मायेचा पदर ( भाग १२)

गावी गेल्यानंतर अचानकच नंदिनी आजारी पडते. त्यामुळे सगळेच चिंतेत पडतात.
कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

बाहेर पुरुष मंडळींच्या छान गप्पा रंगल्या होत्या. पण आता पोटानेही भुकेची आरोळी दिली. स्वयंपाक झाला की नाही हे पाहण्यासाठी नीरज आत आला.

नंदिनीला चुलीजवळ बसून भाकरी करताना पाहून त्याला खूपच नवल वाटले.
"हे काय पाहतोय मी वहिनी? चक्क नंदिनी वहिनी  चुलीवर भाकरी करतायेत. माय डियर वहिनी एकच मिनिट हा, आता पाहा इकडे, स्माईल प्लीज," म्हणत नीरजने नंदिनीचा भाकरी करताना एक छानसा फोटो घेतला. तिच्यासोबत आणि मालती काकुंसोबत त्याने सेल्फी देखील काढला.
लगेचच तो फोटो निशांतला पाठवला. लाडक्या बायकोला असं चुलीजवळ भाकरी करताना पाहून निशांत प्रत्यक्ष तिला पाहण्यासाठी धावतच आत आला. त्यालाही मग नंदिनी सोबत सेल्फी काढण्याचा मोह नाही आवरला.

"ग्रेट हा वहिनी, भारीच. आता शोभतेस खरी सामंतांची सून."

मुलांना असं आनंदी पाहून आत्याबाईंना गावी ट्रिप काढल्याचे खूपच समाधान लाभले.

तितक्यात नंदिनीचे सुरु असलेले कौतुक थोडीच ना तिच्या जावांना रुचणार होते. मोठी जावू अखेर बोललीच.

" नीरज भाऊजी, आम्ही रोजच करतो बरं का चुलीवर भाकरी. आमचे नाही असे कुणी फोटो काढत."

"रोज मरे त्याला कोण रडे." आत्याबाई पुन्हा एकदा बोलल्याच.
आत्याबाईच त्या, जणू ठरवूनच आल्या होत्या. काहीही झाले तरी सूनांना वठणीवर आणायचेच म्हणून.
आत्याबाईंनी मारलेला टोमणा पूनमलाच नाही तर सर्वांनाच समजला बरं का.

पण तेव्हढ्यात सुलभा काकूंनी विषय वाढायला नको म्हणून लागलीच तो बदलला.
"बरं चला, पल्लवी जेवढ्या भाकरी तयार आहेत तेव्हढ्या घ्या वाढायला. चल मी करते मदत तुला," म्हणत सुलभा काकू पुढे सरकल्या. पण तेवढ्यात पुनमने तिला खुणावले, तशी पल्लवी बोलली, नंदिनी तू वाढतेस का? उठ मी करते उरलेल्या भाकरी. तशीही तुला सवय नाही जास्त धुराची. पुन्हा तुलाच त्रास होईल."
ठरल्याप्रमाणे पुढील कामातून पळवाट काढण्याची पल्लवीची शक्कल आत्याबाईंना समजणार नाही असे थोडीच ना होणार होते. त्याही लगेचच बोलल्या,

"अरे बापरे लहान जावेची खूपच काळजी बाई तुम्हा दोघींनाही. आणि आता भाकरी जवळपास झाल्यातच जमा आहेत. आता काय गावजेवण घालायचं आहे का? अजून दोन तीन भाकरी केल्या की झालंच मग. तुम्ही दोघी जा बरं घ्या वाढायला." आत्याबाईंनी आता फर्मानच काढले. आता ह्या दोघी न वाढून सांगतीलच कोणाला.?

"आता बसा वाढत आणि भांडी गोळा करत. भाकरी करुन नंदिनीने जणू तीरच मारलाय मोठा. कित्ती ते कौतुक यालाही काहीतरी लिमिट आहे की नाही." दोन्ही जावा मग चरफडतच उठल्या नि पुढच्या कामाला लागल्या.

मुकाट्याने दोघींनीही मग ताटं करायला घेतली. मदतीला सुलभा काकू आणि आत्याबाई होत्याच तशा. आणि तसंही सगळीच कामे एकमेकींच्या मदतीनेच सुरु होती. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नव्हता. तरी दोन्ही सुनांना का कोण जाणे पण त्यांच्यावर अन्याय होतोय असेच वाटत होते.

आज मालती काकू मात्र मनातून खूप आनंदी होत्या. तसं पाहिलं तर हे काम याआधीच त्यांनी करायला हवं होतं. असं त्यांच्या मनाला क्षणभर वाटून गेलं. आज आत्याबाईंनी मात्र दोन्ही सुनांना बरोबर वठणीवर आणायचेच असा  जणू चंगच बांधला होता.

बोलता बोलता घरातील पुरुष मंडळींची जेवणं आटोपली देखील. सर्वांनी आज पाटवडी आणि रस्सा भाकरीवर मनसोक्त ताव मारला. जेवणाचे कौतुक करताना शब्दही कमी पडत होते आज सर्वांना.
मधुकररव आणि मालती काकूंच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच समाधान दिसत होते आज. खूप दिवसांनी असा एकत्र जेवणाचा आस्वाद साऱ्यांनीच घेतला. एरव्ही शांत असणारा सामंतांचा वाडा आज मात्र गजबजत होता. सगळेच जण सुट्टी अगदी मनसोक्त एन्जॉय करत होते.

सगळ्यांची जेवणं आटोपली. जेवणानंतरची भांडी, स्वयंपाकघर मग तीनही सुनांनी मिळून आवरले. नंदिनीला या सर्व कामांची सवय नव्हती तरीही ती आनंदाने सारं करत होती. पण आज थोडी जास्तच दगदग झाली होती तिची. त्यामुळे चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता.

निशांतला मात्र नंदिनीचा थकलेला चेहरा बघवेना.
"बस झालं आता अजिबात काहीच काम करायचे नाही," असे नजरेतूनच त्याने तिला खुणावले.

सगळ्यांसमोर त्याला तिच्यासोबत बोलताही येईना. म्हणून मग "बाहेर ये" म्हणून फक्त डोळ्यांनीच त्याने तिला इशारा केला आणि तो बाहेर ओट्यावर जावून थांबला. पाठोपाठ मग नंदिनीही बाहेर गेली.

" काय हे नंदिनी, आरशात बघ जरा. तोंड बघ किती सुकलंय. तुला नाही या अशा कामांची सवय मग कशाला उगीच दमलीस?"

"अहो पण बाकीचे सगळे काम करत असताना मी आराम तरी कसा करणार? मी पण या घरची सूनच आहे ना. मग फक्त माझ्यासाठीच वेगळा नियम कसा असेल?"

"अगं पण झेपेल तेवढेच करायचे ना? पुन्हा गेल्यावर रूटीन सुरु होईल. तेव्हा आजारी पडलीस तर? आणि तसंही तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. गोळी घेतेस का एखादी?"

"नाही नको, तुम्हाला माहितीये ना मी जास्त गोळ्या खात नाही. पण आज काहीतरी वेगळंच होतंय अहो. एरव्ही काम करुन देखील नाही एव्हढा थकवा जाणवत, पण आज का कोण जाणे काहीतरी वेगळं वाटतंय खरं."

"म्हणूनच म्हणतोय, गोळी घे सकाळपर्यंत बरं वाटेल. पाहिजे तर सकाळी डॉक्टरकडे जावून येवू."

" पाहू आता आराम करते. कधी एकदा आडवी होतीये असं झालंय."

"बरं चल झोप जावून. बाकीचे काही लवकर झोपतील असं वाटत नाही. त्यामुळे आतल्या खोलीत मुलांशेजारी जावून पड. वहिनींना विचार कुठे झोपायचे त्या सांगतील. आणि रात्री काही त्रास झालाच तर कॉल कर. मी आहे इथेच."

" हो, आणि तुम्हीही जास्त जागत बसू नका. नाहीतर झोप पूर्ण नाही होणार आणि मग नेहमीप्रमाणे डोकेदुखीचा त्रास व्हायचा."

आज का कोण जाणे पण दोघांनाही मनापासून एकत्र राहावंसं वाटत होतं, त्यात नंदिनीचे थोडे जरी दुखायला लागले की निशांतच्या सोबत असण्यानेदेखील तिचा अर्धा अधिक आजार बरा होत असे. पण सगळे असताना आज तरी निशांतला तिच्यासोबत राहणं शक्य नव्हतं. दोघांनाही एकमेकांच्या भावना समजत होत्या पण इलाज मात्र नव्हता.

नंदिनी मग खूपच थकल्यामुळे लगेचच झोपायला निघून गेली. बाकीचे सगळेच गप्पांमध्ये रंगून गेले होते. जुन्या आठवणीत सारा भूतकाळ पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवला.

निशांतने झोपेपर्यंत चार ते पाच वेळा नंदिनीला डोकावले. पण ती मात्र गाठ झोपली होती. शेवटी झोपताना तिला ताप तर आला नसेल ना याची खात्री केली. हळूच जावून तिच्या कपाळावर हात ठेवला. तशी ती दचकून जागी झाली.
"अगं झोप झोप, सॉरी माझ्यामुळे तुझी झोपमोड झाली."

"असं काही नाहीये, पण बरं झालं तुम्ही आलात, मला वाटलं आता डायरेक्ट सकाळीच भेटाल. झोपा ना इथेच. का कोण जाणे पण आज राहून राहून तुमच्या कुशीत शिरुन झोपवसं वाटतंय."

"नंदिनी, मलाही वाटतंय ग, आजतरी तुझ्या जवळ थांबावं. पण सगळी पुरुष मंडळी बाहेर झोपणार आहेत ना, मग मी एकटा असं तुझ्याजवळ झोपणं, बरं नाही वाटत ग. त्यात पल्लवी वहिनी आणि पुनम वहिनी तुलाच पुन्हा काहीबाही ऐकवतील. आताही कोणाचं लक्ष नव्हतं म्हणून मी येवू शकलो. कुणी पाहायच्या आता मला बाहेर जायला हवं.
बाकीचे सगळे गप्पांत इतके हरवून गेलेत की कोणाचंच लक्ष नाही म्हणून बरं झालं नाहीतर म्हणायचे बायकोशिवाय याला क्षणभरही करमत नाही."

" म्हणू देत मला नाही काही फरक पडत. पण थांबा ना, थोडा वेळ तरी."

"अगं राणी समजून घे ना. तू झोप शांत. काळजी घे. मी आहे बाहेर. काही वाटलं तर msg नाहीतर कॉल कर."
नंदिनीने मात्र निशांतचा हात घट्ट धरुन ठेवला होता. तिच्या हातातून स्वत:चा हात सोडवून घेताना त्याच्याही जीवावरच आले होते. पण त्याचाही नाईलाज होता.

अलगद आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवत, हलकेच त्याने मग तिला किस केले. इच्छा नसतानाही तो खोलीच्या बाहेर पडला.

"दुसऱ्या दिवशी मात्र नंदीनीला उठूच वाटेना. प्रचंड थकवा जाणवत होता तिला. हातपाय ठणकत होते. असं नेमकं का होतंय? हे तिलाही समजेना. बऱ्यापैकी कणकण जाणवत होती तिला. पित्ताचा त्रासही होत होता."

मालती काकूंनी मग तिला बरं वाटावं म्हणून आल्याचा गरम गरम चहा  आणून दिला. पण नंदिनीची मात्र चहा पिण्याची इच्छाच  होइना. त्यांच्या समाधानासाठी तिने घोटभर चहा घेतला. पण तोही काही पचला नाही.

प्रवास, दगदग यामुळे पित्त झाले असेल. शेवटी जवळच्याच एका दवाखान्यात निशांत नंदिनीला घेवून गेला.

क्रमशः

नेमकं काय झालं असेल नंदिनीला? दगदग झाल्यामुळे आलेले आजारपण असेल की आणखी काही? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all