मायेचा पदर ( भाग ११)

शहरातील चुलत सासू सासरे आणि त्यांची फॅमिली गावी आलेले गावच्या सुनांना जास्त रुचलेले नव्हते.


कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आज सकाळपासूनच मधुकरराव खूपच आनंदीत होते. खूप दिवसांनी त्यांचा लहान भाऊ सहकुटुंब सहपरिवार गावी येणार होता. एकदा का वय होत चाललं की मग खऱ्या अर्थाने आपल्या माणसांची, हक्काच्या नात्यांची खरी ओढ लागते. आणि अशावेळी ही नाती सोबत असली की मग आयुष्य अगदी सार्थकी लागल्याचे समाधान काही औरच.
मधुकररावांना आज दुपारची झोपही नकोशी झाली होती. त्यांचं आपलं सारखं आत बाहेर आत बाहेर सुरु होतं.

तेवढयात त्यांची मोठी सून पुनम बोललीच, तात्या जरा एका ठिकाणी शांत बसा की, कशाला सारख्या एरझऱ्या मारताय? मी आत्ताच फरशी पुसलिये. थोडी सुकू द्या तरी."
मालतीताईंना मात्र सुनेची ही गोष्ट खटकली. एरव्ही तिचं असं उलट सुलट बोलणं सुरुच असायचं. पण आज जरा अतीच झालं. पण शब्दाने शब्द नको वाढायला म्हणून त्या नेहमी गप्प बसत.

"चला ओ आपण बाहेर जावून बसूयात. बाहेर झाडाखाली छान सावली आहे. सुकू द्या फरशी. आपल्या सुनेने खूप मेहनत घेवून पुसलीये. आपल्या पायाने उगीच घाण नको व्हायला."

दोघेही मग बाहेर आंब्याच्या झाडाखाली असलेल्या बाजेवर जावून टेकले.

थोड्याच वेळात सगळेजण गावी पोहोचले. भावाला आणि त्याच्या कुटुंबाला असं एकत्रित आणि हक्काने गावी आलेलं पाहून मधुकररावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यात लाडकी आणि एकुलती एक बहिण आक्काही होती सोबत मग तर आनंदाला अगदी उधाणच आले. नंदिनीदेखील लग्नानंतर आज पहिल्यांदाच तिच्या मूळ गावी म्हणजे सासरी आली होती. निशांत आणि नीरज लहान असताना सुट्टीत दोन चार दिवस तरी आत्यासोबत यायचे गावी. आज पुन्हा एकदा बालपणीच्या त्या साऱ्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आजी आजोबा देखील होते.
आजोबांच्या आणि काकांच्या मागेमागे शेतात हिंडतानाची सारी मज्जा दोघेही खूप मिस करत होते आजही.

गाडीतून उतरताच आत्याबाई भावाला म्हणाल्या, "असे बाहेर का रे बसलात दोघेही? सुनांनी हाकलले की काय दोघांनाही?"

"आत्याबाई काय हे?" सुलभा काकू हळूच नंदेच्या कानात बोलल्या.

"अगं हो, त्या करुच शकतात तेवढं. उगीच माझा भाऊ आणि भावजय दोघेही खमके आहेत म्हणून आणि आजही जबाबदारीने सगळी कामं करतात म्हणून दोन वेळचं खायला मिळतंय त्यांना, नाहीतर कधीच बाहेरचा रस्ता दाखवला असता त्यांना."

" अगं आक्का तसं काहीच नाही ग, तुमचीच वाट पाहत बसलो होतो आणि तसंही घरात खूप उकडतंय."

" सूनांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे आता तरी बंद कर रे बाबा."

"आक्का जावू दे ना, आल्या आल्या नको तो विषय. तुम्ही चला ना आत."

सर्वजण मग घरात आले. आल्या आल्या सगळी चिलीपिली काकी काकी करत नंदिनीला येवून बिलगली. याआधी एकदाच झालेली भेट इतक्या दिवसांनी देखील मुलांनी बरोबर ध्यानात ठेवली होती. नंदिनीलादेखील त्यांना भेटून खूपच आनंद झाला.

दोन्ही सुना मग सर्वांसाठी पाणी घेवून आल्या. घरात आल्याबरोबर नंदिनीने तात्या आणि मालतीताईंना तसेच दोघी जावांना वाकून नमस्कार केला. मग सर्व मोठ्या मंडळींचादेखील तिने आशीर्वाद घेतला. नंदिनीने  सर्वांना नमस्कार केला हे पाहून पुनम आणि पल्लवीलादेखील कळून चुकले आणि मग त्यांनीदेखील सर्वांना नमस्कार केला.

दोन्ही सूनांनी मिळून मग सर्वांसाठी सरबत बनवले. नंदिनीनेही त्यांना मदत केली. थोडा वेळ आराम करुन मग सर्वचजण शेतात फेरफटका मारायला गेले.

बालपणीचे मित्र आज पुन्हा नव्याने भेटले नीरज आणि निशांतला. दोघांचीही प्रगती पाहून सगळ्यांनाच त्यांचे कौतुक वाटत होते. जे जे लोक भेटतील त्यांची ओळख करुन देत होता निशांत नंदिनीला. त्याबरोबरच बालपणीच्या अनेक आठवणीही सांगत होता. तिलाही त्यांच्या गमती जमती ऐकताना खूपच मजा येत होती. त्यात असं शेतात फिरण्याचा अनुभव तिला फारसा नसला तरी त्या वातावरणात ती अगदीच रमून गेली. हिरवीगार झाडे, टोमॅटो, भोपळा, मिरची, वांगी या सर्व भाज्या ती एरव्ही बाजारातच पाहायची. आज मात्र सारं काही प्रत्यक्ष पाहताना तिला या साऱ्याचे खूपच कुतूहल वाटत होते. तिचा आनंद तिच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता.

"सूनबाई मात्र लाखात एक शोधलीस ग सुलभा," म्हणत आजूबाजूच्या बायका नंदीनीचे कौतुक करत होत्या.
"आता धाकट्याचे पण  करुन टाक लग्न. डॉक्टर झाला ना तो. एवढीशी होती पोरं तेव्हा यायची गावी. आता किती मोठे झाले ग दोघेही. तात्यांकडून आणि मालतीकडून समजत असते तुमची खुशाली. पण केलेल्या कष्टाचे चीज झाले बघ. जायच्या आधी मारा एखादी चक्कर घरी, सगळेच जण या. ह्या नव्या पोरींना जुनी नातीही समजायला पाहिजेत ना."

"हो हो नक्की येवू." सुलभा काकूंनादेखील सर्वांचे प्रेम पाहून क्षणभर भरुन आले. खरंच त्यावेळी केलेल्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले होते.

शेतात फेरफटका मारुन सगळेच घरी परतले. दोन्ही सुना सायंकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या.
"ताई मलाही सांगा, काय मदत करु मी." नंदिनीने मोठ्या जावेला विचारले

"अगं कुकर झालाय आता. भाजी टाकतील आई, एवढ्या माणसांचा अंदाज नाही येणार आपल्याला. तू भाकरी करायला तेवढी मदत कर पल्लवीला."

आत्याबाईंचे सूनांवर बारीक लक्ष होते. कोण बरोबर काम करतंय? कोण कामे टाळतय? कोण स्वतःची जबाबदारी इतरांवर ढकलतंय? एका जागी बसून त्या सारं काही निरीक्षण करत होत्या.

"बरं," म्हणत नंदिनी जावेच्या मागून आत गेली. स्वयंपाक घराला लागूनच एक पडवी होती. थोरल्या सासूबाई चूल पेटवत होत्या. चूल पाहून तिला तर नवलच वाटले. एरव्ही चूल फक्त तिने टीव्हीतच पाहिली होती. आणि पाहिली असली तरी अगदीच तिच्या लहानपणी. त्यामुळे तिला या साऱ्याचे खूपच कुतूहल वाटत होते.

"काकू मलाही शिकवा ना चूल पेटवायला." नंदिनी थोरल्या सासूबाईंना म्हणाली

"नंदिनी तुला नाही जमणार ते, त्यासाठी त्याला प्रॅक्टिसच असावी लागते." थोरली जावू लागलीच बोलली

"अगं मग नंदिनीला तर चुलीची अजिबात सवय नाही, मग तिला चुलीवरच्या भाकरी तरी कशा जमतील? त्यालाही प्रॅक्टिसच लागणार ना. हो ना पुनम. मग एक काम करा तुम्ही दोघीच का करत नाहीत भाकरी? ती करेल बाकीचं काहीतरी. आणि तुम्ही दोघी तर खूपच प्रॅक्टिस करुन आला होतात सासरी येताना हो ना?"

"आत्या तसं नाही, पण शिकेलच ना तीही आणि आम्ही आहोतच की मदतीला."
आत्याबाईंचा टोमणा पूनमला बरोबर समजला होता.

"नंदिनी ये इकडे मी शिकवते तुला चूल पेटवायला म्हणत थोरल्या सासूबाईंनी मग तिला चूल पेटवायला शिकवले. त्यानंतर दोघी जावांनी तिला चुलीवर भाकरी करायला देखील शिकवले. तिनेही अगदी काही वेळातच चुलीवर भाकरी करायला शिकून घेतले. नंदिनीला देखील काहीतरी नवीन शिकल्याचा खूपच आनंद झाला.

"नंदिनी हे असं कधीतरी करताना खूप मजा वाटते. पण तेच काम रोज रोज करताना खूपच कंटाळा येतो. आमच्यासारखी तुला रोजच जर ही कामे करायला लागली तर, दोन दिवसांतच कंटाळाशील."

"अगं पण तिला का हे सगळं करायला लागेल? ती कायमची नाही राहणार इथे." आत्याबाईं पुन्हा खोचकपणे बोलल्या

"आपलं सहजच म्हणाले मी आत्या, शहरातील मुली गावच्या ह्या वातावरणात नाही निभावू शकत म्हणून मनात विचार आला तसा. बाकी काही नाही."

"हो पण तुम्ही नंदिनीला कमी समजू नका बरं, तुम्हाला दोघींनाही अगदी पुरुन उरेल ती. तिच्यासाठी काहीच अवघड नाही. चार दिवस तुमच्यासोबत राहिली की लगेच शिकेल ती सगळं. पण तुम्हालाही तिच्यासारखं सगळ्यांची मने जपणं आणि दिवसभर ऑफिसात जावून जबाबदारीने काम करणं झेपेल का? तेवढं पाहा आधी. आणि प्रत्येकात काही चांगले तर काही वाईट गुण असतातच की. जास्त लांब नका जावू, स्वतःजवळच पाहा."आत्याबाई दोन्ही सुनांना बोलण्याची एकही संधी सोडत नव्हत्या.

आत्याबाई वारंवार नंदिनीची बाजू घेत आहेत हे पाहून दोघी जावांना नंदिनीचा आता खूपच राग येत होता. पण नंदिनी मात्र आज पहिल्यांदा चुलीवर भाकरी करण्याचा आनंद घेत होती. त्यांच्या कोणाच्या बोलण्याकडे तिचे जास्त लक्षही नव्हते. मालती काकूंना नंदीनीचा हा गुण खूपच आवडला.

"खरंच इतरांच्या बोलण्याकडे कान देण्यापेक्षा आपण आपलं काम व्यवस्थित केलं तर आपलीच प्रगती होते हे ह्या दोघींनाही जर वेळीच समजलं तर घरातील कलह नक्कीच मिटतील. देवा ह्या दोघींनाही थोडीशी बुद्धी दे रे बाबा." असं मनातल्या मनात म्हणत मालती काकूंनी चुलीतील लाकडे पुढे सरकवली.

तिकडे सुलभा काकू आणि पल्लवीने म्हणजेच धाकट्या सुनेने मिळून भाजीची तयारी केली. पाटवडीचा बेत छानच जमला होता आज. सुलभा काकूंनी आज स्वतःच्या हाताने पाट्यावर मसाला वाटला होता. त्यावेळी त्यांना त्यांच्या लग्नानंतरचे दिवस आठवले. जुन्या आठवणी मग पल्लवीला सांगताना वेळ कसा गेला हे त्यांनाही समजले नाही. इकडे पाटवडी आणि रस्सा झालाही तयार. सर्व आवरुन मग सुलभा काकू पडवीत आल्या.

"अगं नंदिनी छानच जमल्यात बाई चुलीवरच्या भाकरी." सुलभा काकूंनीही मग सुनेचे कौतुक करायला मागे पुढे पाहिले नाही.

"नंदिनी तू खूपच लकी आहेस बाई, असं सगळ्याच सूनांच्या नशिबी नसतं सासुकडून कौतुक ऐकायला मिळणं." पुन्हा एकदा पूनम मधेच बोलली

सुनेच्या या बोलण्यावर मालती काकू तरी आता काय बोलणार होत्या. तसंही त्या नेहमी गप्प बसण्यात शहाणपण मानायच्या.
पण आत्याबाई होत्याच की, त्या थोडीच ना त्यांच्या भावजयीचा हा अपमान सहन करणार होत्या.

"अगं पण पुनम सूनाही तशा असाव्या लागतात ग त्यासाठी. प्रत्येक वेळी नंदिनीशी नका स्वतःची तुलना करु. आणि पहिली गोष्ट म्हणजे आधी स्वतःचे विचार बदला. तिच्याकडे ते आहे आणि माझ्याकडे का नाही म्हणत रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आधी आनंद मानायला शिका. सारखं सारखं नशिबाला दोष देणं बंद करा आधी. आणि तसंही काय कमी आहे ग तुम्हाला? सासू मान वर करून बोलणारी नाही. की आयते बसून खायचे, सासू सासार्यांना दोघांनाही माहीत नाही, तरी पण असं सारखं सारखं टोमणे देणं योग्य आहे का ग?"

आता आत्यापुढे बोलण्याची दोघींचीही हिम्मत नव्हती.

"बरं झालं आत्या तू बोललीस. किती वेळा सांगितलंय आम्ही त्यांना पण नाही त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं नेहमी. बाकी सगळे चुकीचे असतात त्यांच्या नजरेत. दोन्ही मुलांनी मग आत्याच्या बोलण्याला दुजोरा देत आपापल्या बायकांनाच चुकीचे ठरवले.

क्रमशः

आत्याबाईंच्या बोलण्याने आणि समजवण्याने दोन्ही सूना येतील का वठणीवर? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "मायेचा पदर".

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all