मायेचा पदर ( भाग १६)

आयुष्यात आलेला आनंद इतक्यात तरी कोणाला समजू नये यासाठी नंदीनीची धडपड सुरू होती.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

मातृत्वाची चाहूल लागली नि नंदिनी आता स्वप्नांच्या दुनियेत पुरती हरवून गेली. बाळाचे ते गोंडस रुप, ती मनातल्या मनात सजवू लागली. सगळेच जण तिची काळजी घेत होते त्यातच ती स्वतःदेखील शक्य तितकी स्वतःला जपत होती. इतक्या दिवसांनी तिला मिळणारा हा आनंद ती अलगद हृदयात साठवत होती.
नंदिनीचे क्षणाक्षणाला होणारे मुड स्विंग्ज निशांत जबाबदार पतीप्रमाणे सांभाळत होता. बाप होणार असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. इतक्या दिवसांनी येणारा हा आनंद नंदिनीच्या साथीने तो स्वतः ही अनुभवत होता.

त्यातच आता नीरजच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. घरात थोडी गडबड नि पाहुण्यांची येजा वाढली होती. नीरजने निशाबद्दल घरात कल्पना देखील दिली. घरच्यांनीही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यात त्याला साथ दिली.
निशादेखील नंदिनी सारखीच उंच, गोरीपान, नाकी डोळी नीटस, सामंतांच्या घराला अगदी साजेशी असल्याने कुणाला पसंत न पडण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्यात डॉक्टर, मग नाही म्हणण्याचा प्रश्न येतच नव्हता. सर्वांच्या संमतीने मग छोटासा कांदे पोह्यांचा कार्यक्रम करण्यात आला. पुढची बोलणी झाल्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत एंगेजमेंट सेरेमनीदेखील पार पडली. परंतु हा सारा आनंद नंदिनीला मनाप्रमाणे लुटता येत नसल्याची खंत तिच्या मनाला खात होती.

नंदिनीला मनातून खुपदा वाटायचे, खूप एन्जॉय करावा प्रत्येक क्षण. लाडक्या दिराचे लग्न आणि तिच्या आयुष्यातील मातृत्वसुख दोन्हीही आनंदाचे क्षण जणू तिच्या आयुष्यात एकाच वेळी आले होते. परंतु तसेच मनाला समजावत नि भावनांना आवरत ती शक्य तितकी स्वतःला जपायची.

एंगेजमेंट सेरेमनी तर आनंदात पार पडली. लग्नाची तारीख देखील फायनल करण्यात आली. पुढे जावून खूप सारे कार्यक्रम असतील घरात म्हणून मग खूप गोंधळ होणार यासाठी जवळचीच तारीख फायनल करण्यात आली. जेमतेम महिन्यानंतरचा योग्य मुहूर्त फायनल झाला.

या साऱ्यात सुलभा काकूंची खूपच धावपळ होणार होती. आत्याबाईदेखील होत्याच मदतीला. सगळ्यांची धावपळ पाहून नंदिनी देखील जायची मदतीला पण तिला जास्त त्रास नको म्हणून तिच्याकडे मोजकीच कामे सोपवली जायची. पण सगळ्यांची धावपळ पाहून तिला मात्र आराम करु वाटेना. मग मधेमधे थोडीफार लुडबुड सुरू असायची तिची.

कपड्यांची, दागिन्यांची खरेदी देखील लगेचच करण्यात आली. एक एक करत कामाचे नियोजन केले जात होते. घरातील वातावरण खूपच उत्साही बनले होते. बघता बघता लग्न आठ दिवसांवर येवून ठेपले. आता मात्र ह्या शेवटच्या दिवसांत खूपच धावपळ होणार होती सर्वांचीच.
नंदिनीला आता तिसरा संपत आला होता. थोडाफार त्रास जाणवत होता तिला पण सगळ्यांचे उत्साही चेहरे पाहून तीही मनापासून आनंदी व्हायची. पदराआडून पोट हळूच डोकावू पाहत होते आता. चेहरा तर खूपच खुलला होता तिचा. गरोदर पणाचे तेज चेहऱ्यावर झळकत होते.

लग्नाच्या आधी चार दिवस गावाकडची मंडळी आली. दोन्ही सूना आणि मुले मात्र एक दिवस आधी येणार होते. कारण शेतीची कामे सोडून लवकर येणं सर्वांनाच शक्य नव्हतं. बाकीचे पाहुणे रावळे सगळेच जमले. घर कसे अगदी गोकुळासारखे भरले होते. दिव्यांच्या रोषणाइत घर उजळून निघाले होते.

एवढ्या सगळया उत्साही वातावरणात नंदिनी मात्र कुठेच दिसत नव्हती. तिला शोधत मालती काकू म्हणजेच नंदिनीच्या गावाकडच्या सासूबाई तिच्या  रूमजवळ आल्या. नंदिनी तिच्या रुममध्ये बेडवर आडवी झालेली पाहून मालती काकूंनी काळजीपोटी नंदिणीला विचारले, "काय ग नंदिणी अजूनही बरं वाटत नाही का ग बाळा तुला?"

"मी ठीक आहे काकू आता." हातातील मोबाईल बाजुला ठेवत हळूच ती उठली.
"माझ्याकडे पाहून मी आजारी वाटते का तुम्हाला.?" हसत हसत नंदिनीने विचारले.

"वाटत नाही ग, पण तरी काहीतरी वेगळं जाणवलं म्हणून काळजीपोटी विचारलं ग.माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नको घेवूस आ बाळा."

"नाही ओ काकू उलट छान वाटलं तुम्ही काळजीने माझी चौकशी केलीत."

" काकूंना सांगावी का ही आनंदाची बातमी? आणि तसेही त्या कोणालाच नाही बोलणार."नंदिनी विचारात पडली.

"माझी आपली पारखी आणि अनुभवी नजर म्हणून एक सल्ला देवू का नंदिनी?" मालती काकू घाबरतच बोलल्या

"हो बोला ना काकू. कुठलाही संकोच मनात ठेवू नका."

"हे असं सारखं झोपून नको ग राहूस. होणाऱ्या बाळासाठी ते चांगलं नसतं."

नंदिनी अवाक् होवून मालती काकूंकडे पाहतच राहिली. क्षणभर तिला काय बोलावे तेच समजेना.
" काकू तुम्हाला आईंनी सांगितली का ही गोष्ट.?"
आश्चर्य कारक रित्या नंदीनीने प्रश्न केला.

"नाही ग बाळा. कोणी कशाला सांगायला हवं? अनुभवच तेव्हढा दांडगा आहे ना. पाहताच क्षणी काही गोष्टी न बोलताही समजतात. तू गावी आलीस तेव्हाच माझ्या लक्षात आले होते. अचानक आजारी पडलीस पित्त,मळमळ,थकवा ही सगळी गरोदरपणाची लक्षणे दिसत होती. आणि आता घरात एवढी धामधूम असताना तू अशी झोपून राहणारातील नाहीस. आपला जास्त संबंध जरी नसला आला तरी एकाच दिवसांत तुला अगदी जवळून ओळखले बरं का मी. चुलीवरच्या भाकरी किती आवडीने शिकलीस तू. तुझी आवडच तूझ्या कामाची खरी पावती आहे. आणि आता पोटही हळूच डोकावताना दिसतंय हो पदराआडून."

दोघीही मग एकमेकींकडे पाहून हळूच हसल्या. सुलभा काकुंप्रमाणेच मालती काकू देखील नंदिनीला अगदी जवळच्या वाटू लागल्या होत्या त्यांच्या या संभाषणानंतर.

"पण चला हे मात्र खूपच छान झालं."मालती काकू आनंदाने बोलल्या.

"काकू पण मला इतक्यात तरी ही गोष्ट कोणालाही सांगायची नाहीये ओ. आणि त्यात आता लग्नात सगळेच जमणार म्हणजे आपसूकच सर्वांना समजणार. म्हणजे मनमोकळेपणाने पाहुण्यांत मिसळता देखील येणार नाही का मला.?"

"अगं आता कितीही लपवली तरी थोडीच ना ही बातमी लपून राहणार आहे. तू कशाला टेन्शन घेतेस? तो वरचा कर्ता करविता बसलाय ना त्यालाही काळजी असतेच ग भक्तांची. आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तो चांगलेच जाणतो. तसंही नाही समजत जास्त काही अजून. मला समजले म्हणजे सगळ्यांना समजेलच असे नाही ग. नको काळजी करु.माझ्या मते आता चौथा सुरु असेल ना? "

"किती अचूक ओळखलत काकू तुम्ही. अहो कालच चौथा लागलाय. खरंच आता समजतंय न शिकताही तुम्ही जुन्या बायका किती हुशार आहात. प्रत्येक अंदाज कित्ती अचूक आणि एकदम परफेक्ट असतो तुम्हा अनुभवी बायकांचा."

"बस बस अगं किती कौतुक करशील आता. तुझंही कौतुक करावं तेवढं थोडंच ग. आणि तसंही आत्याबाईंच्या मनात घर करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण तू ते करून दाखवलंस यातच तुझा स्वभाव, तुझे प्रेम आणि हुशारी समजते. अगदी काही वेळातच समोरच्याला आपलंसं करुन घेतेस तू. तुझ्यातला एक जरी गुण माझ्या एका जरी सूनेत असता ना तर मी अगदी भरुन पावले असते."
बोलता बोलता मालती काकूंचे डोळे पाणावले.

"बरं चल तू कर आराम मी काय बोलत बसले तुझ्यासोबत. सुलभाला मदत करू लागते बाहेर. आणि सांगितलेलं लक्षात ठेव तेवढं. सारखं झोपत जावू नकोस. थोडं चालत जा. तुला जे आवडतं ते सगळं कर. म्हणजे लेखन, वाचन अजून काही तुझे छंद असतील तर ते जोपासत जा. पोटातील बाळही तसेच घडेल." डोळ्यातील अश्रू जागेवरच थोपवत मालती काकू बोलत होत्या.

"हो काकू नक्कीच. फ्रेश वाटलं तुमच्याशी बोलून.
बरं चला मी पण येते तुमच्यासोबत, खूप कंटाळा आलाय असं बसून."

नंदिनी देखील मग घरात छोट्या छोट्या कामात मदत करु लागत होती. खूपच आनंदी आणि उत्साही वातावरणात मग तीही खूपच फ्रेश झाली होती.

क्रमशः

आता नंदिनीने कितीही ठरवलं तरी तिची आनंदाची बातमी लपून राहील का सगळ्यांपासून.? जाणून घेण्यासाठी वाचत राहा " मायेचा पदर".

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all