मायेचा पदर ( भाग १७)

इतरांच्या सुखाचा किंवा आनंदाचा शोध घेत बसलेले लोक स्वतःचा आनंद कधीही घेवू शकत नाहीत.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

सामंतांच्या घरी त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची गडबड सुरु होती. पाहुण्या रावळ्यांनी घर गजबजले होते. इच्छा असूनही नंदिनी मात्र हा आनंद घेवू शकत नव्हती. कारण डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे अजूनही दोन महिने काळजी घेणे भाग होते. त्यामुळे जास्त दगदग, धावपळ करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यातच इतक्या दिवसांनी आलेली ही आनंदाची बातमी लग्नसोहळ्यापेक्षाही खूपच महत्त्वाची होती त्यांच्यासाठी. म्हणूनच तर नंदिनी शक्य तितका आराम करत होती. कोणामध्येही जास्त मिसळत नव्हती. दुरुनच सगळया गमती जमती पाहायची.

नंदिनीच्या दोन्ही जावा आणि दिर लग्नाच्या आदल्या दिवशी आले. नंदिनीला असं दूर दूर पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. "पण एका दृष्टीने हे बरंच झालं म्हणजे आता सगळयांच्या पुढे पुढे करत सगळ्यांकडून वाहवा तरी मिळवता येणार नाही तिला, म्हणून दोघीही जावा खुश झाल्या. पण नेमकी ही अशी का वागत असेल?" हा मोठा प्रश्न दोघींनाही पडला. सख्ख्या आणि लाडक्या दीराचे लग्न म्हटल्यावर सगळ्यांत पुढे नंदिनीने असायला हवं पण तीच अशी मागे मागे आणि दूर का असेल? नक्कीच आत्याबाईंना उशीरा का होईना पण तिचे खरे रुप समजले असणार." दोघीही विचारांत पडल्या खऱ्या. पण जशी दृष्टी तशी सृष्टी अशी काहीशी अवस्था होती नंदिनीच्या जावांची. त्यात नंदिनीला दोघींच्याही स्वभावाचा पुरता अंदाज असल्याने तीही त्यांच्यापासून चार हात अंतर राखूनच वागत होती. आत्याबाईंचा हुकूमच होता नंदिनीला तसा.

बघता बघता लग्न दिवस उजाडला. भरजरी साड्यांत सगळ्याच बायका अगदी उठून दिसत होत्या. त्यातल्या त्यात नंदिनीचे रुप तुलनेने थोडे जास्तच खुलले होते. चेहरा अगदी प्रसन्न दिसत होता. सगळ्यांचेच लक्ष आपसूकच मग तिच्याकडे जात होते.
दोन्ही जावांना तर गप्पांसाठी नंदिनी हाच एकमेव विषयच मिळाला होता जणू.

हिरव्या रंगाच्या साडीत नंदिनीचे रूप खुलले होते. निशांतलाही पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडण्याचा मोह आवरता येत नव्हता. नजरेतूनच साऱ्या भावना व्यक्त होत होत्या. अधनमधून सुलभा काकू,आत्याबाई तसेच मालती काकू येता जाता नंदिनीची विचारपूस करत होत्या. जास्त दगदग करु नकोस, काळजी घे म्हणत येता जाता सूचना सुरुच होत्या त्यांच्या. त्यात निशांत इतक्या घाई गडबडीतदेखील दुरुनच नंदिनीकडे लक्ष देत होता. चुकूनही एकही चूक नको होती आता त्याला. त्यामुळे त्याचा अर्धा जीव भावाकडे आणि अर्धा नंदिनीकडे असेच झाले होते.

"एखाद्याला देव किती भरभरून देतो नाही." नंदिनीकडे पाहतमोठी जाऊ धाकटीला म्हणाली.

"पण त्याचा काय उपयोग ताई? अशा अनेक गोष्टी मिळतील पण \"आईपणाचे सुख त्याशिवाय ह्या अशा सुखाला माझ्या दृष्टीने तरी शून्य किंमत आहे."धाकटीने लगेचच मग थोरलीच्या शब्दांना दुजोरा दिला.

मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात नीरज आणि निशाच्या लग्नाचा एक एक विधी  पूर्ण होत होता. प्रसन्नतेचे तेज साऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. पाहुण्यांच्या मनपानात घरातील मंडळी व्यस्त होती. इकडून तिकडून सारेचजण मिरवत होते लग्नात. नंदिनी तेवढी एका बाजूला शांत बसली होती. न राहवून दोन्ही जावा गेल्याच तिच्याकडे माहिती काढायला.
"अगं नंदिनी, नेमकं काय झालंय तुला? आणि सकाळपासून पाहतोय तू एकटीच अशी बाजूला आहेस. लग्नात नीट एन्जॉय पण करत नाहियेस. नेमकं काय झालंय ग? आत्याबाई काही बोलल्या का?
म्हणजे बघ त्या जर काही बोलल्या असतील तर त्यांचं बोलणं जास्त मनावर नाही घ्यायचं. अगं त्या तशाच आहेत. सुरुवातीला खूप गोड गोड वागतात त्या आणि नंतर हे असं तांदळातील खड्याप्रमाणे एखाद्याला अलगद बाजूला काढतात. आधी आमच्याशी त्या असंच वागल्या आणि आता तुझ्याशी वागत आहेत."

यावर आता नंदिनीला काय बोलावे काहीच समजेना. तिने शांत
राहण्यातच शहाणपण समजले.

"बरं चल ना नंदिनी आपण हळद खेळूयात. मस्त फोटो पण काढुयात. हळदीशिवाय लग्नाला मज्जाच नाही. गावी लग्नात तर आम्ही खूप खेळतो हळद. खूप मज्जा येते बघ."

दोघीही नंदिनीला हळद खेळण्यासाठी खूपच आग्रह करत होत्या. पण नंदिनीची अजिबात इच्छा नव्हती. आणि त्यातल्या त्यात ह्या दोघींवर तर तिचा आता अजिबात विश्वास उरला नव्हता. काही माहिती नसताना देखील ह्या एखाद्या बद्दल किती खालच्या थराला जावून बोलतात याचा आता नंदीनीला पुरता अंदाज आला होता. आताच आत्याबद्दल त्यांनी केलेले विधान नंदिनीच्या खूपच जिव्हारी लागले होते.
"समोरची व्यक्ती कशीही असली तरी लहान मोठं काही असतं  की नाही, उगीचच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला" असेच वागतात ह्या दोघीही.

"त्यामुळे तुम्ही खेळा हळद मी तुमचे छान फोटो काढते. आणि तसंही फोटो काढायलाही कुणीतरी हवं ना. तुम्ही जा मी बसते इथेच." म्हणत नंदिनीने तात्पुरती वेळ मारुन नेली आणि त्या दोघींबरोबर जाण्याचे टाळले.

पण नंदिनी अशी का वागत आहे? याचे कारण मात्र दोघींनाही समजू शकले नाही.
तेवढ्यात आत्याबाई तिथे आल्या.
"आत्या तुम्ही तरी सांगा ना ओ नंदिनीला, आमच्यासोबत हळद खेळायला."

"बापरे किती दुतोंडी आहेत ह्या दोघीही. आताच आत्याला माझ्याजवळ नावे ठेवत होत्या आणि आता लगेच तोंडात साखर ठेवल्यागत गोड गोड बोलत आहेत. नंदिनी सावधच राहा बाई ह्यांच्यापासून." नंदिनी मनाशीच बोलली.

"अगं पण तिला नसेल आवडत हळद खेळायला, तुम्ही इतका फोर्स का करत आहेत तिला? तुम्हाला खेळायचे तर तुम्ही खेळा ना."
आत्याबाई कडक शब्दांत बोलल्या तेव्हा कुठे दोघीही तिथून निघून गेल्या.

" नंदिनी बाळा तू आधी जेवण करून घे चल उठ लगेच. आणि फिर ग थोडी इकडे तिकडे. अशी एकाच जागी नको ग बसून राहूस. तेवढं फिरायला काहीच हरकत नाही."

"हो आत्या पण मला कसतरी होतंय. म्हणून मी इथेच बसून राहिले."

"अगं भूक लागल्यामुळे होत असेल तसं. त्यात गर्दी आहे ना आजूबाजूला त्यामुळे थोडं वेगळं वाटत असेल तुला. आणि जेवायलाही थोडा उशीर झाला ना ग.आता दोन जीवांची आहेस ग बाई तू. त्यामुळे पोटातल्या बाळालाही भूक लागली असेल ना. म्हणून मग तेही तुला त्रास देतंय."

"बरं चल पटकन्" म्हणत आत्याबाई नंदिनीला जेवायला घेवून गेल्या. पोटात दोन घास गेले तेव्हा कुठे तिला बरे वाटले.
नंतर सगळ्यांत मिळून मिसळून लग्नाचा थोडा फार का होइना पण आनंद घेतला तिने.

आनंदी वातावरणात नीरज आणि निशाचा विवाहसोहळा अखेर पार पडला.सामंतांच्या घरी नव्या सुनेचे आगमन झाले. संध्याकाळी वरात आणि नव्या नवरीचा गृहप्रवेश खूप आनंदात आणि विधिवत पार पडले सारे. दिवसभर ताटकळल्यामुळे कधी एकदा बेडवर आडवी होते असे झाले होते नंदिनीला. पाय थोडे सुजले होते. त्यामुळे बाकी कार्यक्रमात तिचा सहभाग नव्हता. आणि तिच्या जावांचे मात्र सगळे लक्ष तिच्याकडेच. त्यामुळे नंदिनीला थोडे जास्तच अवघडल्यासारखे व्हायचे. तरी नशीब आत्याबाई प्रत्येक वेळी यायच्या तिच्या मदतीला धावून म्हणून वेळ निभावून नेली जायची. नाहीतर दोन्ही जावा तर तिच्या मागे जणू हात धुवून लागल्या होत्या.

क्रमशः

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all