाला आता पारावार उरला नव्हता.

थोड्याच वेळात नंदीनीची नि बाळाची भेट घडवून आणली. बाळाला पाहताच तिच्यातील गेलेले त्राण जणू लगेचच परत आल्यासारखे तिला वाटले. डोळ्यांतील अश्रूंनी पापण्यांच्या कडा केव्हाच ओलांडल्या. जे सुख अनुभवण्यासाठी ती तळमळत होती ते आता तिच्या पुढ्यात होते. स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती ती. आज परमेश्वराने तिचे गाऱ्हाणे ऐकले नि तिचे आयुष्य परिपूर्ण झाले होते. त्याचे मानावे ठेवढे आभार कमीच होते.

नंदिनीने एक कटाक्ष निशांतकडे टाकला. नजरेची भाषा नजरेला समजली. दोघांचेही चेहरे आनंदाने उजळले. पालकत्वाचा सुरू झालेला हा अनोखा प्रवास त्यांच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेवून आला होता. दोघेही आता सज्ज झाले होते आयुष्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार करण्यासाठी.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all