मायेचा पदर ( भाग १४)

आपल्या प्रामाणिकपणाचे फळ उशीरा का होईना पण मिळतेच.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

निशांत आणि नंदिनीला दवाखान्यातून यायला उशीर झाला म्हणून आत्याबाईंनी काळजीपोटी फोन केला.
"हॅलो सोनू, अरे का रे एवढा वेळ लागतोय? नंदिनी ठीक आहे ना आता? नेमकं काय झालं होतं तिला? काळजीचं काही कारण नाही ना रे?

"नाही ग आत्या आणि ती एकदम ठीक आहे. थोडा त्रास होतोय पण औषधं घेतल्यावर वाटेल बरं डॉक्टर म्हणाले. हे काय आम्ही आता निघतच होतो तर तुझाच फोन आला."

"बरं बरं या मग सावकाश."

आज निशांत आणि नंदिनीच्या आयुष्यातील खूपच आनंदाचा दिवस होता. अखेर नंदिनीची आनंदाची बातमी आली, मातृत्वाची चाहूल लागताच दोघांनाही मग आकाशच ठेंगणे झाले. आनंदाश्रुंनी पापण्यांचे काठ ओलांडले नि क्षणभर दोघेही स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाले.

आता दोघांपुढे मोठा पेच उभा राहिला होता तो म्हणजे इतकी मोठी नि आनंदाची बातमी इतक्यात घरी सांगायची की नाही? पण घरी गेल्यावर सगळ्यांचा पहिला हाच प्रश्न असणार आहे, की नेमकं काय झालं आहे नंदिनीला? परंतु अजून दोन महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि लगेच कशी सांगायची ही बातमी सर्वाँना?

अखेर दोघांनीही इतक्यात काहीच नको सांगायला हे एकमताने ठरवले. पण आत्याशी कसं खोटं बोलायचं? ती खोदून खोदून विचारणारच. आणि आपण थोडं जरी खोटं बोललो तरी तिला ते बरोबर समजणार.

"अहो मी काय म्हणते, निदान आत्याला आणि आईंना तरी ही गोष्ट सांगायलाच हवी ओ. सगळ्यांशी मी खोटं बोलेल पण आत्या आणि आईसोबत अजिबात नाही."

"अगदी खरं आहे ग तुझं पण आता जर आपण त्यांना सांगितलं तर घरातील सर्वांनाच ही गोष्ट समजणार. त्यात पल्लवी आणि पुनम वहिनीचा स्वभाव आता तू तर जवळून अनुभवला आहेच. त्यामुळे ही एवढी मोठ्ठी बातमी त्या दोघींना तरी लगेच समजावी अशी माझी बिलकुल इच्छा नाहीये. त्यात इतक्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आपल्या आयुष्यात हा आनंद आलाय त्यामुळे लगेचच नको सांगूयात. आता मला कोणतीच रिस्क नकोय ग.
तसंही आपल्या आनंदाच्या बातमीचा बाकी कोणाला नाही पण पल्लवी आणि पुनम वहिनीला नक्कीच त्रास होणार यात नो डाऊट. त्यामुळे आपण पुण्याला गेल्यानंतर ही बातमी घरी सर्वाँना सांगूयात. म्हणजे मला तरी असंच वाटतं. तुला काय वाटतं?"

"चालेल, पण आता लगेच आपल्या वागण्यातून कोणाला  समजणार तर नाही ना? कारण खोटं बोलता येत नाही म्हणून तर फसण्याची दाट शक्यता वाटते."

"हे बघ, तसंही तुला आता त्रास होतोच आहे, म्हणजे तू काहीच काम करु शकणार नाही. कारण मला डॉक्टरांनी बजावून सांगितलंय शक्य तितकी तुझी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इथे राहून काळजी घेणं शक्यच नाही. आणि सध्या तरी तुला आरामाची खूपच गरज आहे. इथे राहून तुला आराम मिळणंदेखील पॉसिबल नाहीये.
त्यापेक्षा एक काम करु, बाकी सगळ्यांना राहू देत आणखी दोन चार दिवस इथे, आपण दोघे आजच निघूयात. इतक्या उत्साहाने आलेत सगळे, त्यामुळे लगेच सर्वांनी निघून जाणंही योग्य वाटत नाही. तात्यांना आणि काकूलादेखील खूप वाईट वाटेल त्यामुळे."

"अहो पण मला खूप त्रास होतोय ओ. आजतरी प्रवास करण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. त्यात दोन अडीच तास मी नाही बसू शकत गाडीत. त्यापेक्षा आपण उद्या सकाळी गेलो तर चालेल का?"

"बरं, तसं करु मग. पण आत्याला त्यासाठी विश्वासात घ्यावं लागेल. बघू ती काय म्हणते, मग ठरवू."

बोलता बोलता घर आलं देखील. आत्या आणि आई दोघीही बाहेर झाडाखाली बसून नंदिनी आणि निशांतची वाटच पाहत होत्या.

गाडी घरी पोहचताच दोघीही लगेच गाडीजवळ आल्या. नंदिनीचा सुकलेला चेहरा पाहून दोघींनाही तिची खूपच काळजी वाटत होती. दोघींनाही समोर पाहून नंदिनीला तर अश्रूच अनावर होत होते पण तसाच तिने स्वतःला आवर घातला.

"काय ग बाळा, अशी कशी आजारी पडलीस ग. झेपेल तेवढंच काम करायचंस ना काल. चेहरा बघ किती सुकलाय. नंदिनीच्या पाठीवरून हात फिरवत सुलभा काकू बोलल्या. सासूच्या या प्रेमळ शब्दांनी तर आता नंदिनी नव्हती थांबवू शकत स्वतःला. न राहवून तिने सुलभा काकूंना मिठीच मारली.

"खूप त्रास होतोय का ग? चल जेवण कर आणि औषधं घे अगोदर. पण त्याआधी मला सांग, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं? कशामुळे झालं असं अचानक? सुलभा काकूंनी प्रश्न केला.

आता ठरवून देखील नंदिनी ही एवढी मोठी बातमी लपवून ठेवू शकत नव्हती. शेवटी पोटातील गोष्ट तिच्या ओठावर आलीच.

"आई एवढ्या दिवसांची आपली प्रतीक्षा आज संपणार ओ. फायनली आपल्या घरात बाळकृष्ण येणार आई."

नंदिनीच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा सुलभा काकूंनी पदराने अलगद टिपल्या.
"काय सांगतेस काय अगं नंदिनी. खरं आहे का रे हे निशांत?"

"हो आई अगदी खरं आहे. दोन महिने पूर्ण होतील आता. आम्ही तोच विचार करत होतो सगळ्यांसमोर तुम्हाला दोघींना कसं सांगायचं हे? पण बरं झालं तुम्ही दोघी एकट्याच सापडलात."

"खूप मोठी आनंदाची बातमी दिलीत रे बाळांनो. पण आता  सध्या कोणालाच काही बोलू नका. आणि त्या तुझ्या दोन वहिन्यांना तर अजिबात लगेच कळू द्यायचं नाही सोनू. नंदिनीचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात बघवत नाही. त्यात इतक्या दिवसांनी हा आनंद आलाय आपल्या आयुष्यात. त्यामुळे पाच महिने तरी चोर ओटी होईपर्यंत कोणालाही कळता कामा नये ही गोष्ट.
आता चला आत नाहीतरी तुझ्या लाडक्या वहिन्या येतील धावत काय सुरु आहे आपलं हे जाणून घ्यायला. ते बघ खिडकीतून आपल्यावरच लक्ष ठेवून आहेत दोघीही."

घरात येताच आत्याबाई बोलल्या, "नंदिनी तू आधी खावून घे बरं काहीतरी आणि औषध घेवून आराम कर. त्याशिवाय बरं नाही वाटायचं तुला.

आत्याला नंदिनीची काळजी करताना पाहून दोन्ही जावा मात्र नंदिनीची कोणतीही चौकशी न करता त्यांच्या कामाला निघून गेल्या. तसंही नंदिनीला पाहून त्यांच्या तोंडावर बारा वाजलेलेच होते. कारण सकाळपासून सगळी कामे त्या दोघीच करत होत्या आणि नंदिनीची त्यांना कोणतीही मदत झाली नाही. याचा राग जास्त होता.
मोठ्या सासूबाईंनी म्हणजेच मालती काकूंनी मग नंदिनीला जेवायला वाढले.

"काय हो ताई, मला एक कळत नाहीये ह्या आत्याला नंदिनीचा एवढा पुळका कसा काय ओ? आपण मात्र कितीही काम केलं आणि कितीही चांगलं वागलं तरी आपल्याला टोमणे मारण्याची एक संधी सोडत नाहीत त्या. मग नंदिणीच्या काहीच चुका नसतील का, ज्या त्यांना अजिबात दिसत नाहीत. की फक्त आपल्याला जळवण्यासाठी त्या असं वागतात?"पल्लवी तिच्या मोठ्या जावेला पूनमला म्हणाली.

"जावू दे काहीच बोलू नकोस बाई आतातरी, कुणी ऐकलं तर पुन्हा आपल्यालाच बोलणी खावी लागतील. आणि तसंही दोन तीन दिवसांचाच तर प्रश्न आहे. त्यामुळे शांत बसण्यातच सद्ध्या तरी शहाणपण वाटतंय मला." पूनम ने मग पल्लवीला समजावले. तसंही वेळीच शहाणपण सुचलं हे एक बरंच झालं होतं. आत्याबाईंच्या प्रयत्नांना थोडे तरी यश मिळाले होते हेच यावरून सिद्ध होत होते. तरी इतक्यात काही दोघींची खोड मोडेल असे वाटत नव्हते.

"पण काय झालं असेल ग नंदिनीला. कालपर्यंत तर ठणठणीत होती आणि आज असं अचानक."

"काही नाही ओ ताई, कामातून फक्त पळवाट काढण्यासाठी नाटक करत असेल आजारपणाचं. नवऱ्यासोबत फिरणं तर झालं दोन तीन तास. इकडे कामे आटोपली तोपर्यंत.आता बरोबर जेवायच्या वेळीच बरे घरी आले."

"काय माहित बाई, असेलही तसं. कारण तिने एकटीने थोडीच काल काम केलं.आपण सगळेच करत होतो की. बरी ती एकटीच आजारी पडली. अहो ह्या शहरातील बायकांचं असंच असतं. सगळं कसं अगदी नाजूक काम. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं एवढं सगळं होवूनही सगळ्यांचीच लाडकी कशी ओ ती?"

" जावू दे ग, असतं एक एखाद्याचं नशीब. म्हणून तर देव पण अशा लोकांना शिक्षा देतोच की. बघ सगळे सुख जरी तिच्या पायाशी लोळण घेत असले तरी देवाने अजून आईपणाचं सुख तिच्या झोळीत टाकलं नाही. आणि मग काय अर्थ आहे तिच्या अशा या आयुष्याला. त्यामुळे बोलून काहीच उपयोग नाही. देव बरोबर न्याय करत असतो."

आज नंदिनीच्या जावांनी तिच्याबद्दल वाईट विचार करण्याची जणू हद्दच पार केली होती.

नंदिनी काही तिच्या जावांची वैरी नाही तरी त्या तिच्याबद्दल इतक्या खालच्या थराला जावून विचार करतात त्या. पण म्हणतात ना सत्याचा न्याय हा उशीरा का होइना होतोच. फक्त आपले विचार आणि वर्तणूक प्रामाणिक असायला हवी. असेच काहीसे घडले होते नंदिनीसोबत.तिच्या प्रामाणिकपणाचे फळ बाप्पाने अखेर तिच्या पदरात टाकलेच नि आता तिचा मायेचा पदर आतूर झाला होता इवल्याशा त्या चिमुकल्या जीवावर मातृत्वरुपी प्रेमवर्षाव करण्यासाठी.

क्रमशः

आता जेव्हा कधी नंदीनीची आनंदाची बातमी तिच्या जावंना समजेल तेव्हा त्या नंदिनीचा आणखीच द्वेष करतील यात तिळमात्रही शंका नाही. पाहुयात पुढे आणखी काय काय घडतंय. त्यासाठी वाचत राहा, मायेचा पदर.

©® कविता वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all