Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

मायेचा पदर ( भाग १३)

Read Later
मायेचा पदर ( भाग १३)


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

काल दिवसभरात नंदिनीची खूपच दगदग झाली. आणि त्यामुळेच तिला रात्री खूपच त्रास झाला. आज सकाळी तर तिची तब्येत जास्तच बिघडली. त्यामुळे दवाखान्यात नेण्याशिवाय आता दुसरा पर्यायच नव्हता. त्यात गावाकडच्या वातावरणाची, तिथल्या कामांची तिला सवयच नव्हती. पण तरी तिने आवडीने सगळी कामे केली. कदाचित त्यामुळेच तिला कणकण आली असावी.

निशांतने मग तिला शेजारच्या गावात असलेल्या एका दवाखान्यात नेले. कारण गावात मोठ्या दवाखान्याची सोय नव्हती. त्यालाही खूपच टेन्शन आले होते. कारण एरव्ही थोडी जरी कणकण आली तरी थोड्या आरामाने देखील नंदिनीला बरे वाटायचे. पण आज मात्र तसे झाले नाही. त्यात गावचे वातावरण तिला सूट झाले नसावे. तो विचारच करत होता.

तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले.

"डॉक्टर काय झालंय नंदिनीला? टेन्शनचे काही कारण तर नाही ना."

"तसं टेन्शनचं कारण आहे देखील आणि नाही देखील."डॉक्टर थोडे कोड्यातच बोलले.

" म्हणजे मी समजलो नाही डॉक्टर."

"अहो त्या दोन महिन्याच्या गरोदर आहेत. त्यांना अशक्तपणा तर आहेच पण त्यांच्या पोटात पण दुखत होतं म्हणून आपण सोनोग्राफी करुन घेतली खात्रीसाठी. नशीब सोनोग्राफीचे डॉक्टर अचानक व्हिजिट साठी आले होते म्हणून शक्य झालं सगळं. नाहीतर मी दिल्या असत्या नॉर्मल गोळ्या औषधं. प्रेगनन्सी मध्ये द्यायच्या गोळ्या थोड्या वेगळ्या असतात. तुमचं नशीबच समजा ते.
पण एव्हाना तुमच्या किंवा त्यांच्या लक्षात यायला हवी होती ही गोष्ट. त्यात काल त्यांची खूप दगदग पण झाली त्या म्हणाल्या. एरव्ही असं कधी होत नाही पण या दिवसांत असा त्रास होणं नॅचरल आहे. पण त्यामुळे असं निष्काळजी राहिलं तर बाळ दगावण्याचे पण चांसेस नाकारता येत नाहीत. थोडी काळजी घ्यावीच लागते."

"डॉक्टर आमच्या लक्षात तरी कसं येणार ना. आम्ही तीन वर्षे झाली बाळासाठी ट्रीटमेंट घेत आहोत. पण काहीच प्रोग्रेस नाही. दवाखान्याच्या वाऱ्या करूनही कंटाळलो आम्ही. आता तर दोघांचेही बिझी शेड्युल त्यामुळे शक्य पण होत नाही रेग्युलर जाणं. त्यामुळे गेले काही दिवस ट्रीटमेंट बंदच आहे.  म्हणून मग आम्हीही दुर्लक्षच करत गेलो त्या गोष्टीकडे. दर महिन्याला थोडी जरी शंका आली की ती चेक करायची पण दरवेळी निराशाच व्हायची. आणि नेमकी ह्याच वेळी तिने कामाच्या व्यापात स्वतःकडे थोडे दुर्लक्षच केले.
तशी ती मला मागे एकदा म्हणाली पण होती,"पाळीची तारीख मिस झाली पण मी अजिबात चेक नाही करणार ह्यावेळी. करूनही काहीच उपयोग होत नाही म्हणाली. आणि मीदेखील सारं काही पाहता लाईटली घेतली ही गोष्ट. दरवेळी निराशा झाली की ती रडत बसायची. म्हणून मग मीही तिला जास्त फोर्स नाही केला. होईल तेव्हा होईल म्हटलं. आणि आधीच माहीत असतं तर आम्ही गावी आलोच नसतो."
निशांतने मग नंदिनीची सगळी हिस्टरी सांगितली डॉक्टरांना.

"अहो मग आता तर त्यांची खूपच काळजी घ्यावी लागेल. खूप प्रयत्नानंतर त्यांना प्रेगनन्सी राहिलीये. देवाचीच कृपा म्हणायचं. एवढं सगळं होवूनही सगळं ठीक आहे. अशा केसेसमध्ये दुर्लक्ष करुन अजिबात चालत नाही. आता अलमोस्ट दोन महिने होत आलेत आणि अजूनही एक दोन महिने काळजी घ्यावीच लागेल. एकदा तुम्ही तिकडे गेलात की सगळ्या टेस्ट, सोनोग्राफी वेळच्या वेळी करुन घ्या आणि शक्यतो कामातून थोडे दिवस ब्रेक घ्या त्यांना म्हणावं. जास्त धावपळ, जड वस्तू उचलणं हे सारं टाळणं खूप आवश्यक आहे. एरव्ही ठीक आहे पण त्यांची बाकीची हिस्ट्री पाहता काळजी गरजेची वाटते मला तरी. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच."

"हो नक्कीच डॉक्टर. आणि तसंही आमच्या घरचे सगळे जण खूप सपोर्टिव आहेत त्यामुळे  नंदिनीची पाहिजे तितकी काळजी सगळेच घेतील."

" ओके, मग नो प्रॉब्लेम."

"डॉक्टर तुम्ही नंदिनीला सांगितली का ही आनंदाची बातमी?"

"नाही, म्हणजे मी तरी नाही सांगितली. त्यांना खूपच त्रास होत होता. त्या काही ऐकून घेण्याच्या मुडमध्येच दिसत नव्हत्या. पण सोनोग्राफीच्या डॉक्टरांनी सांगितले असेल तर ते नाही मला माहीत. आणि सकाळपासून काहीच खाल्लेही नव्हते त्यांनी. म्हणून मग एनर्जी ड्रिंक दिलंय आता त्यांना आणि थोडा वेळ आराम करायला सांगितलाय."
तोपर्यंत तुम्ही ही औषध घेवून या. घरी गेल्यावर काहीतरी खायला द्या आधी त्यांना आणि लगेच औषधं द्या. त्याशिवाय बरं नाही वाटणार. आणि नारळ पाणी दिले तर उत्तमच. आणि तसंही हा असा त्रास होणं आता नॅचरल आहे. काहींना पाच सहा महिन्यापर्यंत होतो असा त्रास तर काहींना अगदी नऊ महिनेही अशक्तपणा, उलट्यांचा त्रास सुरुच राहतो. काही काहींना तर काहीच त्रास होत नाही. पण हे सगळं नॅचरल आहे त्यामुळे अति घाबरण्याचेही काही कारण नाही. फक्त शक्य तेवढी काळजी घेणं महत्त्वाचं."

डॉक्टरांनी सगळं सविस्तर समजून सांगितलं तेव्हा कुठे निशांतच्या जीवात जीव आला.

निशांतने मग औषधं आणली आणि बिल पेड करुन दोघेही दवाखान्यातून बाहेर पडले. एकंदरीत नंदिनीला ही गोष्ट माहीत नसावी असेच वाटत होते तिच्याकडे पाहून.

"नंदिनी एकदम सावकाश उतर पायरी." नंदिनीला आधार देत त्याने तिला दावाखान्याच्या त्या दोन तीन पायऱ्या उतरायला मदत केली."

"अहो खूप त्रास होतोय मला. अंग खूपच जड झालंय. पायांत गोळे आलेत असं वाटतंय. नेमकं काय झालंय ओ मला?  काळजीचं काही कारण तर नाही ना?"

" नाही ग, सांगतो चल. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता."

"टेन्शन नाही घ्यायचे म्हणजे?" नंदिनी विचारात पडली असे का म्हणाले हे? कोणता मोठा आजार तर झाला नसेल ना मला." पण पुढे काही बोलण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती.
"उगीच गावी आलो आपण, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास झाला." ती मनातल्या मनात विचार करत होती.

निशांतने मग तिला  गाडीत बसण्यास मदत केली. तोही मग गाडीत बसला.
नंदिनीचा हात हातात घेत प्रेमाने त्याने तिला जवळ घेतले.
"नंदिनी आज मी खूप म्हणजे खूपच आनंदात आहे." बोलतानाही निशांतच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. जी बातमी ऐकण्यासाठी त्यांचे कान आतूर झाले होते अखेर तो दिवस आज उजाडला होता.

"मी आजारी आहे आणि तुम्हाला आनंद झालाय?" तिच्या चेहर्यावर असंख्य प्रश्नांनी गर्दी केली.

"हो, तुला आजारच तसा झालाय. ऐकून तूही उड्या मारायला सुरुवात करशील."

"म्हणजे? काय झालंय मला नेमकं? प्लीज सांगा ना लवकर."

"नंदिनी, फायनली आपण आई बाबा होणार आहोत." एक मोठा सुस्कारा टाकत निशांत म्हणाला.

"काय...?" अंगात एकदम दहा हत्तींचे बळ संचारल्यागत नंदिनी जवळपास ओरडलीच.
"माझी मस्करी तर नाही ना करत तुम्ही ? तसं असेल तर प्लीज नका मला त्रास देवू. आधीच मला खूप त्रास होतोय. आणि तसंही सोनोग्राफी झाल्यावर मला डॉक्टर बोलले असतेच ना मग तसं. पण ते काहीच बोलले नाहीत."

"तू विचारलं का मग त्यांना.?"

" नाही, पण त्यांनी सांगायला हवं होतं ना, त्यांनी मला जेवढे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे दिली मी बस. आणि घाबरण्याचे काही कारण आहे का म्हटल्यावर ते नाही म्हणाले. मग पुढे मी कशाला काय विचारु ना?"

"बरं त्यांचं जावू दे, तुला वाटतं, मी तुझी ह्या बाबतीत मस्करी करील?"

"म्हणजे तुम्ही खरं बोलताय?"

डोळ्यांतील अश्रू निशांतच्या गालावर ओघळले. मान हलवत नजरेतूनच त्याने "हो" म्हटले. निशांतला इतके इमोशनल झालेले पाहून मग नंदिनीला देखील अश्रू अनावर झाले. दोघांसाठीही तो क्षण अतिशय आनंदाचा होता. एकमेकांचे अश्रू पुसत दोघांनीही मग भावनांना थोडा आवर घातला. एकमेकांना कडकडून मिठी मारावी नि हा आनंदाचा क्षण कायमस्वरूपी हृदयात साठवून ठेवावा असेच वाटत होते त्या क्षणी दोघांनाही. पण ती वेळ आणि जागा मात्र योग्य नव्हती.

नंदिनीने मग निशांतचा हात घट्ट पकडून क्षणभर डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाचे खूप आभार मानले. इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची दोघेही आतुरतेने वाट पाहत होते ती अशा पद्धतीने समोर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते त्यांना. पण खरंच, प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावीच लागते यात दुमत नाही. हे नंदिनी आणि निशांतला आता कळून चुकले होते.

इतक्यात निशांतचा फोन वाजला, आत्याबाईंनी मुलांना यायला इतका उशीर झाला म्हणून काळजीपोटी चौकशी करायला म्हणून फोन  केला होता. आता ही इतकी मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आत्याला सांगू की नको? हाच निशांत विचार करत होता.

क्रमशः

निशांत इतक्यात सांगेल का आत्याला किंवा घरातील इतरांना त्यांच्या आयुष्यातील ही इतकी मोठी गोष्ट? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "मायेचा पदर."

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//