मायेचा पदर ( भाग १८)

मनातील स्वप्न जेव्हा सत्यात उतरते तेव्हा होणारा आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य. पण कधीकधी आपला हा आनंदच इतरांच्या दुःखाचे कारण असू शकते.
कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नंदिणीच्या दिराचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले पण नंदिनीला मात्र लग्नात म्हणावा तसा आनंद लुटता आला नाही. पण तरीही ती मनापासुन आनंदी होती. मातृत्वाच्या ओढीने ती पूर्णतः स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली होती. दिवसागणीक उदरातील जीव कणाकणाने वाढत होता. एक एक करत बाळाच्या आगमनाचा दिवस जवळ येत होता.

लग्नानंतर घरातील वातावरणच बदलून गेले. उत्साहाचे वारे घरभर वाहू लागले. एक एक करत आनंदाचे सुखाचे दिवस साऱ्यांना आनंद देत होते. नव्या सुनेनेदेखील काही दिवसांतच घरातील सर्वांना आपलेसे केले. अगदी नंदिनीच्या पाऊलावर जणू तिने पाऊल ठेवले होते. दोन्ही जावांची तर खूप छान मैत्री जमली. निशा आधीपासूनच नंदिनीला ओळखत होती. नीरज कडून तिने अनेकदा वहिनीचे कौतुक ऐकले होते. त्यामुळे नंदिनी सोबत जुळवून घेताना निशाला देखील वेळ लागला नाही. त्यात लग्ना आधी फोनवरून एकदा दोनदा दोघींचे बोलणे देखील झाले होते. त्यामुळे आपसूकच दोघींचे एकमेकिंबद्दल आपलेपणाची नाते आधीपासूनच तयार झाले होते.

आता घरात आणखी एक मेंबर वाढला होता, नंदिनीची काळजी घेण्यासाठी, तिला वरचेवर सूचना देण्यासाठी. नंदिनीची लहान जाऊ निशा देखील जमेल तशी नंदिनीची काळजी  घेत होती. घरात असताना तिला हवं नको ते सारं पाहायची ती. तसा तिलाही जास्त वेळ मिळायचा नाही पण तरीही घरात असताना शक्य तेवढी ती नंदिनीला वेळ द्यायची. दोंघींचे एकमेकींना समजून घेणे सुलभा काकूंना मात्र सुखावून जात असे. मुलांचा संसार, त्यांचे सुख स्वतः च्या डोळ्याने पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. त्यात मनासारखे सारे घडत असेल तर काय हवे आणखी आयुष्यात.?
त्यातच आता बाळाच्या येण्याने आणखीच आनंद येणार होता घरात.

पाचव्या महिन्यात नंदिनीचा चोर ओटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. आईपणाचे खरे सुख काय असते ते आतापासूनच नंदिनी अनुभवत होती. खरंच हा आनंद ती हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवत होती, निशांतच्या साथीने.
एक एक दिवस सरत होता तसे नंदिनीच्या चेहऱ्यावरील तेज आणखीच खुलत चालले होते. नुसत्या बाळाच्या विचारानेच घरातील वातावरण बदलून जायचे. खरंच आयुष्यात आता सारे सुख मिळाल्याचे समाधान नंदिनी आणि निशांत च्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. पोटातील बाळाची हालचाल नंदिनीला स्वर्ग सुखाचा आनंद देत होता.

बघता बघता नंदिनिला सातवा महिना लागला. तिचे डोहाळे पुरवायला आता घरातील प्रत्येक जण जणू तयारच होता. तिला जे काही खावेसे वाटेल ते सुलभा काकू दुसऱ्या मिनिटाला बनवून द्यायच्या. नातवाचे लाड जणू त्या आत्तापासूनच पुरवत होत्या.
सातवा संपत आला नि नंदिनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचे ठरले. पुन्हा एकदा सामंतांचे घर सज्ज झाले आनंदात न्हावून निघण्यासाठी.

नात्यातील सर्वचजण पुन्हा एकदा एकत्र आले नंदिनीला आणि तिच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी. ओटी भरणाचा कार्यक्रम मात्र जल्लोषात साजरा करण्याचे ठरले.

ठरल्याप्रमाणे हॉल बुक करण्यात आला होता. ह्यावेळी निशा होती लाडक्या जावेचे डोहाळे पुरवण्यासाठी सज्ज. नंदिनीच्या आवडीचे सारे पदार्थ मेजवानीत सज्जच होते. नंदीनीचे रूप असे काही खुलले होते की आज सर्वांच्याच नजरा जणू तिच्यावरच खिळल्या होत्या. बाळाच्या बाबांचा थाटही काही औरच होता. त्याबरोबरच होणाऱ्या बाळाचे काका तर उत्साहाच्या भरात बायकोला म्हणाले, "आता आपणही लवकरच चान्स घ्यायला हवा असंच वाटतंय मला निशा."
मग काय, हॉलमध्ये एकच हशा पिकला. निशाचा चेहरा तर लाजेने गोरामोराच झाला.

आज नंदिनी आणि निशांतच्या आयुष्यातील खूपच आनंददायी दिवस होता. खूप दिवसांनी त्यांच्या पदरी हे सुख पडले होते. देवाची किमया खरंच खूप निराळी असते. त्याला भक्ताच्या मनातील सारं काही आपसूकच समजत असतं. पण त्यासाठी भक्ताचा त्याच्यावरील विश्र्वासदेखील तितकाच दृढ असणे गरजेचे असते. आली कितीही संकटे तरी त्या विधात्यावरील विश्वास तसूभरही ढळता कामा नये. त्याच्यावर अविश्वास तर मुळीच दाखवू नये. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावीच लागते. आणि आपल्यासाठी अचूक वेळ तो विधाताच ठरवत असतो. त्यामुळे माझ्याकडे हे नाही आणि ते नाही म्हणत, रडत खडत आयुष्य जगण्यापेक्षा आयुष्यात आनंद घ्यायला आणि द्यायला आधी शिकले पाहिजे.

नंदिनी आणि निशांतला या साऱ्या गोष्टींचा आता चांगलाच प्रत्यय येवू लागला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी परमेश्वराला मात्र कधीच दुखावले नाही. किंवा तसा विचारही मनात आणला नाही. या साऱ्याची परतफेड म्हणून परमेश्वराने देखील त्यांच्या आयुष्यात हा सारा आनंद जणू योग्य वेळी पाठवला होता.

नंदिनीचा ओटी भरण कार्यक्रम साऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. नातेवाईक, आप्तेष्ट सारेचजण त्यांच्या या आनंदाचा एक भाग बनले होते.
फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसून नंदिनी स्वर्गसुखाच्या झुल्यावर जणू हिंदोळे घेत होती. मधेच शांत शीतल चंद्राच्या त्या मंद प्रकाशात चांदण्यांच्या साथीने ती आनंदाच्या गावी विहरत होती. तर कधी धनुष्य बाणाच्या साहाय्याने आपल्या जोडीदारासवे लक्षाचा अचूक वेध घेण्याचा ती प्रयत्न करत होती.
फुलांच्या दुनियेत ती क्षणभर स्वतःलाच विसरत होती. नि त्या नटखट गोंडस रुपाची तिच्या मनी वसलेली छबी क्षणात तिच्या अवतीभवती फिरत असल्याचा भास होवून त्याच्या मागेमागे ती धावत होती. कित्ती तो आनंद नि काय वर्णावे त्याचे सुरेख चित्रण. हेच स्वप्न आता अगदी काही दिवसांतच सत्यात उतरणार होते. पण त्याआधीच नंदिनीने सारे क्षण जणू भरभरून जगून घेतले होते.

नंदिनीचा हा सारा आनंद तिच्या दोन्ही जावांच्या मात्र नजरेत खुपत होता. ही एवढी मोठी बातमी तिने आपल्यापासून लपवून ठेवल्याचा राग दोघींनीही मनात साठवून ठेवला होता. पण साधी गोष्ट आहे, ह्याच तिच्या लाडक्या जावा तिच्या आयुष्यात हा दिवस कधीच येवू नये यासाठी प्रार्थनाच करत होत्या जणू. पण म्हणतात ना, "कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नाही." हे आता त्यांचे त्यांनाच कळून चुकले असावे.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all